' अंगावर काटा आणणारी चित्तथरारक कहाणी : एअर इंडिया “IC 814” विमान अपहरण… – InMarathi

अंगावर काटा आणणारी चित्तथरारक कहाणी : एअर इंडिया “IC 814” विमान अपहरण…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

अटलजी पंतप्रधान असताना, त्यांच्या सरकारने काश्मिरी फुटीरतावाद्यांना बिलकुल भिक न घालण्याचा निर्णय घेतला होता.

अतिशय कठोरपणे काश्मीरप्रश्नावर काम सुरु असताना, ‘हर्कातुल मुजाहिदीन’च्या (HUM) दहशतवाद्यांनी भारतीय प्रवाशांनी भरलेल्या विमानाचे अपहरण केले.

तब्बल आठ दिवस या अतिरेक्यांनी भारतीय नागरिकांच्या प्राणास वेठीस धरून आपल्या मागण्या मान्य करून घेतल्या. त्यावेळी विविध पत्रकारांनी या घटनेवर एकेरी भाष्य केले होते, मात्र नक्की काय व कसे घडले होते याचा लेखा-जोखा या लेखामध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

दिनांक २४ डिसेंबर, १९९९ रोजी इंडिअन एअरलाईन्स चे विमान काठमांडू मधून दिल्ली येथे निघाले. या विमानामध्ये १७८ प्रवासी आणि ११ विमान कर्मचारी होते.

हे विमान भारतीय हद्दीमध्ये आले असता पाच अतिरेक्यांनी पूर्ण विमानावर ताबा मिळवला. त्या पाच जणांकडे स्फोटके आणि हत्यारे होती.

अपहरण केलेले विमान सरळ लाहोरला न्यावे अशी वैमानिकास आज्ञा केली असता, वैमानिकाने ‘इंधनाची कमतरता असून, त्यामध्ये लवकरात लवकर इंधन भरण्याची गरज आहे’ असे सांगितले.

 

kandahar-hijacking-inmarathi02
herald.dawn.com

तिकडे लाहोरमध्ये पाकिस्तानी शासनास या परिस्थीची कल्पना आली. नुकतेच कारगिल युद्ध होवून गेले होते आणि अशा वेळेस भारतामधून अपहरण केलेले विमान जर पाकिस्तानी जमिनीवर उतरवू दिले तर पाकिस्तानाला आंतरराष्ट्रीय पातळीवर फार मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले असते.

या सर्व परिस्थितीचा विचार करता पाकिस्तानी सरकारने सदर विमानास लाहोरमध्ये उतरण्यास मनाई केली.

या सर्व कारणांमुळे दहशतवाद्यांनी विमान अमृतसरला थांबवून इंधन भरून घेण्याचा निर्णय घेतला. दरम्यान अतिरेक्यांनी नुकत्याच लग्न झालेल्या प्रवासी दाम्पत्याची, श्री. रुपीन आणि श्रीमती रचना कत्याल यांची ताटातूट केली आणि रुपीन यास भोकसून ठार मारले. बिचाऱ्या रचनाला तर पुढील आठ दिवस तिचा नवरा जिवंत आहे की नाही हे माहित देखील नव्हते.

भारत सरकार या सर्व घडामोडींच्या धक्क्यातून सावरू शकले नाही. अचानक घडलेल्या घटनांना कसे हाताळावे, निर्णय कुणी आणि कसे घ्यावे आणि मुख्यतः घेतलेल्या निर्णयांची जबाबदारी कशी घ्यावी असा विचार करून सर्वजण माननीय पंतप्रधान अटलजींसाठी थांबले होते.

दरम्यान अटलजी शासकीय कामानिमित्त दिल्लीबाहेर गेले होते आणि नेमक्या या घडामोडी झाल्या तेव्हा त्यांचे परतीचे विमान निघाले होते.

त्या काळात आजसारख्या तांत्रिक सुविधा उपलब्ध नसल्याने अटलजींना याबाबत माहिती देता येणे शक्य नव्हते.

वाजपेयींचे विमान दिल्ली विमानतळावर उतरले असता, राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी ब्रजेश मिश्रा धावपट्टीजवळ थांबले होते. लगेचच अटलजींच्या समवेत सर्व अधिकारी, परराष्ट्र मंत्री जसवंत सिंग, अडवाणीजी आदि सर्व लोकांची बैठक सुरु झाली आणि विमान अमृतसरला इंधन भरण्यास उतरवल्याची बातमी आली.

 

atal-bihari-vajpayee-inmarathi09
dnaindia.com

अमृतसरमधील विमानतळावर विमान उतरवण्यात आले आणि दहशतवाद्यांनी तेथील अधिकाऱ्यांना इंधन भरण्यास फर्मावले. विमानतळावर एकच गोंधळ उडाला. एका व्यक्तीची हत्या झाली असल्याने जो तो जण स्वतःला वाचवण्यासाठी पळू लागला. अशा संकटसमयी प्रसंगावधान राखण्यास सर्वजण कमी पडले.

दिल्लीवरून जसवंत सिंग फोन वर फोन करीत होते, ओरडून ओरडून सांगत होते की, काहीही करून ते विमान थांबवा.

त्यांनीतर असे देखील सांगितले की,

विमानाच्या धावपट्टीवर पेट्रोल किंवा सामानाचा मोठा ट्रक किव्वा काही मोठ्ठी वाहने आणून लावा, जेणेकरून अजून थोडा वेळ विमान थांबवता येईल.

परंतु, तेथील कुणीही शांतपणे विचार करून निर्णय घेतले नाही. आपल्या सरकारला माहित होते की, जर विमान भारताच्या हद्दीबाहेर गेले तर परिस्थिती अतिशय बिकट होईल. परंतु अशा अकल्पित घटनेला सामोरे जाण्यासाठी काहीही विशिष्ट व्यवस्था नसल्यामुळे आपली प्रणाली समर्थपणे तोंड देण्यास कमी पडली.

अर्ध्या तासातच दहशतवाद्यांना भारतीय हद्दीमध्ये थांबण्याचा धोका जाणवला व भारतीय सुरक्षा व्यवस्थेने काहीही करायच्या आधीच विमान अमृतसरमधून लाहोरला रवाना झाले होते. राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवान, दिल्लीहून तडक निघाले, परंतु ते पोहोचण्या आधीच विमान अमृतसर वरून निघाले होते.

हे विमान लाहोरला इंधन भरण्यास उतरवण्यात आले असता, पाकिस्तानी शासनाने त्यांना इंधन भरताक्षणी पाकिस्तानच्या हद्दीबाहेर जाण्यास सांगितले. बाळकृष्ण अडवाणी आणि जसवंत सिंग यांनी पाकिस्तानशी संपर्क साधून त्या विमानास थांबवण्याची विनंती केली, परंतु पाकिस्तानने हात झटकले.

इथे भारतामध्ये प्रसारमाध्यमे आणि जनतेने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरायला आणि सरकारविरोधी आवाज उठवायला सुरुवात केली. आधीच अनपेक्षित घटनांनी बावचळलेल्या आणि घाबरलेल्या सरकारवर मोठ्या प्रमाणात दबाव आणण्यास सुरुवात झाली.

 

kandahar-hijacking-inmarathi
herald.dawn.com

इंधन भरल्यानंतर विमान दुबईला नेण्यात आले. त्या-पाठोपाठ राष्ट्रीय सुरक्षा दलाचे जवान विमानाने दुबईला पोहोचले. त्यावेळी गल्फ देशांमध्ये अमेरिकेचा फार मोठा दबदबा होता आणि भारत-अमेरिकेचे आपापसातील संबंध चांगले असल्याने परराष्ट्रमंत्र्यांनी अमेरिकेशी बोलण्यास सुरुवात केली.

राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या जवानांना दुबईमध्ये उतरलेल्या विमानावर कारवाई करून प्रवाशांना सोडवता यावे यासाठी परवानगी हवी होती. अशा वेळी अमेरिकेने देखील स्वार्थ पहिला.

जवानांना विमानतळावर उतरण्याची परवानगी नाकारण्यात आलीच, परंतु वाटाघाटी करण्यासाठी भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना देखील विमानतळावर जाण्यास मज्जाव करण्यात आला.

अमेरिकेच्या राजदूतास मात्र विमानाजवळ जाऊन दहशतवाद्यांशी बोलण्यास परवानगी मिळाली. याचे फलित असे झाले की, काही लोकांना सोडण्याच्या बदल्यात, अतिरेक्यांना इंधन भरून सुरक्षितपणे दुबईबाहेर जाण्याची परवानगी मिळाली.

त्यामुळे दहशतवाद्यांनी २७ लोकांना आणि मृत रुपीनच्या शरीरास विमानाबाहेर नेण्याची परवानगी दिली.

कंदाहार येथील तालिबानी राजवटीने या दहशतवाद्यांना आसरा दिला. विमान कंदाहारला पोहोचल्यानंतर त्यांनी भारताशी वाटाघाटी सुरु केल्या. या सर्व वाटाघाटींमध्ये तालिबानने मध्यस्थी करण्यात पुढाकार घेतला. भारताकडून विवेक काटजुंच्या अधिपत्याखाली एक गट चर्चा करण्यास पाठवण्यात आला.

दहशतवाद्यांमध्ये ‘जैश- ए – मोहम्मद’ या अतिरेकी संघटनेचा संस्थापक ‘मौलाना मसूर अझहर’ चा सख्खा भाऊ होता. हे तिघेही पाकव्याप्त काश्मीर मधील रहिवासी असून, त्यांचा उद्देश्य भारतीय तुरुंगात बंदिस्त असलेल्या ३६ दहशतवाद्यांना सोडवणे हा होता. त्यांनी भारतासमोर २ मागण्या ठेवल्या.

पहिली म्हणजे भारताने ३६ अतिरेक्यांना सोडावे, आणि २०० दशलक्ष डॉलर रक्कम द्यावी.

 

kandahar-hijacking-inmarathi03.jpg
huffingtonpost.in

 

भारत सरकारने ही मागणी अमान्य केलीच, त्याचसोबत तालिबानी पुढाऱ्यांनी दहशतवाद्यांना योग्य त्याच मागण्या मागण्यासाठी तंबी दिली. शेवटी भारताने तीन निर्दयी दहशतवाद्यांना सोडावे यावर वाटाघाटी संपल्या. या तीन दहशतवाद्यांमध्ये भारतीय संसदेवर हल्ला करवणारा आणि ‘जैश- ए – मोहम्मद’ या अतिरेकी संघटनेचा संस्थापक ‘मौलाना मसूर अझहर’ होता.

त्याचबरोबर अहमद ओमार सईद शेख होता, जो पाश्चिमात्य देशातील प्रवाशांचे अपहरण करण्यामुळे अटकेत होता.

या अहमद ओमार सईद शेखने १९९९ मध्ये सुटल्यानंतर अमेरिकन पत्रकार डॅनिअल पर्ल याची हत्या केली आणि तो अमेरिकेमध्ये ११ सप्टेंबरला झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार होता.

आणि तिसऱ्या दहशतवाद्याचे नाव ‘मुश्ताक अहमद झार्गार’ असून त्यानंतर त्याने काश्मीर मधील अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली.

१६९ लोकांचा जीव वाचवण्यासाठी आणि अजून काहीही पर्याय नसल्यामुळे भारतीय सरकारने या तीन अट्टल गुन्हेगारांना सोडण्याचा निर्णय घेतला.

स्वतः जसवंत सिंग या तिघांना आपल्यासोबत घेऊन कंदाहारला गेले. त्यानंतर या १६८ भारतीय नागरिकांना घेऊन आपले मंत्री आणि वाटाघाटीस गेलेले अधिकारी, तालिबान क्षेत्रामधून सुखरूप भारतात परतले.

तालिबानने या आठ दहशतवाद्यांस दहा तासांच्या आत तालिबान क्षेत्रातून बाहेर पडण्यास सांगितले, आणि अशा प्रकारे अतिशय भीषण घटनेचा शेवट झाला.

 

kandahar-hijacking-inmarathi01
hwnews.in

 

यानंतर भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने अटलजींच्या सरकारवर अतिशय मोठ्या प्रमाणावर हल्ला केला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ‘सरकारने या लोकांच्या जीव वाचवण्याच्या बदल्यात ३ अट्टल दहशतवाद्यांना सोडलेच कसे?’

परंतु परिस्थितीचा अभ्यास केल्यावर कळून येते की, सरकारने अतिशय मुत्सद्दीपणे १८८ भारतीय नागरिकांचा जीव वाचवला आहे.

ज्या वेळेस कुठलाही पाश्चिमात्य देश मदत करीत नव्हता आणि विमान तालिबानी अतिरेक्यांच्या प्रदेशामध्ये उतरवले होते, अशा वेळी मुत्सद्दीपणे वाटाघाटी करून, त्यांच्या मागण्या कमी करण्यास त्यांना मजबूर करणे आणि आपल्या लोकांचे प्राण वाचवणे जास्त महत्वाचे होते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?