' …म्हणून मग लिटल मास्टर गावसकरांनी डावखुरी फलंदाजी केली होती! – InMarathi

…म्हणून मग लिटल मास्टर गावसकरांनी डावखुरी फलंदाजी केली होती!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

उजव्या हाताने कामं करणारे आणि डाव्या हाताने काम करणारे असे दोन प्रकारचे लोक आपण आजूबाजूला बघत असतो. एखाद्या व्यक्तीला डाव्या हातात का जास्त शक्ती असते आणि तो इतरांसारखा उजव्या हाताने का लिहू शकत नाही? किंवा क्रिकेटची बॅटिंग, बॉलिंग करू शकत नाही? याचं नेमकं उत्तर विज्ञानाकडे सुद्धा नाहीये.

अमिताभ बच्चन हे भारतातील डावखुऱ्या व्यक्तींपैकी सर्वात लोकप्रिय उदाहरण म्हणता येईल. डावं किंवा उजवं हा फक्त व्यक्तीच्या सवयीचा भाग आहे, क्षमतेचा नाही हे कित्येक लोकांनी वेळोवेळी सिद्ध केलं आहे.

 

abhishek and amitabh bachchan inmarathi

 

काही लोकांना दोन्ही हाताने सर्व काम करण्याची कला सुद्धा अवगत असते. ही पण एक कमालच आहे. कारण, हे वाटतं तितकं सोपं नाहीये. साधं उदाहरण द्यायचं झालं तर, उजव्या हाताच्या बाजूला स्टेअरिंग असलेली कार चालवण्याची सवय असलेल्या व्यक्तीला डाव्या हाताला स्टेअरिंग असलेली कार चालवणं सोपं नसतं. कारण, शरीराला एक सवय लागलेली असते.

विशेषतः एखादा खेळ खेळतांना उजव्या हाताने आणि डाव्या हाताने सुद्धा खेळता येणे, हे त्या खेळाडूचं त्या खेळावर असलेलं प्रभुत्व दर्शवत असतं. भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी एका रणजी सामन्यातून आपलं खेळावरचं प्रभुत्व सिद्ध केलं होतं.

 

sunil gavaskar inmarathi
mid-day.com

 

एकाच सामन्यात सुनील गावस्कर यांनी उजव्या हाताने आणि डावखुऱ्या हाताने सुद्धा फलंदाजी केली होती. एक चेंडू, उजव्या हाताने खेळायचा तर दुसरा डाव्या हाताने असं करून सुनील गावस्कर यांनी चक्क एक तास बॅटिंग केली होती.

लेफ्टी बॅटिंगची वेळ आली कारण…

१९८१-८२ च्या रणजी ट्रॉफीची कर्नाटक विरुद्धची उपांत्य फेरीचा तो सामना होता. कर्नाटकचा डावखुरा गोलंदाज रघुराम भट हा आपल्या गोलंदाजीतून जणू आग ओकत होता. मुंबईचा संघ रघुराम भटसमोर तग धरू शकत नव्हता.

आउट होणारे सगळे फलंदाज हे उजव्या हाताने फलंदाजी करणारे होते. मैदानावर फलंदाजी करायला जाण्यासाठी तयार असलेल्या सुनील गावस्कर यांना या गोष्टीचा अंदाज आला होता.

डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्या रघुराम भट समोर आपली सुद्धा त्रेधा तिरपीट होऊ शकते, हे लक्षात घेऊन सुनील गावस्कर हे डावखुरा फलंदाजाच्या रूपातच मैदानावर उतरले. ४ दिवसीय असलेल्या त्या सामन्यात सामना वाचवणे, विकेट न जाऊ देणे ही जबाबदारी सुनील गावस्कर यांच्या खांद्यावर येऊन पडली होती.

 

young sunil gavaskar inmarathi

 

१ तास फलंदाजी करून सुनील गावस्कर यांनी त्या सामन्यात १८ धावा केल्या होत्या आणि बिकट परिस्थितीत सापडलेल्या आपल्या मुंबईच्या संघाला पराभवापासून वाचवलं होतं. कमालीची गोष्ट म्हणजे दुसरा गोलंदाज बी. विजयकृष्णा गोलंदाजी करत असतांना सुनील गावस्कर लगेच उजव्या हाताने फलंदाजी करायचे.

 

sunil gavaskar batting inmarathi
thecricketmonthly.com

धोका पत्करण्याची तयारी

सुनील गावस्कर यांनी सामना संपल्यावर आपली प्रतिक्रिया या शब्दात दिली होती, की रघुरामची गोलंदाजी ही त्यावेळी खूप भेदक होती. दुसरी इनिंग असल्याने खेळपट्टी जुनी झाली होती आणि बॉल टप्पा पडल्यावर खूप वळत होता.

कोणत्याही उजव्या हाताने फलंदाजी करणाऱ्या फलंदाजाला ती वेळ निभावून नेणं सोपं नव्हतं. एलबीडब्ल्यू होण्याची सुद्धा शक्यता होती. पण, कॅच जाण्याची शक्यता डाव्या हाताने फलंदाजी करतांना कमी होणार होती. हे लक्षात घेऊन त्यांनी डाव्या हाताने फलंदाजी करण्याचा धोका पत्करला होता. या प्रयोगात ते अयशस्वी झाले असते, तर त्यांच्यावर खूप टीका सुद्धा झाली असती हे ते जाणून होते.

 

sunil gavaskar inmarathi

 

तो सामना कर्नाटकच्या गोलंदाज रघुराम भटने गाजवला होता. पहिल्या इनिंगमध्ये रघुराम भटच्या भेदक गोलंदाजीने मुंबईच्या ८ फलंदाजांना तंबूत पाठवलं होतं. सुनील गावस्कर हे त्या सामन्यात मुंबईचे कर्णधारही होते. आपण स्वतः ८ व्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन संघाला सर्वबाद होण्यापासून वाचवण्याचा निर्णय घेतला होता.

१९७१ मध्ये टेस्ट सामन्यात पदार्पण केलेल्या सुनील गावस्कर यांना या सामन्यापर्यंत ११ वर्षांचा अनुभव होता. सुनील गावस्कर यांच्या त्या निर्णयाचं आणि डावखुऱ्या फलंदाजीचं आजही कौतुक केलं होतं.

क्रिकेटच्या नियमानुसार, कोणताही फलंदाज किंवा गोलंदाज सामन्यात उजव्या किंवा डाव्या हाताने फलंदाजी करू शकतो. या नियमाचा उपयोग करून सुनील गावस्कर यांनी हा सामना वाचवला होता.

सुनील गावस्कर हे नाव क्रिकेट विश्वात इतक्या मानाने का घेतलं जातं हे आपल्याला एका रणजी सामन्याच्या उदाहरणातून लक्षात आलं असेल. “लेफ्ट इज राईट” या नावाचा धडा शालेय अभ्यासक्रमातही होता. क्रिकेटविश्वाला हा धडा या सामन्याने शिकवला होता.

 

hands inmarathi

 

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?