' लोकल सुरू होतेय, एका क्लिकवर e-pass कसा मिळवायचा? वाचा – InMarathi

लोकल सुरू होतेय, एका क्लिकवर e-pass कसा मिळवायचा? वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

हुश्श! अखेर जे वाक्य ऐकण्यासाठी लाखो मुंबईकरांचे कान आसुसले होते, ती घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आणि अनेकांचा जीव भांड्यात पडला.

मॉल, हॉटेल्स, थिएटर या सर्वांपेक्षाही जास्त मुंबईकरांना आस होती ती ‘मुंबईची लाईफलाईन सुरु होण्याची! एकवेळ हौसमौजेच्या सुविधा मिळाल्या नाही तरी हरकत नाही मात्र मुलभूत गरजांपैकी एक असलेली मुंबईची जान अर्थात लोकल सुरु व्हावी अशी मागणी सर्वच स्तरांतून केली जात होती.

अखेर मुंबईकरांची ही गरज लक्षात घेत ठाकरे सरकारने निर्णय घेत १५ ऑगस्टपासून मुंबईची जीवनदायिनी पुन्हा आपला वेग धारण करणार असल्याचं घोषित केलं.

 

train inmarathi

 

मात्र थांबा! हा आनंद साजरा करण्यापुर्वी त्याची नियमावली जाणून घ्या, नाहीतर लोकलचा हा प्रवास तुम्हाला चांगलाच महागात पडू शकतो. कारण हा ‘लोकलदिलासा’ सर्वांसाठी नाही हे लक्षात घ्या.

प्रवासमुभा कोणाला?

‘कोरोनाची लस घ्या’ यासाठी सरकार कानीकपाळी ओरडतं का होतं? याचं उत्तर तुम्हाला आता मिळेल, कारण लसीचे दोन डोस घेणा-यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे, त्यातही दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असेल तरच तुम्ही लोकल प्रवासाच्या पाससाठी मागणी करू शकता.

अर्थात या नियमात कोणत्याही प्रकारची सूट नाही की बनवाबनवी करता येणार नाही, कारण पास मिळण्यासाठी तुम्हाला लस घेतल्याचं प्रमाणपत्र दाखवावं लागणार आहे.

 

vaccine certificate inmarathi

 

ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीनं रेल्वेचा पास काढता येणार आहे. पास काढण्याआधी पाससाठीचा क्युआरकोड मिळवावा लागणार आहे

ऑनलाईन पद्धतीने मिळवा पास

आधार कार्ड असो वा लसीकरणाचे रजिस्ट्रेशन, शासनाचे सगळे व्यवहार आता एका क्लिकवर उपलब्ध झाले असताना रेल्वे पासही त्याला अपवाद नाही.

लोकलचा पास मिळवण्यासाठी रेल्वे स्टेशन्सवर होणारा गोंधळ लक्षात घेता ही सुविधा घरबसल्याही मिळणार आहे.

तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सगळेच टेक सॅव्ही झाल्याने स्मार्टफोनवरून पास मिळवणे हा सर्वात उत्तम मार्ग आहे. यामुळे गर्दीचा धोका नाही की वेळेचा खोळंबा नाही.

http://epassmsdma.mahait.org  या नव्याको-या वेबसाईटवरून तुम्हाला ही सुविधा मिळेल.

या साईटवर रेल्वे पास पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर नोंदवावा लागेल. त्यानंतर मोबाईलवर आलेला OTP क्रमांक टाकल्यानंतर तुमचं नाव, आधार कार्ड क्रमांक ही माहिती स्क्रीनवर दिसेल.

 

railway pass inmarathi

 

त्यानंतर आधार कार्डशी संलग्न असलेले लसीकरणाच्या सर्व डिटेल्सही उपलब्ध होतील. यामध्ये दोन्ही डोस घेतल्याच्या तारखा तपासून घ्या.

दुसरा डोस घेतल्यानंतर १४ दिवस पूर्ण झाले असल्यास त्यासंदर्भातील मेसेजही स्क्रीनवर दिसल्यानंतरच तुम्ही पास मिळवण्यासाठी मागणी करू शकता.

त्यानंतर रेल्वे सिझन पास हा पर्याय निवडल्यानंतर तुम्हाला हा पास मिळेल, त्यानंतर त्यासंदर्भातील मेसेजही २४ तासांच्या आत तुमच्या मोबाईलवर येईल.

मोबाईलवर आलेली लिंक सेव्ह केल्यास मोबाईलमध्ये तुमचा पासही सेव्ह होईल.

पास डाऊनलोड कोणतीही अडचण आल्यास हा मेसेज रेल्वे स्थानकात दाखवल्यानंतरही तुम्हाला पास मिळू शकतो.

ऑफलाईन अर्ज

ऑनलाईन प्रक्रिया करता येत नाहीये? स्मार्ट फोन कसा वापरावा कळत नाहीये? मात्र पास हवाय, चिंता सोडा कारण हा पास ऑफलाईन पद्धतीने अर्थात रेल्वे स्टेशनवर मिळणार आहे.

यासाठी आधार कार्ड आणि दोन्ही लस घेतल्याचा पुरावा असलेला पास दाखवणं गरजेचं आहे. रेल्वे कर्मचा-यांकडून या कागदपत्राची शहानिशा केल्यानंतर तुम्हाला हा पास सहजगत्या मिळू शकतो.

 

 

pass inmarathi
hindustantimes.com

 

त्यासाठी नियोजित वेळेत तुमच्या नजिकच्या रेल्वे स्थानकाला भेट द्या.

हे लक्षात ठेवा

य़ा दोन्ही पद्धतींपैकी कोणत्याही मार्गाने तुम्हाला रेल्वे पास मिळेल. यामध्ये केवळ मासिक पासची सुविधा देण्यात आली असून रोजचे तिकीट दिले जाणार नाही.

त्यासह अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना नेहमीच्याच पद्धतीने मासिक पास किंवा तिकीट दिले जाईल.

 

local inmarathi
ndtv.com

 

तुम्ही ऑनलाईन पद्धतीने पासची मागणी करा वा ऑफलाईन, तुमची सगळी कागदपत्र, दोन डोस घेतल्याचे प्रमाणपत्र तपासले जाणार हे नक्की! त्यावर असलेल्या क्युआर कोडचे स्कॅनिंग यशस्वी झाल्यानंतरच तुम्हाला प्रवासाची मुभा आहे, त्यामुळे कोणत्याही प्रकारचा बनाव किंवा खोट्या कागदपत्रांसह प्रवास करण्याचे धाडस करू नका नाहीतर काही क्षणांचा प्रवास तुम्हाला चांगलाच महागात पडू शकतो.

त्यामुळे शासनाने दिलेल्या या सुविधेचा वापर मर्यादेने, गरज असेल तरच वापरा. शासनाने सुविधांचा पुनःश्च हरीओम केला असला तरी अजूनही कोरोनाचं संकट कायम आहे. त्यामुळे विनाकारण गर्दी करणं टाळा. रेल्वे प्रवास करतानाही मास्क, सॅनिटायझर आणि सुरक्षित अंतर ही काळजी घेणं गरजेचं आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?