…..आणि इंदिरा गांधीनी थेट पाकिस्तानचीच फाळणी केली!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

पाकिस्तानच्या कुरापतीमध्ये गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरवेळी कोणता न कोणता वाद उकरून काढून किंवा दहशतवाद्यांच्या पाठीमागून भारतावर वार करायच्या पाकिस्तानच्या खोड्या सुरूच असतात. त्यांच्या या भेकड कृत्यांमुळे आपले कित्येक सैनिक जीव गमावून बसतात, कित्येक जण जखमी होतात, मालमत्तेचे प्रचंड नुकसान होते. पाकिस्तानचे हे छुपे हल्ले काही आता सुरु झालेले नाहीत, जेव्हापासून यांना वेगळ घर थाटू दिलं आहे तेव्हापासून आपल्या घरात सुखाने न नांदता, भारताला त्रास देण्याचा सपाटा यांनी लावला आहे. पण प्रत्येकवेळी भारत देखील गप्प बसला नाही, पाकिस्तानने मर्यादा ओलांडली की प्रत्येकवेळी भारताने पाकिस्तानला जन्माची अद्दल घडवली आहे. असाच एक, पाकिस्तान कधीही न विसरू शकणारा धडा इंदिरा गांधीनी पाकिस्तानला शिकवला होता.

तुम्हाला हे माहितच असेल की फाळणीच्या वेळी सध्याचा बांगलादेश हा पाकिस्तानमध्ये होता.

map-marathipizza
AppleIphones,org

त्यावेळचे पाकिस्तानचे सरकार आणि त्यांचे सैन्य तेथील आपल्याच देशवासियांवर अन्याय करत होते. त्यामुळे तेथील नागरिकांनी पाकिस्तानी सैन्याविरोधात बंड केलं होतं. हे बंड मोडीत काढण्यासाठी सैन्यदलाने मोठी मानवी कत्तल सुरु केली. आपला जीव वाचवण्यासाठी हे नागरिक भारताकडे धाव घेऊ लागले. त्या काळात पूर्व पाकिस्तानातून तब्बल १० लाख नागरिक भारतात स्थलांतरित झाले होते.

या सर्व परिस्थितीचा भारतावर थेट परिणाम होत होता, त्यावर तोडगा काढण्यासाठी १९७१ साली रोजी भारताच्या तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधींनी एक बैठक घेऊन सैन्यप्रमुखांना पाकिस्तानला अद्दल घडवण्यासाठी आवश्यकता असल्यास युद्ध लढण्याची परवानगी दिली होती.

युद्धजन्य परिस्थिती उद्भवताच  पाकिस्तानचे धाबे दणाणले,

पूर्व पाकिस्तानातील समस्या या पाकिस्तानचा अंतर्गत प्रश्न आहेत भारताने त्यामध्ये पडू नये

असा भेकड पवित्रा पाकिस्तानने घेतला. त्याला इंदिरा गांधींनी सडेतोड उत्तर देत,

पूर्व पाकिस्तानातील अराजक समस्येमुळे भारताच्या पूर्वेकडील राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत असताना आम्ही शांत का बसायचं?

असा थेट सवाल केला. एकिकडे इंदिरा गांधी पाकिस्तानची कोंडी करत होत्या, तर दुसरीकडे भारताच्या भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरुन समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्नशिल होत्या. यात पाकिस्तानविरोधात अमेरिकेने मवाळ धोरण स्विकारल्याने इंदिरा गांधी यांनी ९ ऑगस्ट १९७१ रोजी रशिया सोबत एक करार केला. या कराराअंतर्गत दोन्ही देशांनी एकमेकांनी सुरक्षेची हमी दिली.

(पूर्वी पाकिस्तानातून भारतात स्थलांतरित झालेले नागरिक) keywordsuggests.com

तर दुसरीकडे पूर्व पाकिस्तानमधील परिस्थिती अतिशय गंभीर होत होती. तिथे पोलीस, पॅरामिलेट्री फोर्स, इस्ट बंगाल रेजिमेंट आणि इस्ट पाकिस्तान रायफल्सचे बंगाली सैनिक यांनी पाकिस्तानी सैन्याविरोधात बंड पुकारुन देशाचे स्वातंत्र्य घोषित केले. याचवेळी त्यांनी भारताकडून मदतीची अपेक्षा केली. यावेळी भारतीय सैन्यदलाच्या वतीने येथील नागरिकांना प्रशिक्षण देऊन, मुक्ती वाहिनीचा जन्माला आली. पण दुसरीकडे पाकिस्तानने आपला हेका सोडला नव्हता. चीन आणि अमेरिकेच्या जोरावर पाकिस्तानने भारताच्या खोड्या काढण्याचे उद्योग सुरुच होते.

नोव्हेंबर महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात पाकिस्तानी एअरक्राफ्टनी सातत्याने भारतीय सीमेत प्रवेश केला. यावर भारताकडून पाकिस्तानला इशारा देण्यात आला. पण पाकिस्तानने त्याला गांभीर्याने घेतला नाही. उलट पाकिस्तानचे राष्ट्रपती याया खान यांनी भारताला युद्धाची धमकीच दिली. भारताने यापूर्वीच युद्धाची तयारी पूर्ण केल्याने, पाकिस्तानला याचा जराही अंदाज नव्हता.

पाकिस्तानच्या भूमिकेमुळे इंदिरा आपल्या निर्णयावर ठाम होत्या. युद्ध अटळ असल्याची कुणकुण दोन्ही बाजूला लागली होती. पण पहिला हल्ला चढवणार कोण? हा एकच प्रश्न होता. याचे उत्तर ३ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्ताननेच दिले. या दिवशी रात्री ११ वाजता पाकिस्तानी एअर क्राफ्टनी पुन्हा भारतीय हद्दीत प्रवेश करुन, काही शहरांबर बॉम्ब हल्ले करण्यास सुरुवात केली. या घटनेनंतर इंदिरा गांधींनी सैन्यदलाच्या अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकी घेतल्या. सोबतच त्यांनी विरोधी पक्षांसोबत बैठक घेऊन त्यांनाही विश्वासात घेतले. यानंतर मध्यरात्री ऑल इंडिया रेडिओवरुन देशाला संबोधित करुन देशवासियांना परिस्थितीची माहिती दिली.

यासोबतच इंदिरा गांधींनी भारतीय सैन्य दलाला ढाकाकडे कूच करण्याचे आदेश दिले. इंदिरा गांधींच्या या आदेशानंतर भारताच्या वायूदलानेही पश्चिम पाकिस्तानच्या हद्दीत प्रवेश करुन महत्त्वाच्या ठिकाणांवर बॉम्ब हल्ले करण्यास सुरुवात केली.

1971-war-marathipizza
indiandefencereview.com

भारताच्या तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानची मोठी कोंडी केली. ४ सप्टेंबर १९७१ रोजी भारतीय सैन्य दलाने ऑपरेशन ट्रायडेंटची सुरुवात करुन, भारतीय नौदलाने या युद्धात दोन मोर्चावरुन पाकिस्तानला कोंडीत पकडले. यातील पहिला मोर्चावर बंगालच्या खाडीतून पाकिस्तानच्या नैदलाला टक्कर दिली. तर दुसऱ्या मोर्चवरुन पाकिस्तानी सैन्यदलाला चोख प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली.

५ सप्टेंबर रोजी भारतीय नैदलाने कराचीच्या बंदरावर मोठ्याप्रमाणात बॉम्ब हल्ला चढवून पाकिस्तानच्या नैदलाचे मुख्यालयच उद्धवस्त केलं. पाकिस्तानची चोहोबाजूंनी कोंडी झालेली पाहून इंदिरा गांधींनी बांग्लादेशाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली. बांग्लादेश आता पाकिस्तानचा भाग राहिला त्यांच्या जाचातून मुक्त झालेलं ते एक स्वतंत्र राष्ट्र आहे. अशी घोषणा इंदिरा गांधींनी केली.

याचदरम्यान अमेरिकेने पाकिस्तानच्या मदतीसाठी आपल्या नौदलातील सर्वात शक्तीशाली सातवी युद्धनौका बंगालच्या खाडीकडे रवाना केली. याला प्रत्युत्तर म्हणून रशियानेही भारतासोबतच्या करारानुसार आपली एक युद्धनौका हिंद महासागरात पाठवली. अशाप्रकारे जगातील दोन महासत्ता या युद्धात सहभागी होऊ पाहात होत्या. अशात अमेरिकेची युद्धनौका बंगालच्या खाडीत दाखल होईपर्यंत पाकिस्तानी सैन्याला आत्मसमर्पण करण्यास भाग पाडण्यासाठी इंदिरा गांधींनी झटपट पावले उचलली. यानंतर भारताचे सैन्यदल प्रमुख जनरल सॅम मानेक शॉ यांनी तत्काळ पाकिस्तानी सैन्याला आत्मसमर्पण अर्थात सरेंडर करण्याचा इशारा दिला.

पण पाकिस्तान आपल्याच गुर्मीत होता. पूर्व पाकिस्तानातील सैन्य कमांडर ए.ए.के.नियाजी यांनी अमेरिका आणि चीनच्या जोरावर सरेंडर करण्यास नकार दिला. याचवेळी दुसरीकडे भारतीय सैन्यदलाने ढाक्याला तिन्ही बाजूंनी घेरलं होतं. १४ डिसेंबर रोजी ढाक्यामधील पाकिस्तानच्या गव्हर्नरांच्या घरात पाकिस्तानच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची गुप्त बैठक सुरु होती. याचवेळी भारतीय सैन्याने त्या घरावर हल्ला चढवला. या हल्ल्यामुळे पाकिस्तान गर्भगळीत झालं. पाकिस्तानचे कमांडर नियाजींनी तत्काळ युद्धविरामाचा प्रस्ताव भारताकडं पाठवला. पण भारताचे सैन्यप्रमुख मानेकशॉ यांनी युद्धविराम नव्हे, तर सरेंडर करण्यास पाकिस्तानला सांगितले. याची जबाबदारी मेजर जनरल जे एफ आर जॅकब यांच्याकडे सोपवली.

हे देखील वाचा : (पाकिस्तानच्या २,६४,००० सैनिकांना पुरून उरणारे जनरल जेकब!)

यानंतर कोलकातामधील भारताचे माजी कमांड प्रमुख लेफ्टनंट जनरल जगजीत सिंह अरोडा ढाक्यात दाखल झाले. अरोडा आणि नियाजी यांनी एकाच व्यासपीठावर एकत्रित येऊन १६ डिसेंबर १९७१ रोजी दुपारी २:३० वाजता सरेंडर करण्याची प्रक्रिया सुरु केली.

1971-war-marathipizza
en.wikipedia.org

पाकिस्तानचे कमांडर नियाजी यांनी पहिल्यांदा लेफ्टनंट जनरल अरोडा यांच्यासमोर सरेंडरच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली आणि आपल्या वर्दीवरील बिल्ले उतरवले. तसेच सरेंडरचे म्हणून नियाजींनी आपले रिव्हॉलव्हर जनरल अरोडा यांच्याकडे सुपूर्द केलं.

हे देखील वाचा : (९६००० पाकिस्तानी सैन्याला गुडघे टेकायला लावणाऱ्या भारतीय सैन्याचा ‘विजय दिवस’)

भारताने फक्त १४ दिवसातच पाकिस्तानला आपली शस्त्रे खाली ठेवण्यास भाग पाडलं आणि भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नारीशक्तीला साजेशी कामगिरी करून दाखवीत पाकिस्तानचे दोन तुकडे केले.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?