' मुंबई ते ठाणे नव्हे, तर ‘या मार्गावर’ धावली आहे भारतातली पहिली रेल्वे! – InMarathi

मुंबई ते ठाणे नव्हे, तर ‘या मार्गावर’ धावली आहे भारतातली पहिली रेल्वे!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वेपैकी एक समजली जाते. झुक-झुक आगीनगाडी ते बम्बार्डियर रेल्वे असा रेल्वेचा प्रवास झाला आहे. आणि आता तर मेट्रो, बुलेट ट्रेनकडे आपली वाटचाल सुरु आहे.

माणसाच्या शरीरात जसे रक्तवाहिन्यांचे जाळे आहे तसेच आपल्या देशात रेल्वेचे नेटवर्क सर्वदूर पसरलेले आहे. भारताच्या सगळ्या दिशा रेल्वेने जोडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळेच रेल्वे ही भारताची लाईफलाईन आहे.

 

mumbai local inmarathi
india.com

 

भारतात पहिली रेल्वे धावली त्याला आज दीडशे वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. रेल्वे सुरु झाली आणि भारतात परिवहन व्यवस्था अस्तित्वात आली. ब्रिटिशांनी स्वतःच्या सोयीसाठी सुरु केलेली ही रेल्वे आपल्यासाठी इतकी अत्यावश्यक ठरेल असे तेव्हाच्या लोकांना वाटले देखील नसेल. अगदी सुरुवातीला लोक रेल्वेला “लोखंडी राक्षस” वगैरे म्हणत आणि त्यात प्रवास करायला घाबरत असत.

साधारणपणे १६ एप्रिल १८५३ रोजी भारतात ठाणे ते बोरीबंदर या दरम्यान पहिल्यांदा रेल्वे धावली असे सांगितले जाते. यासाठी दहा हजार कामगारांनी कष्ट उपसले होते. आणि या रेल्वेत ४०० लोकांनी प्रवास केला होता. त्यात नाना शंकरशेट यांचा देखील समावेश होता.

साम्राज्य विस्तार करण्यासाठी आणि देशाचे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी दक्षिण भारताचा भाग कोकणाशी जोडले जाणे आवश्यक होते. त्यासाठी इंग्रजांना रेल्वेची आवश्यकता भासत होती. १७ ऑगस्ट १८४९ रोजी ईस्ट इंडिया कंपनीने ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे (जीआयपी) या कंपनीशी प्रायोगिक तत्वावर एक रेल्वे लाईन टाकण्यासाठी करार केला.

यानंतर लगेच तीन – चार वर्षांत रेल्वे लाईनचे काम पूर्ण होऊन १८५३ साली ठाणे ते बोरीबंदर मार्गावर रेल्वे धावली. हा भारताचा पहिला रेल्वे प्रवास मानला जातो.

 

thane boribandar inmarathi

 

खरे तर याआधी देखील भारतात रेल्वे धावली होती आणि ती महाराष्ट्रात नव्हे तर उत्तराखंडमधील रेल्वे मार्गावरून धावली होती, अशी कागदोपत्री नोंद आहे. भारतात जी पहिली रेल्वे धावली ती खरं तर एक मालगाडी होती. ही मालगाडी २२ डिसेम्बर १८५१ रोजी रुरकी ते पिरान कलियर या मार्गावर धावली होती. आणि १८५३ साली जी रेल्वे धावली ती पहिली पॅसेंजर ट्रेन होती.

याबद्दलची माहिती ही २००२ साली “रिपोर्ट ऑन गंगा कॅनाल” या रिपोर्टमध्ये मिळते. त्यात असे नमूद केले आहे की २२ डिसेम्बर १८५१ रोजी रुरकी ते पिरान कलियर या दरम्यान असलेल्या रेल्वे लाईनवर वाफेच्या इंजिनावर दोन बोगी असलेली मालगाडी चालवली गेली होती. म्हणूनच भारतात रेल्वेची सुरुवात ही १८५१ सालीच झाली आहे.

 

roorkee to piran kaliyar railway inmarathi

 

“रिपोर्ट ऑन गंगा कॅनल” हे पुस्तक ब्रिटिश लेखक पी. टी. कॉटले यांनी लिहिलेले आहे. या पुस्तकाची प्रत आजही आयआयटी रुरकीच्या ग्रंथालयात आहे.

पुस्तकात असे नमूद केले आहे, की १८३७-३८ मध्ये उत्तर-पश्चिम प्रांतात भयंकर दुष्काळ पडला होता. त्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीला मदतकार्य करण्यासाठी खूप पैसा खर्च करावा लागला होता. म्हणूनच गंगा आणि यमुना या दोन नद्यांच्या मध्ये जो भूभाग आहे तेथील शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी , सिंचन व्यवस्थेचा प्रश्न सोडवण्यासाठी इंग्रजांनी सोलानी नदीतून कालवा काढण्याची योजना केली होती.

हा कालवा बांधण्यासाठी भरपूर प्रमाणात मातीची आवश्यकता होती. ही माती पिरानहून आणण्याचे ठरले होते. रुरकी आणि पिरान हे अंतर १० किलोमीटरचे होते. या योजनेसाठी प्रोजेक्टचे प्रमुख अभियंते थॉमसन यांनी इंग्लंडहून एक वाफेचे इंजिन मागवले होते. तसेच या इंजिनाला जोडण्यासाठी दोन डबे (बोगी) देखील लागणार होते.

या इंजिनाला १८०-२०० टन क्षमतेचे डबे जोडण्यात आले. पुस्तकात असाही उल्लेख आहे, की ही मालगाडी १० किलोमीटरचे अंतर ३८ मिनिटांत कापत असे. म्हणजेच या मालगाडीचा वेग ताशी ६.४४ किमी इतका होता.

 

roorkee inmarathi

 

कालव्याचे काम पूर्ण होईपर्यंत ही मालगाडी चालली. नऊ महिने व्यवस्थित चालल्यानंतर दुर्दैवाने एक दिवस एका दुर्घटनेत अचानक मालगाडीच्या इंजिनाला आग लागली आणि ते इंजिन बंद पडले. सुदैवाने तोवर कालव्याचे काम पूर्ण झाले होते.

त्यानंतर दोन वर्षांनी १८५३ साली ठाणे ते बोरीबंदर पहिली पॅसेंजर ट्रेन चालवली गेली. ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे (जीआयपी रेल्वे) या कंपनीने ही सेवा सुरु केली होती. त्यानंतर देशात आणखी आठ रेल्वे कंपन्या आल्या परंतु जीआयपी रेल्वेने भारतात रेल्वेचे युग सुरु केले. १८४५ साली जमशेदजी आणि नाना शंकरशेट यांच्या नेतृत्वात भारतीय रेल्वे संघाची स्थापना झाली. ते त्यावेळच्या रेल्वे कंपनीचे संचालक होते.

 

nana shankar sheth inmarathi

 

१८५३ नंतर ठाणे ते बोरीबंदर हा मार्ग १८५४ साली कल्याणपर्यंत वाढविण्यात आला. त्यानंतर १५ ऑगस्ट १८५४ रोजी हावडा ते हुगळी या मार्गावर देखील रेल्वे सुरु झाली आणि पूर्व रेल्वेची सुरुवात झाली. पुढे दक्षिणेला चेन्नईजवळ व्यासरपडी ते अर्काट या मार्गावर देखील १०० किलोमीटरची रेल्वे लाईन टाकण्यात आली आणि ३ मार्च १८५९ पासून तेथे रेल्वे सेवेला सुरुवात खाली.

उत्तरेत हथरस रोड ते मथुरा या मार्गावर १९ ऑक्टोबर १८७५ पासून रेल्वेच्या सेवेला सुरुवात झाली. तोवर मुंबई-पुणे मार्गावर खोपोलीपर्यंतचे काम पूर्ण झाले होते. आणि पुण्याकडून देखील रेल्वे लाईन पुढे टाकण्याचे काम सुरु होतेच. पुण्यापासून खंडाळा पर्यंतच्या ट्रॅकचे काम १८५८ मध्ये पूर्ण झाले.

सगळ्यात अवघड होते ते घाटात रेल्वेलाईन टाकणे. ते पळसदरी ते खंडाळा ट्रॅकचे हे अत्यंत अवघड काम देखील असंख्य कामगारांच्या आणि अभियंत्यांच्या असीम कष्टांमुळे १८६२ साली पूर्ण झाले.

 

khandala ghat railway inmarathi

 

भोर घाटातील हे कठीण काम झाल्यानंतर तो ट्रॅक १८७१ पर्यंत रायचूरपर्यंत नेण्यात आला. त्याच काळात अर्कोणम ते रायचूर ट्रॅकचे काम देखील करण्यात आले आणि मुंबई आणि चेन्नई ही दोन महानगरे रेल्वेद्वारे जोडली गेली. मुंबई व चेन्नईतील अंतर १२८१ किमी होते.

याच काळात भारतात इतर ठिकाणी सुद्धा रेल्वे पोहोचावी यासाठी कामे सुरूच होती. ७ मार्च १८७० रोजी मुंबई-कलकत्ता एकमेकांशी रेल्वेद्वारे जोडले गेले. या रेल्वे ट्रॅकचे उदघाटन तत्कालीन व्हाइसरॉय लॉर्ड मेयो यांनी केले. भारतात १८८० पर्यंत चक्क १३,५०० किमी ट्रॅकचे काम झाले होते.

रेल्वेने त्यानंतर अगदी राजधानी एक्सप्रेसच्या वेगाने प्रगती केली. २००३ च्या आकडेवारीनुसार आजपर्यंत भारतीय रेल्वेमार्गाची एकूण लांबी ६३,१४० किमी आहे. आज रेल्वेने संपूर्ण देश जोडला गेला आहे.

भारतीय अभियंत्यांनी अथक परिश्रम करून दुर्गम भाग देखील रेल्वेने जोडून दाखवला आहे. न थांबता लोकांना एका स्थानाहून दुसऱ्या स्थानी सुखरूप पोहोचवण्याच्या भारतीय रेल्वेला ह्यासाठीच जगात देखील नावाजले जाते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?