' "या घटने"नंतर टॉपची सुपरहिट संगीतकार जोडी कायमची तुटली...

“या घटने”नंतर टॉपची सुपरहिट संगीतकार जोडी कायमची तुटली…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

कोरोनामुळे नदीम-श्रवण या संगीतकार जोडीतल्या श्रवण राठोड यांचं  निधन झालं. पूर्ण देशात कोरोनाचा वणवा पेटलेला असतांना श्रवण राठोड यांना हरिद्वारमध्ये सुरू असलेल्या कुंभ मेळ्यात का जावं वाटलं असावं? हा एक प्रश्नच आहे.

आधीपासूनच तब्येतीच्या इतर तक्रारीसुद्धा असलेल्या श्रवण हे पूर्ण कुटुंबासोबत कुंभ मेळ्यासाठी गेले होते. तिथून आल्यावर घरातील चारही सदस्य कोरोनाच्या विळख्यात अडकले.

 

shravan rathod inmarathi

 

हरिद्वारमध्ये असतांना श्रवण राठोड यांनी उदित नारायण यांना फोन केला होता, तो त्यांचा शेवटचा फोनवरील संवाद होता. आपल्या मुलाचा विरोध असूनही श्रवण यांनी कुंभ मेळ्यात जायचं ठरवलं ही त्यांची शेवटची चूक ठरली.

९० च्या दशकातील काळ होता जेव्हा नदीम-श्रवण या संगीतकार जोडीशिवाय बॉलीवूड इंडस्ट्रीचं पान हलत नव्हतं. आशिकी, साजन, धडकन, फुल और कांटे, दिलवाले सारख्या यशस्वी सिनेमाचं मधुर संगीत देणाऱ्या नदीम-श्रवण या जोडीला नंतरच्या काळात खडतर संघर्ष करावा लागला असंच म्हणावं लागेल.

===

हे ही वाचा बॉलिवूडमधील गटबाजीचा बळी ठरलेला बहारदार संगीतकार!

===

गुलशन कुमार यांच्या हत्येनंतर संशयित ठरवण्यात आलेल्या नदीम सैफी हा २००७ पासून लंडनमध्ये जाऊन लपला आणि नदीम-श्रवण यांची ट्युन परत कधी एकत्र वाजलीच नाही.

दुसऱ्या देशात असूनही काही काळ नदीम-श्रवण हे एकत्र काम करत होते. पण, त्या गाण्यांमध्ये ती मजा नव्हती. २००५ मध्ये आलेला ‘दोस्ती’ हा त्यांनी संगीतबद्ध केलेला शेवटचा सिनेमा होता.

 

nadeem shravan inmarathi

बॉलीवूडचा सुवर्ण काळ गाजवणारी जोडी एकत्र कशी आली? विभक्त का झाली? जाणून घेऊयात.

संगीतकार म्हणजे जोडी असं बॉलीवूडचं जणू एक समीकरणच आहे. शंकर-जयकिशन, कल्याणजी-आनंदजी, लक्ष्मीकांत-प्यारेलाल, नदीम-श्रवण , विशाल-शेखर ते अगदी अजय-अतुल पर्यंत बॉलीवूडचं संगीत हे नेहमीच दोन संगीतकरांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं.

नदीम-श्रवण पैकी, नदीमच्या घरात संगीताचा वारसा नव्हता. नदीमचे वडील एक व्यवसायिक आहेत. नदीम यांची संगीताची आवड बघून त्यांनी नदीमला बॉलिवूडमध्ये संगीत क्षेत्रात करिअर करण्याची परवानगी दिली होती.

श्रवण राठोड हे संगीत घरण्यातून येतात. श्रवण यांचा जन्म १३ नोव्हेंबर १९५४ रोजी झाला होता. प्रसिद्ध गायक, संगीतकार पंडित चतुर्भुज राठोड हे त्यांचे वडील होते. श्रवण यांचे दोन्ही भाऊ ‘रुपकुमार राठोड’ आणि ‘विनोद राठोड’ हे बॉलीवूड मधील लोकप्रिय गायक आहेत.

कल्याणजी- आनंदजी यांचे फॅन असलेले श्रवण हे वयाच्या ७ व्या वर्षीच तबला वादन शिकले होते.

नदीम-श्रवण हे एकमेकांना ओळखत पण नव्हते. मुंबईच्या ‘सेंट ऐंस’ शाळेत या दोघांनाही वेगवेगळं निमंत्रण पाठवून संगीत स्पर्धेचं परीक्षण करण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. तिथे झालेली ओळख इतक्या पुढे जाईल हे त्या दोघांना सुद्धा वाटलं नसेल. १९७२ मध्ये या दोघांनी ‘नदीम-श्रवण’ नावाने आपलं संगीत करिअर सुरू करायचं ठरवलं.

 

nadeem shravan 2 inmarathi

 

१९७९ मध्ये रिलीज झालेल्या ‘दंगल’ या भोजपुरी सिनेमा पासून नदीम-श्रवण ही जोडी एकत्र आली. १९८० ते १९९० मध्ये या जोडीने कित्येक छोट्या सिनेमांना संगीत दिलं. पण, प्रेक्षकांनी, कोणत्याही निर्मात्याने त्या कामाची दखल घेतली नाही.

एक वेळ अशी आली होती की, दोघांनीही संगीत क्षेत्र सोडण्याचा निर्णय घेतला होता. पण, ‘इलाका’, ‘बाप नंबरी बेटा दस नंबरी’ सारखे हिंदी सिनेमांनी त्यांना त्यावेळी साथ दिली.

‘आशिकी’ कसा मिळाला?

अनुराधा पौडवाल यांचा नदीम-श्रवण या जोडीला बॉलीवूड मध्ये काम करण्याची संधी मिळण्यात फार मोठा वाटा आहे. १९८८ मध्ये नदीम-श्रवण यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘बाप नंबरी, बेटा दस नंबरी’ मध्ये ‘पहिली बार…’ हे गाणं अनुराधा पौडवाल यांनी गायलं होतं.

हे गाणं ऐकण्याची अनुराधा पौडवाल यांनी गुलशन कुमार यांना विनंती केली. गुलशन कुमार यांना ते गाणं आवडलं. गुलशन कुमार हे त्यावेळी एका रोमँटिक अल्बमवर काम करत होते. त्यांनी नदीम-श्रवण यांना भेटायला बोलावलं.

नदीम-श्रवण यांना त्यांनी ६-७ रोमँटिक गाणी तयार करण्यासाठी सांगितलं. ही गाणी गुलशन कुमार त्यांच्या अल्बमसाठी वापरणार होते. ‘धीरे धीरे से मेरी जिंदगी मे आना…’, ‘तू मेरी जिंदगी है…’ आणि बाकीची गाणी नदीम-श्रवण यांनी गुलशन कुमार यांना ऐकवली.

===

हे ही वाचा बॉलिवूडला खडेबोल सुनावणारा, लतादींकडून एकही गाणं गाऊन न घेणारा संगीतकार!

===

aashiqui inmarathi

 

गुलशन कुमार यांना ही गाणी प्रचंड आवडली आणि त्यांनी ती महेश भट यांना ऐकवली. ही गाणी अल्बम पेक्षा ‘आशिकी’ सिनेमात वापरली जावीत असं महेश भट यांनी ठरवलं. गुलशन कुमार हेच ‘आशिकी’ चे निर्माते होते. त्यांनी हा प्रस्ताव लगेच मान्य केला आणि ‘आशिकी’ च्या गाण्यांची रेकॉर्डिंग झाली.

आशिकीच्या गाण्यांचं यश इतकं मोठं होतं की त्यामुळे टी-सीरिज, कुमार सानू, महेश भट आणि नदीम-श्रवण या सर्वांच्या करिअरला एक वेगळीच कलाटणी मिळाली.

‘आशिकी’ नंतर नदीम-श्रवण यांची गाडी सुसाट धावत होती. दिल है की मानता नही, सडक, हम है राही प्यार के, दिवाना, राजा हिंदुस्तानी हे सगळे नदीम-श्रवण यांच्या श्रवणीय गाण्यांनी सजलेले सिनेमे होते. गाणी चांगली तर सिनेमा हिट असा तो काळ होता. आज जितकं स्क्रिप्टला महत्व आहे तितकं ९० च्या दशकात गाण्यांना महत्व होतं.

 

hum hain rahi pyar ke inmarathi

 

नदीम-श्रवण यांच्या गाण्यांनी लोकांना तेव्हा इतकी भुरळ घातली होती की जान तेरे नाम, सलामी आणि रंग सारखे सिनेमे हे बॉक्स ऑफिसवर आदळले होते. पण, त्यांची गाणी लोकांना इतकी आवडली की त्यामुळे लोकांनी हे सिनेमे शोधून बघितले.

दरवर्षी फिल्मफेअर पुरस्कार स्वीकारण्यासाठी ही जोडी ३ महिने आधीच सूट शिवून तयार ठेवायची. ६ फिल्मफेअर पुरस्काराने या जोडीला सन्मानित करण्यात आलं आहे.

नदीम-श्रवण या जोडीला ए.आर.रहेमान यांचा पहिला सशक्त पर्याय समोर आला होता. रोजाची गाणी प्रचंड लोकप्रिय झाली होती आणि त्यानंतर ए आर रहेमान यांनी १९९५ च्या रंगीला या पहिल्या हिंदी सिनेमासाठी संगीत दिलं.

नदीम-श्रवण ही जोडी कधी विभक्त झाली ?

१२ ऑगस्ट १९९७ रोजी टी सिरीजचे सर्वेसर्वा गुलशन कुमार हे अंधेरी मध्ये जितेश्वर महादेव मंदिरातून पूजा करून येत होते. ‘राजा’ नावाच्या एका शार्प शूटरने त्यावेळी १६ गोळ्या मारून गुलशन कुमार यांची हत्या केली. बॉलिवूडच्या सर्व निर्मात्यांना त्या काळात खंडणीसाठी धमक्या यायच्या.

 

gulshan kumar inmarathi

 

गुलशन कुमार यांच्या हत्येचं कारण सुद्धा त्यांनी खंडणी देण्यास केलेला विरोध हे होतं. दाऊद इब्राहिमने हे कृत्य नदीम सैफीला हाताशी धरून पूर्णत्वास नेलं आहे असा पोलिसांना दाट संशय होता.

कारण, हत्येच्या काही दिवसांपूर्वी नदीम आणि गुलशन कुमार यांच्यात वाद झाला होता. या घटनेच्या काही दिवसांपूर्वी नदीम सैफी यांनी कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमच्या एका कार्यक्रमासाठी संगीत दिल्याची पोलिसांकडे माहिती होती, त्यामुळे हा संशय अधिकच बळावला गेला होता.

नदीम सैफी विरुद्ध अटक वॉरंट सुद्धा जाहीर झालं होतं. पण, नदीम त्यावेळी भारतीय गुन्हेगारांना नेहमीच आश्रय देणाऱ्या लंडनमध्ये होता आणि तो तिथून कधीच परतला नाही.

नदीम-श्रवण यांच्या मैत्रीत इथेच फुट पडली. या घटनेनंतर काही वर्ष त्यांचे फक्त व्यवसायिक संबंध. आजच्या इतके सहज इंटरनेट उपलब्ध नसलेल्या त्या काळात नदीम हे मोबाईलवर ट्युन तयार करायचे आणि श्रवण राठोड त्यांचे भारतात रेकॉर्डिंग करायचे.

‘सिर्फ तुम’, ‘धडकन’, ‘राझ’ हे त्यांनी रिमोट पद्धतीने केलेलं संगीत होतं हे वाचल्यावर कोणालाही आश्चर्य वाटेल.

===

हे ही वाचा त्यांनी बियरच्या बाटलीत फुंकर मारून संगीत बनवलंय, ज्यावर येणाऱ्या पिढ्याही फिदा होत राहतील..

===

२००५ मध्ये रिलीज झालेल्या ‘दोस्ती’ नंतर नदीम-श्रवणमध्ये मतभेद आले आणि त्यांनी पुन्हा कधीही एकत्र काम न करण्याचा निर्णय घेतला. आज नदीम सैफी हे लंडन मध्ये सुटकेस विकण्याचा व्यवसाय करत आहेत.

 

nadeem shravan gulsham kumar inmarathi

 

२००२ मध्ये नदीम यांना गुलशन कुमार यांच्या हत्येतून ‘क्लीन चिट’ मिळाली. पण, नदीम यांनी लंडन मध्येच राहण्याचा निर्णय घेतला.

९० च्या दशकातील एका पिढीला आजही नदीम-श्रवण याची गाणी ऐकायला आवडतं आणि नकळत ते आजच्या गाण्यांसोबत त्याची तुलना करतात.

नदीम-श्रवण हे प्रत्यक्षात भारतात नसले तरीही त्यांच्या गाण्याच्या रूपाने ते नेहमीच लोकांच्या मनात घर करून असतील हे नक्की!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?