महाभारताचे युद्ध कुरुक्षेत्रावरच का लढले गेले? त्यामागचे ‘रहस्य’ जाणून घेऊया!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |
===
महाभारताचे युद्ध हे अतिशय मोठे युद्ध होते. नीती-अनीती, औरस-अनौरस ह्या मधील हा वाद होता. अखेर श्रीकृष्णाच्या मदतीने व पांडवांच्या शौर्याने विजय सत्याचा झाला.
पण ह्या युद्धामध्ये अपरिमित हानी झाली. हजारो लोक मारले गेले.
अनेक संसार अर्धवट राहिले आणि कौरवांचा अनाचार व अधर्म नष्ट होण्यासाठी व परत धर्माची स्थापना होण्यासाठी हे युद्ध होणे आवश्यक होते, म्हणूनच युगपुरुष, योगेश्वर श्रीकृष्णाने ह्या युद्धाची पटकथा लिहिली होती.
सर्वव्यापी व परमेश्वर श्रीकृष्णाला ज्ञात होते की, धर्माचे व सत्याचे आचरण करणारे पांडव त्यांच्याच भावांवर व नातलगांवर शस्त्र चालवण्यास धजावणार नाहीत. त्यांच्या मनात किंतु निर्माण होईल.
अशा वेळी जर पांडवांनी शस्त्र खाली ठेवले असते तर धर्माची स्थापना झाली नसती, कौरवांचे अधर्माने व अनीतीने वागणे, प्रजेचे हाल करणे थांबले नसते.
अधर्माचा विजय झाला असता. म्हणूनच असे होऊ नये म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला तो द्विधा मनस्थितीत असताना त्याला भगवद्गीता सांगून मार्गदर्शन केले.
आसुरी प्रवृत्तीला युद्धाच्या माध्यमाने नष्ट करणे हा भगवान श्रीकृष्णाचा हेतू होता.

म्हणूनच त्यांनी विचार केला की चुकून हे भाऊ युद्धात एकमेकांना मारताना बघून एक झाले तर हे अधर्म नष्ट होऊ शकणार नाही. महाभारताचे युद्ध हे धर्मयुद्ध होते.
म्हणूनच हे युद्ध केवळ दोन कुटुंबातील आपापसातील युद्ध नव्हते. हे धर्म आणि अधर्म ह्यांच्यामधील युद्ध होते. म्हणूनच हे युद्ध लढण्यासाठी वातावरणात क्रोध आणि द्वेषाच्या लहरी असणे आवश्यक होते.
जेव्हा युद्धाची निश्चिती झाली तेव्हा हे युद्ध लढण्यासाठी योग्य ती जागा शोधण्याचे काम सुरु झाले. ही जबाबदारी भगवान श्रीकृष्णांनी स्वतःवर घेतली होती.
ह्यासाठी श्रीकृष्णांनी त्यांचे दूत चारही दिशांना पाठवले. ह्या दूतांना असे आदेश देण्यात आले होते की ते जिथेही जातील तेथील घटना त्यांनी परत येऊन श्रीकृष्णांना सांगायच्या!
एक दूत जो कुरुक्षेत्राच्या दिशेने गेला होता त्याने परत येऊन श्रीकृष्णांना तिथे घडलेली एक घटना सांगितली जी अतिशय क्रूर होती.
हे ऐकून भगवान श्रीकृष्ण ह्यांनी कुरुक्षेत्राची युध्दभूमी म्हणून निवड केली.

दूताने सांगितलेली क्रूर घटना कोणती होती?
दूत म्हणाला की-
मी ज्या दिवशी त्या ठिकाणी गेलो, त्या दिवशी निसर्गाचे अत्यंत रौद्र स्वरूप बघायला मिळाले. अतिशय मुसळधार पाउस पडत होता. एका ठिकाणी एकाने आपल्या लहान भावाला सांगितले की,
शेतातील पिकांचे पावसामुळे व पुरामुळे नुकसान होऊ नये म्हणून शेतावर बंधारा घाल.
ह्यावर लहान भावाने अतिशय रागाने त्याच्या मोठ्या भावास हे करण्यास नकार दिला व उलट अतिशय उर्मटपणे प्रश्न विचारला की,
तू सांगितलेले काम करण्यास मी काय तुझा नोकर आहे का?
लहान भावाचे असे वागणे बघून मोठ्या भावाचा राग अनावर झाला व त्याने सुरा भोसकून लहान भावाची हत्या केली.
तो एवढ्यावरच थांबला नाही तर पुढे त्याने त्याचे शव पायांच्या दिशेने पकडून खेचत शेतातील बंधाऱ्याच्या दिशेने आणले व जिकडून पाणी वाहत होते तिथे त्याचे शव पायाने अक्षरश: ठेचून त्या ठिकाणी बसवले.
दूताने हे दृश्य पाहिले तेव्हा त्याला धक्का बसला व तो तडक हा वृत्तांत सांगण्यासाठी भगवान श्रीकृष्णांकडे आला. जेव्हा श्रीकृष्णांनी ह्या नृशंस हत्येचा वृत्तांत ऐकला तेव्हा त्यांनी निश्चय केला की
ही जागा भावा भावांमधील युद्धासाठी योग्य आहे.
कारण ह्या ठिकाणी ज्या तामसिक लहरी उत्पन्न झाल्या आहेत त्यांचा मेंदूवर प्रभाव पडेल व कौरव –पांडव ह्यांच्या मनात एकमेकांविषयी प्रेमाची भावना उत्पन्न होणार नाही तसेच युद्धात होणारी हानी बघून समझोता करण्याचा विचार सुद्धा ते करणार नाहीत.

काही काळाने जेव्हा हे महाभारताचे युद्ध झाले तेव्हा हे युद्ध करणाऱ्यांनी आपापसातील कुठल्याच नात्याचा मान ठेवला नाही.
एकाच कुटुंबातील लोक असून सुद्धा त्यांनी अत्यंत क्रूरपणाने एकमेकांचा वध करण्यास मागे पुढे पहिले नाही. शिष्य गुरुचा वध करण्याची वाट बघत होते तर भाऊ भाऊ एकमेकांवर वार करण्यास उत्सुक होते.
एका क्षणी जेव्हा अर्जुनाचा विवेक जागृत झाला. युद्धात आपल्याच गुरूंवर, काकांवर, भावांवर, भावांच्या पुत्रांवर म्हणजेच आपल्याच लोकांवर शस्त्र चालवण्यापेक्षा संन्यास घेऊन निघून जावे.
सत्ता ,राज्य काहीही नको असा विचार त्याच्या मनात आला. त्याची द्विधा मनस्थिती झाली. अशा वेळी श्रीकृष्णाने अर्जुनाचे मन ओळखून त्याला भगवद्गीता सांगून त्याचे मार्गदर्शन केले.
त्याच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे दिली व असे सांगितले की,
धर्माच्या स्थापनेसाठी प्रसंगी आपल्याच लोकांवर वार केला तर ते पाप ठरत नाही आणि सामान्य मनुष्य हा फक्त त्याचे प्रारब्ध व संचित ह्या गोष्टींमुळे त्याच्या वाट्याला आलेले आयुष्य जगत असतो.
त्याची कृती ही त्याच्या हातात नसून नियतीच्या व परमेश्वराच्या हातात असते.
म्हणूनच अर्जुनाने कुठलाही किंतु मनात न ठेवता युद्ध करावे व धर्माची स्थापना करण्यास हातभार लावावा.
हे सर्व ज्ञान मिळाल्यानंतर व श्रीकृष्णाच्या सर्वव्यापी विश्वरूपाचे दर्शन घेतल्यानंतर अर्जुन युद्धासाठी सज्ज झाला ह्या युद्धात धर्माचा विजय झाला आणि कुरुक्षेत्राची भूमी ह्या सर्व घटनांची साक्षीदार झाली.

आपण जे बोलतो, वागतो ,जी कृती करतो इतकेच नव्हे तर जसा विचार करतो त्याचा चांगला वाईट परिणाम आसपासच्या वातावरणावर, त्या जागेवर होतो. त्या ठिकाणी तशा लहरी तयार होतात.
म्हणूनच कायम आपले विचार कायम शुभ असावे, आपण कायम चांगली कार्ये करावीत कारण ह्या सगळ्याचा परिणाम आपल्या आसपासच्या जागेवर, वातावरणावर तसेच निसर्गावर सुद्धा होत असतो.
हे देखील वाचा: (महाभारताच्या युद्धसमाप्ती नंतर काय झाले?)
===
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.