' एक सामान्य मुलगी ते भारताची पहिली महिला फोटोजर्नलिस्ट – प्रवास जाणून घ्या! – InMarathi

एक सामान्य मुलगी ते भारताची पहिली महिला फोटोजर्नलिस्ट – प्रवास जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ज्या काळात मुलींना शिक्षण मिळणे देखील दुरापास्त होते, त्या काळात पुरुषांच्या समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात उतरून स्वतःची कारकीर्द घडवणे सोपे काम नाही. त्यासाठी मनात जिद्द असावी लागते, स्वतःला घडवावे लागते, आत्मविश्वास असावा लागतो आणि सर्वात महत्वाचे म्हणजे प्रचंड कष्ट करण्याची तयारी असावी लागते.

प्रसिद्ध छायाचित्र पत्रकार (फोटोजर्नलिस्ट) होमाई व्यारावाला यांनीही त्यांचे आयुष्य असेच घडवले आहे. “डालडा १३” उर्फ होमाई व्यारावाला या भारतातील पहिल्या महिला फोटो पत्रकार होत्या.

 

homai inmarathi

होमाई व्यारावाला यांचा जन्म ९ डिसेम्बर १९१३ रोजी गुजरातमधील नवसारी येथे एका मध्यमवर्गीय पारशी कुटुंबात झाला. त्यांचे वडील उर्दू थिएटरमध्ये अभिनेते होते. वडील नाटकाच्या निमित्ताने जिथे जिथे जात तिथे त्यांचे कुटुंबही त्यांच्याबरोबर जात असे. त्यामुळे होमाई त्यांच्या बालपणी अनेक गावांत वास्तव्यास होत्या. नंतर त्यांच्या वडिलांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला.

होमाई यांनी शालेय शिक्षण मुंबईतच घेतले. शालेय शिक्षण झाल्यानंतर होमाई यांनी मुंबईच्या प्रख्यात जे.जे. स्कुल ऑफ आर्टस् मध्ये पुढील शिक्षणासाठी प्रवेश घेतला. त्याच दरम्यान त्यांची भेट माणेकशॉ व्यारावाला यांच्याशी झाली.

त्याकाळी माणेकशॉ व्यारावाला हे फ्रिलान्स फोटोग्राफर म्हणून काम करत होते. तेव्हा होमाई यांनी माणेकशॉ यांच्याकडून फोटोग्राफी शिकून घेतली. काही काळाने त्या आणि माणेकशॉ व्यारावाला विवाहबंधनात अडकले.

 

homai 1 inmarathi

 

त्यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात १९३० साली केली. त्यांचे पहिले असाइनमेंट हे कॉलेज पिकनिकचे फोटो काढण्याचे होते. त्यावेळी त्या कॉलेजचे शिक्षणच घेत होत्या. त्यांचे हे फोटो एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले. त्यानंतर त्यांनी अनेक फ्रिलान्स असाइनमेंट घेणे सुरू केले.

त्यांनी “मुंबईतले जनजीवन” याविषयावर काही उत्तम फोटो काढले ते फोटो “द इलस्ट्रेटेड विकली ऑफ इंडिया” या मासिकात छापून आले. या फोटोंमुळे त्यांच्या नावाला बरीच प्रसिद्धी मिळाली. त्या आधी त्यांचे नाव लोकांना ठाऊक नव्हते तसेच त्या स्त्री असल्याने त्यांनी काढलेले फोटो त्यांच्या पतीच्या नावाने छापून येत असत.

व्यारावाला म्हणतात की त्या काळी स्त्रियांना पत्रकार म्हणून फार कुणी पात्र समजत नसत त्यामुळे त्या चांगल्या क्वालिटीचे आणि स्पष्ट फोटो कुणाच्याही आडकाठीशिवाय काढू शकत असत. त्यांना फोटो काढताना कोणी फारसे डिस्टर्ब करत नसे.

डीएललडा १३ – अ पोट्रेट ऑफ होमाई व्यारावाला या पुस्तकात त्या लिहितात की, “त्याकाळी लोक खूप संकुचित विचारांचे, जुन्या विचारांना घट्ट धरून ठेवणारे होते. स्त्रियांनी मोकळेपणाने सगळीकडे संचार करावा अशी त्यांची अजिबात इच्छा नव्हती. परंतु जेव्हा त्या लोकांनी मला साडी नेसून कॅमेरा घेऊन इकडेतिकडे फिरताना पाहिले तेव्हा ते दृश्य त्यांना खूप वेगळे आणि विचित्र वाटले.

 

homai vyarawalla inmarathi
hundredheroines.org

 

सुरुवातीला त्यांना वाटले की मी कॅमेरा घेऊन फक्त दिखावा करतेय किंवा फक्त टाईमपास करतेय. त्यांनी माझ्या कामाकडे अजिबात गांभीर्याने बघितले नाही. याचा मला फायदाच झाला. कारण मी संवेदनशील भागांत जाऊन फोटो काढत असे आणि मला कुणीही अडवत नसे. यामुळेच मला उत्तमोत्तम फोटो काढता आले आणि ते प्रसिद्ध देखील करता आले. जेव्हा मी काढलेले फोटो प्रसिद्ध झाले तेव्हा लोकांना कळाले की मी माझ्या कामासाठी किती कष्ट घेतेय किंवा किती मेहनत करतेय.”

हळूहळू होमाई ह्यांनी काढलेल्या फोटोंना तसेच त्यांच्या नावाला प्रसिद्धी मिळू लागली. १९४२ साली दिल्लीला स्थायिक झाल्यावर त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी मिळाली. त्यांनी ब्रिटिश इन्फॉर्मेशन सर्व्हिसेससाठी काम करणे सुरु केले.

प्रेस फोटोग्राफर म्हणून त्यांनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील अनेक राजकीय आणि राष्ट्रीय नेत्यांची छायाचित्रे टिपली. महात्मा गांधी, पंडित नेहरू, मोहम्मद अली जिना, इंदिरा गांधी, नेहरू-गांधी परिवार यासारख्या मोठ्या नेत्यांची छायाचित्रे त्यांनी अनेकदा काढली.

 

homai 2 inmarathi

 

१९५६ साली दलाई लामा (चौदावे) नथू ला पास मधून पहिल्यांदा सिक्कीमला आले त्यावेळी लाईफ मॅगझीन साठी व्यारावाला ह्यांनी तो क्षण त्यांच्या कॅमेऱ्याने टिपला. त्यांचे बरेचसे फोटो “डालडा १३” या नावाने प्रसिद्ध होत असत. या टोपणनावामागे सुद्धा एक गोष्ट आहे.

त्यांनी “डालडा १३” हे टोपणनाव स्वीकारले कारण त्यांचा जन्म १९१३ साली झाला होता, त्यांना त्यांचे पती वयाच्या १३व्या वर्षी भेटले आणि त्यांच्या पहिल्या गाडीचा नंबर “डीएलडी १३” असा होता. थोडक्यात त्या १३ नंबर लकी मानत असत. म्हणून त्यांनी फोटो प्रकाशित करण्यासाठी “डालडा १३” हे नाव घेतले.

 

nehru 1 inmarathi

 

होमाई व्यारावाला यांनी १९७० पर्यंत फोटोजर्नलिस्ट म्हणून काम केले. ह्या काळात त्यांनी अनेक उत्तमोत्तम फोटो काढून देशविदेशात प्रसिद्धी मिळवली. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत भारत छोडो आंदोलन, दुसरे महायुद्ध ह्या काळातील अनेक संस्मरणीय फोटो काढले. त्यांनी काढलेले काही फोटो आज देखील नावाजले जातात. त्यांच्या ह्या विशेष कामगिरीसाठी त्यांचा २०११ साली “पद्मविभूषण” पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

होमाई यांनी त्यांच्या फोटोंमधून तत्कालीन सामाजिक तसेच राजकीय परिस्थिती दर्शवण्याचे काम केले. १६ ऑगस्ट १९४७ रोजी लाल किल्ल्यावर पहिल्यांदा तिरंगा फडकवताना, भारतातून लॉर्ड माउंटबॅटन ह्यांचे प्रयाण तसेच पंडित नेहरू, महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री ह्यांच्या अंत्ययात्रेची सगळी छायाचित्रे देखील होमाई यांनीच काढली होती.

फोटो काढण्यासाठी त्यांचे सगळ्यात आवडते व्यक्ती म्हणजे पंडित नेहरू होते. पंडित नेहरू सिगारेट पिताना, किंवा तत्कालीन ब्रिटिश उच्चायुक्तांची पत्नी सिमोन यांची मदत करतानाचे फोटो होमाई यांनीच काढले आहेत. पंडित नेहरूंची आज आपण जी छायाचित्रे बघतो, त्यापैकी बरीचशी छायाचित्रे होमाई व्यारावाला यांनीच काढली आहे.

 

homai 3 inmarathi

 

असे खास क्षण कॅमेऱ्यात बंद करणाऱ्या होमाई यांनी पतींच्या निधनानंतर १९७० साली पत्रकारितेतून निवृत्ती घेतली. त्यांना नव्या पिढीच्या फोटोग्राफर्सचे ‘बेताल आणि बेजाबदारपणे’ वागणे पसंत नव्हते. त्यांनी अचानक फोटोग्राफी का सोडून दिली असे त्यांना विचारले असता त्या म्हणाल्या होत्या की ,“आता यात काही अर्थ उरला नाही. आमच्या काळी फोटोग्राफर्ससाठी सुद्धा नियम होते.

आम्ही ड्रेस कोड सुद्धा पाळायचो. आम्ही एकमेकांचा सहकारी म्हणून आदर करत असू. परंतु आता अनेक गोष्टी बदलल्या आहेत. आताची पिढी फक्त काही रुपयांसाठी काम करते. मला या सगळ्याचा भाग व्हायचे नव्हते म्हणून मी पत्रकारितेतुन निवृत्ती घेतली.”

 

indira 2 inmarathi

 

निवृत्त झाल्यानंतर त्या त्यांच्या मुलाकडे राजस्थानला पिलानी मध्ये राहण्यास गेल्या. त्यांचे सुपुत्र फारुख हे बिर्ला प्रौद्योगिकी व विज्ञान संस्थान (बिट्स) मध्ये होते. परंतु १९८९ साली त्यांचे कॅन्सरने निधन झाले आणि होमाई परत एकट्या पडल्या. त्यानंतर त्या बडोद्याला एकट्याच राहत असत. जानेवारी २०१२ मध्ये होमाई त्यांच्या घरातच पडल्या आणि त्यांचे कमरेचे हाड मोडले.

त्यांच्या शेजाऱ्यांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले. तिथे त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. अखेर १५ जानेवारी २०१२ साली वयाच्या ९८व्या वर्षी होमाई व्यारावाला यांनी अखेरचा श्वास घेतला.

ज्या काळी स्त्रियांना घराबाहेर पडून शिक्षण घेण्याची देखील मुभा नव्हती, त्याकाळी होमाई व्यारावाला यांनी फोटोजर्नालिझम सारख्या पुरुषप्रधान समजल्या जाणाऱ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवला आणि पुढच्या पिढीतील स्त्रियांसाठी आदर्श निर्माण केला. त्यांच्या या कर्तृत्वास सलाम!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?