' अभिनयासाठी पुस्तकं विकून गाठली मुंबई आणि बनला बॉलीवूडचा जबरदस्त खलनायक – InMarathi

अभिनयासाठी पुस्तकं विकून गाठली मुंबई आणि बनला बॉलीवूडचा जबरदस्त खलनायक

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

हिंदी चित्रपटातला आयकॉनिक व्हिलन म्हणून ज्याचं नाव घेतलं जातं तो अजित. कसलिही फ़िल्मी पार्श्वभूमी नसताना चित्रपटसृष्टीत अजरामर बनलेलं हे नाव. लहानपणापासूनच सिनेमाचं प्रचंड वेड असणारा हा हैद्राबादी तरुण एक दिवस चक्क पुस्तकं विकतो काय आणि त्या पैशातून मुंबईचं तिकिट काढतो काय आणि त्यानंतर हिंदी चित्रपटातला आयकॉनिक व्हिलन बनतो काय. सगळंच एखाद्या फिल्मी कथेत शोभावसं असं आहे.

 

ajit villan 3 inmarathi

 

हमीद अली खान हे नाव तुम्ही फारसं ऐकलं नसेल किंबहुना हे कोण? असा प्रश्न तुम्हाला पडेल. या नावावर हिंदीतले सत्तर ऐंशीच्या दशकातले एकाहून एक गाजलेले चित्रपट आहेत हे सांगूनही तुम्हाला लक्षात येणार नाही की व्यक्ती कोण? पण या व्यक्तीचा एक कल्ट बनलेला डायलॉग सांगितला तर ही व्यक्ती कोण? हे झटक्यात कळेल,”सारा शहर हमे लॉयन के नाम से जानता है” हा डायलॉग ज्यानं अजरामर केला त्या कलाकाराविषयी आम्ही बोलत आहोत. हमीद अली खानचं पडद्यावरचं नाव होतं, अजित खान. त्याकाळातल्या प्रथेपमाणे त्यानं आपलं हमीद हे नाव बदलून अजित नाव धारण केलं होतं.

 

hyderabad inmarathi

 

हैद्राबादमधील गोलकोंडामधे २७ जानेवारी १९२२ ला हमीदचा जन्म झाला. हमीदचे वडील बशिर अली हे निझामाच्या सैन्यात चाकरीला होते. लहानपणापासूनच त्याला चित्रपट बघण्याचं आणि अभिनयाचं वेड होतं. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर हनमकोंडा ज्युनिअर कॉलेजमध्ये त्यानं प्रवेश घेतला. मात्र आता शिक्षणातून लक्ष उडालेलं होतं आणि सिनेमा खुणावत होता.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

सिनेमात जाण्याची उर्मी त्याला गप्प बसू देत नव्हती आणि एक दिवस त्यानं अभ्यासाची पुस्तकं विकून त्या पैशातून मुंबईचं तिकिट काढलं आणि सिनेमात काम करण्यासाठी मुंबापुरीत पाऊल ठेवलं. अर्थात मुंबईत टिकून रहाणं आणि चित्रपटांमधून भूमिका मिळवणं, दोन्हीही सोपं काम नव्हतंच. मुंबईबाहेर सिनेमाचा जो चकाचक प्रकाश पडतो इथे काम करायला आल्यावर त्या प्रकाशामागच्या अंधार्‍या दुनियेत नवखे वर्षानुवर्षं चाचपडत रहातात.

 

ajit villan inmarathi

हे ही वाचा – बॉलीवूडमध्ये अनोख्या अंदाजासाठी गाजलेल्या या खलनायकांची मुलं काय करतात माहिती आहे?

हमीदचा स्ट्रगल चालू झाला होता, अनेक महिन्यांच्या संघर्षानंतर अखेर दोन चार चित्रपटात त्यानं भूमिका मिळविल्या. कोण कुठला हैद्राबादचा हमीद, त्याला पदार्पणातच मुख्य रोल मिळणं अशक्यच होतं आणि हमीद चित्रपटांचा वेडा असला तरीही डोकं शाबूत असणारा होता. त्याला पुरेपूर माहित होतं की आपल्याला इथे नाव कमवायला वेळ द्यावा लागणार आहे. त्यानं मिळेल ती लहान भूमिका स्विकारली.

अजितला पहिला ब्रेक दिला महेश भट्ट यांच्या वडिलांनी, नानाभाई भट्ट यांनी. त्यांच्या शेहजाद या चित्रपटात अजितनं म्हणजे हमीदनं पहिली भूमिका साकारली. हमीदनं त्याच्या कारकिर्दीची सुरवात ज्युनिअर आर्टिस्ट म्हणून केली. मात्र ज्युनिआ आर्टिस्ट ते मुख्य नायक हा त्याचा प्रवास त्याचे अथक प्रयत्न होते. त्यानं केलेल्या प्रयत्नांना यश आलं आणि या देखण्या तरूणाला शाह-ए-मिस्रा या चित्रपटात भूमिका मिळविली. यात त्याच्यासोबत मुख्य हूमिकेत होती गीता बोस.

 

ajit villan 2 inmarathi

 

या चित्रपटानंतर त्यानं, सिकंदर, हातिमताई, आपबिती, सोने की चिडिया, ढोलक, चंदा की चांदनी या चित्रपटांतून भूमिका साकारल्या. दुर्दैवानं हे सर्व चित्रपट तिकीट खिडकीवर सपशेल आपटले. १९५० साली दिग्दर्शक के. अमरनाथ यांनी त्याला आपल्या बेकसूर या चित्रपटात मधुबालासोबत निवडलं. त्यांनी हमीद खानला सल्ला दिला की त्यानं सोपं सुटसुटीत नाव धारण करावं.

नाव बदलण्यातही नानाभाई भट्ट हे मदतीला आले, यांच्या सल्ल्यानं हमीदनं “अजित” हे स्क्रिन नेम धारण केलं. यानंतरही त्यानं काही चित्रपटात भूमिका साकारल्या. मात्र राज, दिलीप, देव यांची जादू इतकी होती की या अ दर्जाच्या गटातल्या चित्रपटात अजितला सहाय्यक भूमिकांतच समाधान मानावं लागत होतं.

 

ajit inmarathi

 

नया दौर आणि मुघल-ए-आझम या अजरामर चित्रपटांतही अजितची सहाय्यल भूमिकाच आहे. मुख्य नायकाच्या भूमिकेतले चित्रपट आपटी खात होते. आता त्यानं हिरोच्या भूमिका सोडून व्हिलनच्या भूमिका करण्याचं ठरविलं. खलनायक म्हणून त्याचा पहिला चित्रपट होता, सूरज. एरवी व्हिलन म्हणलं की कुरूप हे समीकरण ठरलेलं असायचं अपवाद प्राणचा.

आता हा देखणा रूबाबदार आणि भारदस्त आवाजाचा व्हिलन बघून प्रेक्षकांना काहीतरी नवीन वाटू लागलं आणि त्यांनी अजितला खलनायकाच्या भूमिकेत ताबडतोब स्विकारलं. यानंतर त्यानं खलनायक म्हणूनच कारकीर्द चालू ठेवली. चित्रपटातली नायकांची पिढी बदलून आता अमिताभराज चालू झालं होतं.

 

ajit villian 1 inmarathi

 

अमिताभ नावाच्या महापुरातही अजितनं त्याच्या भूमिका ठळकपणे लक्षात रहातील अशा केल्या. जंजीर, यादों की बारात, डॉन ही त्याची काही उदाहरणं. डॉन मधे अजित नसता तर अमिताभचा डॉन एक आणा फ़िका झाला असता. अजित खलनायक म्हणून पडद्यावर आला की हिरोचं हिरो असणं दुप्पट जोरकस असायचं.

हिंदी चित्रपटातल्या खलनायकाला अजितनं एक क्लासिक स्टाईल दिली. त्याचे रुबाबदार सूट, तोंडातलं चिरूट आणि हायफ़ाय बोलणं यानं हिंदी चित्रपटातल्या खलनायकाची प्रतिमाच बदलली. त्याचा बॅरिटोन आवाज कानांना वेगळा वाटत असे आणि तीच त्याची खासियतही बनली.

दिग्दर्शक प्रकाश मेहरा सांगतात की, हिंदी चित्रपटातले खलनायक हे उंच पट्टीत बोलणारे आणि आक्रस्ताळे असत. त्यांचा क्रूरपणा दाखविण्यासाठी अवाजवी आरडाओरड असे.

अजितला यात वेगळेपणा आणायचा होता म्हणून त्यानं बरोबर उलट करायला सुरवात केली. सगळ्यात आधी त्यानं व्हिलनचं दिसणं बदललं. त्याला एखाद्या व्यावसायिका उच्चभ्रू लूक दिला आणि मग या उच्चभ्रू वर्गाला साजेशी इंग्लिशमिश्रीत हिंदी भाषा घेतली.

आक्रस्ताळ्या आवाजात बोलण्याऐवजी अगदी थंड चेहर्‍यानं आणि शांत पट्टीत तो संवाद बोलायचा. याचा अपेक्षित परिणाम झाला. अजित पक्क्या आतल्या गाठीचा आणि थंडपणे हिरोला छळणारा व्हिलन बनला. प्रेक्षकांनी व्हिलनमधला हा बदल आनंदानं स्विकारला.

 

ajit inmarathi 1

 

अजितची खासियत म्हणजे त्याचा वेगळ आवाज आणि त्याचं हिंग्लिशमधे डायलॉग बोलणं, जे आजवर कोणीच केलेलं नव्हतं. इंग्रजाळलेल्या हिंदीत तो बोलायचा आणि प्रेक्षकांना ते ऐकायला आवडायचं. म्हणूनच तो पडद्यावर मोना डार्लिंग म्हणतो तो आजही मिमिक्रीचा विषय आहे. त्याची मोना डार्लिंग आणि रॉबर्ट हे आजही मीमचे लाडके विषय आहेत. २२ ऑक्टोबर १९९८ या दिवशी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि अजित नावाचं पडद्यावरचं रूबाबदार वादळ शांत झालं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?