' “असली थेरं लग्नानंतरच कर”, आजही मुलींना आडकाठी ठरणाऱ्या या ९ गोष्टी – InMarathi

“असली थेरं लग्नानंतरच कर”, आजही मुलींना आडकाठी ठरणाऱ्या या ९ गोष्टी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

“असला भडक मेकअप? ही सगळी थेरं नवऱ्याकडे गेल्यावर करा”, “तरुण मुलींना नाईटआऊटची वगैरे गरजच काय? सासरी गेल्यावर काय हवं ते करा”…ही अशी वाक्य ऐकली की तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय रहात नाही. हो ना?

धोक्याचं मानलं जाणारं ‘सोळावं वर्ष’ सरलं की ‘मुलगी मोठी झाली हो’ अशा प्रतिक्रिया लोकांकडून ऐकू आल्या की पालकही नकळत आक्रमक पवित्रा धारण करतात. मग लाडाच्या लेकींवर अशी काही बंधनं लादली जातात, जी ऐकूनही तुम्हाला हसू आवरणार नाही.

एकीकडे स्त्री-पुरुष समानतेच्या गप्पा मारणाऱ्या घरांमध्येही रात्री उशीरापर्यंत मुलगी बाहेर थांबली की तिला ‘स्त्री’ असण्याची आठवण करून दिली जाते.

ऐरव्ही गबाळ्या अवतारातील मुलीला स्त्रीच्या श्रृंगाराची आठवण करून दिली जाते, मात्र जास्त मेकअप केल्यानंतरही ‘नखरा पुरे’ म्हणून दटावलं जातं. या सगळ्या गदारोळात नेमकं कसं वागायचं? याचं उत्तर मुलींना मिळतच नाही.

आपल्या कोणत्याही मागणीवर ‘लग्न’ हे उत्तर कसं असू शकतं? याचं उत्तर तुम्ही शोधत असाल तो प्रयत्न थांबवा, कारण आजतागायत कुणालाही त्याचं उत्तर मिळालेलं नाही.

 

rani kiran kher

 

‘सगळी हौसमोज करा पण लग्नानंतर’ असा विचित्र सल्ला देणा-या पालकांचा नक्की फंडाच कळेनासा होतो.

तर अशा सगळ्या बिचाऱ्या, गोंधळलेल्या मुलींची व्यथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक प्रयत्न! तरुण मुलींना नेमकं कोणकोणत्या दिव्यांतून जावं लागतं, कोणकोणत्या बंधनांत विनाकारण अडकवलं जातं, हे प्रत्येकाने किमान एकदा तरी समजून घ्यायला हवं. हे सगळं वाचल्यानंतर तुम्हीही म्हणाल, “बाईचा जन्म नकोच”.

तरुणींच्या घरात हमखास ऐकू येणारे काही भन्नाट डायलॉग आणि कुणालाही ठाऊक नसणारी त्यामागील कारणं…

१. सोलो ट्रिप? नवऱ्याबरोबर हनीमूनलाच जाऊन फिरा

सोलो ट्रिप ही संकल्पना नवी नाही. आपला मित्र, भाऊ यांच्या सोलो ट्रिप्सचे फोटो पाहिल्यानंतर मुलींनाही इच्छा होणं स्वाभाविक आहे. मात्र घरी हा विषय काढल्यानंतर परवानगीचा प्रश्नच नाही उलट चित्रविचित्र कारणं ऐकावी लागतात.

 

kangana inmarathi

 

“एकटीने भटकायचंय कारणं काय? त्यापेक्षा लग्न करून नवऱ्याबरोबर हवं तिथे जा” असा सल्ला देताना, त्यानंतरही सासरच्या मंडळींची परवानगी घे असंही सांगायला पालक विसरत नाहीत.

त्यामुळे लग्नाआधी माहेरचे आणि नंतर सासरंचे, तुम्हाला प्रत्येकवेळी परवानगी घ्यायला लागणारच!

२. रेड लिपिस्टक, नवऱ्याला दाखवून खुश कर

मेकअपबाबत जागृक असलेल्या मुलींना ‘हॉट रेड’ लिपस्टिक खुणावते. ‘असला नखरा करण्याची काय गरज? त्यापेक्षा लग्नानंतर नवऱ्याला खुश करण्यासाठी ही लिपस्टिक राखून ठेव’ असा अजब सल्ला ऐकल्यानंतर मुलींच्या उत्साहावर पाणी पडतं.

 

lipstick inmarathi

 

लिपस्टिकचा रंग आणि लग्न यांचा नेमका संबंध काय? हा प्रश्न इथे चुकूनही विचारायचा नाही,

३. स्लिव्हलेस घाल, पण लग्नानंतर…

कपडे आणि लग्न यांचं भन्नाट कनेक्शन जोडण्याची कला पालकांना ठाऊक असते. रात्रीअपरात्री सुरक्षेच्या कारणास्तव अंगप्रदर्शन होणारे कपडे घालू नयेत ही त्यांची अपेक्षा योग्यच आहे. मात्र स्लिव्हलेस, किंवा आधुनिक फॅशनचे कपडे घालायचे असतील तर लग्नानंतच हा नियम अनेक घरांमध्ये लागू केला जातो.

 

tapsee pannu inmarathi

 

‘मुलगी म्हणजे जीवाला घोर’ असं म्हणत ‘लग्नानंतर असे कपडे घाल म्हणजे तुझं रक्षण करायला नवरा समर्थ असेल, हा सल्ला ऐकल्यानंतर मुलींनो, तुमचं कपाळावर हात मारून घेणं अगदीच स्वाभाविक आहे.

हे ही वाचा – ‘बघण्याच्या’ कार्यक्रमात मुलीला विचारले जाणारे विचित्र प्रश्न…

४. ‘असले कपडे’, फक्त नवऱ्यासाठीच हं

काळानुसार हल्ली कपड्यांसह अंतर्वस्त्रांचाही चॉइस बदलला आहे. प्रत्येक कपड्याला अनुसरून असणारी अंतर्वस्त्र, पिकनीकला गेल्यावर बिकीनी, स्विमिंग सुट मध्ये मुली सहजतेने वावरतात.

मात्र पालकांच्या मते लग्नापुर्वी असे कपडे घालणं म्हणजे पापच! लग्न होईपर्यंत मुलींचे आचारविचार, राहणीमान हे उत्तम असायला हवं.

 

alia inmarathi

 

अंगप्रदर्शन करणारे, मादक कपडे हे फक्त पतीराजांच्यासमोरच घातले जावे असा कानमंत्र दिला जातो. बाकी कुठेही असले कपडे घातले तर ‘पालकांच्या संस्कारांवरच’ बोट ठेवलं जातं ना!

५. मित्रांबरोबर सलगी नको, लोक काय म्हणतील

मुलींना मैत्रिणींसह घनिष्ट मित्रही असू शकतात ही बाब अनेक पालकांच्या पचनी पडत नाहीत. मुलांशी हसून, खिदळून बोलणारी मुलगी म्हणजे लफडेबाज अशी काहीशी समाजाची धारणा असल्याने आपल्या मुलीने मुलांशी अतिरिक्त परिचय ठेवू नये अशी ताकीद मुलींना दिली जाते.

 

friends inmarathi

 

यामध्ये पालकांचा आपल्या लेकीवर विशवास असला तरी ‘लोक काय म्हणतील?’ ही शंका त्यांना स्वस्थ बसू देत नाही.

६. जास्त शिकवू नका, नाहीतर मुलगा मिळणं कठीण

मुलींनाही मुलांच्या बरोबरीने शिक्षण दिलं जातं. अनेक घरांत मुलींच्या शिक्षणाबाबत पालक जागृक असतात. मात्र अनेक गावांत आजही मुलींना जास्त शिकवू नका असा सल्ला थोरामोठ्यांकडून दिला जातो.

जास्त शिकलेल्या मुली या मुलांपेक्षा वरचढ ठरतात. अनेकदा अशा मुलींच्या लग्नाबाबत अपेक्षा उच्च असतात. तर काहीजणी आपला नवा स्वतःच निवडतात.

 

convocation inmarathi

 

त्यामुळे योग्य वर हवा असेल, तर मुलींना जास्त शिकवू नका. पुस्तकी ज्ञानापेक्षा त्यांना घरकाम, स्वयंपाक याचे धडे द्या अशी अपेक्षा आजही केली जाते.

७. लग्नाआधी किस? म्हणजे पापच!

 

maa inmarathi

 

अफेअर आणि ब्रेकअप या गोष्टी आता काही नव्या नाही.  एदा ब्रेकअप झाल्यानंतर लग्नासाठी पाहिलेल्या जोडीदाराला आपला भुतकाळही मनमोकळेपणाने सांगितला जातो. मात्र पालकांना ही गोष्ट मान्य नसते.

 

kissing inmarathi

 

लग्न ठरवताना आपल्या मुलीच्या चारित्र्यावर, भुतकाळावर कोणीही बोट ठेवू नये यासाठी लग्नापुर्वी मुलीला प्रेमात पडण्याला सक्त मनाई असते. त्यात किस किंंवा शारिरीक संबंध यांचा प्रश्नच निर्माण होत नाही.

हे ही वाचा – “एक ‘किस’की किंमत तुम क्या जानो”… वाचा किसिंगचे ८ वाईट परिणाम!

८. लग्नापुर्वी टॅन्पॉन नकोच बाई

मासिक पाळीदरम्यान वापरण्यात येणाऱ्या पॅडसाठी टॅम्पॉन, मॅन्युस्ट्रिअल कप यांसारखे पर्याय मुलींकडून वापरले जातात. हे सगळे पर्याय सुरक्षित असले तरी पालकांकडून मात्र यावर शंका निर्माण केली जाते.

 

tampon inmarathi

 

टॅम्पॉनसारख्या साधनांच्या वापरामुळे लग्नापुर्वीच व्हर्जिनिटी जाण्याचा धोका असतो अशी सबब देत अविवाहित मुलींना विरोध केला जातो. प्रत्यक्षात अशा साधनांचा वापर कोणीही करू शकतो आणि याचा व्हर्जिनिटीशी काहीही संबंध नसतो असं डॉक्टरांकडून सांगण्यात येत असलं तरी पालकांचा विरोध कायम असतो.

९. हेअरकलर, टॅटु… कशाला हवाय असलं फॅड

हेअरकलर, टॅटू करायला आवडत नाही अशी मुलगी शोधूनही सापडणार नाही. मात्र हे फॅड हवंय कशाला? म्हणत मुलींना गप्प केलं जातं.

मुलगी बघायला आलेल्या मंडळींना मुलीचं केस रंगवणं आवडलं नाही तर? मुलाच्या आईला तिचा टॅटू खटकला तर? केवळ यावरून मुलीला नाकारलं गेलं तर? अशा अनेक शंका काढून मुलीला रोखलं जातं.

 

hair inmarathi

 

वास्तविकतः मुलींच्या आवडीनिवडी, छंद आणि लग्न यांचा काहीही संबंध नाही, किंबहूना मुलींना मनसोक्त जगण्याचा अधिकार आहे, त्यासाठी लग्न, संसार, यांचं कुंपण नकोच.

अनेक घरांमध्ये मुलं-मुली भेद न करता मुलींना पुर्ण स्वातंत्र्य दिले जाते. लग्नापुर्वी आपल्या लेकीचे सगळे लाड पुरवले जातात. मात्र आजही अनेक घरांत मुलींवर काही बंधंनं लादली जातात. संस्कार, सुरक्षा यांसाठी काही बंधनं प्रत्येकावर असणं, शिस्त असणं हे अपेक्षित आहेच मात्र केवळ मुलगी म्हणून तिच्या पायात स्वतंत्र बंधनांची बेडी नको.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?