' "हिंदू-मुस्लिम लोकांचा डीएनए एकच" च्या निमित्ताने: हिंदुत्वाच्या व्याख्येचा पुनर्विचार

“हिंदू-मुस्लिम लोकांचा डीएनए एकच” च्या निमित्ताने: हिंदुत्वाच्या व्याख्येचा पुनर्विचार

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

लेखक : तन्मय केळकर 

===

काही दिवसांपूर्वी भारतीय हिंदू व भारतीय मुस्लिमांचा DNA एकच असल्याचं विधान सरसंघचालकांनी केल्यानंतर अनेक उलटसुलट चर्चा झाल्या. या निमित्ताने हिंदू म्हणजे कोण?, हिंदुत्व म्हणजे काय? याबाबत पुनर्विचार करण्याची निकड मात्र प्रकर्षाने जाणवली. या मुद्द्यांवर प्रकाश टाकणारे 4 लेख टाकतो आहे….

हिंदुत्व_व्याख्या_पुनर्विचार – 1 : पुनर्विचार कशासाठी?

१९२१ मध्ये सावरकरांनी रत्नागिरी तुरुंगात ‘हिंदुत्व’ ग्रंथ लिहिला. यात त्यांनी हिंदुत्वाची आज सर्वाधिक वापरली जाणारी व्याख्या केली. ती अशी –

आसिंधुसिंधुपर्यन्ता यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स हिंदुरिति वै स्मृत: ।।

( सिंधू नदीपासून समुद्रापर्यंत असलेल्या भारतभूमीला जो आपली पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे तो हिंदू)

 

savarkar inmarathi

 

त्यात त्यांनी “हिंदु”ची “पितृभू” आणि “पुण्यभू” या निकषांवर आधारित व्याख्या केली. या व्याख्येचा वापर आज हिंदुत्ववादी आणि हिंदुत्वविरोधी दोघेही आपापल्या आकलनानुसार करतात. पण आज ह्या व्याख्येला एक शतक लोटल्यानंतर “हिंदु”च्या व्याख्येवर पुनर्विचार करावा लागेल, कारण –

१. सावरकरांनी ज्याला “आसिंधुसिंधु म्हटलं त्या भूभागाचा जवळपास ३३% भाग आज भारताबाहेर (पाकिस्तान आणि बांग्लादेश) आहे. “आसिंधुसिंधु” ह्या भौगोलिक मर्यादेत न बसणारे काही भूभाग आज (१९५० नंतर) भारतात आहेत. उदा. लडाख (हा हिमालयाच्या उत्तरेचा मध्य आशियाचा भाग आहे), अंदमान निकोबार द्वीपसमूह, लक्षद्वीप इ.

२. “आसिंधुसिंधु” भौगोलिक मर्यादेत न बसणारे पण स्वतःला “हिंदू” म्हणवणारे अनेक लोक व जनसमूह जगात आहेत. उदा. ISKCON, रामकृष्ण मिशन इ. हिंदवी धर्मविचाराने प्रभावित होऊन अनुयायी बनलेले पाश्चात्य नागरिक, आग्नेय आशियाई (बाली, मलेशिया, व्हिएतनाम इ.) + नावाने किंवा religion ने हिंदू नसूनही स्वतःला हजारो वर्षांच्या अखंडित हिंदवी सभ्यता प्रवाहाचा (civilizational flow) भाग मानणारे उदा. ताहिर गोरा, तारिक फतेह, हमीद बाशानी इ.

 

iskon prabhu inmarathi

 

३. भारताला “पितृभू” व “पुण्यभू” मानणाऱ्या परिवारात जन्मूनही भारताबाहेर निष्ठा असलेल्या विचारधारांचे अनुयायी सावरकरांनी हिंदुत्वाची व्याख्या केली त्या काळात नव्हते (चीनधार्जिणे/ सोव्हिएतधार्जिणे/ पॅलेस्टाईनधार्जिणे/ पाकिस्तानधार्जिणे/ खलिस्तानवादी इ.). अश्या लोकांना नावापुरतं हिंदू म्हणू शकतो. पण त्यांचं वर्तन आणि विचार हिंदुद्वेषाने बरबटलेले आहेत.

४. त्या काळात सिंधू खोरं सभ्यतेच्या (हडप्पा/ मोहेंजोदडो) उत्खननाला तितकासा वेग आला नव्हता आणि त्यामुळे आर्य आक्रमण/ स्थलांतर सिद्धान्त त्या काळात प्रमाण मानला जाई. आज तो पूर्णपणे खोडला गेलेला आहे.

५. त्या काळात भारतीयांनी स्वतः स्वतःसाठी बनवलेली संवैधानिक राज्यरचना अस्तित्वात नव्हती. आज ती आहे.

६. गेल्या काही दशकांमध्ये सर्वात मोठी हिंदुत्ववादी संघटना असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाने “हिंदू” शब्दाचा नवीन अर्थ लावल्याने काही प्रमाणात वैचारिक गोंधळ निर्माण झाला आहे.

 

rss inmarathi

 

#हिंदुत्व_व्याख्या_पुनर्विचार – २ : सावरकरांचे हिंदुत्व

हिंदुत्वाची सर्वाधिक वापरली जाणारी व्याख्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या ‘हिंदुत्व’ या ग्रंथात केली. ती अशी –

आसिंधुसिंधुपर्यन्ता यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स हिंदुरिति वै स्मृत: ।।

( सिंधू नदीपासून समुद्रापर्यंत असलेल्या भारतभूमीला जो आपली पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे तो हिंदू)

सावरकरांनी हिंदुत्वाची व्याख्या का केली? त्यात ‘पितृभू’ आणि ‘पुण्यभू’ हे निकष का वापरले? हे कारण शोधण्यासाठी 1921 च्या आसपासची राजकीय परिस्थिती विचारात घ्यावी लागेल.

१. त्यावेळी पहिले महायुद्ध नुकतंच संपलं होतं. इतका मोठा भौगोलिक विस्तार असलेलं ज्ञात इतिहासातील पहिलेच युद्ध होतं. या युद्धाच्या मुळाशी राष्ट्र आणि राष्ट्रवाद ही संकल्पना होती. त्यामुळे जगभरच्या जनसमुदायांपैकी कोण कुणाला ‘आपलं’ (स्व-राष्ट्रीय स्वकीय) आणि कुणाला ‘परकं’ (परराष्ट्रीय शत्रू) मानतो यावरून युद्धातल्या बाजू ठरत होत्या. जर्मन वंशाचे अमेरिकन जर्मनीच्या समर्थनार्थ युरोपच्या दिशेने जाऊ लागले. म्हणजेच निवासस्थान कुठेही असलं तरीही निष्ठा पितृभूशी असते ही मानवी प्रवृत्ती सावरकरांनी विचारात घेतली.

 

world war 1 inmarathi

हे ही वाचा – “मुस्लिम म्हणून तुम्हाला हिंदू धर्माबद्दल काय वाटतं?” : मुस्लिमांची अचंबित करणारी उत्तरं

२. पहिल्या महायुद्धानंतरच्या घटनांचा परिपाक म्हणून तुर्कस्तान आणि अरबस्तानातली खिलाफत बरखास्त केली गेली. पण हे खिलाफत वाचवण्यासाठी खिलाफतनिष्ठांनी दंगेधोपे केले ते तुर्कस्तानात किंवा अरबस्थानात नव्हे, तर हिंदुस्थानात.

भारतीय उपखंडात कोट्यवधी लोक असे होते जे वंशाने भारतीय असले तरीही त्यांच्या निष्ठा ते जिला पुण्यभूमी मानत होते त्या प्रदेशाशी जोडलेल्या होत्या. म्हणजेच आपलेपणाची भावना पितृभूमीप्रमाणेच पुण्यभूमीशीही असते हे निरीक्षण सावरकर नोंदवतात.

३. १९०९ चा मोर्ले मिंटो सुधारणा कायदा आणि १९१९ चा माँटेग्यू चेम्सफर्ड सुधारणा कायदा यांमुळे हे सिद्ध झालं होतं की इंग्रज आज ना उद्या भारतीयांना देश चालवण्याचे घटनात्मक अधिकार देतील. तसे अधिकार ज्या कोणत्या एतद्देशीयांना मिळतील त्यांच्या मनात हिंदुस्थान म्हणजे नेमकं काय?, हिंदुस्थानी म्हणजे नेमके कोण?, हिंदू म्हणजे नेमके कोण? याच्या संकल्पना जर सुस्पष्ट नसतील तर देशाचा कारभार चालवणे अशक्य होऊन बसेल याची कल्पना सावरकरांना आली.

४. Religious मतांवरून आणि विशेषतः हिंदू म्हणजे कोण असतात आणि कोण नसतात यावरून राजकीय समीकरणे ठरत होती. एकेक हिंदवी संप्रदाय आपण हिंदू ह्या संज्ञेत कसे समाविष्ट नाही हे दाखवण्यासाठी चढाओढ करत होता. १९२१ च्या जनगणनेत आर्य समाजाने स्वतःला अहिंदू म्हणवून घेतले.

शीखांनीही त्यापूर्वीच स्वतःला हिंदूंहून वेगळा religion म्हणवले. केशधारी (ज्यांना आपण आज शीख म्हणतो असे पगडीधारी) आणि सहजधारी (पगडी न घालणारे पण १० गुरूंना पूजनीय मानणारे इतर करोडो अनुयायी) यांच्यातील दरी वाढत चालली होती.

 

arya samaj inmarathi

 

५. जागोजागी दंगेधोपे होऊन हिंदूंच्या एकतर्फी कत्तली होऊन अनेक जिल्हे एकेक करत हिंदुमुक्त होत होते. हिंदू या संज्ञेत समाविष्ट असलेल्यांचे राजकीय अधिकार आणि सुरक्षा क्रमाक्रमाने कमी होत होती.

व्याख्येत पितृभू आणि पुण्यभू हे शब्द का वापरले याचाही आढावा घेतला पाहिजे. सावरकर हिंदुत्व या ग्रंथात असं लिहितात की पहिल्या महायुद्धात अमेरिका विरुद्ध जर्मनी युद्ध सुरू झाल्यावर अनेक जर्मन वंशाचे अमेरिकन जर्मनीच्या समर्थनार्थ युरोपच्या दिशेने जाऊ लागले. म्हणजेच निवासस्थान कुठेही असलं तरीही निष्ठा पितृभूशी असते ही मानवी प्रवृत्ती सावरकरांनी विचारात घेतली. तसेच तुर्की आणि अरबस्तानातली खिलाफत बरखास्त केल्यावर खिलाफतनिष्ठांनी दंगेधोपे केले ते भारतात. म्हणजेच आपलेपणाची भावना पितृभूमीप्रमाणेच पुण्यभूमीशीही असते हे निरीक्षण सावरकर नोंदवतात.

मक्का, मदिना, जेरुसलेम वगैरे पवित्र मानलेल्या क्षेत्रांमध्ये जगभरातल्या विविध देशांमध्ये राहणाऱ्या मुस्लिमांचे हितसंबंध व त्यानुसार राजकीय भूमिका व मानसिक निष्ठा ठरतात ही निर्णायक महत्वाची प्रवृत्ती सावरकर विचारात घेतात.

पण त्या काळात असेही लोक फारसे अस्तित्वात नव्हते जे कोणत्याही भूमीला पितृभू/ पुण्यभू मानायला इन्कार करतात.

*** #हिंदुत्व_व्याख्या_पुनर्विचार -३ : आजचे हिंदू कोण? ***

आज हिंदू ह्या शब्दाची व्याख्या करण्याची आणि हिंदू ह्या नावाखाली एकत्र यायची गरज असेलही किंवा कदाचित नसेलही. पण खालील विचारधारा असणाऱ्या नागरिकांचं फक्त राष्ट्रव्यापीच नव्हे तर जागतिक स्तरावर संघटन गरजेचे आहे. त्यांनाच “हिंदू” म्हटलं पाहिजे –

 

hindu people inmarathi

 

हिंदू म्हणजे कोण? –

१. Religious बाबतीत –

“फक्त माझेच religious विचार बरोबर आहेत आणि जो माझ्या religious विचारांशी सहमत नाही तो कायमस्वरूपी नरकात सडण्याच्या लायकीचा आहे” असं जो मानत नाही तो….

भारतात दार्शनिक वैविध्य अपरंपार आहे. कुणी सगुण उपासक तर कुणी निर्गुण उपासक, कुणी द्वैतवादी तर कुणी अद्वैतवादी, प्रत्येकाची इष्टदेवता व पूजापद्धती बऱ्यापैकी वेगळी…. पण सर्व भारतीय पंथ संप्रदायांना समान असलेले लक्षण म्हणजे जो आपल्या पंथाचा नाही तो महापापी असून कायम नरकात सडण्याच्या लायकीचा आहे असं कोणताही भारतीय संप्रदाय मानत नाही. जैन, बौद्ध, चार्वाक, लिंगायत, शीख, वैष्णव, शैव, शाक्त वगैरे सर्वांचे या मुद्द्यावर एकमत आहे.

२. सांस्कृतिक बाबतीत –

जो एक वेळ मनातून नास्तिक असेल, पण पर्यावरणाशी व मातीशी जोडले गेलेले सण उत्सव साजरे करतो तो….

हिंदवी सण व परंपरा मुख्यतः या मातीशी व भारतीय ऋतुमानाशी घट्ट जोडल्या गेल्या आहेत. याउलट अहिंदू सण उत्सव हे दंतकथा व जयंती/ मयंतीवर आधारित आहेत. उदा. हिवाळ्याच्या सुरुवातीची दिवाळी, सुगीच्या हंगामातील संक्रांत/ लोहरी/ ओणम/ पोंगल, ऋतू पालट होतानाची नवरात्रे (शरद & वसंत ऋतूत) इ. त्यातही दिवाळी, दसरा, नववर्ष, संक्रांत असे काही सण जवळपास सर्व प्रांतांतल्या हिंदू, जैन, बौद्ध, शीख, नास्तिक वगैरेंना सर्वांना common आहेत.

 

holi-festival-photos-inmarathi06

 

हे सण साजरे करण्यासाठी ईश्वराच्या अस्तित्वावर किंवा पुराणकथांवर विश्वास असणे विशेष आवश्यक नाही. ते फक्त आनंदोत्सव आहेत. याउलट बकर ईद, ख्रिसमस, रमजान, गुड फ्रायडे इ. सण अरबस्तान/ युरोप किंवा जगातल्या कोणत्याच भागाच्या ऋतुमानाशी निगडित नाही. त्या सणांचा संबंध पुराणकथांशी आहे. अल्लाह/ येशूवर श्रद्धा नसली तर ते सण साजरे करणं निरर्थक होतं.

३. राजकीय बाबतीत –

Exclusivist विस्तारवादी कट्टर राजकीय विचारधारांच्या [इस्लामीस्ट, साम्यवाद (Wokism), Christianity इ.] धोक्याबाबत आणि अतिरेकी सहिष्णुतेच्या परिणामांबद्दल जो सजग आहे तो….

हिंदू या शब्दाची किळस असलेल्या आणि स्वतःला हिंदू म्हणवणाऱ्या जनसमूहाला संपवू इच्छिणाऱ्या तीन मुख्य विचारधारा आज सक्रिय आहेत. या विचारधारा अधिकाधिक लोकांना आपल्या कंपूत सामील करवू इच्छितात (विस्तारवादी). कंपूतला कोण आणि कंपूबाहेरचा कोण याची स्पष्ट कल्पना त्यांना असते. कंपूबाहेरच्यांबद्दल या तिघांनाही तीव्र तिरस्कार असतो (exclusivism).

आपलीच विचारधारा १००% बरोबर असून त्यात सुधारणा आवश्यक नाही यावर त्यांचा ठाम विश्वास असतो (कट्टरता). तिघेही हिंदूंना (विशेषतः हिंदुत्ववाद्यांना) १ नंबरचा शत्रू मानतात. पण हिंदूंनी दाखवलेल्या सहिष्णुतेचा तिथेही पुरेपूर लाभ उचलतात. या ३ विचारधारांबद्दल सजग असणे हे जागरूक हिंदुत्वाचे लक्षण आहे.

हिंदूची ही लक्षणे आहेत, व्याख्या नाही. यातून एखादी सुटसुटीत व्याख्या काढायची म्हटली तर काढता येईलही. पण वरील वैचारिक बैठक असलेल्या लोकशाही जगातील नागरिकांची हातमिळवणी गरजेची आहे. ही लक्षणं भारतीय संदर्भात ‘हिंदू’ किंवा ‘हिंदवी’ (Indic) ची ठरू शकतील. पण त्याखेरीज, भारतीय उपखंडाबाहेरील ‘Pagan’ म्हणवल्या गेलेल्या संस्कृती व विचारधारांशी हातमिळवणी करण्यासाठीही त्याचा उपयोग होऊ शकेल.

(क्रमशः)

*** #हिंदुत्व_व्याख्या_पुनर्विचार – ४ : हिंदू कोण नव्हेत? ***

 

muslim sa inmarathi

हे ही वाचा – इस्लाम+ख्रिश्चनांच्या हजारो वर्षांच्या आक्रमणानंतरही हिंदूधर्म टिकून राहण्याचे कारण काय? वाचा

१९६०च्या दशकापासून ( विशेषतः आणीबाणीनंतर) संघ परिवाराने “हिंदू”ची व्याख्या बर्‍याच प्रमाणात बदलली. या बदललेल्या व्याख्येच्या समर्थनार्थ हे युक्तिवाद केले जातात –

१. स्वतःला भारतीय म्हणून घेणारा प्रत्येक जण हा हिंदूदेखील असतो (जसे मोहम्मदीय हिंदू, ख्रिस्ती हिंदू इ.)

२. भारतात राहणारा व भारतीय संस्कृतीनुसार वागणारा प्रत्येक जण हिंदू असतो.
३. सर्व भारतीय हे हिंदू आहेत.
४. भारतीयता म्हणजेच हिंदुत्व.
५. मुस्लिम किंवा ख्रिस्ती असल्यामुळे एखाद्याचे राष्ट्रीयत्व बदलत नाही.

पण या भूमिकेत आणि युक्तिवादांमध्ये काही त्रुटी आहेत. त्या अश्या –

१. मुस्लिम व ख्रिश्चन हे जर मुळातच मुहम्मदीय हिंदू व ख्रिस्ती हिंदू असतील तर त्यांची घरवापसी करण्याची काय गरज?

२. मुळातच इस्लाम, ख्रिस्ती व Communism ह्या religions च्या अनुयायांनी स्वतःला “हिंदू” या संकल्पनेत समाविष्ट करण्यासाठी आग्रह केला आहे का? नसेल तर त्यांना ओढून ताणून यात बसवण्याचा अति-समावेशक खटाटोप नक्की कशासाठी?

३. वरील तिन्ही religions च्या शिकवणीचा पाया हाच मुळात काफ़िर/ pagan/ heathen वगैरेंशी (म्हणजेच हिंदूंशी) शत्रुत्व हा आहे. मग तरीही त्यांना जबरदस्तीने हिंदू म्हणण्यात काय अर्थ आहे?

४. त्या विचारधारांवर “हिंदू” हे लेबल चिकटवल्यामुळे त्यांची हिंदुद्वेष्टी वागणूक बदलणार आहे का?

५. हिंदुत्वाची वैचारिक पायाभरणी करणाऱ्या कुणीही हिंदू हा शब्द वरील अर्थाने वापरला आहे का? हिंदुत्व चळवळ सुरू करताना “इस्लामी + ख्रिस्ती + Communist” विरुद्ध “हिंदू” अशी राजकीय परिस्थिती होती. या परिस्थितीत आज काही बदल घडला आहे का? जर नसेल तर त्यांच्या व्याख्यांपासून भरकटण्यामागे तसंच काही तरी मजबूत कारण असावं लागेल. असं काही कारण खरोखरच आहे का?

६. सर्वसामान्यांमध्ये कार्यरत असलेल्या एका राष्ट्रव्यापी संघटनेने सर्वसामान्यांना सहज कळतील असेच शब्द वापरायला नकोत का?

संघ परिवार आज करत असलेली हिंदुत्वाची व्याख्या ही वास्तवापेक्षा जास्त कल्पनेच्या नंदनवनात रमणारी आहे. या व्याख्येमुळे “हिंदू” ही संकल्पना कालसुसंगत होत नसून पूर्णपणे विपर्यस्त होते आहे. ही संकल्पना बहुसंख्य हिंदूंसाठी अनाकलनीय आहे आणि बहुसंख्य अहिंदूंसाठी टाकाऊ आहे.

या व्याख्येमुळे हिंदूंचा व विशेषतः हिंदुत्ववाद्यांचा जबर वैचारिक गोंधळ उडणार आहे. या व्याख्यानाला घटनेत किंवा कायद्यातही आधार नाही. या व्याख्येचा प्रसार केल्याने हिंदुत्व विचार व चळवळ सुरू करण्यामागील मूळ हेतूच बाद ठरणार आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?