' अक्षरधाम मंदिरावर हल्ला, १७ वर्षांचा तपास आणि थेट काश्मीर कनेक्शन! वाचा कटू सत्य – InMarathi

अक्षरधाम मंदिरावर हल्ला, १७ वर्षांचा तपास आणि थेट काश्मीर कनेक्शन! वाचा कटू सत्य

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

२४ सप्टेंबर २००२ हा दिवस आठवला की अक्षरश: अंगावर काटा उभा राहतो. हाच तो काळा दिवस ज्या दिवशी गुजरातच्या गांधीनगरमधील अक्षरधाम मंदिरावर दहशतवाद्यांनी भयंकर हल्ला केला होता.

या हल्ल्यात ३० लोकांनी आपले प्राण गमावले होते तर ८० लोक गंभीर जखमी झाले होते. दोन आत्मघातकी दहशतवाद्यांनी मंदिरात शिरून त्यांच्या एके ५६ रायफलमधून बेछूट गोळीबार करत पवित्र मंदिरात रक्ताचा सडा घातला होता. आणि हातबॉम्बने स्फोटदेखील घडवून आणला होता.

 

akshardham attack inmarathi

 

यानंतर एनएसजी कमांडोजने आपल्या जीवाची पर्वा न करता एका थरारक ऑपरेशनमध्ये या दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. या हल्ल्याच्या मागे लष्कर-ए-तोयबाचा हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.

गांधीनगर स्थित स्वामीनारायण अक्षरधाम मंदिर म्हणजे एक भव्य वास्तू आहे. २३ एकर जमिनीवर विस्तारलेल्या या मंदिराच्या परिसरात स्वामीनारायण यांचे मंदिर तसेच अनेक लहान मोठ्या इमारती आहेत. हे मंदिर बांधायला तब्बल १३ वर्षांचा कालावधी लागला.

हे ही वाचा हे ८ दहशतवादी हल्ले म्हणजे प्रत्येक भारतीयाच्या मनातली कधीही न भरून निघणारी जखमच!

स्वामीनारायण अक्षरधाम मंदिराचे बांधकाम हे सुंदर गुलाबी सँडस्टोनने केलेले आहे. हे मंदिर बांधायला सुमारे सहा हजार मेट्रिक टन गुलाबी सँडस्टोन वापरला आहे.

या मंदिराच्या बांधकामासाठी हा खडक खास राजस्थानहुन आणण्यात आला आहे. प्राचीन वैदिक स्थापत्यशास्त्राच्या पद्धतीने या मंदिराचे बांधकाम झाले असल्याने, या मंदिराच्या उभारणीत कुठल्याही प्रकारच्या स्टील आणि लोखंडाच्या वस्तू वापरलेल्या नाहीत ही ह्या मंदिराची खासियत आहे.

 

akshardham temple inmarathi

 

मंदिराला भक्कमपणा देण्यासाठी दगडी खांब बांधण्यात आले आहेत. आणि प्रत्येक खांब हा २० फूट उंच असून त्याचे वजन प्रत्येकी ५ टन इतके आहे. संपूर्ण देवळात ह्याच खांबांवर इमारत उभी आहे. अक्षरधाम कॉम्प्लेक्समध्ये स्वामिनारायण ह्यांचे मंदिर मध्यभागी असून ते १०८ फूट उंच, १३१ फूट रुंद तसेच २४० फूट लांब आहे.

या मंदिरात कोरलेले ९७ खांब , २२० दगडी खांब आणि १७ घुमट आहेत. या भव्य वास्तूला तब्बल ८ सज्जे (बाल्कनी) आहेत. ९७ खांबावर सुंदर कोरीवकाम केलेले असून, देवळात २६४ मूर्ती आहेत.

देवळाच्या गर्भगृहात भगवान श्री स्वामीनारायण यांची सोन्याने मढवलेली ७ फूट उंच मूर्ती आहे. स्वामीनारायण अक्षरधाम कॉम्प्लेक्समध्ये मोठे लॉन्स, प्रदर्शन हॉल्स तसेच नाट्यगृह देखील आहे.

 

swami narayan inmarathi

 

३० ऑक्टोबर १९९२ साली या मंदिराचे उद्घाटन झाले. हे मंदिर भगवान स्वामीनारायण, त्यांचे सर्व अवतार, हिंदू धर्मातील सर्व देवदेवता आणि साधुपुरुष यांना अर्पण केले आहे.

या मंदिराच्या निर्माणासाठी चार हजारांपेक्षाही जास्त स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले आहेत. या पवित्र वास्तूमध्ये गेल्यावर मन प्रसन्न होते. तेथील सात्विक लहरींमुळे मनःशांती प्राप्त होते अशी भाविकांची श्रद्धा आहे.

२४ ऑक्टोबर २००२ या दिवशी देखील अनेक भाविक त्याच श्रद्धेने श्री स्वामीनारायण भगवान यांच्या दर्शनासाठी मंदिरात होते. परंतु त्याच दिवशी अघटित घडले. २४ सप्टेंबर रोजी दुपारी साधारण ४:४५ च्या सुमारास दोन दहशतवादी अक्षरधाम मंदिराच्या परिसरातील गेट नंबर ३ जवळ उतरले. त्यांनी आत कॉम्प्लेक्समध्ये शिरण्याचा प्रयत्न केला.

परंतु मंदिरात काम करणाऱ्या बीएपीसच्या स्वयंसेवकांनी त्यांना सुरक्षा तपासणी करण्यासाठी अडवले. दहशतवाद्यांनी ही तपासणी टाळण्यासाठी उंच कुंपणावरून उडी मारली आणि मंदिराच्या आवारातील उद्यानातून जात असताना बेछूट गोळीबार सुरु केला.

देवळात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना त्यांनी गोळीबार करून जखमी केले तसेच त्यांच्यावर ग्रेनेड टाकून हल्ला केला.

हा भयाण प्रकार डोळ्यासमोर घडताना बघून बीएपीएसच्या स्वयंसेवकांनी तसेच मंदिराचे सुपरवायझर खोदसिंह जाधव यांनी तात्काळ मुख्य मंदिरात असलेल्या स्वयंसेवकांशी संपर्क साधला आणि त्यांना देवळाचे दरवाजे तात्काळ बंद करण्याची सूचना केली.

 

akshardham 2 inmarathi

 

मंदिरात झालेल्या हल्ल्याविषयी लगेच दुपारी ४.४८ वाजता मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये कळवण्यात आले. पंधरा मिनिटांच्या आत राज्य पोलीस दल आणि कमांडो पथक मंदिराच्या परिसरात पोहोचले. त्यांनी देवळाच्या आवारात असलेल्या शेकडो भाविकांना सुखरूप बाहेर काढले.

त्या ठिकाणी असलेल्या सामान्य नागरिकांनी देखील काळाची गरज ओळखून जखमींना वैद्यकीय सुविधा मिळाव्या यासाठी पटापट हॉस्पिटलमध्ये नेण्यास मदत केली.

जेव्हा दहशतवाद्यांना लक्षात आले, की मुख्य देवळाचे दरवाजे बंद झालेले आहेत आणि ते आता उघडणार नाहीत तेव्हा त्यांनी त्यांचा मोर्चा एग्झिबिशन हॉल नंबर १ कडे वळवला. या हॉलमध्ये एक मल्टिमीडिया शो सुरु होता. आत हॉलमध्ये बसलेल्यांना बाहेर काय झालंय याची काहीच कल्पना नव्हती.

दहशतवादी आत हॉलमध्ये शिरले आणि त्यांनी तिथे बसलेल्या लोकांवर गोळीबार सुरु केला. या हल्ल्यात अनेक स्त्रिया, पुरुष तसेच लहान मुलेदेखील जखमी झाली. अनेकांचा जीव गेला.

एग्झिबिशन हॉलमध्ये हाहाकार माजवल्यानंतर ते दहशतवादी परिक्रमा परिसरात लपून बसले. इकडे सुरक्षा पथकांनी दहशतवाद्यांचा शोध घेणे सुरु केले आणि त्याबरोबरच मंदिराच्या परिसरात अडकलेल्या भाविकांना सुरक्षित ठिकाणी आणले.

जीव मुठीत धरून मुख्य देवळात अडकलेल्या भाविकांची सुखरूप सुटका होण्यास संध्याकाळचे ७:३० वाजले. संध्याकाळ झाल्यानंतर दहशतवाद्यांना कळून चुकले, की आता इथून जिवंत बाहेर पडणे अशक्य आहे. त्यामुळे त्यांनी परिक्रमा परिसरातून बाहेर येऊन पोलीस आणि कमांडोजवर गोळीबार करण्यास सुरुवात केली.

त्या दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांच्याशी संपर्क साधून राष्ट्रीय सुरक्षा दलाचे पथक पाठवण्याची विनंती केली होती. रात्री १० वाजून १० मिनिटांनी एनएसजीचे कमांडोज अक्षरधामला पोहोचले.

 

advani and modi inmarathi

 

रात्री साडेअकराच्या सुमारास एनएसजीने ऑपरेशनला सुरुवात केली. स्वतःचा बचाव करण्यासाठी दहशतवादी मध्यरात्री बाथरूममध्ये लपून बसले होते. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी रॅपिड ऍक्शन फोर्स, बॉर्डर सिक्युरिटी फोर्स, राज्य राखीव पोलीस दल तसेच अँटी टेररिस्ट स्क्वाड ही सुरक्षा दले देखील अक्षरधाम परिसरात दाखल झाली.

पहाटे सूर्योदय होताच दहशतवाद्यांचा धीर सुटला आणि त्यांनी कमांडोजवर न थांबता गोळीबार सुरु केला.

अखेर सकाळी पावणेसातच्या सुमारास कमांडोजने यशस्वीपणे दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्थान घातले. त्यावेळी ते दहशतवादी एग्झिबिशन हॉल नंबर ३ जवळील झुडुपांमध्ये लपून गोळीबार करत होते.

 

nsg commando inmarathi

हे ही वाचा शहीद करकरे यांच्या मृत्यूबद्दल जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करणाऱ्यांचा अजेंडा काय?

या भयानक हल्ल्यात ३० भाविकांनी आपले प्राण गमावले तर एक राज्य पोलीस अधिकारी आणि एक कमांडो या हल्ल्यात शहीद झाले. आणखी एक कमांडो या हल्ल्यात गंभीर जखमी झाला आणि तब्बल दोन वर्षे मृत्यूला झुंज दिल्यानंतर त्याचेही दुःखद निधन झाले.

या हल्ल्याच्या चौकशीत POTA कोर्टाने सहा संशयितांना दोषी ठरवून शिक्षा सुनावली परंतु सबळ पुराव्यांअभावी २०१४ मध्ये सुप्रीम कोर्टाने या संशयितांची मुक्तता केली. २०१९ साली एटीएस पथकाने या हल्ल्याशी संबंधित असलेल्या फरार दहशतवाद्यास जम्मू काश्मीरमध्ये अटक केली.

या हल्ल्यानंतर मंदिर काही दिवस बंद होते ते ७ ऑक्टोबर २००२ रोजी परत भाविकांसाठी खुले करण्यात आले आणि सुरक्षा तपासण्या अधिक कडक करण्यात आल्या.

 

akshardham terrorist inmarathi

 

स्वामीनारायण अक्षरधाम हल्ला मंदिरावर होऊन आज १९ वर्षे उलटली तरीही त्या हल्ल्याच्या जखमा भारतीयांच्या मनात अजूनही ताज्या आहेत. त्या दुर्दैवी हल्ल्यात ज्यांना आपला जीव गमवावा लागला त्या सर्वांना भावपूर्ण श्रद्धांजली!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?