' सुपरहिट हिंदी चित्रपटांच्या पोस्टरमागे होता या मराठमोळ्या कलाकाराचा हात! – InMarathi

सुपरहिट हिंदी चित्रपटांच्या पोस्टरमागे होता या मराठमोळ्या कलाकाराचा हात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

चित्रपट निर्मितीची एक मोठी प्रक्रिया असते. गोष्ट लिहिण्यापासून, ती निर्मात्यांसमोर मांडून फायनान्स मिळवणे, फिल्मच्या वेगवेगळ्या आणि महत्वाच्या कामांसाठी योग्य लोक निवडणे, भूमिकेसाठी कलाकार निवडणे, त्यांचे स्क्रीनिंग, लूक टेस्ट, शूट करणे, एडिट करणे,प्रोमो किंवा पहिला लूक रिलीज करून प्रेक्षकांचा कल जाणून घेणे आणि त्यांच्या मनात सिनेमाविषयी आकर्षण निर्माण करणे!!

इतकी सगळी कामे असतात. आणि त्यात सगळ्यात महत्वाचे काम असते ते चित्रपटाच्या पोस्टर बनवण्याचे. पोस्टरइतके महत्वाचे का असते असे जर तुम्हाला वाटत असेल तर एकदा त्या काळात चला जेव्हा मोबाईल, इंटरनेट, युट्युब, ही सगळी साधने अस्तित्वातच नव्हती.

 

Film-Production-inmarathi

 

पोस्टर हे चित्रपटाची माहिती देणारे, लोकांना आकर्षित करणारे, त्यांच्या मनात सिनेमागृहात जाऊन चित्रपट बघण्याची इच्छा निर्माण करणारे एकमेव उपलब्ध आणि महत्वाचे साधन होते.

पोस्टर म्हणजे चित्रपट बघण्याचे निमंत्रण असे म्हटले तरी हरकत नाही. त्यामुळे हे पोस्टर जितके जास्त जिवंत आणि आकर्षक, तितके जास्त प्रेक्षक प्रत्यक्ष पैसे खर्च करून, सिनेमा बघायला येणार, हे त्याकाळातील ठरलेले समीकरण होते.

 

Om-Shanti-Om-Poster InMarathi

 

आत्ताच्या संगणकाच्या आणि डिजीटलायझेशनच्या युगात चित्रपटांचे प्रोमो, फर्स्ट लूक हे सगळे, चित्रपटातील स्टील्स वापरून कट-पेस्ट पद्धतीने होत असले तरीही, पूर्वीच्या काळी मात्र चित्रपटाच्या जाहिरातीची एक अत्यंत वेगळी पद्धत होती. सगळे काम मोठ्या कष्टाने, विविध टेक्निक वापरून हाताने, केले जायी.

या काळात जे जे इफेक्ट्स आपल्याला दिसतात ते आधी कम्प्युटर नसल्याने, हाताने करण्यात येत होते. अनेक चित्रकार आपल्या ब्रश आणि रंगानी चित्रपटाची जादू आपल्या कॅनव्हास वर उतरवायचे. आणि ह्याच चित्रकारांपैकी एक असूनही फिल्म इंडस्ट्रीवर स्वतःची अविस्मरणीय छाप सोडणारे चित्रकार होते “दिवाकर करकरे.”

 

diwkar karkare inmarathi

 

दिवाकर करकरे हे नाव फिल्म इंडस्ट्रीत मोठं झालं ते १९६४ च्या बिमल रॉय दिग्दर्शित बेनझीर ह्या चित्रपटापासून. पुढे त्यांनी अनेक चित्रपटांचे पोस्टर्स आपल्या जादूच्या ब्रशने अक्षरशः जिवंत केले. त्यात वक्त (१९६५), डॉन (१९७५), शोले (१९७५), सिलसिला (१९८१), सत्यम शिवम सुंदरम (१९७८) ह्या तुफान हिट झालेल्या चित्रपाटांचा सुद्धा समावेश होता.

एक पोस्टर आर्टिस्ट म्हणून ह्या क्षेत्रात पदार्पण करण्याआधीचा त्यांचा इतिहास पण जाणून घेण्यासारखा आहे. दिवाकर करकरे हे मूळचे नागपूर, म्हणजेच विदर्भातले होते. मुंबईच्या प्रसिद्ध सर जे.जे स्कुल ऑफ आर्टस् मधून त्यांनी फाईन अँड अप्लाइड आर्टस् मधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले व ट्रेनी आर्टिस्ट म्हणून ते “एस. एम. पंडित स्टुडिओ” येथे कार्यरत झाले. तिथूनच त्यांची चित्रपट विश्वाशी आणि आपली कला तिथे कशी कामास येईल याची नव्याने ओळख झाली.

 

jj school of arts inmarathi

 

कारण पंडित स्टुडिओ हे चित्रपटांचे पोस्टर, बॅनर, फ्लेक्स, हे बनवण्याच्या क्षेत्रातील एक मोठे नाव होते. इथे त्यांना सुरुवातीला पोस्टर साठी लागणारे रफ स्केच बनवण्याचे प्रशिक्षण दिले गेले. मग चित्रपाटांची नवे कशा पद्धतीने, कोणत्या फॉन्ट मध्ये, कोणत्या कोणत्या रंग संगतीत लिहिता येतात याचे त्यांनी धडे गिरवले.

याच स्टुडिओ मध्ये त्यांना व्यवहार ज्ञान, काम कुठे शोधावे, आपल्या सर्व्हिसचे किती पैसे घ्यावे हे सगळे ज्ञान सुद्धा प्राप्त झाले. पंडित स्टुडिओ मधून काम संपवून जे दिवाकर बाहेर पडले होते, ते पूर्णतः बदललेले, आपल्या कलेत निष्णात असलेले आणि व्यवहार ज्ञानाने परिपूर्ण असलेले दिवाकर होते.

 

benazir inmarathi

 

पंडित स्टुडिओ मधून ट्रेनिंग पिरेड पूर्ण करून, त्यांनी स्वतःचा चित्रपट पोस्टर बनवण्याचा व्यवसाय सुरु केला. आणि त्यांना पहिली संधी दिली ती, बिमल रॉय यांनी. त्यांच्या बेनझीर चित्रपटासाठी दिवकारांनी एक इतके सुंदर पोस्टर तयार केले होते ज्याने त्यांना त्यांचे पुढचे सगळे कॉन्ट्रॅक्ट मिळवून दिले. आता दिवकारांचा बढतीचा प्रवास सुरु झाला.त्यांच्या हातून घडलेले प्रत्येक पोस्टर हे निराळे असायचे.

चित्रपटाची संपूर्ण कथा एका पोस्टर मधून कशी मांडता येईल हा त्यांचा कायम प्रयत्न असायचा. आणि हे त्यांचे प्रयत्न त्यांच्या प्रत्येक पोस्टर मध्ये अगदी ठळक पणे दिसून पाडायचे. बेनझीरनंतर त्यांना काम मिळत गेले, पण त्यांच्या व्यवसायाला सुवर्ण तोरण लागले ते जंजीर या चित्रपटाच्या पोस्टर पासून.

 

don inmarathi

 

अमिताभ बच्चन यांना “अँग्री यंग मॅन” बनवण्यामागे सलीम जावेद, जावेद अखतर, यश चोप्रा ही नावे आपण ऐकली होती, पण बच्चन साहेबांची ती अँग्री यंग मॅनची प्रतिमा जिवंत करणारे कलाकार होते दिवाकर करकरे. अमिताभ बच्चन उठून दिसावे म्हणून त्यांनी गुलाबी रंग तर इतर पात्रांना पिवळा- लाल रंगात बनवण्याची अप्रतिम कल्पना त्यांनी कॅनव्हास वर सुद्धा तितक्याच सफाई ने उतरवली होती.

हे पोस्टर बनवताना त्यांनी पेंटिंग नाईफचा वापर इतक्या बारकाईने केला होता की चित्रपातातल्या भूमिकेप्रमाणे हावभाव हे पोस्टरवरील अमिताभ बच्चन यांच्या चेहऱ्यावर दिसत होते.

 

zanjir inmarathi

 

दिवाकर करकरे आपल्या प्रत्येक पोस्टर साठी त्याकाळात कमीत कमीत रु. ३०,००० इतके पैसे घ्यायचे. १९८५ साली प्रदर्शित झालेल्या, “मर्द” ह्या सिनेमाच्या पोस्टर साठी त्यांना ५०,००० रुपये स्वतः मनमोहन देसाई यांनी दिले होते. त्याकाळात दिवकारांकडे इतके काम होते की  आठवड्याला कमीत कमी ४*५पोस्टर तरी तयार करून द्यावे लागायचे.

त्यांची लोकप्रियता इतकी वाढत होती की इंडस्ट्री मधील एक अत्यंत आदरणीय आणि सन्माननीय व्यक्तिमत्व म्हणून आता दिवाकर ओळखल्या जाऊ लागले होते.

हे सगळे त्यांचे अनेक पोस्टर्स पाहून त्यांनी मिळवलेल्या नावामुळे होते पण करकरेंच्या कलेमुळे त्यांना अगदी सुरुवाती पासूनच किती मान मिळायचा याचा एक सुंदर किस्सा, त्यांच्या सुपुत्री, उत्तरा सामंत यांनी अनेकदा सांगितलेला आहे, तो असा की,

 

bimal roy inmarathi

 

“बिमल रॉय यांच्या, म्हणजे दिवकारांच्या पहिल्याच पोस्टर चे काम पूर्ण झाल्यावर जेव्हा करकरेंनी त्यांना काम संपल्याची माहिती देण्याकरता आणि हे पोस्टर कुठे आणून देऊ? हे विचारण्या करता फोन केला तेव्हा समोरून उत्तर आले की, करकरेजी तुम्ही एक उत्तम कलाकार आहात, त्यामुळे तुमचा सुद्धा आम्ही मान राखला पाहिजे. पोस्टरसाठी तुम्ही इथे येण्याची नाही तर आम्ही तिथे येण्याची गरज आहे. आम्ही तिथे येऊन ते पोस्टर घेऊन जाऊ.

पण जसजसा काळ बदलत गेला तसतशी टेक्नॉलॉजी बदलत गेली. करकरेंच्या कलेची आणि त्यांच्या हाताने काढलेल्या पोस्टर्सची आता फिल्म इंडस्ट्रीला गरज उरली नव्हती.

करकरे हवे तर बदलत्या काळाबरोबर बदलू शकले असते पण “कॉपी पेस्टच्या” टेक्नॉलॉजीत त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळाली नसती. म्हणून त्यांनी, जड मनाने आपल्या कामाचा निरोप घेतला आणि पुण्यात स्थलांतरित झाले.

अलीकडेच, २०२१ च्या जानेवारी महिन्यात त्यांना देवाज्ञा झाली. आणि एक महान कलाकार कायमचा निवृत्त झाला.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?