' पावसामुळे रस्त्यांची वाट लागलीय... हे 'रोड डॉक्टर्स' तुम्हाला मदत करू शकतील!

पावसामुळे रस्त्यांची वाट लागलीय… हे ‘रोड डॉक्टर्स’ तुम्हाला मदत करू शकतील!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

तुम्ही नाक, कान, डोळे, मेंदू या सगळ्यांच्या डॉक्टरबद्दल ऐकलं असेल, पण तुम्ही रोड, म्हणजेच रस्त्याच्या डॉक्टरबद्दल ऐकलंय का? नाही ना, आम्ही आज एक अशीच वेगळी गोष्ट आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

‘आपले पाय चिखल तुडवतात म्हणून बाकीचं शरीर चिखल चुकवू शकतं, त्यामुळे पायाचं काम काही छोटं नाही, ते डोक्याच्या कामाइतकंच महत्वाचं आहे’ आपलं शरीरंच आपल्याला जीवनातील एक महत्वाचा धडा शिकवतं.

काम मोठ्या कचेरीत, मोठ्या पदाचं असो वा रस्त्यावरील केर काढण्याचं असो, छोटं- मोठं असं काहीच नसतं. काम हे काम असतं आणि ज्याच्या वाट्याला जे आलं आहे, त्याने ते चोखपणे बजावायचं असतं.

 

sweeper inmarathi

 

अनेकदा मोठ्या पदावरचे पदाधिकारी त्यांची कामं करताना, त्यांची कर्तव्ये बाजावताना दिसत नाहीत. आणि मग एखादा सामान्य माणूस, अतिसामान्य कष्टांनी ते काम आपल्या हातात घेतो. असंच एक उदाहरण आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

तुम्हाला ठाऊक आहे का, की दरवर्षी तब्बल २५००० अपघात हे रस्त्यावरील लहान खड्ड्यांमुळे होत असतात. अपघात झालेल्या केसेसपैकी, सुमारे ४००० लोक आपले प्राणही गमावतात. दिसताना तो खड्डा आपल्याला लहानसा दिसतो, पण त्या एका लहान खड्ड्यामुळे अनेक जण आपले प्राण गमावतात ही अत्यंत गंभीर बाब आहे.

 

potholes inmarathi

 

पावसाळ्यात तर खड्ड्यांमध्ये पाणी साचून, अपघातांची संख्या कैक पटीने वाढते. इतकं सगळं होऊनही प्रशासन मात्र काहीच हालचाल करत नाही ही फार शरमेची बाब आहे. पण म्हणतात ना, रडत बसल्याने काहीच होत नाही, आपल्या प्रश्नांची उत्तरं आपण स्वतः कर्म करून मिळवायची असतात’ याचं एक सर्वोत्कृष्ट उदाहरण, हैदराबादच्या रिटायर्ड रेल्वे कर्मचारी गंगाधर तिलक कटनम आणि त्यांच्या धर्मपत्नी वेंकटेश्वरी कटनम म्हणजेच ‘रोड डॉक्टर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दाम्पत्याने समाजापुढे ठेवलं आहे.

कटनम हे भारतीय रेल्वेचे निवृत्त कर्मचारी आहेत. गेल्या ११ वर्षांपासून या दोघांनी हैदराबाद येथील, रस्त्यावर झालेले जवळपास २०३० हुन अधिक खड्डे स्वखर्चाने बुजवले आहेत. अलीकडेच त्यांना हैदराबाद सरकारने पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे.

 

gangadhar tilak katnam inmarathi

 

कटनम दाम्पत्याचा हा रस्ते सुधरवण्याचा प्रवास ११ वर्षांपूर्वी सुरु झाला. गंगाधर कटनम निवृत्त झाल्यानंतर, एका कंपनीत सॉफ्टवेअर डिझायनर इंजिनियर म्हणून रुजू होण्यासाठी हैदराबाद येथे स्थलांतरित झाले.

वर्षभर त्यांनी त्या कंपनीत काम केलं. त्या वर्षात त्यांनी रस्त्यांच्या समस्येबद्दल अनेकवेळा कॉर्पोरेशनकडे, विविध सरकारी पदाधिकाऱ्यांकडे, पोलिसांकडे तक्रार केली. मात्र प्रशासनाकडून त्यावर काहीच कारवाई करण्यात आली नाही. रस्त्यावरील या खड्ड्यांमुळे अनेक लोकांचे प्राण जात आहेत, अनेक लोक कायमचे अपंग सुद्धा होत आहेत, हे त्यांना बघावलं नाही.

शेवटी त्यांनी आपली नोकरी सोडली आणि रेल्वेच्या नोकरीतून मिळणाऱ्या पेन्शनमधून त्यांनी या रस्त्याच्या समस्येवर तोडगा काढण्याचं ठरवलं.

यात त्यांच्या सहचारिणी सौ. वेंकटेश्वरी कटनम यांनी त्यांना भक्कम साथ दिली. गेल्या ११ वर्षात, त्यांनी रस्ता दुरुस्तीसाठी तब्बल ४० लाख, किंबहुना त्याहून अधिक रक्कम त्यांनी या कामात खर्च केली आहे. जिथे आपण आपला पैसे म्हातारपणी कामी यावा म्हणून अगदी पै-पै करून जपून ठेवतो, तो गुंतावतो, तिथे कटनम दाम्पत्याने आपला अर्ध्याहून अधिक जमा पैसा समाजकार्यासाठी वापरला. कितीही कौतुक केलं तरी ते या दाम्पत्याच्या कामापुढे तोकडंच पडतं.

 

gangadhar and venkateshwari katnam inmarathi

 

त्यांची काम करण्याची पद्धत ही जरा वेगळी आहे. कोणालाही शहरात किंवा बाहेर रस्त्यांवर खड्डे, भेग काहीही आढळून आलं, तर ती व्यक्ती या रोड डॉक्टर्सना त्वरित फोन करून त्या ठिकाणची माहिती पुरवते. पुढे हे दाम्पत्य, आपली एक गाडी घेऊन, जिला ते ‘रोड अँबुलन्स’ म्हणतात, ती घेऊन, त्यात आपल्या पैशांनी विकत घेतलेलं सामान घेऊन त्या ठिकाणी जाऊन ते खड्डे आणि भेगा बुजवतात.

कटनम दाम्पत्यासारखे अनेक सजग आणि सुजाण नागरिक भारताला मिळाले, तर सगळेच प्रश्न सुटतील. त्याहीपेक्षा प्रशासनाला जाग येणं अधिक महत्वाचं आहे.

रस्ते, स्वच्छ पाणी, सार्वजनिक वाहतूक हे सगळं मनुष्याच्या मूलभूत गराजांमध्ये येतं आणि हे सगळं नागरिकांना उपलब्ध करून देणं हे सरकारचंच काम असतं. शेवटी आपण कर त्याचसाठी भरतो आहोत. पण वेळीच जाग येईल ते प्रशासन कसलं, नाही का?

कटनम दाम्पत्याबाबत आणखी एक गोष्ट वाखाणण्याजोगी अशी आहे, ती म्हणजे त्यांचं वय. गंगाधर कटनम हे ७४ वर्षांचे आहेत, तर वेंकटेश्वरी कटनम या ६४ वर्षांच्या आहेत. उतारवयात, इतके शारीरिक श्रम असलेलं काम करणं काही सोपं नसतं.

 

gangadhar and venkateshwari katnam inmarathi

 

आपल्या सारखी तरणीताठी माणसं सुद्धा इतके कष्ट घेऊ शकत नाहीत, जितके हे ‘रोड डॉक्टर्स’ घेतायत. आपल्या मनात जिद्द असेल, आपण एखाद्या मुद्द्याची खरंच चिंता वाटत असेल, आपल्याला समाजात बदल घडून आणायचा असेल तर वय, हुद्दा, वैयक्तिक अडचणी यापैकी काहीच त्यांच्या कार्यात अडथळे निर्माण करू शकत नाही याचं जिवंत उदाहरण म्हणजे कटनम दाम्पत्य. त्यांच्या समाजनिष्ठेला आमचा सलाम!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?