' आर्किटेक्ट होण्याचं तंत्रशुद्ध शिक्षण नव्हतं; तरीही या महिलेने भारतात ‘स्वर्ग’ साकारला! – InMarathi

आर्किटेक्ट होण्याचं तंत्रशुद्ध शिक्षण नव्हतं; तरीही या महिलेने भारतात ‘स्वर्ग’ साकारला!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

एका अमेरिकन महिलेने भारतीय माणसाशी लग्न केले आणि त्यांनंतरही स्वतःचे सगळे आयुष्य भारताचा स्वर्ग मानल्या जाणाऱ्या हिमाचल प्रदेशातल्या लोकांसाठी व्यतीत केले असं सांगितलं तर तुम्हाला ही एक काल्पनिक गोष्ट वाटेल पण ही एक सत्यघटना आहे.

आपल्या कामानं ओळख बनविलेल्या आणि देश विदेशात ख्याती असणार्‍या दीदी कॉण्ट्रॅक्टर म्हणजेच डेलिया कॉण्ट्रॅक्टर एक कलाकार, डिझायनर होत्या. मात्र जगाला त्यांची ओळख आहे आर्किटेक्ट म्हणून. जर्मन वडिल आणि अमेरिकन आई यांची डेलिया किन्जिंगर ही एकुलती एक मुलगी!

आईवडिल दोघेही आर्किटेक्ट असल्यानं डेलिया लहानपणापासूनच या वातावरणात वाढली. आईवडिलांचं काम बघता बघता कधी यात तिला आवड निर्माण झाली हे तिलाही कळलं नाही.

लहानपणापासूनच फ्रँक लॉयड राईटची मतं ऐकायला सुरवात केलेल्या डेलियाना तिच्या आईवडिलांनी मात्र कधीच या विषयातलं रितसर शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केलं नाही. तिनंही ना कधी शिकण्याचा विचार केला ना कधी या विषयातली पदवी घेण्याचा.

 

didi contractor inmarathi

 

या विषयात रूची असली तरिही तिचा कल डिझायनिंगडे जास्त होता. परिणामी आईवडिल दोघेही आर्किटेक्ट असणार्‍या डेलियानं कोलोरॅडो विद्यापीठातून कला शाखेतली पदवी घेतली.

१९५१ साली अमेरिकेत सिव्हिल इंजिनियरिंगचं शिक्षण घेणार्‍या रामजी नारायण या भारतीय तरूणाच्या प्रेमात ती पडली. प्रेमाचं रुपांतर विवाहात होऊन ती डेलिया नारायण बनून भारतात आली.

रामजी सिव्हिल इंजिनियर असल्यानं त्यांच्यासोबत डेलिया जिथे काम चालू असेल त्या शहरात जात असे. शिमल्यातून डेलिया कामानिमित्तानं नाशिकला आली. एका मोठ्या एकत्र मराठी कुटुंबात त्यांनी तब्बल दहा वर्षं घालविली आणि वेळ घालवायला म्हणून आजूबाजूच्या खेड्यांमधून भटकंती करू लागली.

खेड्यांमधल्या घरांच्या बांधणीनं आणि त्यावरच्या कलाकुसरीनं तिला भुरळ घातली. या भटकंती दरम्यान डेलियाला लोक दीदी म्हणून संबोधू लागले आणि कालांतरनं हे नावच प्रचलीत झालं.

नाशिकनंतर हे दांपत्य कामानिमित्त मुंबईत आलं. पतीच्या कामात सहज रुची घेता घेता त्यांनी हळूहळू यात सक्रिय सहभाग घ्यायला सुरवात केली. लहानपणापासूनच या क्षेत्राची माहिती असल्यानं अनुभवातून शिकणं त्यांना सोपं गेलं.

मुंबईतल्या वास्तव्यादरम्यान मात्र कौटुंबिक कुरबुरी चालू झाल्या ज्या कालांतरानं वाढत गेल्या आणि परिस्थिती अशी निर्माण झाली की त्या विभक्त होऊन हिमाचलला परतल्या.

 

dilia inmarathi

 

कांगडा व्हॅलितल्या निसर्गरम्य अशा सिधबाडीत त्यांनी स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. या परिसरात दीदींनी अनेक इकोफ्रेंडली इमारतींची बांधणी केली. त्यांच्या इमारती निसर्गाशी एकरुप झालेल्या कलाकृतीच मानल्या जातात. त्यांनी सहाय्यक म्हणून कायम मुलींना आपल्या हाताशी घेतलं.

स्वत: आर्किटेक्चरची पदवी घेतली नसली तरीही नवीन मुलींनी मात्र या विषयातलं तंत्रशुध्द शिक्षण घेत पदवी घेण्याबाबत त्या कायम आग्रही असत.

आधुनिक स्थापत्यशास्त्रात लॅण्डस्केपिंगचा विचार केला जातो. दीदी याबाबत कायम आग्रही असत. इमारत बांधून मग तिथे निसर्गाचा तुकडा रोवण्याऐवजी ज्या जागेवर इमारत उभी करायची आहे तिथला निसर्ग धक्का न लागू देता त्याच्याशी मिसळून जात एकरुप झालेला आराखडा उभा करण्यावर त्यांचा जोर असे.

म्हणूनच हिमाचल प्रदेशातल्या त्यांनी बांधलेल्या इमारती या झाडांत दडलेल्या आहेत. निसर्ग आणि माणसाचं सहजीवन स्थापित करणार्‍या आहेत. खिडकीतून बघण्यापुरता निसर्ग नसावा तर तो आपल्या दैनंदिन जगण्याचा भाग असायला हवा असं त्यांना वाटत असे.

 

didi contractor house inmarathi

 

कारण शेवटी सगळं करून झाल्यावर ज्या मन:शांतीच्या शोधात आपण निघतो ती इतरत्र मिळत नाही तर निसर्गातच दडलेली असते, निसर्गाशी संवाद साधणं हा देखील अध्यात्माचाच भाग आहे असं त्यांचं तत्व होतं.

लग्नानंतर भारतातच संपुर्ण आयुष्य व्यतीत केलेल्या दीदी इथल्या मातीशी अगदी एकरूप झाल्या. इथली संस्कृती, अध्यात्म त्यांनी आपलसं केलं. हिंदू तत्वज्ञान आणि हिंदू स्थापत्यशास्त्र यांत त्यांना रुची होती.

दिदींनी त्यांच्या आयुष्यातला बराचसा काळ हिमाचल प्रदेशातील कांगडा व्हॅलिमधील सिधबाडित घालवला. इथेच त्यांनी टाकावू गोष्टींतून स्वत:चं घर बांधलं ज्याची दखल जगभरात घेतली गेली. हे घर त्यांनी स्वत: डिझाईन केलं.

या एकमजली घराची जमिन त्यांनी संपूर्णपणे दगडाची बनविली. या घरासाठी वापरलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी रिसायकल किंवा अपसायकल केलेली होती. मुळातच दीदींना घरातली कोणतीही गोष्ट टाकून द्यायला आवडत नसे.

 

didi dalia inmarathi

 

टाकून देण्याऐवजी त्यापासून नवं काही बनवता येईल का? याचा त्या विचार करत असत. याच घरात त्यांनी माती आणि काचेच्या तुकड्यांपासून सोलर कुकरची निर्मिती करायला सुरवात केलेली होती.

१९९५ साली दीदींना त्यांचा पहिला कम्युनिटी प्रोजेक्ट मिळाला. त्यांनी एक कम्युनिटी क्लिनिकची उभारणी केली. या क्लिनिकची बांधणी करताना त्यांनी स्थानिक मटेरियल आणि पारंपारिक तंत्राची मदत घेतली. प्लास्टरमधे तांदळाच्या भुशाचा वापर केला जो नंतर भूकंप विरोधी असल्याचं सिध्द झालं.

याशिवाय दीदी घर बांधणी करताना शक्य तिथे माती, शेण, सुकं गवत, दगड आदींचा वापर करत असत. घर बांधताना जास्तीत जास्त बांबूचा वापर करण्यावर त्यांचा भर असे कारण त्यांचं म्हणणं होतं की बांबू तीन वर्षात वापरासाठी तयार होतो मात्र इतर प्रकारची लाकडं तयार व्हायला वर्षानुवर्षं जावी लागतात.

 

didi contractor 3 inmarathi

 

अशी जुनी झाडं तोडण्याला त्यांचा विरोध असे. पर्यावरणाची हानी न करता त्याच्याशी ताळमेळ राखत मानवी घरं/निवारे उभे राहिले पाहिजेत हे त्यांचं तत्व होतं.

या तत्वाशी एकनिष्ठ रहातच त्यांनी आयुष्यभर घरांची बांधणी केली. या तत्वाशी त्यांनी अपवाद म्हणूनही कधी म्हणजे कधीही तडजोड केली नाही.

कॉन्ट्रॅक्टर दीदींचं निधन झालं असलं, तरी मात्र त्यांच्या कलाकृतीतून आजही त्यांनी भारतीयांशी जपलेलं नातं कायम आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?