हृदयात अखंड अभ्यास विषय असावा, तोच आपला नारायण म्हणावा : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १८

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १७

===

पारावरून उठून उभे राहिलेल्या तुकोबांनी एकदम प्रश्न केला,

नारायणा, किती आमंत्रणे पक्की झाली आज?

नारायण उत्तरला.

नाही जमले कुणाचेच.

तुकोबांनी विचारले.

का नाही जमले?

नारायण उत्तरला.

व्यवहारात अडकले.

तुकोबा आपल्याशीच पुटपुटले,

व्यवहारात अडकले…

आणि म्हणाले,

चला आता घरी

आणि वेगात घराकडे निघाले. रस्त्यात तुकोबांनी एक शब्द तोंडून काढला नाही आणि ह्या दोघांचीही मग तशी हिंमत झाली नाही.
घरी येऊन पाहतात तर कान्होबांनी अंथरूणे घालून ठेवलेली. तुकोबा तसेच काही न बोलता आपल्या खोलीत गेले आणि इकडे हे दोघेही आपापल्या अंथरूणावर पडले.

सकाळी सर्वांनी आवरले, आधी ठरल्याप्रमाणे नारायणाच्या गाडीवानाने बैलगाडी जोडली. नारायणाच्या तोंडून शब्द फुटत नव्हता. आतून गरम दुधाचे पेले आले. कान्होबा म्हणाले,

नारायणराव, दूध घ्या. आबा, तुम्हीही घ्या.

नारायणाने यांत्रिकपणे दुधाचा पेला ओठाला लावला. त्याचा पडलेला चेहेरा पाहून कान्होबा म्हणतात,

तुकोबा फार बोलले का काल?

नारायण म्हणाला,

फार नाही हो बोलले, त्यांचा अधिकारच आहे. पण रागावले आहेत ते. मला कळत नाही आता आपण काय करावे?

कान्होबा म्हणाले,

विचारायचं मग त्यांनाच.

नारायण म्हणाला,

भीती वाटते हो…

मागून तुकोबांचा अचानक आवाज आला,

कशाची भीती वाटते?

आणि नारायण दचकला. सगळे एकदम उभे राहिले.

तुकोबांनी अजून विचारले.

माझी भीती वाटते का?

नारायण म्हणाला,

नाही, आपला धाक आहे पण भीती नाही वाटत. मला भीती वाटते की मी कितीही प्रयत्न केला तरी तुमच्या अपेक्षा पूर्ण नाही करू शकणार. तुकोबा तुकोबा आहेत, आम्ही आम्ही आहोत. आम्हाला मर्यादा फार. सारखी भीती वाटते, संसार चालेल कसा?

तुकोबा समजावणीच्या सुरात म्हणाले,

अहो नारोबा, काल तुम्हीच ना जगाला सांगितलेत, ‘सकल जीवांचा करितो सांभाळ, तुज मोकलिल ऐसे नाही…. कीर्तन करणे कसे कठीण आहे बघा, ‘तुझी चिंता त्यासी सर्व आहे’ असे एकीकडे म्हणायचे आणि मनात आपल्याला जेवायला मिळेल ना याची चिंता वाहायची! आपले वागणे आणि सांगणे याचा मेळ बसत नसेल तर उपदेशाचा अधिकार नाही आपल्याला. नारोबा, तुम्ही संसाराची चिंता सोडा आणि आता योग्य मार्गाला लागा.

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

तुकोबांच्या बोलण्यातून असा धागा मिळताच नारायण तुकोबांचे पाय धरण्यासाठी वाकला आणि म्हणाला,

आजपासून आपण सांगाल तसा वागेन. आपल्या शब्दाबाहेर जाणार नाही.

तुकोबा म्हणाले,

पाहा बरं, पुन्हा विचार करा. गेला शब्द मागे घेता येत नसतो. ही साधना आहे. रोज परीक्षा होते. कमी पडायचं नाही.

नारायण म्हणाला,

शब्द आधीच गेला माझा, आता पुनर्विचार नाही! पुन्हा पुन्हा हेच म्हणेन की सांगाल ते ऐकीन.

तुकोबांनी आज्ञा केली,

काढा मग तुमच्या पोतडीतले लिखाणाचे सामान, बसा खाली आणि घ्या लिहून.

नारायणाने लगबगीने दौत, बोरू, कागद काढले आणि सरसावून बसला. तुकोबा स्निग्ध आवाजात बोलू लागले,

नारायणा, पुन्हा ऐका. कीर्तन करणे ही साधी गोष्ट नव्हे. लोक येतात ते केवळ करमणुकीसाठी असे आपण समजू नये. त्यांना काही बोध, उपदेश हवा असतो. तो देण्याची क्षमता आपण अंगी बाणविली पाहिजे. तशी क्षमता यावी म्हणून काही काळ तरी तुम्ही कठोर साधना केली पाहिजे. तुम्ही तर चांगल्या खात्यापित्या घरातले आहात. मीठ भाकरीला कमी पडायचं नाही, पण बैलगाडीवर नोकर माणूस ठेवता येईल असे नव्हे. तशी तुमची तयारी हवी. तुमचा विश्वास हवा की आपली सोय पांडुरंग करील. तो मला, माझ्या कुटुंबाला जेवू घालेल. असा विश्वास मनात दृढ करा आणि आता सांगतो तो नियम लिहून घ्या आणि तंतोतंत पाळा.

 

जेथे कीर्तन करावे । तेथे अन्न न सेवावे ।।
बुक्का लावू नये भाळा । माळ घालू नये गळा ।।
तट्टा-वृषभासी दाणा । तृण मागो नये जाणा ।।
तुका म्हणे द्रव्य घेती । देती ते ही नरका जाती ।।

कीर्तन ही आपल्या अभ्यासाची, सरावाची गोष्ट आहे असे समजायचे नारायणा. आपण लोकांना काही देतो आहोत आणि म्हणून त्याची परतफेड त्यांनी केली पाहिजे हा विचार मनातून काढून टाकायचा. मनात म्हणायचे, आज ह्या लोकांनी मला कीर्तनाची संधी दिली! आज मी यांना काय बरे सांगू? माझे सांगणे उचित झाले पाहिजे. त्यासाठी मी ग्रंथांचे वाचन करीन. ग्रंथातील वाक्यांचा अर्थ लावीन. तो अर्थ लागावा यासाठी माझे मन नियंत्रणात ठेवीन. मन नियंत्रणात यासाठी काय करायचे ते आता लिहून घ्या.

 

निर्वाहापुरतें अन्न आच्छादन । आश्रमासी स्थान कोंपी गुहा ।।
कोठें ही चित्तासी नसावें बंधन । हृदयीं नारायण सांटवावा ॥
नये बोलों फार बैसों जनामधीं । सावधान बुद्धी इंद्रियें दमी ।।
तुका ह्मणे घडी घडीनें साधावी । त्रिगुणांची गोवी उगवूनि ।।
नारायणा, जनलोकांतील उठणे बसणे अगदी कमी करा. विनाकारण होणारे बोलणे टाळा. अखंड सावधान असा. आपली इंद्रियांना जे आवडते ते ती आपल्याकडून मिळवू इच्छितात. अशी बुद्धी घडवा की इंद्रिये वाहावली जाऊ नयेत. त्यांचे दमन करणे हाच योग्य मार्ग. निर्वाहापुरते अन्न असले की झाले. जीभेचे चोचले पुरवू नका. आवश्यक तेवढेच कपडे वापरा, वस्त्रांनी आपल्याला शोभा येत नसते! राहण्यासाठी आपली म्हणून एक जागा तयार करा. एखादी गुहा वा वृक्षाची ढोली (कोपी) मिळाली तर फारच उत्तम. अशा ठिकाणी आपल्याला फारसे कुणी दिसत नाही आणि दृष्टी भिरभिरत राहात नाही. तेथे आपले वाचन, मनन चिंतन चालू द्या. अभ्यासाव्यतिरिक्त चित्ताला कोणते आलंबन असू नये. हृदयात अखंड अभ्यास विषय असावा. तोच आपला नारायण म्हणावा. तो असा साधावा की ते त्याचे निवासस्थान झाले पाहिजे. सारखा विचार करावा की आपले मन गोंधळते ते का? ते एकाग्र का होत नाही? आपली बुद्धी नेहमी एकदिश का राहात नाही? जे घडायला हवे ते का घडत नाही? विपरित का घडते? कधी चांगला अभ्यास होतो आणि कधी अंगात आळस भरतो! कधी मोह अनावर होतात तर कधी संयम अजिबात सुटत नाही. असे का? आपली नेहमी एक स्थिती का नसते? नारायणा, विचार केला की कळते, हा सारा त्रिगुणांचा खेळ आहे. त्यांच्यापायी झालेला हा गुंता आहे. सत्वरजतमाचे काही प्रमाण आपल्याला जन्मतः मिळालेले आहे आणि तेही स्थिर नाही! आपल्या बाबतीत हे त्रिगुण कमीजास्त होत एकमेकांत कसे गुंतत राहतात आणि त्या गुंत्यात (गोवी) आपल्याला कसे अडकवतात ते आपल्याला कळले पाहिजे. ते कळायचे तर तो गुंता सोडविण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. हे सारे कळणे ही वेळाची गोष्ट आहे किंवा म्हणा की तशी वेळ यावी लागते. तशी वेळ येण्यासाठी आपण वेळ दिला पाहिजे. घडीने घडी साधली पाहिजे. सतत सावधान राहिलात की गुंता सुटण्याचा क्षण लवकर येईल. तो साधा. नारायणा अजून एक सांगतो, आपण गवई आहोत हे आजपासून विसरा! घ्या, लिहा.

 

नेणें गाणें कंठ नाहीं हा सुस्वर । घालूं तुज भार पांडुरंगा ॥
नेणें राग वेळ काळ घात मात । तुझे पायीं चित्त ठेवीं देवा ॥
तुका म्हणे मज चाड नाहीं जना । तुज नारायणा वांचूनिया ॥

अशा रीतीने तुकोबा नारायणाला समजावीत असता काही पिशव्या घेऊन आवलीबाई बाहेर आल्या आणि म्हणाल्या,

नारायणा, ही पिशवी तुमच्या घरी द्या आणि ही आता रामेश्वरभटांकडे जात आहात ना, त्यांच्याकडे द्या.

आवलीबाईंचे इतके बोलणे होते तोच बाहेर चारपांच माणसे आल्याचे सांगत कान्होबा आले आणि मागोमाग ती मंडळीही. कान्होबांनी ओळख करून दिली,

हे आसगांवचे गांवकरी. काल कीर्तनाला होते. त्यांना नारायणबुवांचे कीर्तन पक्के करायचे आहे

ती मंडळी येऊन इकडे तुकोबांच्या पाया पडली आणि इकडे नारायणभटाचा चेहेरा पांढराफटक पडला! काल ज्यांच्याशी देवाणघेवाणीवरून बिनसले तीच ही मंडळी. आपण यांच्याकडे घसघशीत मानधन मागितले होते. इतके जमायचे नाही म्हणत होते. आता ह्याचवेळी हे लोक इथे कशाला आले? विचारांनी नारायणाच्या अंगाला कांपरे भरले! आता कसे?

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?