' संपले सूनेचेही चार दिवस! हे पर्व तरी बरं असेल असं वाटलं होतं पण… – InMarathi

संपले सूनेचेही चार दिवस! हे पर्व तरी बरं असेल असं वाटलं होतं पण…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – ईशान पांडुरंग घमंडे 

===

मार्च महिन्यात दुसरं पर्व सुरु झालं, त्यावेळी खरं तर थोडं बरं वाटत होतं. फारशी न आवडणारी तेजश्री प्रधान मालिकेतून बाहेर पडली आणि अद्वैत दादरकर या कलाकाराची मालिकेत एंट्री झाली. प्रोमोमधून दाखवला गेलेला सोहम अतिशय शहाणा, सुधारलेला आणि शिस्तप्रिय दाखवला गेला. मात्र मालिकेच्या सुरुवातीलाच, यातला दमदार ट्विस्ट समोर आला. यामुळे अपेक्षा वाढल्या, असं म्हणायलाच हवं.

 

babdya aggabai sunbai inmarathi

 

अद्वैतचा अभिनय पाहायला मिळणार होता आणि ते पात्र सुद्धा फारच रंजकप्रकारे फुलवलं जाईल अशी अपेक्षा होती. तसं काही घडलं नाही, हे काही वेगळं सांगायची गरज नाही. मालिकेने फक्त आणि फक्त भ्रमनिरासच केला.

आता शुभ्राचंच घ्या ना, त्या पात्रामध्ये घडलेला बदल दयनीय होता. मनाला अगदीच न पटणारा होता. एकेकाळी सासूला आत्मविश्वासाचे डोस पाजणारी, तिला स्वतःच्या पायावर उभं राहायला मदत करणारी आणि नवरा चुकला तर थेट त्याला धडा शिकवणारी ही मुलगी अशी एवढी कोशात जाऊ शकते का? अजिबातच नाही…

मालिका ज्या पद्धतीने आकार घेत गेली, त्यात एक विचार मनात येऊन गेला, तेजश्री प्रधान आणि आशुतोष पत्की यांचा निर्णय उत्तम होता.

 

ashutosh and tejashri inmarathi

===

हे ही वाचा – ‘ते’ मूर्ख बनवणार आणि आपण बनत राहणार! ‘सो कॉल्ड नवी मालिका’ही त्याच वळणावर

===

असा एक प्रश्नही पडला, की ही अशी मुख्य भूमिका साकारण्याचं धाडस अद्वैत दादरकरसारख्या अभिनेत्याने का केलं असेल? तशी ही मालिका म्हणजे, तो याआधी झी मराठीवर ज्या मालिकेत काम करत होता, त्या ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेची कार्बन कॉपी होती.

जुन्या आठवणी जागवण्यासाठीच त्याने या  मालिकेतील काम स्वीकारलं असणार. गुरुनाथच्या पावलावर पाऊल ठेवण्याची इच्छा सौमित्रला झाली असणार… असो…

मालिका संपण्याची चर्चा सगळीकडे सुरु झाली आणि ‘आपण सुटलो’ ही भावना मनात येऊन गेली. सासू सुनेचा छळ करतेय, सून तिला तेवढंच तिखट प्रत्युत्तर देतेय हा टिपिकल मसाला बाजूला सारून सासू-सुनांमधील सौख्य दाखवायला मालिकावाल्यांनी सुरुवात केली आणि त्या सासू-सुना मिळून प्रेक्षकांचा छळ करू लागल्या.

‘अग्गबाई सासूबाई’चं नवं रूप असणारी ‘अग्गबाई सुनबाई’ ही मालिका म्हणजे सासूने सुनेसह केलेल्या प्रेक्षकांच्या छळाची परिसीमाच म्हणायला हवी. या जाचातून आपण सुटतोय हेही नसे थोडके!

 

asavari and shubhra inmarathi

 

मोहन जोशी, डॉ. गिरीश ओक, निवेदिता सराफ, अद्वैत दादरकर असे चांगले कलाकार असूनही, ‘ही मालिका का बघावी?’ असा प्रश्न पडला, तिथेच ही मालिका हरली होती. खरं तर, झी मराठीच्या सगळ्याच मालिकांची सध्या तशीच स्थिती आहे म्हणा.

एकीकडे तो आदित्य देसाई उर्फ कश्यप उर्फ केचप, एकीकडे स्वीटू, एकीकडे अजितकुमार देव सगळ्यांचेच पार बारा वाजलेत. ते फक्त वेगवेगळ्या वेळी आपल्याला दर्शन देतात, एवढाच काय तो फरक…

 

sai aditya inmarathi

 

‘सा रे ग म प’मधेही अभिनय…

या सगळ्यापेक्षा चांगची स्क्रिप्ट सध्या ‘सा रे ग म प’मध्ये पाहायला मिळतेय. सूत्रसंचालक म्हणून एक चांगली अभिनेत्री घेतली आहेच, शिवाय ‘पंचरत्न’ असणाऱ्या परीक्षकांकडून (?!) अभिनय करून घेतला जातोय. हेही कमी की काय, म्हूणन त्या बिचाऱ्या लिटिल चॅम्प्सना सुद्धा ‘अभिनय करायला लावतायत’ ही मंडळी…

‘सा रे ग म प’ हा ‘कथाबाह्य’ कार्यक्रम पाहताना कधी कधी वाटतं, की याचं स्क्रिप्ट सुद्धा डॉ. निलेश साबळेंनी लिहिलंय. ओंकार कानेटकरला ‘ओके’ म्हणणं काय, लहान मुलांचे किस्से या नावाखाली दाखवलेले जाणारे, कार्यक्रम भरकटवणारे चाळे काय…

 

sa re ga ma pa little champs zee marathi inmarathi

 

“ओंकारने काढलेलं मंडोलीन बघून, माझं मन डोलायला लागलं” हा संवाद प्रथमेश लघाटेच्या मुखी अजिबात शोभून दिसला नाही. रोहित राऊतच्या अनुपस्थितीत हा खुळचट डायलॉग मारण्याची वेळ त्याच्यावर आली असावी. थोडक्यात काय तर झी मराठीवर नुसताच भंपकपणा सुरु आहे.

नामुष्कीची पहिलीच वेळ नाही

मालिकेचा गाशा लवकर गुंडाळण्याची वेळ यावी, याचं कारण काय असावं? असं विचारलं, तर ‘झी मराठीचा घसरलेला दर्जा’ हेच उत्तर आधी द्यावंसं वाटतं. सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केली, ते प्रकरण फारच तापलं होतं म्हटल्यावर झी मराठीने तापल्या तव्यावर पोळी भाजून घेण्याचं ठरवलं. ‘काय घडलं त्या रात्री’ नावाने नवी मालिका सुरु केली.

मोठ्या प्रमाणावर प्रमोशन करत, सुशांत सिंग प्रकरणाचा फायदा घेण्याचा प्रयत्नही झाला. मात्र शेवटी त्या रात्री काय घडलं, हे नीटसं न सांगताच ही मालिका निघूनही गेली. ‘मालिका संपली कुठल्या रात्री’ हेदेखील आता प्रेक्षकांना ठाऊक नसेल.

 

kay ghadala tya ratri inmarathi

 

TRP अभावी गाशा गुंडाळावा लागणार याचं ताजं उदाहरण म्हणजे ‘अग्गबाई सुनबाई’! मुळात ही मालिका का सुरु केली, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला, आणि तोच प्रश्न अनुत्तरित ठेऊन ऑगस्ट महिन्यात सासू-सुना निघून जाणार असं दिसतंय. अर्थात याचं दुःख झालेली मंडळी कमी आणि आनंद साजरा करणारे अधिक असणार आहेत.

सासूचे चार दिवस जरा जास्तच लांबले होते, सुनेचे चार दिवस मात्र वेळेत संपतायत, याचाच खरं तर मला खूप आनंद आहे.

सध्याची चॅनलची स्थिती पाहता, सुनबाई संसार उधळून (किंवा सावरून) निघून गेल्या, तरी त्यांच्या जागी सुरु होणार नवा प्रपंच फारसा खास असेल अशी अपेक्षाच न ठेवणं बरं… एखादी वासरात लंगडी गाय शहाणी अशी मालिका येईलही कदाचित, पण भरवशाच्या म्हशीला टोणगा होण्याचीच शक्यता अधिक आहे.

असो, आपण आपला रिमोटचा योग्य वापर करत राहायचं आणि मिळेल तिथून मिळेल तसं मनोरंजन (?) करून घ्यायचं. अन्यथ ओटीटीच्या रूपात प्रत्येकाच्या खिशात मनोरंजन पोचलेलं आहेच…

 

ott-logos-inmarathi

===

हे ही वाचा – आताच्या टुकार मालिका सोडा.. या १० मराठी सिरीयल आजही आवर्जून बघा!!!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?