ब्राह्मण…मुक्त (ता) चिंतन!

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

हा लेख मी पूर्वी लिहिलेला पण आता त्यात कालानुरूप आणि मुख्य म्हणजे माझ्या नवीन अनुभवानुरूप महत्वाचे बदल करायला हवेत असे प्रकर्षाने वाटतेय…आणि काय असते की आपण उगाच लई भारी प्रश्न विचारले ना की लोक ही मानभावीपणे उत्तर देतात, म्हणजे कदाचित खरं बोलत असतील पण बरोबर नसते किंवा बरोबर असेल ते बोलतात पण मग ते खरे नसते…!

माझा जन्म एका ब्राह्मण कुटुंबात झाला. म्हणून मी जन्माने ब्राह्मण आहे पण तसं ते अर्धसत्य आहे. म्हणजे असं की माझी आई जातीने ब्राह्मण नव्हती. आम्ही मामाकडून पठारे प्रभू या जातीचे (आज काल बऱ्याच जणांना ही जात आहे हेच माहित नसेल, पण हि एक बऱ्यापैकी प्रसिद्ध जमात होती आणि आजकाल मुंबई- पुण्यामध्येच पाठारे प्रभू काय ते शिल्लक उरले आहेत – पठारे प्रभूंबद्दल नंतर लिहीन.) आपल्याकडे बापाची जात हीच मुलांची जात मानली जाते अगदी कायद्याने सुद्धा, का? ते नक्की सांगता येत नाही.

 

bhramins-marathipizza
dnaindia.com

असो, तर म्हणून मी जातीने ब्राह्मण. खरंतर माझं ब्राह्मण्य एवढ्यावरच संपते. म्हणजे बघाना, मी सर्वसाधारणपणे ब्राह्मण्याचे किंवा ब्राह्मणाचे कोणतेही गुणधर्म अंगी बाळगून नाहीये. म्हणजे जानवं, संध्या वगैरे सोडा मी साधे गुरुवार, शनिवार, चतुर्थ्या, एकादश्या, श्रावण वगैरे पाळत नाही. (आम्ही कुत्रे पाळतो). पूजा सांगत नाही. मांसाशन (चिकन, मटण, मासे ते अगदी बीफ, पोर्क काहीही- जे आवडेल आणि पचेल असं काहीही) करतो. कधी मधी दारू ही पितो.

बाकीच्या सर्वसाधारण धार्मिक रूढी-रीतीही पाळत नाही, फार कशाला मी माझ्या आई वडिलांचे आणि बहिणीचे त्यांच्या मृत्युनंतर अग्नी संस्कारही केले नाहीत त्यांचे मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयांना अभ्यासासाठी दिले (देहदान) आणि डोळे दान केले. नंतरचे दहावे, बारावे श्राद्धादी संस्कार केले नाही हे वेगळे सांगायला नकोच. एव्हढच कशाला मी आणि माझ्या पत्नीने आमच्या मुलीचे बारसे सुद्धा केलेलं नाहीये (म्हणजे मुलीला नाव ठेवलय पण बारसं नाही केलेलं).

माझे शाळेपासून ते कामाच्या ठिकाणचे बहुसंख्य मित्र ब्राह्मणेतर आहेत आणि जुने, शाळेतले जे मित्र आज सुद्धा संपर्कात आहेत. त्यात तर एक सुद्धा ब्राह्मण नाहीये. त्यामुळे एक जन्मतःच चिकटलेली जात म्हणून फक्त मी ब्राह्मण आहे असे म्हटले तर ते फारसे वावगे होणार नाही. मग मी आज या विषयावर काही का बोलत आहे?….well त्याला काही विशिष्ट कारणं आहेत.

म्हणजे बघा, सहज जाता येता किंवा कामाच्या ठिकाणी, जेवणाच्या वेळी, चहाच्या वेळी अवांतर गोष्टींवर गप्पा मारताना मी जे काही बोलतो किंवा गप्पांच्या ओघामध्ये ज्या आसपास घडणाऱ्या गोष्टीवर चर्चा होते, त्यात मी आणि माझे विचार यांना माझ्या जन्मजात ब्राह्मण्याशी जोडूनच पहिले जात. जणू मी सर्व ब्राह्मणांचा एक प्रतिनिधी आहे आणि मग मला गोंधळल्यासारख होतं (म्हणजे व्हायचं, आता सवय झालीये).

उदाहरणार्थ काही वर्षांपूर्वी झालेला दादोजी कोंडदेव शिवाजी महाराजांचे गुरु होते का? हा वाद, जेम्स लेन- भांडारकर संस्था वाद किंवा बाबासाहेब पुरंदरे आणि शिवचरित्राचा वाद…खरं तर तेव्हा माझा ह्या प्रकरणांशी, ह्या लोकांशी काहीही संबंध नव्हता-आजही नाही. या प्रकरणाबद्दल काही माहितीही मला तेव्हा नव्हती आणि मला खात्री आहे की यावर शिळोप्याच्या गप्पा मारणारे लोकही माझ्या इतकेच अनभिज्ञ होते.

तरी पण त्यांचा एकूण सूर हा मला एका प्रकारे आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारा असे. तुम्ही सगळे ब्राह्मण लोक असेच, ब्राह्मणांनी आपली कायमच वाट लावली…अशा तुकड्यांनी सुरु होणाऱ्या वाक्यांनी मी गोंधळून जात असे.

अचानक मी ह्यांच्या मध्ये इतकी वर्ष काढलेला न राहता कुणी तरी बाहेरचा होऊन जात असे. यावर मग मी वाचायला आणि माहिती गोळा करायला सुरुवात केली. आता मी गोळा केलेली माहिती आणि मला झालेले ह्या एकंदर गोष्टीच हे आकलन हे अपूर्ण, चूक किंवा फारच वरवरचं असू शकत किंवा बरोबर आणि अगदी मूलगामीही असू शकतंक. ते कसं आहे हे तुम्ही ठरवायचं.

इंग्रजांनी मराठी राज्य बुडवून त्यांचा अंमल जेव्हा कायम केला, तेव्हा पुण्यात तरी ब्राह्मण हेच सत्ताधारी होते. (तसं पाहू जाता ब्राह्मणही काही राज्यकर्ती जात नव्हे. (अर्थात तरीही ही सत्तेशी आणि सत्ताधाऱ्याशी कायम जवळीक साधून राहणरी जात होती.) इतिहासात ब्राह्मणांनी राज्य कमावल्याची उदाहरणं कमीच.

इ.स. पूर्व १५० मध्य झालेला पुष्यमित्र श्रुंग सोडला तर मला तरी ब्राह्मण राजे काही आठवत नाहीत. महाराष्ट्रातले सातवाहन सम्राट हे ब्राह्मण होते असं मानलं जातं, पण यावर संशोधकांमध्ये मतभेद आहेत. त्यामुळे त्याकाळात साहजिक पुण्यात व त्याच्या आसपासच्या प्रांतात तरी ब्राह्मणही साहजिकच प्रभावशाली आणि सत्तेशी हितसंबंध जुळवून असलेली जात होती हे निश्चित.

आता सत्ताधारी म्हणून ब्राह्मण राज्यकर्ते हे फार न्यायी आणि समंजस होते अशातली बात नाही. त्यांनी स्वतःला व स्वतःच्या जमातीलाच झुकतं माप, अधिकार आणि सत्तेत वाटा दिला हे देखील खरं, पण सर्वसाधारणपणे सत्तेतली कुठलीही जमात किंवा वर्ग असाच वागतो. स्वकीयांचे हितसंबंध तो अधिक जपतो. (असे न वागणारे लोक कमी, अपवादात्मक आणि नक्कीच प्रशंसनीय.)

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेले मराठी राज्य १८१८ मध्ये इंग्रजांनी बुडवले आणि महाराष्ट्रात त्यांची सत्ता दृढ मूल केली, त्या वेळी ब्राह्मण हेच सत्ताधारी होते आणि दिल्लीचे नामधारी बादशाहच्या आडून तेच देशाच्या राजकारणाची सूत्रे हाकीत होते. त्यामुळे राज्य घालवल्याचा राग त्यांच्या वर होताच. इंग्रज परकीय खरे, पण त्यांनी राज्य व्यवस्थेत सुसूत्रता आणली, शिवाय त्यांच्या बरोबर आधुनिक विचार, शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान हेही आले.

राज्यकारभाराच्या सोयीसाठी म्हणून का होईना पण त्यांनी नवीन शिक्षण पद्धती आणली, तेव्हा गेल्या काही पिढ्या सत्तेला चिकटून असलेले ब्राह्मण पुन्हा जुनी लक्तर टाकून ह्या नव्या व्यवस्थेत सत्तेचे भागीदार बनले. त्यांचे हितसंबंध फार बिघडले नाहीत. (जरी बऱ्याच ब्राह्मणांच्या- विशेषतः चित्पावनांच्या मनात इंग्रजांनी आपले राज्य बुडवल्याचा राग होता, तरी या नव्या शिक्षणाचे, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे महत्व ओळखणारे ही बहुसंख्य ब्राह्मणच होते. त्यामुळे सुरुवातीला इंग्रजांविरुद्ध शस्त्र उपसणारे क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके, चापेकर बंधू, वगैरे जसे ब्राह्मण होते तसेच आधुनिक शिक्षण, सुधारणेचे पुरस्कार करणारे लोकहितवादी, न्या. रानडे, आगरकर, कर्वे वगैरे ही ब्राह्मणच होते) याचा राग इतर विशेषतः मराठा जातीच्या मनात फार होता.

मराठा ही खरंतर गेल्या अनेक पिढ्या पासूनची राज्यकर्ती जमात. म्हणजे राज्य कुणाचेही असो, यादवांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे, आदिलशहाचे किंवा मोंगलांचे… मराठा समाजाची सत्तेतली भागीदारी काही आटली नव्हती. पण शाहू महाराजांच्या काळात बाळाजी विश्वनाथाने अन् नंतर पहिल्या बाजीरावाने पद्धतशीर पणे हे परंपरागत मराठा वर्चस्व मोडून काढले. त्यांचा सत्तेतला वाटा नाममात्र केला आणि नवे होळकर, शिंदे यांसारखे सरदार उभे केले, ब्राह्मण सरदार उभे केले. इंग्रजांच्या काळात तर परिस्थिती अधिकच बिकट बनली.

इंग्रजांनी वंशपरंपरेने कुणाला काही देणे बंदच केले. अशातच महात्मा ज्योतिबा फुलेंचा उदय झाला आणि त्यांनी बहुजन समाजाच्या ह्या हीनदिन परिस्थितीचे यथायोग्य मूल्यमापन करून त्यांच्या उत्थापनाचे प्रयत्न सुरु केले. त्यातून सत्यशोधक चळवळीची स्थापना झाली. दारिद्र्य, अज्ञान, भेदाभेद, विषमता हेच बहुजनांच्या मागासलेपणाचे कारण आहे, हे ओळखून ह्या शोषक समाजव्यवस्थेचे संरक्षक जे ब्राह्मण, त्यांना फुल्यांनी आव्हान दिले. त्यांनी स्थापलेल्या सत्यशोधक चळवळीला अभूतपूर्व यश मिळाले.

म. फुल्यांच्या नंतर या चळवळीची सूत्रे मराठा समाजाच्या हाती गेली आणि लवकरच तिला ब्राह्मण- ब्राह्मणेतर चळवळीचे रूप येऊ लागले. बहुजन समाजाला सत्याशोधक चळवळ ब्राह्मणेतर आणि नंतर ब्राह्मणद्वेषी चळवळ कधी झाली हे कळलेच नाही. या चळवळीच्या यशाने ब्राह्मणांची सर्व क्षेत्रातून पीछेहाट सुरु झाली.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रौढ मतदानाच्या युगात संख्येने ३.५ ते ४ % असणाऱ्या ब्राह्मणांना एक समाज म्हणून फारसे भवितव्य नव्हतेच आणि ते जात म्हणून एकही नव्हते. अशात गांधीजींचा खून झाला आणि तो एका ब्राह्मणाने केलेला असल्याने ब्राह्मणद्वेषाला आता एक नैतिक अधिष्ठान प्राप्त झाले.

नथुरामला न्यायालयात शिक्षा झाली. तो फाशीही गेला. पण समस्त ब्राह्मणसमाज या गुन्ह्याच्या अपराध भावनेचा शिकार झाला. आजही ब्राह्मणाना त्या बद्दल जबाबदार धरले जाते आणि त्या घटनेशी काहीही संबंध नसलेले आजचे ब्राह्मण त्या अपराधाचे ओझे आजही डोक्यावर वाहताना दिसतात. ह्या उलट नव्या लोकशाही समाजव्यवस्थेत संख्याने २७ – ३५% असलेला मराठा समाज पुन्हा एकदा सत्ताधारी झाला. त्यांच्याकडे सत्ता कमावण्याचा, चालवण्याचा, टिकवण्याचा प्रदीर्घ अनुभव तर होताच, त्या बरोबर संघटीत असे पुरेसे संख्याबळही होते.

खरं तर ब्राह्मण आणि मराठा ह्या दोन सवर्ण जाती पिढ्यानुपिढ्या सत्तेतल्या भागीदार. पण ब्राह्मणेतर चळवळीत त्या एकमेकांविरुद्ध आल्या. गांधी हत्येनंतर महाराष्ट्रात ज्या दंगली उसळल्या (आमचे आजोबा सुद्धा त्या दंगलीत घर जाळल्यामुळे नाशिकहून परागंदा होऊन पुण्यात आले.) त्यामुळे खेडोपाडी थोडीफार जमीनदारी धरून असणारा ब्राह्मण समाज तिथून मुळापासून उखडला गेला आणि तो शहरात आला. खेड्यातला भिक्षुकी करणारा ब्राह्मण तर आधीच शहराकडे जाऊ लागला होता. (आज खेडोपाडी ब्राह्मण समाज जवळपास नाहीच.)

विपरीत परिस्थिती माणसाला पर्याय शोधायला भाग पाडते. ब्राह्मणांनी स्वतःला बदलत्या परीस्थितीशी जुळवुन घेतले. खरतरं सत्तेतले पिढ्यानपिढ्या भागीदार असलेले मराठा आणि ब्राह्मण हे दोन समाज.

ब्राह्मण हे ही एकेकाळी अत्यंत कर्मठ, पण प्रबोधन आणि सुधारणेत आज ही जात अत्यंत अग्रेसर. इतिहासदृष्ट्या पाहिलं तर ब्राह्मण स्त्री हीने ब्राह्मण असून देखिल इतर स्त्रियांप्रमाणेच शोषित, वंचित!

ब्राह्मण विधवांची स्थिती तर अत्यंत दयनीय, पण आता ही जवळपास इतिहासजमाच झाली आहे. आज ब्राह्मण स्त्रियामध्ये शिक्षण, स्वातंत्र्य आणि स्वावलंबी असण्याचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. अशिक्षित/ निरक्षर ब्राह्मण स्त्री तर अपवादानेच आढळेल आणि जात धर्म प्रांत वंश वगैरेचा विचार न करता, शिक्षण, आर्थिक परिस्थिती, विचार, यांचा विचार करून जातीबाहेर विवाह करणाऱ्या तरुणींमध्ये ब्राह्मण तरुणींचा टक्का लक्षणीय आहे. विशेष म्हणजे त्यांना घरून फारसा विरोध होत नाहीच उलट बऱ्याचदा पाठिंबाच मिळतो.

एवढच कशाला आताशा ब्राह्मणाचे स्वतःल ब्राह्मण म्हणून वेगळे मानणे ही कमी कमी होत चालले आहे.

नवीन पिढीतल्या ब्राह्मण तरुणांमध्ये तर हे प्रमाण अधिकच आहे. त्यांना स्वतःच्या ब्राह्मण असण्याबद्दल, त्यांच्या इतिहासाबद्दल, संस्कृतीबद्दल फारसे काही माहित नसते आणि माहिती करून घ्यायची इच्छा आहे असेही मला वाटत नाही. परंपरागत भिक्षुकी सोडून आधुनिक शिक्षण घेऊन नोकरी व्यवसाय करणे आणि पैसा कमावणारे ब्राह्मण अधिक.

शहरात स्थिरावलेला ब्राह्मण समाज आज शहरेही सोडून परदेशी जाऊन स्थायिक होऊ लागला आहे. इतरही जातीतले लोक जातात, पण संख्याबळ पाहिले तर ब्राह्मणात हे प्रमाण खूपच जास्त आहे. माझ्या माहितीतल्या एकुण एक ब्राह्मण कुटुंबातले कोणी न कोणी परदेशी स्थायिक झालेले असते आणि नवीन पिढी त्यांच्या पावलावर पाउल टाकून तिकडे जायचे स्वप्न उराशी बाळगून असते.

त्याच बरोबर ब्राह्मण तरुणांचा समाजकारणातला आणि विशेषतः राजकारणातला सहभाग लक्षणीय रित्या घटत चालला आहे. माझ्या एका नातेवाईकाच्या नुकत्याच इंजीनीयर झालेल्या आणि परदेश गमनाची तयारी करीत असलेल्या मुलाला मी या बाबत सहज छेडल, त्याला विचारलं की,

तू शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात परत येणार की नाही ?

तर तो म्हणाला,

इथे परत येऊन काय करणार? मी ब्राह्मण आहे. मला चांगली नोकरी इथे मिळणार नाही. त्यापेक्षा अमेरिकेत जास्त पैसा आहे.

यावर मी त्याला पुन्हा प्रश्न केला,

पण तुला या देशाकरता काही करावसं वाटत नाही का? त्यागाची आणि निस्पृह सेवेची फार मोठी परंपरा ब्राह्मण लोकांनी मागे ठेवली आहे. हा देश घडवण्यात ब्राह्मणांचा वाटाही आहे.

तो माझ्या कडे जरा संशयाने पाहू लागला. त्याला वाटले मी त्याची चेष्टाच करतो आहे मग म्हणाला,

कसला त्याग? सेवाभाव? ह्या फालतू गोष्टी आहेत. माझा जन्म भारतात झाला म्हणून मी भारतीय, ब्राह्मणाच्या घरी झाला म्हणून ब्राह्मण,  ह्याला काय अर्थ आहे? परंपरा, इतिहास वगैरे म्हणाल तर तो प्रत्येक देशाला असतोच. या देशात जन्मल्यापासून आमच्याकडे संशयानेच पाहिले जाते. कुठे कोणी दलितांना मारहाण केली की ब्राह्मणाना शिव्या देतात. २००-३००-१००० वर्षापूर्वीच्या गोष्टी काढून आम्हाला धारेवर धरतात. भ्रष्टाचार, विषमता, अन्याय यांनी बरबटलेले लोक आम्हाला त्यांच्या अवस्थे करता जबाबदार धरतात. हे म्हणजे स्वतः रस्त्यावर घाण करायची आणि अस्वच्छतेबद्दल बोंबलायचे तसे झाले. महाराष्ट्रात एवढ्या दलितांवर अत्याचाराच्या घटना घडल्या, त्यात एक तरी ब्राह्मण सापडला का? पण येता जाता आम्हाला टोमणे मारले जातात.

…! पुढे…

आरक्षणाचे फायदे दशकानुदशके घेऊन मागास राहणारे समाज, ब्राह्मणांना त्यांच्या मागासलेपणा साठी जबाबदार धरतात. १०००- १२०० वर्षापूर्वी आलेले मुसलमान इथले, पण ५००० की १०००० वर्षापूर्वी आलेले ब्राह्मण मुळचे आर्य आणि म्हणून बाहेरच? जरा कुठे खुट्ट झाले की आम्हाला बाहेर फेकून द्यायची भाषा, तस कशाला? आम्हीच बाहेर जातो की…दुसऱ्या देशात आम्ही उपरे असू कदाचित, पण मग इथे कोण आम्हाला आपलं मानतंय? इथे तरी आमची मूळ कुठे रुजली आहेत? ती उखडून फेकून दिलीच आहेत की या समाजाने. आम्ही तर मूल नसलेले लोक आहोत. तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही राहा इथे मला तर खर असं काही वाटत नाही.

हे त्याचे विचार सर्वथैव बरोबर आहे असे नाही. (नव्हे मला तरी ते चुकीचेच वाटले पण तो प्रश्न नाही, तो आणि त्याच्या सारख्या बऱ्याच तरुणांना हे असाच काहीसं वाटतंय ही वस्तुस्थिती आहे.) ते प्रातिनिधिकही नाहीत, पण अगदीच अपवादात्मक ही नाहीत. मला भेटलेले बहुसंख्य ब्राह्मण तरुण असेच काहीसे विचार करणारे भेटले. हे फार भयावह आहे. मन उद्विग्न करणारे आहे. “या देशात आमची पाळमूळ नाहीत”, हे त्याचे उद्गार मला जास्त अस्वस्थ करून गेले. पण आहे हे असे आहे. त्याला कोण काय करणार? समाजातला एखादा वर्ग स्वतःला असं इतरापासून, या देशाच्या संस्कृती, इतिहासापासून तुटल्यासारखा/ दुरावाल्यासारखा मानु लागला तर ते निश्चितच उद्वेगजनक आहे.

हा माझा नातेवाईक तरुण, आता परदेशी म्हणजे जर्मनीत चांगला स्थिरावलाय. त्याला मागे भारतातआलेला असताना मी परत छेडले. विचारले की,

तु मागे म्हटलंस तसे खरच इथे ब्राह्मण म्हणून तुला त्रास होतो, म्हणून परदेशी गेलास की आणखी काही कारण होते?

तर तो म्हणाला,

आता तुम्ही त्यागाची आणि निस्पृह सेवेची ब्राह्मणांची फार मोठी परंपरा, हा देश घडवण्यात ब्राह्मणांचा वाटा, असले काहीतरी बोलू लागलात तर मी ही तसेच बोललो. नाही तर इकडे पैसा, सुख सोयी, ऐषोआराम आहे म्हणून इथे आलो हेच खरे, मुख्य कारण बाकी आपले असेच बोलायच्या गोष्टी. घरी आलं की आईला म्हणतो तुझ्या हाताच्या जेवणाची सर कश्शाला म्हणून नाही पण तिकडे जाऊन वजनचांगलं ५० किलोचं ७२ किलो झालंय – ते का लपून राहत? पण आईला ही बरं वाटतं. तसंच आहे हे…!

आता बोला!

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

10 thoughts on “ब्राह्मण…मुक्त (ता) चिंतन!

 • May 6, 2017 at 9:14 pm
  Permalink

  खुप दिवसांनी इतका उत्कृष्ट लेख वाचायला मिळाला खुपच बरे वाटले. खर सांगावे तर हा लेख बहुतांशी मला शास्त्रशुद्ध आणि संदर्भासहीत वाटला. खरच ब्राह्मण अब्राम्हण ह्या गोष्टिंनी फरक पडायला नाही पाहीजे.

  Reply
 • May 7, 2017 at 12:00 am
  Permalink

  लेख चांगला आहे आणि ह्याला एकच उपाय ” unhilliation of caste”.

  Reply
 • May 7, 2017 at 2:52 am
  Permalink

  मुळात ब्राह्मण जमात 3% असल्याने त्यात एकी जास्त आहे.. त्यामुळे ब्राम्हण ब्राह्मणांना मदत करून वरती आणतात.. आणि बाकीच्यांना दुय्यम दर्जा देतात.

  ब्राह्मण मुले बाहेर जाण्याचे कारण सध्या स्पर्धा आहे भारतात. ब्राम्हण श्रीमंत असल्याने बाहेरची वाट धरतात..

  Reply
 • May 7, 2017 at 12:02 pm
  Permalink

  सरकारी नोकऱ्यांमध्ये ब्राह्मणांना काय स्थान आहे, सर्वांनाच माहीत आहे.
  ना नोकरी ना बढती.

  Reply
 • May 7, 2017 at 3:16 pm
  Permalink

  छान लेख, सत्यही आहे.

  Reply
 • May 7, 2017 at 5:57 pm
  Permalink

  छान लेख, पण एक भिती निर्माण करतो कि पुढील काळात आपले समाजातील हे स्थान ब्राह्मण समाजातील पुढील पिढी उदासीनतेमुळे घालवुन तर बसणार नाही ना??

  Reply
 • May 7, 2017 at 11:36 pm
  Permalink

  Partly agree… माझा एक ब्राह्मण मित्र असंच काही प्रमाणात बोलला होता एकदा………आज परदेशात आहे…वापस येणार नाही बहुतेक!

  Reply
 • November 19, 2017 at 11:32 pm
  Permalink

  Khupach Chaan Lekh.. Ajchya Brahman pidhine Itihas janun ghena khup garjecha ahe…Ignorance is not bliss here..Asha vishayan var ajun lekh vachayla avadel.! 🙂

  Reply
 • July 13, 2018 at 5:53 pm
  Permalink

  वास्तव आहे विचारांत,
  इंग्रजांना राज्य टिकवायचे होते .
  मुघलांना ते लुटायचे होते.
  महाराष्ट्राने ती लाट अडवली .
  कारण येथे ब्राह्मण मराठे एक होते.
  इंग्रज हुशार होते.त्यांनी मराठा×मराठा लढविले .
  पेशवाईनंतर शिवशाही किल्ले भुईसपाट केले.
  अव्हान देणारे ब्राह्मण/मराठे आपसात लढविले.
  आम्ही नादान आजपण ईतिहास न वाचता बरळतो.
  काल परवा जे आले ते परके मानत नाही.
  मी म्हणतो कोणालाच परके बोलू नका.
  झापड लावून नालस्ती करणे चुकीचे आहे.
  अस्पृश्यता बाळगणारे 2 टक्केच होते काय ?
  बाबासाहेबांना गायकवाड महाराजांनी शिष्यवृत्ती दिली.
  पण त्याच संस्थानात ते नोकरी करू शकले नाहीत.
  तेव्हा ब्राह्मणांकडे एक बोट दाखविताना 4 बोटे कुठे
  आहेत ?
  वाद करून आपण स्वतः परागंदेत जाणार आहोत.
  परकीय शक्ती येथे यशस्वी होताना दिसते आहे.
  आतातरी ईतिहास समजून घ्या .
  शहाणे व्हा.
  विद्वान सर्वत्र पुज्यते.
  जगभरात ब्राह्मणांना मागणी आहे .
  भारतात यापुढे बौद्धिक दारिद्र्य आले तर ब्राह्मण
  आयात करावे लागतील.
  आपण संस्कृत आणी गोवंश मारून जे केले .
  लक्षांत घ्या .
  आज संस्कृत शिकायला जर्मनी .
  ऊत्तम भारतीय गोवंशासाठी ब्राझीलला जावे लागते.
  चंद्रकांत शहासने. पुणे .9881373585

  Reply
 • September 13, 2018 at 7:24 pm
  Permalink

  ब्राम्हण हा एक विचार व क्रांती आहे, इतिहास साक्षी आहे, या क्रांतीला आणि नथुराम गोडसे नि जे केले, ती त्यावेळे ची गरज च होती नाहीतर गांधींनी भारतच्या पोटा मध्ये दुसरा पाकिस्थान च निर्माण केला असता, तो म्हणजे बांगलादेश, बांगलादेशी हिंदूंना भारतात सहारा मिळू दिला नाही तो गांधी मूळे, इंग्रजांना विरोध केला ब्राम्हणांनी कारण त्यानी नीती ओळखली होती त्यांची,आज उत्तरांचल,मिझोराम, संपूर्ण ख्रिश्चन झाला आहे,याला जवाबदार ब्राह्मणच का? आज गोव्हर्नमेंट ऑफिस मध्ये चागल्या पोस्टवर ब्राम्हण,राजकीय सल्लागर ब्राह्मणच आहेत, कारण निष्ठा हे मूळ आहे,आज जगाला ज्ञानदेणारे वेद, आणि शोध ब्राम्हण आहेत, संस्कार हि चांगली आतिशय महत्वाची गोष्ठ ब्राह्मणा मध्ये आहे, आजकाल परदेशा मध्ये जाणे हि बुद्धिवंतांची लक्षण आहेत, ब्राह्मणेतर समज परदेशात खूप जास्त प्रमाणात आहे, जसे गुजराथी समाज अमेरिकेमध्ये आहे, कॅनडा मध्ये शीख समज भरपूर आहे ,त्याच प्रमाणे काही ब्राम्हण परदेशा मध्ये जात आहेत, आजचे गणित बदले आहे,पैसा हि गरज झाली आहे, ब्राम्हण कुणाला बाटवत नाही आत्याचार करत नाही, दंगली करत नाही मग ब्राम्हण वाईट का व कसा?

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?