' बॉक्सिंगच्या मुखवट्याआड लव जिहाद! फरहानचं ‘तुफान’ खरंच बॅन व्हायला हवं होतं का? – InMarathi

बॉक्सिंगच्या मुखवट्याआड लव जिहाद! फरहानचं ‘तुफान’ खरंच बॅन व्हायला हवं होतं का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

सध्या बॉलिवूड हे ओटीटीचा वापर फक्त डंपिंग ग्राउंडसारखं करताना दिसतंय, एक्का दुक्का सिनेमे सोडले तर बॉलिवुडकडून एकही तगडा सिनेमा ओटीटीवर रिलीज झालेला आपल्याला सापडणार नाही.

खरंतर कोरोना आणि लॉकडाऊनमुळे बॉलिवूडला आणखीन एक चान्स मिळाला होता पण त्याचीही त्यांनी मातीच केलेली दिसून येते!

अख्ख्या लॉकडाऊन काळात बॉलिवूडने काय दिलं तर लक्ष्मी, सडक २, कुली नं १, राधे… आणि आता येऊ घातलाय नवीन तुफान! मुळात याला तुफान कुणी नाव सुचवलं असेल त्याचं नवल वाटतं कारण वळवाचा पाऊसही या तुफानसमोर मुसळधार म्हणता येईल इतका हा तुफान टुकार आहे.

 

toofaan inmarathi

 

म्हणजे सिल्व्हेस्टरच्या रॉकी सिरीजची किंवा स्कॉर्सेसीच्या रेजिंग बुलची कॉपीदेखील धड करता आलेली नाही, निदान तेवढी तरी कॉपी नीट केली असती तर सिनेमा नक्कीच बघण्यालायक झाला असता, पण फरहान अख्तर सारख्या गुणी कलाकाराकडून इतका टुकार कंटेंट अजिबात अपेक्षित नाही.

शिवाय राकेश ओमप्रकाश मेहरासारखे दिग्दर्शक ज्यांनी रंग दे बसंती, भाग मिल्खा भाग सारखा सिनेमा दिला त्यांच्याकडून हा असला टुकार अजेंडा ड्रीवन सिनेमा तर अजिबात अपेक्षित नाही.

काही अंशी रंग दे बसंतीमध्येसुद्धा असाच अजेंडा पसरवला गेला होता पण त्या सिनेमाचं कथानक आणि मांडणीच इतकी दमदार होती की एक पिढी त्या सिनेमाने घडवली असं म्हंटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही, अशा माणसाकडुन इतका बालिश सिनेमा तर अजिबात अपेक्षित नाही!

 

rang de basanti inmarathi

 

मुंबईच्या एका ‘मोहल्ल्यातला’ अजीज अली उर्फ अज्जू भाई हा वसुली करणारा, त्याला लागतं बॉक्सिंगच वेड ते एका तरुण हिंदू मराठी डॉक्टरच्या सांगण्यावरून, त्याच क्षणी हा अज्जू भाई तिच्या प्रेमात पडतो आणि बॉक्सर बनायचं ठरवतो.

हे ही वाचा लसीच्या किंमतीवर मत मांडणारा फरहान अख्तर होतोय ‘तुफान’ ट्रोल

इथे त्याची भेट होते एका कट्टर हिंदी कोचशी, एक असा कोच जो या देशातला एकमेव कोच आहे जो सकाळी रिंगमध्ये मुलांना बॉक्सिंग शिकवतो आणि रात्री आपल्या मित्रासोबत मस्त दारूचे घोट रिचवत “लांडी लोकं अशीच असतात, तशीच असतात, त्यांना जरा दूरच ठेवलं पाहिजे” हे असं बरळत असतो.

त्यामागचं कारण काय तर त्याची बायको एका आतंकवादी हल्ल्यात मारली जाते म्हणून, बरं इथे थांबतील तर ते बॉलिवूडकर कसले इथे येतो एकदम नोलनच्या इनसेप्शन लेव्हलचा ट्विस्ट.

 

paresh rawal inmarathi

 

जी तरुण मराठी डॉक्टर तर आपल्या अज्जू भाईच्या प्रेमात पडते ती याच कोचची मुलगी निघते आणि जेव्हा ही गोष्ट त्या कोचला समजते तेव्हा तो आपल्या मुलीला काय सांगतो तर “हे प्रेम नाही हे लव जिहाद आहे”, आणि मग इथून सुरू होतं बॉलिवूडचं नेहमीचं रडगाणं!

मुलगी त्या टुकार बॉक्सरसाठी आपल्याला लहानाचं मोठं केलेल्या आपल्या बापाला सोडून जाते, आपला संसार थाटते, तिथेही आपल्या बॉक्सरसोबत राहताना तिला धर्मांतर करण्यास सांगितले जाते, पण आपला पठ्ठा अज्जू भाई म्हणजे रॅम्बोच, कोण जाणार याच्या वाटेला?

त्यानंतर त्या डॉक्टर तरुणीचाही एका रेल्वे अपघातात मृत्यू होतो, आणि मग आपला अज्जू भाई ज्या कारणासाठी बॉक्सिंगपासून दूर राहिलेला असतो ते सगळं बाजूला सारून पुन्हा रिंगमध्ये उतरतो आणि जिंकतो, आहे की नाही एकदम दमदार स्टोरी?

 

mrunal thakur inmarathi

 

बरं हे सगळं वाचताना तुम्हाला फारफार तर एक मिनिट लागलं असेल, पण हेच या सिनेमात २ तास ४४ मिनिटं सहन करावं लागतं, कधी सुधारणार हे बॉलिवूड?

ही लोकं त्यांच्या या आभासी दुनियेतून, टिपिकल बाँबईया वातावरणातून कधी बाहेर येणार? मुंबई म्हणजे यांच्यासाठी २ टोकं आहेत एक म्हणजे मड आयलंड किंवा बांद्रा नाहीतर थेट धारावी किंवा डोंगरीसारखी वस्ती.. बास बाकी या बॉलिवुडच्या लोकांसाठी इतर कुणी गणतीत पण नसतात मग भले ते देशातले बहुतांश लोकं का असेना.

हे बॉलिवुडकर त्याच वर्तुळाभोवती गोल गोल फिरवून एकच कथानक सांगत बसणार, अरे बास करा रे जनाची नाही तर निदान मनाची तरी बाळगा रे, आता समजतंय की या सिनेमावर खरंच बॅनची मागणी का होत होती ते?

मी बॅनच्या विरोधातच आहे पण खरंच या अशा कलाकृती सादर करण्याआधी सेन्सॉरची कात्री चाललीच पाहिजे असं वाटतंय, कारण बॉलिवूडच्या या हिडीस प्रवृत्तीचा आता वीट यायला लागलाय, आता याविषयी बोलून बोलून पण थकायला झालं पण हे लोक काही सुधारायचं नाव घेत नाहीत.

मुळात तुफान या सिनेमाला सिनेमा तरी म्हणावं का असाच प्रश्न मनात उद्भवतोय कारण केवळ लव जिहाद आणि मुस्लिम द्वेष पसरवणे हा या सिनेमाचा हेतू त्याच्या प्रत्येक फ्रेम्समधून दिसून येत आहे.

 

toofaan boycott inmarathi

 

जे थेट थिएटरमध्ये बोललं जाऊ शकत नाही, ते संवाद ओटीटीवर सर्रास वापरून ही लोकं त्यांची पोळी भाजतायत, फरहानसारखा अभिनेता ज्याने मिल्खा सिंग यांची भूमिका इतकी समरसून केली होती त्याने हा टुकार रोल का केला असेल?

परेश रावल, मोहन आगाशेसारख्या दिग्गज कलाकारांनी या सिनेमातली त्यांची पात्रं साकारण्यासाठी संमती कशी दिली असेल? परेश रावल यांचं तर या सिनेमात खुपच वाईट वाटतं, म्हणजे त्यांच्यासारखा इतका सिनियर कलाकाराने हा असला मुस्लिम द्वेष्ट्या कोचचा रोल करणंच मला रुचलेलं नाही.

केवळ एक मोठं बॅनर आणि स्टारचं नाव म्हणून ही लोकं या असल्या टुकार सिनेमात काम करणार असतील तर एकंदरच सिनेइंडस्ट्रीचं भवितव्य अंधारमय आहे!

या सिनेमाचा अजेंडा किंवा मुस्लिम द्वेष या गोष्टी बाजूला जरी ठेवल्या तरी टेक्निकलीसुद्धा हा सिनेमा अत्यंत रटाळ, डल आणि अर्थहीन वाटतो, टिपिकल तोच बॉलिवूड मसाला आणि केवळ बॉक्सिंगचा मुखवटा धारण करून त्याच्याआड आपल्या मनातलं विष लोकांच्या मनात कालवायचं काम हा सिनेमा करतो.

अनुराग कश्यपचा मुक्काबाझ, प्रियांकाचा मेरी कोम ही अशी उदाहरणं समोर असतानाही हा तुफान नेमका का लोकांसमोर सादर केला गेला देवजाणे.

 

boxing film inmarathi

 

बॉक्सिंग ही गोष्ट काय फक्त मुहम्मद अलीचे व्हिडियो बघून वेड लावणारी नाहीये, या खेळालाही एक प्रतिष्ठा आहे, रस्त्यावरचा कोणताही गुंड उठून बॉक्सिंग करू शकत नाही, ही गोष्ट जितकी अनुरागच्या ‘मुक्काबाझ’मध्ये प्रभावीपणे मांडली आहे. त्याच्या एक टक्का जरी या तुफानमध्ये दाखवली असती तरी हा सिनेमा सहन करता आला असता.

पण केवळ इस्लामोफोबिया आणि लव जिहाद प्रमोट करून बॉक्सिंगच्या मुखवट्यामागे एक अत्यंत घिसंपिटं कथानक आणि तितकाच predictable क्लायमॅक्स म्हणजे हा सिनेमा तुफान!

३ मिनिटांचा ट्रेलर खेचून उगास २ तास ४५ मिनिटांच्या या सिनेमाची खरंतर काहीच आवश्यकता नव्हती, पण बॉलिवूडमधला कचरा सध्या टाकणार कुठे ना?

असो राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी त्यांच्या या आभासी दुनियेतून बाहेर येऊन भाग मिल्खा भाग सारखे चित्रपट बनवावे, फरहान अख्तर मृणाल ठाकूर, परेश रावल, सुप्रिया पाठक, विजय राज यांनी कामं छान केली आहेत पण या मातब्बर लोकांकडून हे असलं काम बघायची अपेक्षा अजिबात नाही.

हे ही वाचा कारकुनी कामासाठी आपला जन्म झाला नसल्याची ‘त्यांना’ जाणीव झाली आणि…

toofaan cast inmarathi

 

शंकर एहसान लॉय या त्रिकुटाने दिलेलं संगीत विसरण्यालायक आहे, एकंदरच या सिनेमाकडे सिनेमा म्हणून बघणं हादेखील सिनेमाचा अपमानच आहे.

कारण कोणत्याही अँगलने हा सिनेमा तुम्हाला बांधून ठेवत नाही, उलट त्यातल्या इस्लामो फोबिक मानसिकतेमुळे याचा तिटकाराच येतो, असो ज्यांना अजूनही हा सिनेमा बघायचा असेल तर पावणे तीन तास वाया जातील हे मनात ठेवूनच याच्या वाटेला जा, धन्यवाद!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?