' “अध्यक्ष महोदय, विधानसभेत शिव्यांना ‘नो एन्ट्री’ आहे! लक्षात ठेवा”, एक अजबच भानगड – InMarathi

“अध्यक्ष महोदय, विधानसभेत शिव्यांना ‘नो एन्ट्री’ आहे! लक्षात ठेवा”, एक अजबच भानगड

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

राज्याचा कारभार पाहणा-या विधानसभेत हमरीतुमरीवर आलेले नेतेमंडळी पाहिले की ” कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा” हा प्रश्न हमखास पडतो. राज्याचा विकास करण्यासाठी जमलेल्या मंत्र्यांना ‘जनाची नाही किमान मनाची’ तरी शिल्लक असावी ही भाबडी अपेक्षाही पूर्ण न झाल्याने दर अधिवेशनाचा झालेला खेळखंडोबा लाईव्ह दाखवला जातो.

 

vidhansabha inmarathi

 

मात्र गेल्या काही वर्षांपासून विधानसभेतील गोंधळानी नवं रुप घतलं आहे. कधी अध्यक्षांचा माईक खेचणं तर कधी वॉकआऊट प्रक्रियेत विरोधी पक्षनेत्यांना धक्काबुक्की करणं, एवढं करून न थकलेल्या मंत्र्यांना चेव चढतो तो शाब्दिक चकमकींचा.

ऐरव्ही एकमेकांना शालजोडीतील हाणणाऱ्यांचा पारा विधानसभेत असाकाही चढतो की वाद सुरु होतो तो थेट शिव्याशापांनी! मात्र यापुढे मंत्र्यांच्या तोंडाला कुलुप घातलं जाणार आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांनी उच्चारलेला अपशब्द किंवा भांडणात दिलेली शिवी ऐकल्यानंतर बाई जशी छडी उगरतात, त्याचप्रमाणे आता मंत्र्यांना धाक दाखवण्यासाठी एका डिक्शनरी निर्मिती केली गेली आहे.

त्यामुळे आता अगदी सहजतेने उच्चारले जाणारे ‘हरामखोर’, ‘पप्पु’, ‘चोर’, ‘दरोडेखोर’ या शब्दांना विधानसभेत नो एन्ट्रीचा बोर्ड दिसणार आहे.

नक्की भानगड काय?

आपलंच म्हणणं रेटण्यासाठी विधानसभेत प्रत्येक मंत्र्याचा आवाज चढतो. आपल्यावर होणारा हल्ला रोखत प्रतिहल्ला करण्यासाठी मंत्र्यांकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. यामध्ये आवाज चढतो आणि मग वेळ, काळ, स्थळ या कशाचेही भान रहात नाही.

अशावेळी मंत्र्यांकडून समोरील व्यक्ती, पक्ष यांच्या अब्रुचे धिंडवडे काढले जातात, ‘हरामखोर’, साला, चोर यांपासून सुरु झालेल्या वादात समोरच्याला पप्पु, निकम्माही ठरवलं जातं. यामध्ये अनेकांची जीभ जास्त घसरते आणि आई-बहिणींचा उल्लेख करतही अनेकजण समोरच्याला शिव्यांची लाखोली वाहतात.

 

fight inmarathi

 

हे ही वाचा – राग आल्यावर त्रास करुन घेण्यापेक्षा या टिप्स वापरुन राग शांत करा!

बरं, नेत्यांचं हे वागणं आणि सभ्यता, राजकीय शिष्टाचार यांचा दूरवरही संबंध नसतोच, उलट आपण निवडून दिलेल्या, देशाचा कारभार करणाऱ्या नेत्यांचा हा तमाशा देशातील जनता उत्साहाने लाइव्ह बघत असते. त्यामुळे एकंदरित सध्याचे राजकीय परिस्थितीबाबत आदर तर सोडाच पण घृणा, किळस वाटणा-यांची संख्या वाढलीय.

या सगळ्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न मध्यप्रदेश सरकारने केला आहे. मध्यप्रदेश सरकारच्या विधानसभेत आता केवळ शुद्ध भाषा, सात्विक वृत्ती आणि मनमिळाऊ वातावरणात रमणारे नेते दिसून येणार आहेत.

हे वाचून हसू येणं स्वाभाविक आहे, मात्र नेत्यांना हा नियम पाळावाच लागणार आहे, कारण त्यांना विधानसभेत येण्यापुर्वी ‘चांगलं वागण्याचा’ अभ्यास करावा लागणार आहे.

 

no bad word inmarathi

 

यासाठी सरकारने एका खास शब्दकोषाची निर्मिती केली आहे. विधानसभेत बॅन असणा-या ३०० शब्दांचा समावेश हा शब्दकोषात करण्यात आला आहे.

खबरदार, अपशब्द उच्चाराल तर…

मध्यप्रदेश सरकारचे पावसाळी अधिवेश येत्या ९ ऑगस्ट रोजी भरणार आहे, एकंदरित मध्यप्रदेशातील मंत्र्यांचा माथेफिरू स्वभाव लक्षात घेता अधिवेशनात होणारा गोंधळ अपेक्षित आहेच, मात्र यावरून हाणामारी होण्यापर्यंत परिस्थिती चिघळू नये यासाठी शब्दकोषाची संकल्पना राबवण्यात येत आहे.

अधिवेशनात सहभागी होणा-या प्रत्येक मंत्र्यांना या शब्दकोषाचा अभ्यास करून येणं बंधनकारक आहे. त्यासाठी प्रत्येकाला घरपोच हा शब्दकोष दिली जाईल. यामद्ये असलेल्या एकूण ३०० शब्दांची घोकंटपट्टी करावी लागणार आहे.

 

dictionary inmarathi

 

ऐरव्ही आपल्या ज्ञानात नव्या शब्दांची भर घालण्याचं काम शब्दकोष करत असला तरी या नव्या शब्दकोषात थोडासा फरक आहे. कोणते शब्द उच्चारू नये याची ताकीद हा शब्दकोष देणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने सर्व प्रकारच्या शिव्यांना सक्त मनाई आहे. त्याचबरोबर समोरील व्यक्तीला केली जाणारी वैयक्तिक टिका थांबवण्यासाठी ‘साला’, पप्पु, निकम्मा, हरामखोर, ‘नालायक’ या शब्दांच्या उच्चारांवर बॅन केला आहे.

चांगलं वागण्याचा क्लास

आता याला दुर्दैव म्हणावं की राजकीय नेत्यांचा निगरगट्टपणा, पण जनतेच्या विकासकांना आता चांगलं वागण्याचे धडे दिले जाणार आहेत म्हणजे अधिवेशनापुर्वी मद्यप्रदेश सरकारने दोन दिवसांचं ट्रेनिंग प्रोग्रॅम आखला आहे.

यावेळी नेत्यांना पुन्हा एकदा अधिवेशनातील राजकीय शिष्टाचार शिकवण्यात येणार असून कोणते शब्द टाळायचे? याची उजळणी करण्यात येणार आहे.

महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनाचा गदारोळ ताजा असताना बहुतेक त्याच भिती मध्यप्रदेश सरकारने ही खबरदारी घेतली आहेे.

 

keep silence inmarathi

 

अर्थात जनतेच्या अपेक्षांचीच नव्हे तर कायद्याचीही भिती नसलेल्या, किंबहूना कायदा, नियम मोडण्या उत्सुक असलेल्याा नेतेमंडळींना या शब्दकोशाने फरक पडतो का? हा प्रश्न आहेच.

 

fadanvis inmarathi

 

निर्ढावलेल्या नेत्यांना वठणीवर आणण्याचा हा सरकारचा प्रयत्न स्तुत्य म्हणावा, दुर्दैवी की उशीरा आलेले शहाणपण? याचा निर्णय प्रत्येकाने घ्यावा. अर्थात या शब्दकोषांमुळे व्यक्ती खरंच सुधारतो का ? हे येणा-या अधिवेशनात दिसेलच.

महाराष्ट्रातील नेत्यांची वाढती अरेरावी आणि विधानसभेत वारंवार सुटणारा जीभेचा ताबा पाहिल्यानंतर मराठमोळ्या नेत्यांना अशा शब्दकोषाची गरज आहे असं वाटतं का? तुमच्या प्रतिक्रिया नोंदवा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?