' फिश करी अँड राईस निर्मित - बिन पायांची शर्यत!

फिश करी अँड राईस निर्मित – बिन पायांची शर्यत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम |

===  

शाळा कॉलेज ची पुस्तकं म्हणजे अप्पा बळवंत चौक- पुण्यात हा एक अलिखित नियम आहे. त्यामुळे आमच्यासारख्या नदीपलीकडच्यांना कॉलेजनंतर अप्पा बळवंत चौकात, सारखं-सारखं जाईन हे कधी स्वप्नात ही वाटलं नव्हतं! पण ती किमया साधली ती संदेश सुधीर भट ह्यांच्या फिश करी राईसनी!

तसे आम्ही कधीच पट्टीचे मासे खाणारे नव्हतो. आमचं प्रेम हे कोंबडीवरच. लहानपणी आई आणि मोठेपणी पुष्कर काळे नावाचे स्नेही आम्हाला काटे काढून फिश खायला देत असे, तेवढंच आम्ही मासे खाणारे.

कधी पापलेट-सुरमईच्या पलीकडे ढुंकून ही पाहिलं नाही. पण साधारण ८ वर्षांपूर्वी सुधीर भटांनी सुरु केलेल्या ह्या ‘फिश करी राईस’ नी मात्र वेगळी वाट दाखवली. जन्माचे नाटक वेडे आणि सुयोगचे फॅन असे आम्ही, साहजिकच त्यांनी सुरु केलेल्या हॉटेलच्या टेस्टची टेस्ट करायला आम्ही पोहोचलोच.

 

fish-curry-rice-marathipizza
eveningflavors.com

अप्पा बळवंत चौकाजवळ कन्या शाळेशेजारी एक नॉर्मल साईझ ‘गाळा’ होता, त्यात सुरु झालं होतं फिश करी राईस.

आम्हा पुणेकरांना कॅम्प आणि नळ स्टॉपची फेमस सी फूड रेस्टोरंट बघायची सवय. त्यामुळे मासे खायचे म्हणजे महाग, भारी, मोठं आणि एसी वगैरेच हॉटेल मध्ये जावं लागतं असं वाटायचं.

असो, पण सांगायचं मुद्दा असा की त्यामुळे फिश करी राईसचं पहिलं दर्शन खूप निराशाजनक होतं, असं छोटंसं हॉटेल बघून हिरमोडच झाला. पण वास खूप भारी येत होता सो आत गेलो. १०-१५ मिनीटांनी बसायला जागा मिळाली.

ह्या अशा हॉटेल मध्ये उगाच ‘रिस्क नको’ म्हणून एक ‘छोटा ‘ पापलेट फ्राय आणि बॅक-अप प्लॅन म्हणून चिकन करी मागितली. वेटरनी पापलेट फ्राय टेबलवर आणून ठेवलं. आपल्याला जो साईझ मोठा वाटतो तो ह्यांना छोटा वाटतो!!!

छोट्याश्या किमतीत मोठा मासा दिला की काय अशा विचारानी माझं कोकणस्थी मन खुश झालं आणि मी पापलेटची डिश माझ्याकडे ओढली…किंबहुना त्याच्या सुटलेल्या वासानी मला तसं करायला लावलं.

पापलेटवर बरोबर ४ काप केले होते, ४ कापांमध्ये एखाद्या कारागिराने कराव्यात अशा सेम साईझ भेगा पाडल्या होत्या. त्यातून लालसर असा ओला मसाला माझ्याकडे डोकावून बघत होता, बोलवत होता. शेपटीच्या साईडला लिंबाची फोड आणि तिखट वास येणारी हिरवी चटणीपण आली होती. हे सगळं डोळे भरून पाहिल्यानंतर बरोबर मधला काप घेतला आणि जिभेवर ठेवला!!

 

fish-curry-rice-marathipizza02
madhurasrecipe.com

एका क्षणात कोकणस्थी मन कोकणात पोचलं!

पुण्यामध्ये समुद्रवगैरे तयार झाला आहे की काय असं वाटलं! कारणही तसच होतं… प्रिया बापटची स्माईल जेवढी फ्रेश तेवढाच ‘फिश करी राईसचा’ पापलेट फ्रेश होता…जिभेवर ठेवल्या ठेवल्या मस्त विरघळून गेला.

पण चवीमध्ये तिखट आणि झणझणीत अशाचा सुवर्णमध्य साधलेलं मॅरिनेशन जिभेवर रेंगाळत राहिलं…एकदम परफेक्ट चव!! आणि सोबतीला हिरवी चटणी आणि लिंबाची सर!! आह!! मजा आली!

ते पापलेट फ्राय’ एका ‘फाईट’मध्ये संपवलं… आणि पोट आतून ओरडलं.

हा ट्रायल बॉल होता… अजून मॅच सुरु व्हायचीये.

तेवढ्यात वेटर काका आलेच. मी जरा कन्फ्यूजड आहे हे कळल्यावर त्यांनी शांतपणे सांगितलं,

दादा, पापलेट पेदावण ट्राय कर

मी जोरात काय ??? वगैरे ओरडलो.

अहो घ्या, लेस ऑइल आणि फॅट फ्री आहे.

मी तडीक ऑर्डर दिली. थोड्याच वेळात हिरव्या रंगाची डिश आमच्या टेबलच्या दिशेनी येताना दिसली. इंटरेस्टिंग होतं! केळीच्या पानामध्ये, लालसर अशा मसाल्यामध्ये वाफवलेला पापलेट माझ्यासमोर आला होता!

जणू काही हिरव्या शालूमध्ये बसलेली नववधूच ती! पापलेटचा वास इतका भारी होता की डोळे भरून वगैरे बघायला वेळ नव्ह्ता! शून्य तेल, कमी तिखट आणि चवीला भारी! कसलं अशक्य कॉम्बिनेशन!!वाफवलेला मासा चुटकीसरशी संपवला.

 

fish-curry-rice-marathipizza03
thecurlyhairedcook.com

एकदम बाप वाटत होता. २ मासे संपल्यावर लॉन्ग इनिंग साठी एकदम सेट झालो होतो. आम्ही रपारप सुरमई फ्राय, कोळंबी करी, रावस तवा ऑर्डर देऊन सुटकेचा निश्वास सोडला आणि तिथेच सुरु झाली – बिन पायाची शर्यत!!!

सुरमई, रावस ह्यांची पोटात जाण्याची एक शर्यत!! ताटात आलेल्या ह्या सर्व खाद्य अप्सरा पैकी कोणाला आधी भेटायचं? भयंकर मोठा प्रश्न!! एक-एक करत सगळं खाल्लं. तेंडुलकरच करिअर जेवढं ‘स्वछ’ तसाच आपला ताटपण चाटुनपुसून एकदम स्वछ झालं होतं!!

पोटाने पण एकदम छान ढेकर देऊन, आपण खुश आहे हे ओरडून सांगितलं. निघताना अचानक लक्षात आलं, टेबलच्या कोपऱ्यातून कोणीतरी चिडक्या नजरेनी आपल्याकडे बघतय. इकडे तिकडे नजर टाकल्यावर लक्षात आलं, बॅक-अप म्हणून घेतलेली कोंबडी तशीच होती. साईडला पडलेली. एकदम दुर्लक्षित!

पोटातल्या सुरमईकडे ती ‘माझ्या नवऱ्याची बायको’ टाईप रागानी बघतीये की काय असा भास झाला!! आमच्या ह्या मासे प्रेमप्रकरणाला ‘फिश करी राईस’ नि एक वेगळीच कलाटणी दिली होती!!

त्यानंतर मात्र ‘फिश करी राईस’ फारच फ्रीक्वेंटली व्हायला लागलं. एकीकडे पापलेट पेदावण घायचं आणि दुसरीकडे नवीन डिश ट्राय करायची, अशी स्ट्रॅटिजिकल चाल आम्ही तेव्हा खेळत असू!

भट कुटुंबाला चव जेवढी चांगली कळते तेवढीच माणसंही छान कळतात! ह्याचा पुरावा म्हणजे इथे काम करणारे लोकं! सर्व जण तुमची आपुलकीनं चौकशी करतील, हसून ऑर्डर घेतील आणि प्रेमानी वाढतील!

 

fish-curry-rice-marathipizza04
tripadvisor.in

त्यामुळे आपण ‘हॉटेल नावाच्या घरीच’ जेवायला गेल्याचा फील येतो! अशाच गप्पांमध्ये वेटरकाकांनी सांगितलं रावस ग्रीन करी घ्या, नक्की आवडेल!! ऑर्डर दिली, ग्रीन करी आली!! पेदावण सारखीच ह्यावेळेस एकदम ‘फॅन मुमेंट’ झाली ती ग्रीन करी बरोबर! अशक्य वेगळी चव आणि महाबळेश्वरपेक्षा ही जास्त हिरवी!

अजब रावस की गजब कहाणी!!! आपण एकदम फिदा!!

थोडया वर्षानी ‘फिश करी राईस’नी कर्वे रोडला SNDT जवळ दुसरी ब्रॅन्च सुरु केली. म्हणजे आपल्या एरियात!! जाता येता शॉर्ट विझिट सुरु झाल्या!! कर्वे रोडवर पेट्रोल भरायला गेला की स्वगत १ तासाने घरी येतो आणि १ लिटर पेट्रोल भरायला साधारण ४००-५०० रुपये लागतात! असा हिशोब घरच्यांनी समजून घेतला होता!!

तिथेच ह्यांनी ‘स्पेशल थाळी’ सुरु केली. साधारण ६०० रुपये आणि बोल्ड मध्ये लिमिटेड लिहिलं होतं!! एवढे पैसे द्यायचे आणि लिमिटेड खायचं?? अशी शंका पोटाच्या डाव्या कोपऱ्यातून उपस्थित करण्यात आली! पण थाळी आल्यावर थक्क झालं!!

आपण अनलिमिटेड थाळी मध्ये ही जेवढं खाणार नाही तेवढं ह्यांनी लिमिटेड थाळी मध्ये आणून दिलं होतं!! माशाच्या ४ टाईप होत्या!! विषय कट !!! थाळी संपवल्यावर पोटाचा एकदम सैराट झाला!!! हाऊसफुल्ल!!! बाहेर येऊन SNDT कॅनलवर शत पावली मारणं मात्र जरुरी होतं!

 

fish-curry-rice-marathipizza05
dineout.co.in

नुकतीच ‘फिश करी राईस’ नी ८ वर्ष पूर्ण केली, इतक्या दिवसात लाखो ग्राम प्रोटीन्स, कॅलरीज आणि अनलिमिटेड सॅटिसफाईड ढेकरा आम्हाला पुरवल्याबद्दल आपण त्यांचा ऋणी राहणार!! बर्थडेनिमित्त त्यांना आपल्या कि-बोर्डद्वारे शुभेच्छा देण्याचा विचार पोटात आला…म्हणून हा सारा प्रपंच!!!

हैप्पी बर्थडे ,’फिश करी राईस!!

मुंबईचं फेमस सी फूड रेस्टोरंट पुण्यात सुरु होतंय असं ऐकलंय, पण माझ्यासारख्या खवय्यांसाठी ‘फिश करी राईस’ हे नेहमीच या बिन पायाच्या शर्यतीमध्ये आघाडीवर राहील!!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?