' ‘मुघल-ए-आझम’च्या सेटवर पुरुष वावरायचा ‘मधुबाला’च्या मास्कमध्ये, नेमकं घडलं काय? – InMarathi

‘मुघल-ए-आझम’च्या सेटवर पुरुष वावरायचा ‘मधुबाला’च्या मास्कमध्ये, नेमकं घडलं काय?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कुठेही बाहेर जायचं म्हटलं की आधी मास्क लावा आणि मगच घराबाहेर पडा, ही गोष्ट आता फारच त्रासदायक वाटू लागली आहे. पण हा मास्क नकोसा वाटत असला, तरी जेव्हा चित्रपट अथवा मालिकेतील हिरो, वेषांतर करण्यासाठी मास्क वापरतो त्यावेळी त्यातून होणारं मनोरंजन आपल्याला हवंहवंसं वाटतं.

भारतीय मनोरंजन विश्वातला पहिला सुपरहिरो ठरलेला क्रिश असो किंवा लहानग्यांचे आणि तरुणाईचे लाडके असणारे बॅटमॅन, स्पायडरमॅन असे जबरदस्त सुपरहिरोज; त्यांनी लावलेले मास्क हे आपल्यासाठी चर्चेचा आणि आवडीचा विषय असतात.

 

spiderman batman inmarathi

 

सुपरहिरोज मास्क लावतात, ते त्या ‘पात्राची’ खरी ओळख लपवण्यासाठी, आणि नवी ओळख निर्माण करण्यासाठी. मात्र, हिंदी मनोरंजन विश्वात एक अशी भन्नाट गोष्ट घडून गेली, जिथे पडद्यावर दिसणाऱ्या व्यक्तीने वेगळी ओळख धारण करण्यासाठी मास्क लावला होता, पण भूमिकेची गरज म्हणून नाही, तर चक्क एका कलाकाराची गरज म्हणून!

सुपर-डुपर हिट ठरलेल्या आणि आजही अनेकांसाठी आवडत्या असणाऱ्या, मुघल-ए-आझम सिनेमाच्यावेळी सेटवर एक नव्हे तर चक्क २ मधुबाला असायच्या. असं नेमकं काय घडलं होतं, की मधुबाला यांचा मास्क परिधान करून चक्क एक पुरुष सेटवर वावरत होता? चला जाणून घेऊयात एक अनोखा किस्सा…

 

madhubala 4 InMarathi

 

अजरामर गाणं

मुघल-ए-आझमबद्दल बोलायचं म्हणजे काही अशा गोष्टी आहेत, ज्यांच्याविषयी बोलल्याशिवाय बोलणं पूर्ण होऊच शकत नाही. त्यातीलच एक म्हणजे ‘प्यार किया तो डरना क्या’ हे अजरामर गाणं! उत्तम शब्द, साजेसं संगीत आणि पडद्यावर दिसणारं सुखावह नृत्य या सगळ्यांचा एकत्रित मिलाफ म्हणजे हे एव्हरग्रीन गाणं.

 

pyar kiya to darna kya inmarathi

 

अनेकांच्या गळ्यातील ताईत, तरुणांच्या दिलाची धडकन असणारी मधुबाला हे नृत्य करताना अधिकच आकर्षक दिसते नाही का? पण तुम्हाला जर असं सांगितलं, की हा डान्स तुमच्या आवडत्या मधुबालाने केलेला नसून, तो एका पुरुषाने केला आहे. त्या अदा, ती नजाकत मधुबाला यांची नाही, तर एका पुरुषाची आहे.

यामागचं नेमकं कारण काय?

मधुबाला या उत्तम अभिनेत्री होत्या, याबद्दल कुणालाही शंका असण्याचं काहीच कारण नाही. त्यांच्या अभिनयाची जादू आजही रसिकांवर कायम आहे. पण ही उत्तम अभिनेत्री नाचण्यात मात्र ‘ढ’ होती हे तुम्हाला कदाचित माहित नसेल. नृत्यप्रकारातील गिरकी हा तर अगदीच त्यांचा ‘वीक पॉईंट’ होता.

दिग्दर्शक के. असिफ यांना मधुबालाचं नृत्य अजिबातच रुचलं नाही. त्यावर काहीतरी पर्याय काढायला हवा यासाठी ते ठाम होते. शेवटी यातून जो पर्याय समोर आला तो अप्रतिम होता.

 

k asif inmarathi

 

त्यांनी हुबेहूब मधुबाला साकारली

आपल्या महाराष्ट्रातील पुण्याच्या एका शिल्पकाराने, ही ‘दुसरी मधुबाला’ निर्माण केली.  इतकी हुबेहूब, की तुम्हा-आम्हाला  हे कळलंही नाही, की ‘प्यार किया तो डरना क्या’ या गाण्यात आपण ‘ज्याच्याकडे’ बघतोय, ती मधुबाला नाहीच आहे. लक्ष्मी नारायण या नृत्यकाराने ते नृत्य अगदी लीलया केलं. त्यांना मधुबालाचा चेहरा देणारा शिल्पकार म्हणजे बी आर खेडकर.

कोण आहेत खेडकर?

वयाची ऐंशी वर्ष पार केलेले खेडकर, हे त्यावेळी एक तरुण मूर्तिकार होते. मुघल-ए-आझमचं चित्रीकरण होत असताना, ३३ वर्षांचे असणारे खेडकर मधुबाला यांचा हुबेहूब चेहरा बनवण्यात यशस्वी झाले.

दिग्दर्शक असिफ यांनी मधुबाला यांना अवघ्या दहा मिनिटांसाठी पोज द्यायला सांगितलं होतं. त्या दहा मिनिटांच्या अवधीमध्ये खेडकर यांनी सारं काही जाणलं आणि एक रबरी मास्क बनवला. या मास्कचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, हा भारतात बनलेला पहिला रबर मास्क होता.

हा मास्क बघून लक्ष्मीनारायण सुद्धा भलतेच खुश हा झाले होते. ‘अरे खेडकर क्या अच्छा काम किया हैं’ ही त्यांची प्रतिक्रिया खूप काही सांगून जाते.

 

b r khedkar inmarathi

 

ज्या स्टुडिओमध्ये चित्रीकरण सुरु होतं, त्याच्या जवळच एक रबर फॅक्टरी होती. या फॅक्टरीमध्ये फुग्यांची निर्मिती केली जात असे. त्यांच्याकडे जाऊन खेडकर यांनी वितळलेल्या रबरची मागणी केली. मधुबाला यांची एक मूर्ती त्यांना साचा बनवण्यासाठी कामी आली. त्या साच्याचा आणि वितळलेल्या रबरचा वापर करून मधुबाला यांचा ‘नवा चेहरा’ खेडेकरांनी साकार केला.

पडद्यावर दुसरी मधुबाला दिसणार होती, ती खेडकर यांच्या मेहनतीमुळे! त्यामुळेच त्यांनी आपलं नाव पडद्यावर दिसायला हवं अशी मागणी केली. कुठलेही आढेवेढे न घेता असिफ यांनी त्यांची मागणी मान्य केली. एवढंच नाही, तर मोठ्या आणि ठळक अक्षरात खेडकर यांचं नाव पडद्यावर दिसेल असं त्यांना सांगितलं.

 

madhubala InMarathi

 

त्यांच्या उत्तम कामाची पोचपावती मिळायला हवी, असं के असिफ यांनाही वाटत होतं. त्यामुळेच खेडकरांची ही रास्त मागणी लगेच मान्य झाली.

खेडेकरांनी दिलीपजी सुद्धा साकारले

याच खेडकर यांनी सेटवर आणखी एक मास्क तयार केला, चक्क दिलीप कुमार यांचा! दिलीपजींचा मास्क बनवून, तो एका जुनिअर अॅक्टरला त्यांनी घालायला सांगितला. त्यांच्या ऑफिसमधून बाहेर पडलेले असिफजी दिलीप कुमारांना बघून चक्रावून गेले. कारण त्यादिवशी दिलीपजींचं चित्रीकरण होणार नव्हतं.

 

dilip inmarathi

 

त्यानंतर असिफ यांना जेव्हा कळलं, की तोदेखील एक मास्क आहे, त्यावेळी ते खेडकर यांच्यावर अधिकच खुश झाले. एका मराठी कलाकाराने घडवलेली ही किमया महाराष्ट्रासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे.  मग मंडळी, या मराठमोळ्या कलाकाराच्या कलेविषयी इतरांना माहिती देण्यासाठी, हा लेख शेअर करणार ना?

===

===

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?