' शीत युद्धातले ऑल राऊंडर विमान – मिग २५ ( भाग २)

शीत युद्धातले ऑल राऊंडर विमान – मिग २५ ( भाग २)

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक : शीत युद्धातले ऑल राऊंडर विमान – मिग २५ ( भाग १)

===

मागच्या लेखात आपण मिग-२५ चा उगम बघितला. या विमानाशी निगडित काही गोष्टी या भागात बघू. १ मेच्या दिवशी देशात बऱ्याच घडामोडी झाल्या. त्यात वरचढ ठरल्या त्या राजकीय घडामोडी. पण याच दिवशी शीत युध्दातल्या एक मोठ्या सैनिकाने काळाच्या ओघात निवृत्ती पत्करली. तो सैनिक म्हणजे मिग-25 गरुड ! आजतागायत बरेच विक्रम या विमानाने प्रस्थापित केले आहे आणि काहीतर अजूनसुद्धा अबाधित आहेत ! राजकीय घडामोडींमूळे झाकोळल्या गेलेल्या एका लक्षवेधी विमानाचा भारतीय वायू सेनेतील एक प्रवास !

शीत युद्धातील अनोखा योगायोग:

१९७० साली पश्चिमेच्या राष्ट्रांना मिग-२५ ची चाहूल गुप्त उपग्रहाने काढलेल्या छायाचित्राने लागली. हे गुप्त उपग्रह सोव्हिएत रशियाच्या airfieldवर नजर ठेवून होते . त्यामुळे विमान दिसले यात काही वावगे नव्हते. त्यांचे लक्ष  वेधले गेले ते एकच कारणामुळे, ते म्हणजे अवाढव्य पंख ! यांचा वापर विमानाच्या लिफ्टवर होतो आणि विमानाला चपळ बनवायला होतो.  सोव्हिएत रशियाने त्यासाठी खास इंजिन बनवले आहे आहे का ? हे विमान किती वेगवान आहे? किती उंचीवर जाऊ शकते ? याचा धोका अमेरिकन विमानांना आहे का? आपल्यापेक्षा हे सरस आहे का? असे नानाविध प्रश्न पडले. त्यात भरीस भर म्हणून, मार्च १९७१ मध्ये इस्रायलने मिडल ईस्टमध्ये विचित्र विमान Mach ३ च्या वेगाने उडताना बघितले, तेही जमिनीपासून २० किमी वर !

mach-3-marathipizza
dreamlandresort.com

काही दिवसांनी इस्रायलने आपली काही विमाने या विचित्र विमानाला थांबवण्यासाठी धाडली, पण ते जवळसुद्धा पोहोचू शकले नाहीत ! मग अजून एक विफळ प्रयत्नात missile सोडल्या, पण विमान फुर्र्कन उडून गेले! आता मात्र अमेरिकेच्या लष्करी अधिकाऱ्यांना घाम फुटला ! शेवटी एवढाच अंदाज बांधता आला की , हे विमान उंच आणि वेगाने उडू शकते आणि खूप maneuverable आहे ! एवढ्याने थोडीच भागणार! शेवटी या लष्करी अधिकाऱ्यांचा जीव भांड्यात टाकला विकटोर बेलेंकोने !

६ सप्टेंबर १९७६ चा दिवस उजाडला ! विकटोर बेलेंको व्लॅडिवॉस्टॉकच्या पूर्वेला चुगुयेवका तळावर नेमला गेला होता. तिथून जपान हवाई मार्गाने फक्त ६४४ किमीवर होते! त्याच्या साथीदारांसह तो ट्रेनिंग मिशनसाठी हवेत झेपावला. विमानाच्या टाक्या इंधनाने पूर्ण भरल्या होत्या आणि कुठलीच शस्त्रे नव्हती. काही मिनिटांमध्ये तो त्यांच्यामधुन निसटला आणि जपानच्या दिशेने झेपावला! सोव्हिएत आणि जपानी रडारांना चकमा देण्यासाठी पठ्ठा कमी उंचीवरून उडत होता. जपानी एअरस्पेस मध्ये गेल्यानंतर हा पठ्ठा जपानी रडारवर येण्यासाठी २०,००० किमी उंच उडाला !

Viktor_Belenko-marathipizza
wikipedia.org

कमी इंधन आणि जुजबी स्मरणशक्तीच्या आधारे ‘चितोसे ‘ विमानतळाऐवजी उतरला ‘हाकडोदाते’ विमानतळावर ! धावपट्टी छोटी असल्याने विमान बरीच माती उकरत शेवटी एकदम टोकाला येऊन थांबले! विकटोर बाहेर उतरला, हवेत दोन गोळ्या झाडल्या आणि लागलीच देश सोडण्याबाबत इच्छा दाखवली ! शेवटी CIAला देव पावला की नशीब बलवत्तर निघाले ,याचे उत्तर देणे कठीण आहे !

यथावकाश अमेरिकेने शिस्तबद्धपणे विमानाच्या एकएक भागाला वेगळं केलं आणि त्याचा सखोल अभ्यास केला आणि मौल्यवान असे IFF (Identification Of Friend And Foe) कोड हस्तगत केले ! जपान्यांनी विमानातील एक एक रशियन शब्दाच भाषांतर त्याच्या वरच केलं. इंजिनचा अभ्यास केला, विमानात ठिकठिकाणी छिद्र करून विमानाच्या धातूची सखोल चाचणी केली. विमानाची इलेक्ट्रॉनिक उपकरणे अमेरिकन लोकांनी प्रयोगाच्या नादात उडवून टाकली. पण एका गोष्ट बघून अमेरिकन अधिकारी कुत्सितपणे हसले आणि नंतर त्याच गोष्टीने त्यांना घाम फोडला ! ती गोष्ट म्हणजे विमानाची उपकरणे ‘Vacuum Tube’ ची होती ! तुम्ही म्हणाल हे तर बाबा आझमचे तंत्रज्ञान ! पण यामुळेच मिग-२५ जगातील एकमेव विमान आहे जे आण्विक युद्धानंतर हवेतल्या हवेत विमानाचा फडशा पाडू शकते ! कारण याच्यावर Nuclear EMP चा बिलकुल परिणाम होऊ शकत नाही ! आहे कि नाही कमाल ! ना या विमानाला AC हँगर लागते ना उडण्याआधी २४ तासाचा अवधी ! सस्ता,सुंदर, टिकाऊ !

mig-25-marathipizza
bbc.com

 

भारतीय वायु सेनेत प्रवेश:

७०च्या दशकात भारतीय वायू सेनेकडे पाकिस्तान आणि चीन यांच्यावर नजर ठेवू शकणारी क्षमता असणारी विमाने नव्हती. लष्करी भाषेत सांगायचे म्हणजे वायू सेनेकडे reconnaissance क्षमताच लोप पावत होती! याची खंत त्यावेळचे भारतीय वायुसेनेचे एअर चिफ मार्शल इद्रिस लतीफ यांना बोचत होती. अनपेक्षितपणे सोव्हिएत रशियाने मिग-२५ देण्याचा प्रस्ताव इद्रिस यांच्यासमोर ठेवला. उत्साहित होऊन त्यांनी त्या वेळेच्या प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना विचारले आणि त्यांनी होकार कळवला. एवढेच नाही तर इद्रिस यांना मोकळा हात दिला! एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सोव्हिएत रशियाने हे विमान त्यांच्या Warsaw Pact च्या मित्र राष्ट्रांना सुद्धा दिले नव्हते. सखोल विचार करून भारतीय वायू सेनेने मिग-२५ चे reconnaissance प्रकार घेण्याचे ठरवले. या विमानाची एक खासियत म्हणजे याची स्वरक्षण करायची पद्धत! ती म्हणजे mach ३ वेगाने मागावर आलेल्या missile ला पछाडणे !

१७ ऑगस्ट १९८१ मध्ये बरेलीच्या विमानतळावर ‘Trisonics  Sqaudron’ मध्ये मिग-२५ने प्रवेश केला. त्याला नाव दिल गेलं ‘गरुड’!

mig-25-india-marathipizza
slideshare.net

प्रश्न पडला असेल, तर करा जरा विचार! मागच्या भागात याचं उत्तर नक्की सापडेल. भारतीय वायू सेनेमध्ये येण्याआधी एअर मार्शल पलदाइ रामचंद्रन भारतीय वायू सेनेचे मिग -२५ उडवणारे पहिले वैमानिक झाले.

Indian-Air-Force-PM-Ramachandran-MiG-25-marathipizza
aame.in

हे विमान उडवायला वायु सेनेमधून फक्त ४२ वैमानिक पात्र झाले. या वैमानिकांना खास ‘Pressure suit ‘ घालून विमान उडवाव लागत असे. जेव्हा जेव्हा लष्कराला पाकिस्तानी Armoured Assets बद्दल माहिती लागत असे, तेव्हा तेव्हा हे विमान ठळक माहिती पुरवायचे! मोजक्या sorties मध्ये हे विमान अक्ख्या पाकीस्तानचा फोटो काढत असत! वैमानिक दर महिन्यात २० ते २५ वेळा उड्डाण करून महत्वाची माहिती गोळा करत असे आणि कुठे उड्डाण करत असे, हे वेगळे सांगायला नको! १९८१ ते २००६ अश्या प्रदीर्घ काळात या विमानाने पाकिस्तानी आणि चीनवर असंख्य फेऱ्या मारल्या. इस्लामाबादवरचे उड्डाणतर तुम्हाला माहीतच आहे!

एअर चिफ मार्शल इद्रिस यांना या विमानाचा एवढा मोह झाला होता कि त्यांनी निवृत्त होण्याच्या एक महिन्याधी मिग-२५ ९०,००० फूट उंच उडवले आणि वायू सेनेचा निरोप घेतला. २ मे २००६ साली नुसते विमान निवृत्त झाले नाही, तर ह्यासोबत निवृत्त झाले शीत युद्धातील अनन्य साधारण महत्व असणारे एक शस्त्र!

 

पुनर्जन्म:

मिग-२५ अमेरिकेच्या हाती लागल्यामुळे त्यात फेरबदल करणे भाग होते. ज्या वेळेस रशियन वैमानिक या विमानाशी एकरूप होतंच होते, की अशी घटना झाली. शेवटी बेलेंकोला शिव्यांची लाखोली वाहिल्यानंतर फेरबदलांचा आराखडा तयार करण्यात आला. विमानाच्या रडारमध्ये सुधारणा करून ‘ग्राउंड रिफ्लेक्शन इफेक्टवर ‘ मात करण्यात आली. हवेतल्या हवेत मारायच्या क्षमतेत ३००० मीटरची भर झाली. विमानाच्या क्षेपणास्त्रात बदल करण्यात आले आणि काही नवी क्षेपणास्त्र विकसित करण्यात आले. विमानाची उड्डाणाची उंचीसुद्धा वाढली. अशी जवळपास १५० विमाने तयार करण्यात आली. एवढे करूनसुद्धा तंत्रज्ञान विकासामुळे बरीच समीकरणे बदलली. त्यात भर पडली ती strategic cruise missile ची आणि विमाने जी जमिनीपासून कमी उंचीवर उडू शकत होती. हे तंत्रज्ञान रशियाच्या उत्तरेकडून आत शिरण्यासाठी वापरात येऊ लागले. यामुळेच जन्म झाला मिग-३१ चा !

mig-31-marathipizza
sajeevpearlj.blogspot.in

व्लादिमिर पुतीन यांनी या विमानाच्या आधुनिकरणावर लक्ष केंद्रित केले आणि तातडीने ते झाले सुद्धा ! २०३० पर्यंत रशियन भूमीवर ही विमाने उडत राहणार आणि रक्षण करणार, यात काही वादच नाही ! याच जातीचे नवीन विमान येईपर्यंत रशियन वायू सेनेचा या विमानावर तेवढाच भरोसा आहे, जेवढं या विमानाबद्दल असलेले भय !

तुम्हाला काय वाटते या विमानाविषयी ? आणायचे का वापस भारतीय वायू सेनेत  ?

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?