' शिवरायांचा हा योद्धा नसता तर अंदमान निकोबार ही बेटं भारताला कधीही मिळाली नसती – InMarathi

शिवरायांचा हा योद्धा नसता तर अंदमान निकोबार ही बेटं भारताला कधीही मिळाली नसती

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

भारताच्या पश्चिम नौदलाचं नाव ज्यांच्या सन्मानार्थ ठेवलं ते कान्होजी आंग्रे! शिवाजी महारांचे आरमार प्रमुख होते. छत्रपती शिवाजी महाराजां पूर्वी हिंदुस्थानातल्या एकाही राज्यकर्त्याला समुद्री सत्तेचं महत्व कळलं नव्हतं.

छत्रपतींनी सर्वप्रथम दूरदृष्टीनं समुद्रावर आपली पकड बसवली. छत्रपती जर भारतीय आरमाराचे पितामह आहेत तर कान्होजी आंग्रे हे पहिले नौसैना कमांडर. साम्राज्याच्या या पहिल्या आरमार प्रमुखामुळेच आजची अंदमान आणि निकोबार ही बेटं देशाशी जोडली गेली.

 

andaman inmarathi

 

महाभारताशी नातं

हिंदी महासागरातील आजची अंदमान आणि निकोबार बेटांचा इतिहास रामायण कालखंडापासून प्रारंभ होतो. रामायण काळात याला हण्डुकमान या नावानं ओळखलं जायचं कालांतरानं त्याचा अपभ्रंश होऊन ते अंदमान बनलं.

अकराव्या शतकात चौल राजघराण्यातील पराक्रमी राजा राजेंद्र यानं या बेटांचा ताबा घेतल्याचे आणि सुमात्रा बेटांवर हल्ले करण्यासाठी यांचा वापर केल्याचेही संदर्भ आहेत.

अलिकडील इतिहास या बेटांशी मराठा साम्राज्याचा संदर्भ जोडणारा आहे. मराठी नौदलाचे पहिले सरखेल अर्थात आरमार प्रमुख कान्होजी आंग्रे यांनी प्रथमच या बेटांचा युध्दात वापर केला.

 

कोण होते कान्होजी आंग्रे?

आधुनिक भारताचे पहिले नौसैनिक म्हणून ज्यांची ओळख आहे ते कान्होजी आंग्रे म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील एक झुंझार नाव आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना भारतीय नौसेनेचे पितामह मानलं जातं तर आंग्रे आधुनिक भारताचे पहिले नौसैनिक कमांडर होते.

 

kanhoji inmarathi

हे ही वाचा – ३ तासात मुघलांना धूळ चारून, कोहिनूर हिरा लुटून नेणाऱ्या राजाची कहाणी, वाचा!

कान्होजी मुळचे पुणे जिल्ह्यातील काळोसे गावाचे. त्यांचं मूळ आडनावही संकपाळ हे आहे मात्र काळोसेतील आंगरवाडी या भागामुळे त्यांना आंग्रे हे उपनाम पडलं आणि कालांतरानं तेच प्रचलित झालं. कान्होजींचे वडिल तुकोजीही शिवाजी महाराजांच्या आरमारात चाकरीला असल्याचे संदर्भ आहेत. त्यांना २५ असामींची सरदारी असल्याचं सांगितलं जातं.

औरंगजेब मराठ्यांना चीत करण्यासाठी म्हणून १६८१ च्या अखेरीस महाराष्ट्रात आला आणि त्याचवेळेस कान्होजींच्या कोकण किनारपट्टीतील कार्यास प्रारंभ झाला असं इतिहास सांगतो. १६९४ ते ९८ या दरम्यान त्यांनी कोकणपट्टीतले मोगल आणि इतरांच्या ताब्यात गेलेले जवळपास सर्व किल्ले परत घेतले.

कान्होजींच्या नौसेनेत ८० जहाजं होती. ब्रिटिशही ज्यांच्यासमोर थरथरत असं सागरी दहशतीचं नाव होतं कान्होजी. आयुषात त्यांनी कधीही पराभवाला तोंड दिलेलं नाही. ते अजेय होते.

छत्रपती राजाराम महाराजांनी त्यांना सरखेल हा किताब बहाल केला. छत्रपती ताराराणीबाईसाहेबांच्या छत्रछायेत कान्होजींना अभय होतं आणि त्यांच्या कर्तुत्वाचा डंका सर्वत्र गाजला.

८ व्या शतकात भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर वर्चस्व गाजविण्यासाठी मोक्याच्या जागची बंदरं आणि किल्ले काबिज करण्याची अनेक परकीयांत होड लागली होती. यात इंग्रज, पोर्तुगीज, फ़्रेंच, डच, मोगल यांचा समावेश होता.

 

british inmarathi

 

भारतीय किनारपट्ट्यांवरील बंदरं आपल्या ताब्यात ठेवून व्यापारी माल युरोपात पाठविण्यासाठी बंदरांवर साम्राज्य राखणं महत्वाचं होतं. कान्होजींनी त्यांच्यातल्या या अनागोंदीचा पूरेपूर वापर करून घेत या संपूर्ण किनारपट्टीवर आपलं साम्राज्य स्थापन केलं.

इंग्रज आणि पोर्तुगिजांच्या अथक प्रयत्नांनाही यश आलं नाही आणि सागरी वर्चस्वावर कान्होजींची पकड अखेरपर्यंत राहिली. २६ डिसेंबर १७१५ साली चार्लस बून याची मुंबईच्या गव्हर्नरपदी नियुती झाली आणि त्यानं पहिलं काम काय केलं? तर कान्होजींना पकडण्याच्या मोहिमा आखल्या.

त्यानं अक्षरश: शर्थ केली पण त्याच्या हाताला यश आलं नाही. उलट १७१८ मधे कान्होजीनं ब्रिटीशांची तीन व्यापारी जहाजं पकडली. बून या घटनेनं आणखीनच चवताळला. अखेरीस इंगजांनी कान्होजींना समुद्री चाचा म्हणून घोषित केले. मात्र अशा घोषणांना भिक घालतील ते कान्होजी कसले? त्यांनी मुंबई बंदाराच अशी काही नाकेबंदी केली की इंग्रजांना हातपाय हलविणं कठीण बनलं.

कान्होजींनी ईस्ट इंडिया कंपनीकडून थोड्या थोडक्या नाही तर तब्बत त्या काळातील ८७५० पौंडांची खंडणी वसून केली.

अंदमान आणि निकोबारवर ठोकला आरमारी तळ

अंदमान आणि निकोबार द्वीपसमुहांचा वापर युध्दासाठी करणारे ते पहिले अधिकारी होते. अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांनी आपला सैनिकी तळ याठिकाणी ठोकला होता.

या काळात अंदमान आणि निकोबार बेटांच्या बाजूच्या समुद्राचा वापर पोर्तुगीज, इंग्रज आणि डच नौदल व्यापारी कारणासाठी करत असे. या टापूतून जाणार्‍या परकीय जहाजांवर अंकुश ठेवण्यासाठी कान्होजींनी या बेटांचा खुबीनं वापर करून घेतला. या बेटांचं दुर्गम असणं कान्होजींच्या पथ्यावर पडलं. गनिमी काव्यानं लढण्याची शिकवण पुरेपूर उपयोगात आणत त्यांनी परकीयांना अक्षरश: जेरीस आणलं.

कान्होजीचा बंदोबस्त करण्यासाठी पाठविलेल्या इंग्रजाच्या जहाजांना कान्होजी जाणूनबुजून पाठलाग करायला लावत असत. पाठलाग करणारे अधिकारी मनातून खुष होत असत की आता कान्होजीला मुसक्या बांधून न्यायचं. मात्र कान्होजी त्यांना बंदरांच्या दिशेनं नेत असे आणि वेगानं जाऊन लपत असे. त्यांच्या पाठलागावर आलेली जहाजं मात्र जलसमाधी घेत असत. असं सतत होऊ लागल्यावर ब्रिटीशांच्या लक्षात आलं की काही योगायोग असू शकत नाही.

ही व्यूहरचना कान्होजीनं चतुराईनं आखली आहे.

 

kanhoji angre inmarathi

 

कान्होजींचा पराक्रम असा होता की स्वतंत्र भारतातल्या राज्यकर्त्यांनाही त्यांच्या कार्याचं स्मरण ठेवावं लागलं. दुर्दैवविलास असा की, जे सर्व परकीय शक्तींना जमलं नाही ते छत्रपतींच्या कौटुंबिक दुही मुळे घडलं. सत्ता संघर्षात कान्होजींचा पाडाव एका गादीकडून दुसर्‍या गादीला हरविण्यासाठी केला गेला. पेशव्यांना आदेश गेले आणि त्याबरहुकूम मोहिम आखत त्यांनी कान्होजींचा बंदोबस्त केला.

पुढे भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सावरकरांना ठोठावलेल्या काळ्या पाण्याच्या शिक्षेमुळे अंदमानचं नाव आधुनिक भारताच्या इतिहासात कायमचं कोरलं गेलं. भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि ब्रिटिशांनी जाता जाता अंदमान आणि निकोबार ही बेटं देखिल भारताचाच भाग असल्याचं नोंदविलं.

 

savarakar inmarathi

हे ही वाचा – ब्रिटिश जुलूम; भारतात नजरकैदेत प्राण सोडलेल्या पतीला, ती मायदेशी नेऊ शकली नाही

अशा रितीनं दुर्गम अशी ही बेटं भारताचा भाग बनली. कान्होजींच्या धोरणीपणामुळे याठिकाणी नाविक तळ उभारला गेला जो आज भारताचा शक्तीशाली घटक बनला आहे. आजही भारत आपला दबदबा या तळामुळे राखून आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?