' राणेंसह दिल्लीत गेलेल्या ३ मराठी नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी! त्यांच्याबद्दल जाणून घ्या

राणेंसह दिल्लीत गेलेल्या ३ मराठी नेत्यांवर महत्त्वाची जबाबदारी! त्यांच्याबद्दल जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

अखेर काल संध्याकाळी बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. ४३ नव्या मंत्र्यांसह एक नवं मंत्रिमंडळच जणू अस्तित्वात आलं. आरोग्य मंत्री डॉ. हर्ष वर्धन, ज्येष्ठ मंत्री रविशंकर, अशा बड्या नेत्यांसह मंत्रिमंडळात असलेला प्रकाश जावडेकर हा महाराष्ट्रातील चेहरा पदावरून पायउतार झाला.

 

prakash javdekar inmarathi

 

मात्र, हे घडत असताना महाराष्ट्रातील ४ नव्या चेहऱ्यांना, पहिल्यांदाच थेट केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं. नारायण राणे हे नाव तर आधीपासूनच चर्चेत होतं. पण राणेंव्यतिरिक्त कपिल पाटील, डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड हे ३ नेते केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झाले, आणि हे तिघे नेमके आहेत तरी कोण असा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला. हे तिघे नक्की कोण आहेत, ते आता जाणून घेऊयात.

डॉ. भागवत कराड

डॉ. भागवत कराड हे नाव औरंगाबादकरांसाठी नवं नाही. त्यांनी औरंगाबादच्या महापौर म्हणून सुद्धा काम पाहिलं आहे. भाजपचे स्वर्गीय नेते गोपीनाथ मुंढे यांना ते राजकारणात आपला गुरु मानत असत. पेशाने डॉक्टर असणाऱ्या भागवत कराड यांना केंद्रात मंत्रिपद मिळणार अशी खात्री अनेकांना होती असंही म्हटलं जातं.

 

gopinath mundhe InMarathi

 

वंजारी समाजाचे प्रतिनिधित्व करणारे भागवत कराड यांचा आता केंद्रीय मंत्रिमंडळात प्रवेश झाला आहे. त्यांचे राजकीय गुरु मुंढे यांची कन्या प्रीतम मुंढे यांचं स्वप्नं भंगलं असल्याची सुद्धा चर्चा आहे.

===

हे ही वाचा – गोपीनाथ मुंडे यांनी उघडकीस आणले दाऊद आणि शरद पवारांचे संबंध…?

===

सध्या भागवत कराड हे राज्यसभेवर खासदार आहेत. चिखलीसारख्या छोट्या गावात जन्माला आलेले आणि पुढे भाजपचे नेता झालेले भागवतजी, अर्थमंत्रालयात राज्यमंत्री म्हणून काम पाहणार आहे.

 

bhagwat karad inmarathi

 

डॉ. भारती पवार

डॉ. भारती पवार यांच्या रूपात नाशिकला पहिल्यांदा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. भारती पवार यांची राजकीय कारकीर्द फारच नाट्यमय ठरली आहे असं म्हणायला हवं.

राष्ट्रवादीमधून कारकिर्दीला सुरुवात 

२०१४ साली राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना खासदारकीची निवडणूक लढवण्याची संधी मिळाली. मात्र त्या ही निवडणूक जिंकण्यात अपयशी ठरल्या. माजी मंत्री ए. टी. पवार यांची सून असणाऱ्या भारतीजी या पराभवाने खचून गेल्या नाहीत. त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं. त्यांचं उत्तम काम पाहून २०१७ साली त्यांना पुन्हा एकदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत संधी मिळाली.

२०१२ साली उमारणे गटातून जिल्हा परिषद सदस्य झालेल्या भारती पवार यांनी २०१७ साली मानूरमधून विजय प्राप्त केला.

 

bharati pawar inmarathi

 

त्यांच्या कार्याचा धडाका सुरूच होता. त्यांनी या काळात संघटनेचे मोठे जाळे उभे केले. पक्षाची बांधणी अधिक मजबूत होईल यासाठी त्या सतत प्रयत्नशील होत्या. मात्र, ऐनवेळी त्यांची राजकीय वाट बदलली.

निवडणुकीच्या उंबरठ्यावर भाजपत प्रवेश

संघटन बांधणी करणाऱ्या भारती पवार यांना राष्ट्रवादीकडून खासदारकीचं तिकीट मिळणार, हे २०१९ साली जणू निश्चित होतं. प्रत्येकच जण त्याबद्दल विश्वास व्यक्त करत होता. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या धनराज महाले यांना तिकीट मिळालं आणि भारतीजी नाराज झाल्या. त्यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपत प्रवेश केला आणि महाले यांचा पराभव करून त्या संसदेत पोचल्या.

 

dhanraj mahale inmarathi

 

तिकीट कापलं जाणं त्यांच्या पथ्यावर पडलं असं आज म्हणता येईल. भाजपच्या खासदार म्हणून संसदेत प्रवेश करणाऱ्या डॉ. भारती पवार यांनी २ वर्षात आपल्या उत्तम कामगिरीने छाप पाडली आणि एक उत्तम महिला खासदार म्हणून त्यांनी नाव कमावलं. त्यांच्या उत्तम कामामुळे त्यांना राज्यमंत्री म्हणून संधी मिळाली आहे.

कपिल पाटील

कपिल मोरेश्वर पाटील, हे ठाणे जिल्ह्यातील भिवंडी मतदार संघातून निवडून आलेले खासदार आहेत. या भागातील हे एक बडं प्रस्थ आहे, असं म्हणता येईल. अर्थात, कपिल पाटीलसुद्धा पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे नेते होते. २०१४ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली आणि भाजप प्रवेश केला.

पहिल्या निवडणुकीतच विजय प्राप्त करत ते भाजपचे संसद सदस्य झाले. त्यापुढे २०१९ साली देखील त्यांनी भाजपच्या तिकीटावर विजय प्राप्त केला. तब्बल दीड लाख मतांनी विजय मिळवत त्यांनी आपला ठसा यावेळी उमटवला होता. या घटनेला २ वर्षं झाल्यानंतर, आज त्यांच्या गळ्यात केंद्रीय मंत्रिपदाची माळ पडली आहे.

 

kapil patil inmarathi

 

कपिल पाटील यांनी सुद्धा तरुण असल्यापासूनच राजकारणात आपली छाप पडायला सुरुवात केली होती. १९८८ ते १९९२ या काळात त्यांनी दिवे-अंजूर ग्रामपंचायतीचं सरपंचपद भूषवलं. पुढे १९९२ ते १९९६ या काळात भिवंडी पंचायत समितीचे सभासद सुद्धा राहिले. पुढे १९९७ साली त्यांनी अध्यक्षपदाचा कार्यभार सुद्धा स्वीकारला.

नवी मुंबईमधील विमानतळ नावाच्या वादात सुद्धा कपिल पाटील या नावाचा सहभाग असल्याचं दिसतं. दि. बा. पाटील यांचंच नाव विमानतळाला द्यावं यासाठी  ते आग्रही आहेत. आगरी समाजातील हा नेता केंद्रीय मंत्रिमंडळात पोचल्यानंतर, नेमकं काय घडेल, हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे हे नक्की!

राजकीय उद्देशातून मंत्रिमंडळ विस्तार…

हा मंत्रिमंडळ विस्तार राजकीय उद्देश नजरेसमोर ठेऊन करण्यात आला आहे, अशी चर्चा मोठ्या प्रमाणावर होताना दिसतेय. वंजारी समाज, आगरी समाज अशा वेगवेगळ्या समाजातील नेतेमंडळींना मंत्रिमंडळात स्थान देऊन भाजपने नवी खेळी खेळली आहे, अशीदेखील चर्चा आहे.

 

narednra modi inmarathi

 

नारायण राणे, भागवत कराड आणि कपिल पाटील यांचा प्रदेश हा शिवसेनेची अधिक ताकद असलेला मानला जातो. त्यामुळे याचा विचारातून त्यांना संधी देण्यात आली असावी असं जनतेला वाटत आहे. तशी सोशल मीडियावर चर्चा सुद्धा आहे. आता या सगळ्याचा परिपाक काय होतोय, ते येणार काळच ठरवेल.

तोपर्यंत तुम्ही या ३ नव्या चेहऱ्यांविषयी माहिती तुमच्या ओळखीतील इतर मंडळींपर्यंत सुद्धा अवश्य पोचवा. याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया सुद्धा जरूर कळवा.

===

हे ही वाचा – राणेंच्या एन्ट्रीमुळे होणार का मोदी सरकारची एक्झिट? वाचा यापूर्वी काय घडलंय…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?