' चीनचं काय घेऊन बसलात? आपली ‘द ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ माहितीये का? – InMarathi

चीनचं काय घेऊन बसलात? आपली ‘द ग्रेट वॉल ऑफ इंडिया’ माहितीये का?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

जगात अनेक मोठ मोठे किल्ले, वाडे, इमारती आहेत जे पाहून डोळे दिपतात.

इतक्या मोठ्या आणि उंच इमारती इतक्या जुन्या काळात कशा बांधल्या असतील? त्या बांधायला किती वेळ लागला असेल? किती माणसे कामाला लागली असतील? ह्या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करू लागतो.

जगातील आठ आश्चर्ये पाहिल्यावर तर आपण हा विचार करतोच आणि त्याविषयी अधिक माहिती मिळवतो. सर्वांना माहितीच आहे की चीन मधली द ग्रेट वॉल ही जगातील आठ आश्चर्यांमध्ये गणली जाते.

 

china-wall-marathipizza02

 

आपल्या भारतात पण अनेक असे भव्य दिव्य स्थापत्य आहे जिथे पुरातन काळातील स्थापत्यतज्ज्ञांनी आपल्या कलेचा नमुना जगासमोर मांडला आहे. अनेक इमारती तर आज शेकडो वर्षानंतर सुद्धा मजबूत स्थितीत आहेत.

हल्ली टीव्हीवर राजस्थान टुरीजमच्या जाहिरातीत राजस्थान मधील एक मोठी भिंत दाखवतात ती भिंत सुद्धा चीन मधल्या भिंतीसारखीच भव्य आहे.

ही भिंत राजस्थानच्या मेवाड प्रांतातील कुंभलगडच्या किल्ल्याभोवती आहे.

 

kumbhalgarh-fort-marathipizza01

 

ही भिंत आजही ३०० प्राचीन मंदिरांचे संरक्षण करते आहे. ही भिंत राणा कुंभा ह्याने इसवी सनाच्या पंधराव्या शतकात बांधली आहे.

हा किल्ला उदयपुर जिल्ह्यात आहे. उदयपुर शहरापासून ७० किलोमीटर लांब आहे.

समुद्रसपाटी पासून १,०८७ मीटर उंचावर असलेला हा किल्ला ३० किमीपर्यंत पसरला आहे. ह्या किल्ल्याचे बांधकाम १४४३ साली सुरु झाले. तब्बल १५ वर्ष काम सुरु असलेला हा किल्ला १४५८ साली बांधून पूर्ण झाला.

हा किल्ला सम्राट अशोकाचा दुसरा पुत्र संप्रति ह्याने बांधलेल्या किल्ल्याच्या स्थानावर बांधला आहे. ह्या किल्ल्याला अजेयगढ सुद्धा म्हटले जायचे.

कारण ह्या किल्ल्यावर विजय मिळवणे अतिशय कठीण होते. राणा कुंभा ह्यांनी ह्या किल्ल्याभोवती एक संरक्षक भिंत बांधली जी जगात चीनच्या भिंतीनंतर दुसरी सर्वात मोठी भिंत आहे.

ह्याच गडावर महाराणा प्रताप ह्यांचा जन्म झाला होता. हा गड मेवाडची आपत्कालीन राजधानी होता.

 

kumbhalgarh-fort-marathipizza02

 

मेवाडवर जेव्हा जेव्हा परकीय आक्रमणे झाली तेव्हा महाराणा कुंभा ह्यांच्यापासून ते महाराणा राजा सिंह ह्यांच्यापर्यंत सगळे राजपरिवार ह्याच किल्ल्यात आश्रयाला आले होते.

तसेच महाराणा उदय सिंह ह्यांचे पालन पोषण सुद्धा त्यांच्या लहानपणी पन्ना दाई ह्यांनी ह्याच किल्ल्यात केले होते. ह्या कुंभलगडाविषयी तेथील गायक एक पारंपारिक गाणे गातात

कुम्भलगढ़ कटारगढ़ पाजिज अवलन फेर।
संवली मत दे साजना, बसुंज, कुम्भल्मेर॥

तर ह्या कुंभलगडाचे रक्षण करणाऱ्या कुंभलगड वॉलला ग्रेट वॉल ऑफ इंडिया म्हटले जाते.

ही भिंत ३६ किमीच्या परिसरात किल्ल्याभोवती बांधण्यात आली आहे. ही भिंत समुद्रसपाटीपासून ११०० मीटर (३६०० फुट) उंचावर आहे. ही भिंत अनेक पर्वतांच्या शिखरांवरून, दऱ्यांमधून जाते.

ही भिंत त्या काळच्या प्रगत स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना आहे. ही भिंत बांधून आज ७०० वर्ष झाली तरी आजही भिंत भक्कम व सुस्थितीत आहे.

राणा कुंभा ह्यांच्या काळात मेवाड राज्य रणथंबोर पासून ते ग्वाल्हेरपर्यंत पसरलेले होते. ह्यात मध्य प्रदेशातील सुद्धा काही भाग होता.

राणा कुंभा ह्यांच्या राज्यात असलेल्या ८४ किल्ल्यांपैकी ३२ किल्ले त्यांनी स्वतः डिझाईन केले होते.

ह्या ३२ किल्ल्यांपैकी कुंभलगड सर्वात मोठा किल्ला आहे.

ह्या किल्ल्याचे स्थापत्य अतिशय गुंतागुंतीचे आहे. ह्या किल्ल्यामध्ये संकटकाळी आश्रय घेण्यासाठी सर्व सोयी करण्यात आल्या होत्या.

ह्या किल्ल्यावर आक्रमण रोखण्यासाठी म्हणून ही अजस्त्र भिंत बांधण्यात आली आहे.

 

kumbhalgarh-fort-marathipizza03

 

ही अजस्त्र भिंत दऱ्याखोर्यांमधून जाताना काही काही ठिकाणी अगदी बारीक झालेली जाणवते, तर काही ठिकाणी भिंत १५ फुट जाड आहे.

ह्या भिंतीचे बांधकाम अतिशय सुंदर आहे. त्यासाठी हजारो दगडी विटांचा वापर करण्यात आला आहे. शिवाय भिंतीचा वरचा भाग सुशोभित करण्यात आला आहे.

हे ही वाचा – मुघलकालीन शिल्पांच्या कौतुकात दुर्लक्षित राहिलेली अस्सल भारतीय स्थापत्याची उदाहरणं

ह्या किल्ल्याचे संरक्षण आरवली पर्वतरांगेतील १३ शिखरे करतात. ह्या किल्ल्याला ७ दारे आहेत. अरेत पोल, हनुमान पोल, राम पोल, विजय पोल, निंबू पोल आणि भैरव पोल अशी ह्या दारांची नावे आहेत.

ह्या किल्ल्यात जी ३६० मंदिरे आहेत त्यापैकी ६० हून अधिक मंदिरे हिंदू देवतांची आहेत तर बाकीची जैन मंदिरे आहेत.

असे म्हणतात की राणा कुंभा ह्यांच्या काळात ह्या भिंतीवर अनेक मोठे मोठे दिवे लावले जात. ह्या दिव्यांमध्ये ५० किलो तूप आणि शंभर किलो कापसाची वात लागत असे. हे दिवे दऱ्यांमध्ये रात्री काम करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी लावले जात.

ह्या किल्ल्यात वरच्या भागाला एक प्रसिद्ध राजवाडा आहे. ह्या महालाचे नाव बादल महल आहे. ह्याच ठिकाणी महान राजपूत योद्धा महाराणा प्रताप ह्यांचा जन्म झाला असे सांगितले जाते.

असेही म्हणतात की, ह्या किल्ल्याचे सुरुवातीचे बांधकाम मौर्य काळात म्हणजेच दुसऱ्या शतकात झाले आहे. इतके भव्य बांधकाम असून सुद्धा ह्या भिंती बाबत अनेक लोकांना ठावूक नाही.

 

kumbhalgarh-fort-marathipizza03

 

जून २०१३ साली ह्या किल्ल्याला युनेस्कोने वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणून घोषित केले आहे. ह्या किल्ल्यासोबत राजस्थान मधील आणखी ५ गड किल्ल्यांना सुद्धा वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणून घोषित करण्यात आले.

१९व्या शतकापर्यंत ह्या गडावर राजवंशातील लोकांचे वास्तव्य होते मात्र आता हा किल्ला लोकांना बघण्यासाठी खुला करण्यात आला आहे.

चित्तोडगढ नंतर हा किल्ला मेवाड प्रांतातील सर्वात मोठा आणि महत्वाचा किल्ला मानला जातो.

ह्या किल्ल्यावरून आसपासच्या गावांचे मनोहर दृश्य बघता येते. आणि आरवली पर्वत रांगांतून जाणाऱ्या आणि किल्ल्याच्या भोवती असणाऱ्या विस्मयचकित करणाऱ्या लांबच लांब पसरलेल्या भिंतीचे नयनरम्य दृश्य अनुभवता येते.

शिवाय दूरवर दिसणाऱ्या थर वाळवंटाचे दृश्य सुद्धा इकडून बघता येते.

पर्यटकांना नेहमी सूचना देण्यात येते की ज्या ठिकाणी फार लोक जात नाहीत त्या ठिकाणी ह्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करू नये. कारण ह्या भिंतीमध्ये शत्रूसाठी तयार केलेली प्राचीन काळातील सुरक्षा प्रणाली असू शकते.

जरी त्या प्रणाली आता काढून टाकण्यात आल्या आहेत तरीही निर्जन भागात अशा प्रणाली अजूनही असू शकतात. म्हणूनच अशा निर्जन स्थळी जाणाऱ्यांना वेळोवेळी सूचना दिल्या जातात.

 

kumbhalgarh-fort-marathipizza04

 

फारशी कुणाला माहिती नसलेली ही जागा आता जाहिरातीमुळे प्रसिद्ध पावत आहे.

म्हणूनच तिथे जाणाऱ्या पर्यटकांनी इतर ठिकाणी जशी नासधूस करून भारताचे वैभव धोक्यात आणले आहे.

तसे काही करून ह्या भिंतीचे सौंदर्य मातीमोल करू नये ह्याची काळजी तिथल्या देखभाल करणाऱ्यांनी व पर्यटकांनी सुद्धा घेतली पाहिजे.

हे ही वाचा – जागतिक पर्यटनस्थळांत दुसऱ्या क्रमांकावर असलेलं हेअप्रतिम स्थळ फार कमी भारतीय जाणून आहेत

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?