' आमिरच्या घटस्फोटावर द्वारकानाथ संझगिरींची ही पोस्ट अनेकांच्या भुवया उंचावणारी होती! – InMarathi

आमिरच्या घटस्फोटावर द्वारकानाथ संझगिरींची ही पोस्ट अनेकांच्या भुवया उंचावणारी होती!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर आमीर आणि किरण राव यांच्या घटस्फोटाची चर्चा बरीच रंगली होती, काहींनी आमीरच्या या कृतीचं समर्थन केलं तर काहींनी याविरोधात भाष्य केलं, काहींनी तर थेट याचा लव्ह जिहादशीसुद्धा संबंध जोडला.

आमीरचं हे वैयक्तिक आयुष्य असल्याने त्याला ट्रोल करण्याचा काहीच संबंध नाही असाही पवित्रा काही सेलिब्रिटीजनी घेतला, यावरच प्रसिद्ध लेखक द्वारकानाथ संझगिरी यांनी एक फेसबुक पोस्ट केली, त्यांच्या या पोस्टवर चक्क लोकांनी बऱ्याच चांगल्या वाईट कॉमेंट केलेल्या आहेत.

 

dwarkanath sanzgiri inmarathi

 

आज आपण त्यांचीच पोस्ट इथे वाचणार आहोत आणि त्यावर आलेल्या काही प्रतिक्रियासुद्धा पाहणार आहोत!

===

मी गाडी चालवत होतो. बाजूला बायको होती. आणि तिने मोबाईल चाळता चाळता बातमी दिली.”अमीर खान ह्याने दुसरा घटस्फोट घेतला.” हिंदी सिनेमातल्या शॉटप्रमाणे मी कचकन गाडी थांबवली नाही.

 

aamir khan kiran rao inmarathi

 

किंबहुना माझ्या चेहऱ्यावरचे भाव, प्रदीपकुमार एव्हढे निर्विकार होते. फिल्मी माणसाचा घटस्फोट आणि सेट झालेल्या रोहित शर्माने विकेट देणं ही मला पेट्रोलचे भाव वाढण्या एवढी सामान्य बातमी वाटते. का नाही वाटणारं?

आपल्या रेखाला, (आपला हा शब्द, आपला सचिन, आपला अमिताभ ह्या मर्यादित आपलेपणातूनच घ्यावा), एक सख्खी आई आणि तीन सावत्र आई होत्या. (इथे फक्त अधिकृत आईचा विचार केलाय).

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

हे ही वाचा ‘‘कुणी बनवले हे दोन वेगळे देश?”: असाही पाकिस्तानी मित्र! : द्वारकानाथ संझगिरी

किशोर कुमारने चक्क चार लग्न केली. त्याने योगिता बाली बरोबर केलेलं लग्न, केवळ व्हेकन्सी झाली आणि ती भरलीच पाहिजे ह्या नाईलाजापोटी केलं.

आशा पारेख म्हणते, ” तिला अमीर खान हा ह्या पिढी मधला देव आनंद वाटतो” पण देवानंदने लग्न एकच केलं. मला कुणीतरी सांगितलं की देव आनंद आणि बायकोचं नंतर नंतर पटायचं नाही. ते एकाच घरात वेगवेगळे राहिले आणि फक्त रोज जेवायला डायनिंग टेबलवर एकत्र येत. पण त्यांनी घटस्फोट घेतला नाही.

मला फक्त एका गोष्टीचं आश्चर्य वाटायचं की चिकणा अमीर, सलमानप्रमाणे सुंदर मुलीच्या प्रेमात का पडला नाही? सलमान हिऱ्याच्या ढिगातून कोहिनूर शोधून काढतो. आमिरचा कल सौंदर्यपेक्षा बुध्दीकडे आहे, असं मला सांगण्यात आलं. बहुदा मादाम क्युरी केवळ ह्या काळात जन्माला आली नाही म्हणून मिसेस अमीर खान झाली नाही. आणि सलमानचा बुध्दी ह्या गोष्टीशी काय संबंध?

सलमान बुध्दीमान असेल तर अमीर खान सर आयझॅक न्यूटन आहे. मला एक कलाकार म्हणून अमीर खान बुध्दीमान वाटतो. पाणी फाउंडेशनसारख्या कार्यातून तो सामाजिक जाणीव दाखवतो. पण त्याच्या ह्या घटस्फोटानंतर माझा त्याच्या बुध्दीबद्दलचा आदर द्विगुणित झालाय.

 

aamir khan inmarathi 2

 

त्याने माझ्या घटस्फोटाविषयीच्या सर्व कल्पना उलट्या पुलट्या केल्या आहेत. मला अस वाटायचं की नवऱ्याने दुसरा घरोबा केला, किंवा बायकोने आणि कुणाला डोळा मारला, किंवा तीव्र मतभेद झाले, काही शारीरिक प्रॉब्लेम्स झाले वगैरे की घटस्फोट होतो.

आनंदाच्या झोपाळ्यावर मुलाला मध्ये ठेऊन हातात हात असताना आणि उंच झोका घेताना घटस्फोट घ्यावासा वाटणे हा क्रांतिकारी कॉन्सेप्ट आहे. हे मी नाही सांगत तो सांगतोय.

त्याने दिलेल्या निवेदनात तो म्हणतो, ” गेल्या पंधरा वर्षांत आमचा एकत्रितपणे घालवलेला प्रत्येक क्षण आनंदात गेला. आमच्या नात्यात,विश्वास, प्रेम आणि आदर वाढतच गेला. आता एक नवा अध्याय सुरू करू. त्यात आम्ही नवरा बायको नसू”

निव्वळ आनंदाच्या अजीर्ण्या पोटी दिलेला हा घटस्फोट आहे का? वर तो सांगतो,”आम्ही आमच्या मुलाचे (आझाद) ह्याचे सहपालक असू. कुटुंब म्हणून एक असू, सिनेमा, पाणी फाऊंडेशनचे काम एकत्र करू.”

 

amir khan family inmarathi

 

म्हणजे फक्त शयन गृह बदललं का? बरं हल्ली एका शयन गृहात असायला नवरा बायको असावच लागतं अस नाही. म्हणजे हा मानसिक घटस्फोट आहे का? की इंटेलेक्चुअल? की अध्यात्मिक?

घटस्फोटावर अधिकार असणाऱ्या एलिझाबेथ टेलर हिला सुध्दा ही कल्पना सुचली नव्हती. तिने एका नवऱ्याशी दोनदा लग्न केलं पण असा घटस्फोट घेतला नाही. दुखाश्रू असतात तसे आनंदाश्रू असतात हे माहीत होत.

माणूस दुःखात बेशुध्द पडतो तसा आनंदात पडतो हे पण ऐकलं होत. पण आनंदाच्या ताटावर बसून एकमेकाला घास भरवत असताना घटस्फोट देतात हे अमीर – किरणने शिकवलं.

आता बायकोला आनंदात ठेवावं की नाही हा यक्ष प्रश्न माझ्यापुढे उभा ठाकला आहे. बायकोच्या वाढदिवसानिमित्त सोन्याचा दागिना घ्यायचा विचार करत होतो पण मी तूर्तास बेत पुढे ढकललाय.दिलं है के मानता नही!

===

संझगिरी यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी काही चांगल्या तर काही निगेटिव्ह कॉमेंट्स केल्या त्या आपण पाहुयात, खालील फोटोत काहींनी संझगिरी यांच्या या पोस्टवर मत व्यक्त करत त्यांचं हे मत कसं चुकीचं आहे हे मांडलं तर काहींनी त्यांना क्रिकेटवरच लिहावं असा मार्मिक टोलादेखील लगावला.

 

comment 1 inmarathi

 

या पोस्टवर एकानेटकऱ्याने फार खोचक शैलीत संझगिरी यांच्यावर आणि त्यांच्या या मतावर टीका केली पण संझगिरी यांनीसुद्धा त्यांना त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलेच!

 

comment 2 inmarathi

 

वरील कॉमेंटवर संझगिरी यांचं हे उत्तर…

 

comment 3 inmarathi

 

लोकांना ह्या पोस्टमधलं वक्तव्य खटकलं आहे ते त्यांच्या कॉमेंटमधून स्पष्ट होत आहेच.

 

comment 4 inmarathi

 

एकीकडे लोकं या पोस्टवर उलट कॉमेंट करत होते तर काहींनी या बाबतीत संझगिरी यांच्या या वक्तव्याला समर्थन दिलं असून त्यांनाही त्यांचे हे मत पटलेले आपल्याला काही कॉमेंटमधून दिसून येते.

 

comment 5 inmarathi

 

संझगिरी यांनी क्रिकेट सोडून या विषयाला हात घातल्याने त्यांच्या फॅन्सनी याबद्दल चांगलीच नाराजी व्यक्त केली असून या कॉमेंटमधून आमीर खानवरही प्रचंड टीका होताना आपल्याला दिसेल!

 

comment 6 inmarathi

 

टीका करणाऱ्यांनी सुद्धा ती नेटकी केलेली नसावी का, असा प्रश्न या खालच्या कॉमेंटमधून आणि त्यावरील संझगिरी यांच्या उत्तरावरून पडतोय.

 

comment 7 inmarathi

 

या पोस्टवर लोकांनी एकंदरच बॉलिवूडवरचा राग लोकांनी काढला असून संझगिरी यांच्या वक्तव्यावर लोकं व्यक्त झाले आहेत.

 

comment 8 inmarathi

 

गॉसिपसारख्या विषयावर द्वारकानाथ यांनी अजिबात लिहू नये, असं मतंही त्यांच्या चाहत्याने मांडलंय.

 

comment 9 inmarathi

 

संझगिरी यांची ही मतं कितीही वैयक्तिक असली तरी फेसबुकवर ती केल्याने त्यांच्या चाहत्यावर्गातील बऱ्याच लोकांनी याबाबतीत नाराजी दर्शवल्याचं आपल्याला या कॉमेंटमधून दिसून येत आहे!

===

हे ही वाचा वडिलांचा विरोध पत्करून चोरून चित्रपट पाहणारा मुलगा ते बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट….!

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?