' स्पर्धा परीक्षा आणि त्या टेन्शनपायी विद्यार्थ्यांचं टोकाचं पाऊल, वाचा दाहक वास्तव – InMarathi

स्पर्धा परीक्षा आणि त्या टेन्शनपायी विद्यार्थ्यांचं टोकाचं पाऊल, वाचा दाहक वास्तव

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – सौरभ गणपत्ये

===

सर्वप्रथम स्पष्ट करतो की स्पर्धा परीक्षा देणाऱ्या मुलांना परावृत्त करण्याचा कोणताही हेतू यात नाही. पण काही बाबतीत गरज आहे सावध करण्याची!

एका मुलाने एमपीएससीला मायाजाल असं संबोधत आत्महत्या केल्याचं समजलं. बहुतेकांनी त्याच्या नावाने उमाळे काढले तर अनेकांनी सरकारच्या नावाने खडे फोडले.

 

suicide inmarathi

 

एक बाब स्पष्ट करायची म्हटली तर हे खरं आहे की एमपीएससी अनेकदा महाराष्ट्र सरकारची बटीक असल्यासारखी वावरली आहे. जे काठिण्य, जो ताठा आणि मुळात असलेलं स्वातंत्र्य केंद्रीय लोकसेवा आयोगाला आहे ते राज्य लोकसेवा आयोगाला नाही. साक्षात नरेंद्र मोदी किंवा इंदिरा गांधींसारख्या अजस्त्र पंतप्रधानांनीही यांच्यात कधी ढवळाढवळ केलेली आढळून आलेली नाही.

 

upsc inmarathi

 

माझ्या किमान गेल्या वीस वर्षांच्या निरीक्षणात केंद्रीय लोकसेवा आयोगाने फक्त दोन शिफारसी राजकारण्यांकडून स्वीकारल्या. एक, राहुल गांधींनी नव्या सिलॅबसबरोबर वय वाढवायची विनंती केली आणि नितीश कुमारांनी प्रिलिम्समध्ये इंग्रजीचा प्रभाव कमी व्हावा अशी विनंती केली. (तो तसा झाला तरी रिकामटेकडा कन्हैय्याकुमार म्हणतो इंग्रजी उत्तम असलेलेच आयोगाला हवे असतात) कारण त्यावर देशभर चर्चेचं वादळ झालं आणि म्हणूनच जर स्पर्धा परिक्षावाल्या मुलांनी जर जीवाचं रान करून यूपीएससी देण्याचं ठरवलं तर त्याला नैतिक पाठींबा तरी द्यावा पण खरी मेख पुढे आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास कठीण असतो कारण तो मोठा असतो. जेंव्हा आठ ते दहा लाख मुलं फॉर्म भारतात तेंव्हा त्यातून १५०० वगैरे निवडून येत असतात. हे १५०० हिरो होतात. बाकीचे अपयशाची कारणं शोधत राहतात.

बरं, या उत्तरपत्रिका कश्याकश्या तपासल्या गेल्या हे कळत नाही. माहितीच्या अधिकारात त्या येत नाहीत असं आयोगाने अनेकदा स्पष्ट केलं असल्याने अपयशाची कारणं समजत नाहीत.

 

tension inmarathi

हे ही वाचा – इतिहासात असं एक गाणं होऊन गेल जे ऐकून, लोक चक्क आत्महत्या करायचे!

त्यामानाने राज्य लोकसेवा आयोग किमान पारदर्शी वाटतो कारण ९० टक्के परीक्षा ही वस्तुनिष्ठ प्रश्नांमार्फत होत असते आणि त्याची उत्तरतालिकाही मिळत असते पण या आयोगाच्या वर सांगितलेल्या त्रुटी आहेतच. वर आयोगाकडून निवडल्या जाणाऱ्या मुलांची संख्याही तीन आकडे पार करत नसते, मुलं मात्र लाखो बसतात.

प्रश्न आहे तो या चक्रात अभिमन्यूसारखं अडकून हा अभ्यास म्हणजे आयुष्यातल्या दोन दोन पंचवार्षिक योजना करून घेतलेल्या विद्यार्थ्यांचा! हातात भोपळाच राहत असतो. प्रचंड अभ्यास केलेला असतो, तो डोक्यात असतो पण त्यामुळे तुलनेने कमी माहिती असणाऱ्या लोकांशी जमत नाही. सहज पटकन कोणाशी मैत्री झाली तर ती टिकतही नाही. प्रत्येक गोष्टीचा विश्लेषणात्मक विचार करण्याची इतकी सवय झालेली असते की थोडं ‘डोकं बाजूला ठेवून’ अनेक गोष्टी करताही येत नाहीत. आणि ही हुशारी जमवताना वय मात्र निघून गेलेलं असतं.

एमपीएससी आणि एकूणच स्पर्धा परीक्षांची मुलं हा विनोदाचा विषय झालेली आहेत ही वस्तुस्थिती आहे आणि याला जबाबदार केवळ ते नाहीत तर इतरही घटक आहेत.
या परीक्षेत निवडून यायला समुद्रभर कर्तृत्व आणि आभाळभर नशीब लागतं हेच खरं. ते ज्यांच्या ठायी असतं ते लोक उठसूट स्पर्धा परीक्षांसाठी मुलांना प्रवृत्त करत असतात.

अनेक यशस्वी अधिकारी तर अक्षरशः बोलण्यात काव्याची पखरण करत असतात. आपला करिष्मा ते एवढा दाखवतात की अक्षरशः मुलांना त्याची भुरळ पडून मुलं त्यात स्वतःला बघायला लागतात आणि इकडेच घात होतो.

बरं, महाराष्ट्रातल्या मुलांची अवस्था बऱ्याचदा, ‘खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी’ अशी! उत्तरेकडच्या राज्यात दागिने जमीन गहाण टाकायची, पैसे उभे करायचे आणि एखादा महागडा क्लास लावायचा हे चालतं. ही मुलं वर्षाला १५ ते २० परीक्षाही देऊ शकतात. कशात तरी निवडली जातात आणि अधिकारी बनून मार्गाला लागतात. महाराष्ट्रात तेही घडत नाही.

 

upsc exam inmarathi

 

सर्वात वाईट अवस्था तर अक्षरशः बीए आणि बीकॉमच्या मुलांची होते. यांच्यासाठी तर मार्केटात जॉब्सही नसतात. कोणत्याही नोकरीच्या जाहिरातीत ‘बी ए पॉलिटिकल सायन्स किंवा हिस्ट्री अथवा समाजशास्त्र असणारा उमेदवार हवा’ अशी अट मी तरी पाहिलेली नाही. त्यामुळे यांच्यासाठी असे जॉब्स बनत नाहीत.

एमपीएससी यूपीएससीचा अभ्यासक्रम हा या विषयांचा व्यापक अवतार असतो हेच खरं. ज्ञान आणि नुसतं ज्ञान त्यापलीकडे कोणतंही विशिष्ट कसब (स्किल) तुम्हाला यात मिळत नाही. बरं तुम्ही मुख्य परीक्षा दिली किंवा इंटरव्ह्यू दिला (आजकाल इंटरव्युवालेतरी इतर आस्थापनानांमध्ये बोलावले जातात) तर त्याचं कसलंही प्रमाणपत्र नसतं.

वस्तुस्थिती ही आहे की स्पर्धा परीक्षांच्या मागे पाच सात वर्षे घालून तुमची नोकरीतल्या बाजारातली लायकी ही सहकारी बँकेच्या क्लार्कएवढीही नसते. हे क्रूर सत्य आहे. कारण याक्षणी कागदोपत्री तुमच्याकडे फक्त आणि फक्त ग्रॅज्युएशनची डिग्री आहे तीही राज्यशात्र, इतिहास आणि समाजशास्त्रांत किंवा वाणिज्य. वर यात लाखो रुपयांचा चुराडा झाला आहे हे वेगळंच. लग्नाचं वय उलटून गेलेलं असतं, आणि वर लग्नाच्या एखाद्या वेबसाईटवर माहिती द्यावी तर त्याप्रमाणे पात्रताही आपण गोळा केलेली नसते. शेवटी हे ठरतं मृगजळच. अख्ख तारुण्य गिळून टाकणारं!

झपाटलेपणे एखाद्या गोष्टीच्या मागे लागणं चांगलंच पण त्यातून मिळणारं किमान यश बघावंच लागेल. मग या परीक्षेसाठी प्रयत्नच नाही का करायचा?
हा संपूर्ण आटापिटा जेमतेम ग्रॅज्युएशन करून वेड्यासारखं यूपीएससी एमपीएससीच्या मागे धावणाऱ्यांसाठी होता. मनापासून यात नशीब अजमावायचं असेल तर ते करा. पण ते करताना नोकरी लाभेल एवढं शिक्षण जरूर ठेवा. ते नसेल तर किमान अश्या पद्धतीने स्वतःला घडवा की तुम्हाला कामावर चांगल्या ठिकाणी ठेवून घेतलं जाईल.

शक्यतो पुढचं करियर असं निवडा की ज्यात या अभ्यासाचा फायदा होईल. जर राज्यशास्त्र, इतिहास आणि समाजशास्त्रात ग्रॅज्युएशन असेल तर त्यात एमए करा आणि नेटसेट परीक्षा देण्याचा प्रयत्न करा.

 

Job Interview inmarathi

 

माझा एक संस्कृत मधला गोल्ड मेडलिस्ट मित्र तीनदा अपयशी ठरला आणि त्याने अखेर आयआयटीतून पीएचडी मिळवली. पण जे मित्र आधीच वकील होते, डॉक्टर किंवा आर्किटेक्ट होते त्यांना सहज जॉब्सही मिळून गेले. थोडे ज्युनियर मिळाले खरे पण त्यांनी नंतर चमक दाखवली.

मी स्वतः यूपीएससीच्या अभ्यासातून बाहेर पडलो आणि मला मोजून सोळाव्या दिवशी आकाशवाणीवर वार्ताहराचं काम मिळालं होतं. मी आधीच पत्रकारितेची पदविका घेतलेली होती. म्हणजे पुढे काय करायचं याचा अंधार फक्त दहा दिवस राहिला एवढंच. तेवढीच विश्रांती. आज थोडंफार जे काही माझं टीव्हीवर दर्शन दिसतं त्यामागे माझा तो अभ्यासच कारणीभूत आहे हे नम्रपणे नमूद करतो. पण हेही तितकंच खरं की मी योग्य वेळी त्यातून बाहेर पडलो आणि पुढची वाटचाल स्वतंत्र होती.

आमच्या गोष्टी फार प्रेरणादायी नाहीत हे मान्य कारण अशोकस्तंभ आणि चांदण्या आमच्या अंगावर नाहीत, सरकारी गाडीही नाही. पण हे ज्यांना लाभत नाही अश्या अनेकांपेक्षा आमची अवस्था फारच परवडली.

स्पर्धा परिक्षावाली मुलं अप्रतिम पत्रकार होऊ शकतात शिक्षक होऊ शकतात, वकील होऊ शकतात कारण अभ्यासूंची तिकडे गरज असते. पण त्यासाठी स्वतःचा विचार तश्या पद्धतीने करायला हवा. एखाद्या करियरसाठी आपण नसतो तर एखादं करियर आपल्यासाठी असतं हेच सत्य आहे.

सगळं आपल्या हातात असेल तर वाट्याला आलेल्या संघर्षाला आपणच जबाबदार असतो. लाथ मारेन तिकडून पाणी काढेन हा बाणा चांगलाच पण त्यापायी पाय मोडून घेण्याची गरज नाही. कॉलेजात टॉपर असलेली मुलं अशी कोशात गेलेली बघवत नाहीत म्हणून ही कळकळ.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?