' गंदी बात आणि तत्सम प्रक्षोभक सिरिजला 'समांतर' जाणारा फसलेला खेळ!

गंदी बात आणि तत्सम प्रक्षोभक सिरिजला ‘समांतर’ जाणारा फसलेला खेळ!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक : अखिलेश विवेक नेरलेकर

===

भारतीय वेबसिरिजचे बहुतेककरून दुसरे सीझन हे गंडलेलेच असतात. सेक्रेड गेम्स असो मिर्झापुर असो किंवा आणखीन कोणतीही सिरिज असो, भारतीय वेबसिरिज असो किंवा सिनेमा असो त्यांचे दुसरे भाग म्हणजेच सीक्वल हे नेहमीच गंडतात.

काही अपवाद आहेत पण ते अगदी हातावर मोजण्याइतकेच, त्यामुळे भारतीय सिरिजच्या दुसऱ्या भागाकडून अपेक्षा ठेवणं हे बऱ्याच प्रेक्षकांनी कधीच सोडून दिलं आहे.

कालच एमएक्स प्लेयर या ओटीटीवर रिलीज झालेल्या समांतर २ कडून लोकांच्या बऱ्याच अपेक्षा होत्या कारण पहिल्या सीझनमध्ये सतीश राजवाडे या दिग्दर्शकाने ही कलाकृति एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली होती.

 

samantar inmarathi

 

पण दूसरा सीझन बघता भारतीय आणि खासकरून मराठी प्रेक्षकांनी या सीझनकडून दुसरी कोणतीही अपेक्षा ठेवू नये असेच वाटते. कारण अगदी खरं सांगायचं झालं तर सतीश राजवाडेसारखा टच समीर विद्वंस यांना देता येणं निव्वळ अशक्यच आहे.

हे ही वाचा ‘हिंदूद्वेष्ट्या’ ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरील हे ‘तांडव’ वेळीच थांबायला हवं नाहीतर…

मुळातच समांतर ही सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारीत सिरिज, त्यामुळे मूळ कथानक आणि सिरिजचं कथानक याच्याशी तुलना होणं साहजिक होतंच. पण तरी समांतर २ ही कोणत्याही दृष्टीने प्रेक्षकांच्या पसंतीस उतरणार नाही असं मला वाटतं.

याधीही सुहास शिरवळकर यांच्या दुनियादारी पुस्तकावर आधारीत जेव्हा सिनेमा आला तेव्हाही काही प्रमाणात अशी तुलना झाली होती, पण त्यावेळचा प्रेक्षक आणि २०२१ मधला प्रेक्षक यांच्यात बरीच तफावत तुम्हाला आढळून येईल.

आजचा प्रेक्षक गेम ऑफ थ्रोन्स, मनी हाइस्ट, नारकोज अशा आंतरराष्ट्रीय सिरिज चवीने जरी बघत असला तरी त्यातल्या कथानकाशी, आणि त्याला अनुसरून येणाऱ्या बोल्ड सीन्सशी ते परिचित आहेत.

 

web series inmarathi

 

त्यामुळे वेबसिरिज म्हणजे स्वैराचार किंवा फक्त बोल्ड सीन्स असला समज जो आपल्या भारतातल्या काही कलाकारांनी करून घेतला आहे त्याची प्रचिती पुन्हा समांतर २ मध्ये येतेच.

समांतरच्या पहिल्या सीझनमधल्या त्या किसिंग सीनमुळेसुद्धा प्रचंड चर्चा झाली होती, पण त्या सीझनच्या कथेला अनुसरून का होईना तो सीन आपल्यासमोर आला होता.

समांतर २ मध्ये कथा, पटकथा आणि दिग्दर्शन याचा अभाव तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल आणि त्याऐवजी घुसडलेल्या निरर्थक बोल्ड सीन्स बघून तुम्हाला अल्ट बालाजीच्या गंदी बात मधल्या कथाही बऱ्याच वरचढ वाटतील.

मुद्दा बोल्ड सीन्स हवे का नकोत याचा नसून, ते का हवेत? त्यामागे लोकांना पटणारं कारण हवं तरच त्याचं महत्व आपल्याला पटतं, पण समांतर २ मध्ये आलेले भडक बोल्ड सीन्स बघताना uncomfortable होणं सोडाच त्या कथानकाशीदेखील आपण जोडले जात नाहीत.

 

samantar 2 inmarathi

 

यातलेच काही कलाकार तोंड वर करून बोलत होते की “आपला प्रेक्षक हिंदी वेबसिरिज आणि इंग्रजी वेबसिरिजमधला बोल्ड कंटेंट चवीने बघू शकतो मग मराठीमध्ये तेच केलं तर काय प्रॉब्लेम?”

या ‘भाबड्या’ कलाकारांना मी एकच उत्तर देऊ इच्छितो की त्या हिंदीतही आजकाल असला चिप कंटेंट खूप येतोय ज्याची आवश्यकता नसते हे खरं आहेच पण इंग्रजी किंवा इतर आंतरराष्ट्रीय कंटेंटची जी नावं ही लोकं आपल्या तोंडावर मारतात त्या कलाकृती यांनी तरी कितपत बघितल्या आहेत याची शंकाच मला येते.

गेम ऑफ थ्रोन्स म्हणा किंवा तत्सम कोणतीही परदेशी सिरिज म्हणा त्यातले बोल्ड सीन्स, भडक दृश्यं, शिवराळ भाषा म्हणा ही त्यातल्या सीन्सना अनुसरून असते, आणि तसंही ओटीटी म्हंटल्यावर हे सगळं आपसूकच येणार हे न समजायला लोकं तितकी दूधखुळी नक्कीच नाहीत.

“लोकं हिंदीत बघतात मग मराठीत का नाही?” केवळ अशाच गोष्टींच्या नावाखाली स्वतःचा कंटेंट खपवणं हे निदान मलातरी पटणारं नाही.

 

samantar bold scene

 

समांतरच्या पहिल्या सीझनची मांडणी, त्यातला उत्सुकता ताणून ठेवणार शेवट, भविष्य आणि भूतकाळ यांच्यातला फेरा आणि या सगळ्या मायाजाळात अडकत गेलेले सुदर्शन चक्रपाणी आणि कुमार महाजन, या सगळ्यामागे नेमकं काय गूढ लपलंय हे सतीश राजवाडेने फार कमी वेळात प्रभावीपणे मांडलं होतं.

त्यामुळेच खरंतर लोकं दुसऱ्या सीझनची आतुरतेने वाट बघत होते. पण ती गुजरातीमध्ये एक म्हण आहे ना की “जेनु काम तेनु थाय” तसंच समांतर २ बाबतीत घडतं. जे सतीश राजवाडे यांना जमलं होतं तसं समीर विद्वंस यांना अजिबात जमलेलं नाही.

समांतर २ मधले शेवटचे ३ एपिसोड सोडता आधीच्या सगळ्याच एपिसोडमध्ये विस्कटलेल्या पटकथेमुळे काहीच प्रभाव पडत नाही, नको त्या ठिकाणी बोल्ड सीन्स आणि शिवीगाळ यामुळे तर आधीच आपला इंट्रेस्ट कमी होतोच पण एकंदर कथेच्या बाबतीतही कुठेही तुमची उत्सुकता शिगेला पोहोचत नाही.

पहिल्या सीझनच्या शेवटी जो थरारक अनुभव आपल्याला बघायला मिळाला होता, त्याच्या एक टक्काही थरार तुम्हाला दुसऱ्या सीझनच्या कोणत्याही एपिसोडमध्ये बघायला मिळत नाही.

चक्रपाणीचा भूतकाळ आणि कुमार महाजनचा भविष्यकाळ यांच्यातलं रहस्य शेवटच्या ३ एपिसोडमध्येच उलगडतं पण त्याचाही खास प्रभाव आपल्यावर पडत नाही, कारण तोवर आपण शेवट काय असेल याचा अंदाज लावतो आणि तो खराही ठरतो.

हे ही वाचा निकृष्ट दर्जाचं लिखाण, बॉलिवूडचा एकसुरी अजेंडा – म्हणून “लक्ष्मी” बॉम्ब गेला फुसका

swapnil joshi inmarathi

 

खरंतर सस्पेन्स असल्याने इथे सविस्तर मांडणं कठीण आहे पण एका सईची गरज नसतानाही २ सई ताम्हणकर दाखवण्याचा समीर विद्वंस यांचा अट्टहास काही आपल्याला तरी झेपला नाही बुवा!

सुहास शिरवळकर यांची कादंबरी किंवा त्यांचं लिखाण हे कोणत्याही वर्गातल्या किंवा पिढीतल्या लोकांना किती तंतोतंत लागू होतं हे आपण जाणतोच, किमान त्या लिखाणाचा मान ठेवून तरी या दुसऱ्या सीझनला आणखीन रंजक बनवता आलं असतं, पण केवळ सई ताम्हणकरला घेऊन हिंदीला टक्कर देण्याच्या नादात त्या ओरिजिनल कलाकृतीचा बट्टयाबोळ झाल्याची भावना आपल्या मनात येते.

सिरिजमध्ये कामं सगळ्यांची चांगलीच झाली आहे. तेजस्विनी पंडित हिने निमाची भूमिका चांगली वठवली आहे, सई ताम्हणकरशिवाय स्वप्नील जोशीचा एकही सिनेमा पूर्ण होत नसला तरी त्यांना यात आपण सहन करू शकतो, नितीश भारद्वाजसारख्या सीनियर अॅक्टरला पुन्हा अशा रोलमध्ये बघताना वेगळाच आनंद होतो.

 

star cast inmarathi

 

पण यापलीकडे या दुसऱ्या सीझनमध्ये मलातरी काहीच बघण्यालायक वाटलं. टेक्निकल गोष्टींमध्येसुद्धा हा सीझन बराच बेगडी वाटतो, बालिश कोर्टरूम सीन, अनावश्यक इमोशनल सीन्स खरंच आपला अंत बघतात.

खरंतर एक मराठी सिरिज म्हणून समांतर २ कडून बऱ्याच अपेक्षा होत्या पण उत्तम कथा, पटकथा आणि ‘दिग्दर्शन’ यांच्या ‘अभावामुळे’ हा दुसरा सीझन (अ)समांतर झालाय हे मात्र खरं!

===

हे ही वाचा कुवत नसतानाही(?) परीक्षकाची खुर्ची: रीऍलिटी शोजच्या थिल्लरपणावरील खरमरीत उत्तर

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?