' केवळ ऐश्वर्याच्या प्रेमाखातर सलमान या सिनेमाचा क्लायमॅक्स बदलणार होता पण….! – InMarathi

केवळ ऐश्वर्याच्या प्रेमाखातर सलमान या सिनेमाचा क्लायमॅक्स बदलणार होता पण….!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“प्रेम आंधळं असतं” असं आपण नेहमीच म्हणतो. प्रेमात पडलेल्या व्यक्तीला प्रत्येक गोष्टीचा संबंध आपल्या प्रिय व्यक्ती सोबत जोडायची सवय लागलेली असते. प्रेम व्यक्त करण्याची आणि त्याबद्दल अपेक्षा ठेवण्याची पद्धत ही सामान्य माणूस असो किंवा सेलिब्रिटी दोघांचीही सारखीच असते.

सध्याच्या फास्ट आणि स्मार्ट जगात तर सेलिब्रिटींच्या प्रेमकथांवर फारशी चर्चा होतांना दिसत नाही. पण, ९० चं दशक होतं की जेव्हा तरुणाई ही टीव्ही, फिल्मफेअरसारख्या मासिकातून नेहमी सेलिब्रिटींच्या व्यक्तिगत आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी नेहमीच उत्सुक असायची.

‘सलमान खान – ऐश्वर्या राय’ ही ९० च्या दशकातील सर्वात लोकप्रिय, चर्चा झालेली जोडी होती. ज्यांनी खरं तर ‘हम दिल दे चुके सनम’ या एकाच सिनेमात एकत्र काम केलं. पण, तरीही त्यांच्या प्रेमकथेची चर्चा कित्येक वर्ष सुरू होती.

 

salman aishwarya inmarathu

 

इतकंच नाही तर, आजही कोणत्या पुरस्कार सोहळ्यात सलमान, ऐश्वर्या एकत्र असतील तर त्यांच्या सादरीकरणाच्या वेळी कॅमेरामन हे एकमेकांच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपायला विसरत नाहीत.

हे ही वाचा प्रेमळ स्वप्नं दाखवणाऱ्या पडद्यावरील या १० रोमँटिक जोड्यांची खऱ्या जीवनातील कहाणी अधुरीच राहिली

सलमान खान त्या काळात ऐश्वर्या रायच्या प्रेमात इतका बुडाला होता की त्याला तिने इतर कोणासोबत सिनेमात काम करणंसुद्धा चालत नव्हतं. ऐश्वर्या रायच्या घरासमोर सलमानने दारू पिऊन गोंधळ घातला आणि या प्रेमकथेचा शेवट झाला.

हा शेवट तर नियतीने लिहून ठेवला होता जो की कोणालाही बदलणं शक्य नव्हतं. पण, ‘हम दिल दे चुके सनम’ या सिनेमाचा शेवट बदलावा यासाठी सलमान खानने खूप प्रयत्न केले होते हे कदाचित आपल्याला माहीत नसेल.

काय होतं सलमानच्या मनात ? ते घडवून आणण्यासाठी त्याने किती प्रयत्न केले ? तसं न घडल्याने त्याच्या मनात दिगदर्शक संजय लीला भन्साली बद्दल किती राग आहे? जाणून घेऊयात.

‘तडप तडप के इस दिल से आह निकलती रही…’ हे फक्त ‘हम दिल दे चुके सनम’ मधील एक गाणं नसून त्या सलमान खानच्या मनातील त्या काळातील आर्त भावना आहेत. ‘हम दिल दे चुके सनम’ हा केवळ एक सिनेमा नसून तो या प्रेमकथेचा प्रवास आहे.

 

tadap tadap inmarathi

 

इटलीहून संगीत शिकायला भारतात आलेला ‘समीर’ त्याच्या शिक्षकाच्या मुलीच्या ‘नंदिनी’ च्या प्रेमात पडतो. त्यांची प्रेमकथा ही हळूहळू सुरेल गाण्यांनी पुढे सरकत जाते.

प्रेक्षकसुद्धा या कथेमध्ये गुंतत जातात आणि कुठे तरी प्रेक्षकांनासुद्धा सिनेमा बघतांना वाटतं की, “ही जोडी खरंच खूप सुंदर आहे. यांच्यातील प्रेम निर्मळ आहे. सिनेमाच्या शेवटी या जोडीनेच एकत्र असावं.” पण, त्याचवेळी सिनेमात ‘वनराज’ च्या रूपाने अजय देवगणची एन्ट्री होते.

“चिंगारी कोई भडके” हे गाणं म्हणण्याची टेस्ट देतांना सुरांना कच्चा असूनही, मुलगा चांगला असल्याने नंदिनी आणि वनराज यांचं लग्न ठरतं.

वनराज हा अबोल, गंभीर असा एक सामान्य माणूस असतो. त्याच्यातील वेगळेपण आणि सर्वात चांगली गोष्ट म्हणजे त्याला खोटं बोललेलं अजिबात आवडत नसतं. नंदिनी वनराजला लग्न ठरतांना समीर बद्दल काहीच सांगत नाही.

लग्न झाल्यानंतर नंदिनी ही आपलं प्रेम समीरवर असल्याचं वनराजला सांगते. वनराजला नंदिनीचं हे सत्य लपवणं अजिबात आवडत नाही.

 

vanraj inmarathi

 

तो इटलीला जाऊन नंदिनी आणि समीरला भेटवायचं ठरवतो. भारत ते इटली या प्रवासात, समीरला शोधण्याच्या वेळात वनराज ने दाखवलेला सच्चेपणा हा नंदिनीला खूप आवडतो.

सोशल मीडिया नसलेल्या त्या काळात वनराजला समीर पर्यंत पोहोचण्यासाठी बराच वेळ लागतो. नंदिनीचा एक अपघात होतांना वनराज तिला वाचवतो. इटलीमधील चोर वनराज आणि नंदिनीचा पाठलाग करतात. चोरांनी मारलेली एक गोळी नंदिनीला लागते. वनराज नंदिनीची त्या दरम्यान खूप काळजी घेतो.

समीरचा गाण्याचा कार्यक्रम असल्याचं वनराजला कळतं. ते दोघेही तिथे पोहोचतात. दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी ही समीरकडे जाणार असते.

आदल्या रात्री उशिरापर्यंत वनराज आणि नंदिनी इटली मधील एका पुलावर फिरत असतात. अजय देवगण तिथे आपल्या करिअर मधील सर्वात बेस्ट सीन देतो आणि नंदिनीला म्हणतो की, “मिलने आउंगा मै तुमसे…” खूपदा म्हणतो.

ऐश्वर्या राय ही शेवटी सलमान खानची निवड न करता अजय देवगणची निवड करणार. घडतं ही तसंच. भारतीय प्रेक्षकांची नस ओळखणारा दिगदर्शक संजय लीला भन्साली कुठेही चूक करत नाही.

 

sanjay leela bhansali inmarathi

 

हा शेवट मान्य नव्हता तो केवळ लोकांच्या लाडक्या सलमान खानला. ऐश्वर्या रायच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या सलमानला नंदिनीने शेवटी समीरची निवड करावी अशी इच्छा होती.

सलमान खानची ही केवळ इच्छा नव्हती तर त्याने या कथेचा असा शेवट व्हावा यासाठी खूप प्रयत्न सुद्धा केले होते. संजय लीला भन्साळीला समजवण्याचे आपले प्रयत्न संपल्यावर सलमानने आपला मित्र, दिगदर्शक सूरज बडजात्याला दिगदर्शकाची भेट घ्यायला लावली.

एक ते दीड तास या दोन गुणी दिगदर्शकांमध्ये चर्चा झाली. संजय यांनी सूरज यांचं म्हणणं ऐकून घेतलं. पण, प्रत्येक सिनेमा हा त्या दिगदर्शकाचं एक स्वप्न असतं.

दिगदर्शकाने आधी बघितलेलं स्वप्न आपण नंतर पडद्यावर बघत असतो. त्यामध्ये बदल करण्याचा कोणी प्रयत्न करायला नाही पाहिजे, कोणाला तो अधिकार ही नसतो. सिनेमाच्या कथेशी प्रामाणिक राहून संजय लीला भन्साळी यांनी नंदिनीला शेवटी वनराजकडेच जाण्यास सांगितलं.

हे ही वाचा सलमानचा मनस्ताप, करिष्मा-रविनाची खुन्नस; पडद्यामागील “खरा” अंदाज अपना अपना!

bhansali inmarathi

 

सलमान खान ‘हम दिल दे चुके सनम’ च्या झालेल्या या शेवटामुळे प्रचंड नाराज झाला होता. त्याने तो ऑपेरा हाऊस मधील शेवटचा सीन मध्ये काम केलं. पण, त्याचं मन ऐश्वर्याला कोणासाठीही सोडण्यास तयार होत नव्हतं.

सिनेमातील नंदिनीमध्ये त्याला प्रत्यक्षातील ऐश्वर्या दिसत होती आणि ती त्याच्याकडे न आल्याने सलमान इतका नाराज झाला होता की, त्याने कित्येक वर्ष संजय लीला भन्साळी सोबत बोलणं बंद केलं होतं.

कित्येक वर्ष दोघांनी एकत्र काम देखील केलं नव्हतं. ‘सावरिया’ मध्ये केवळ एक छोटा रोल सलमानने केला होता, त्यानंतर नाहीच.

 

saawariya inmarathi

 

संजय लीला भन्साळी यांनी याबद्दल कुठेही वाच्यता केली नाही. पण, सलमान खानने मात्र बऱ्याच मुलाखतींमध्ये या गोष्टीला दुजोरा दिला आहे की, “ज्याच्यावर पहिलं प्रेम केलं त्यालाच ते मिळावं, कर्तव्यापेक्षा प्रेम श्रेष्ठ या लॉजिकने नंदिनी ने समीरची निवड करणं गरजेचं होतं” असं माझं मत आहे.

सलमानचं हे मत व्यवसायिकपेक्षा व्यक्तिगत जास्त वाटल्याने सुद्धा संजय लीला भन्साळी यांनी त्याकडे दुर्लक्षित केलं असावं. सिनेमा लोकांना आवडला, सुपरहिट झाला यातच दिगदर्शकाने आपलं म्हणणं लोकांना पटवून दिलं असं म्हणता येईल.

आजच्या काळात कदाचित लोकांनी या सिनेमाचा वेगळा शेवट मान्य देखील केला असता. पण, तेव्हा दिगदर्शकाने ठरवलेला शेवटच योग्य होता असं आपण या सिनेमाचे चाहते म्हणून आपलं मत सांगू शकतो.

तुमचं काही वेगळं मत असेल तर नक्की कमेंट करा.

===

हे ही वाचा संजय लीला भन्साळीला देवदासची प्रेरणा चक्क वडिलांमुळे मिळाली होती

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?