' नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचचं नाव हवं! – InMarathi

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचचं नाव हवं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न’ ही म्हण सरकारी प्रकल्पांवरूनच सुचली असावी, अशी शंका येण्यामागे अनेक कारणं आहेत.

सरकारने एखादा प्रकल्प हाती घेतला गाजावाजा करत घोषणा केली, कोटींच्या आकड्यांचा निधी मिळवला आणि अखेर प्रकल्प ठप्प झाला याची इतिहासात असंख्य उदाहरणं सापडतील. या सगळ्यात माशी नेमकी शिंकली कुठे? हा प्रश्न शेवटपर्यंत अनुत्तरीत राहतो.

नेमकं असंच काहीसं घडलंय नवी मुंबई विमानतळाबाबत! महाराष्ट्रातलं सर्वात मोठ विमानतळ असलेल्या मुंबईच्या टर्मिनल २ वर येणारा ताण तसंच प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता मुंबईत आणखी एका विमानतळाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून जोर धरत होती. अखेरिस प्रवाशांची प्रतिक्षा संपली आणि नवी मुंबई विमानतळाचा प्रस्ताव मंजूर झाला.

 

navi mumbai inmarathi

 

पुढील काही वर्षात घरानजिक असलेल्या विमानतळाच्या प्रवासाला सुरु होण्याआधी ब्रेक लागलाय. पोटात भुक खवळलीय, समोर सुग्रास अन्नाचं ताट आहे मात्र खायला दात नाहीत असा एकंदरित प्रकार घडत असून प्रकल्प पुर्ण होऊनही विमानतळाच्या नामकरणावरून पेटलेल्या वादाने आता उग्र रूप धारण केलं आहे.

काय आहे वाद?

लोकनेते दि बा पाटील, शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोघांच्या नावांवरून हा वाद सुरु झाला. पनवेल, उरण येथिल भुमिपुत्रांनी दि बा पाटीलांच्या नावाचा आग्रह धरला. केवळ दि बा पाटीलांमुळेच शासनाला विमानतळाची ही जमीन मिळाल्याने त्यांच्याच नावाचा धोषा सुरु झाला. मात्र शिवसेनेला हा प्रस्ताव मंजूर नसल्याने त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावाचा जयघोष केला गेला.

 

di ba patil balasaheb inmarathi

 

या दोन गटांमध्ये हमरीतुमरी सुरु असतानाच मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी या वादात उडी घेतली. या दोन्ही नावांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज यांचंच नाव विमानतळाला देण्यात येणार असं म्हणत वादाला नवं वळण दिलं.

 

raj thackrey inmarathi featured

 

सुरवातीला चर्चा, त्यानंतर प्रत्येक गटातील वाद, राज्यशासनावर असलेला दबाव या सगळ्याचा परिपाक म्हणजे दि बा पाटीलांचा नारा देत आज रस्त्यावर उतरलेले हजारो कार्यकर्ते, नागरिक.

कालपासूनच नवी मुंबई परिसराला छावणीचं स्वरुप आलं असताना आज सकाळपासून सिडको भवनाला वेढा दिलेल्या भुमिपुत्रांनी आपला हट्ट कायम ठेवल्याने आता हा वाद आणखी किती चिघळणार हा प्रश्न आहे.

दि बा पाटीलांचंच नाव हवं

लोकनेते दि बा पाटील यांच्या नावाचा आग्रह धरताना किंबहूना त्यांच्या नावाचं ससमर्थन करताना छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदू ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा अनादर करणं किंवा त्यांचे थोरपण नाकारणं असा कोणताही उद्देश नाही. मराठी माणसांच्या मनात या दोघांचेही असलेले अढळ स्थान कधीही नाकारता येणार नाही. मात्र असे असले तरी नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचेच नाव द्यायला हवे यासाठी अनेेक महत्वाची कारणंही नजरेआड करता येणार नाही.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने मुंबईतील मुख्य अर्थात टर्मिनल २ हेे विमानतळ कार्यरत आहे. महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण देशातील महत्वाचे, प्रशस्त आणि सुसज्ज विमानतळ अशी याची ख्याती आहे. देशात सर्वाधिक प्रवाससंख्या असलेल्या या विमानतळाला शिवरायांचे नाव देण्यात आले असून याला कधीही कोणताही विरोध झालेला नाही.

 

mumbai airport inmarathi

 

याशिवाज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल अर्थात सीएसटी स्टेशनही शिवरायांच्याच नावाने गेली अनेक वर्षांपासून दिमाखात उभं आहे.

 

cst staation inmarathi

 

प्रत्येक मराठी किंबहूना महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी नागरिकांच्याही मनात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर, भक्ती यांची तुलना इतर कोणत्याही ठिकाणांच्या नावाने केली जाऊ शकत नाही. पर्यायाने नवी मुंबई विमानतळाला शिवाजी महाराजांचे नाव देणे हे त्या आदराचे, भक्तीचे मोजमाप ठरूच शकत नाही.

त्यानंतर आणखी एक महत्वाचा पर्याय म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा. मुंबईतीलच नव्हे तर राज्यातील मराठी माणसाला सन्मानाने, ताठ मानेने जगायला शिकवणाऱ्या बाळासाहेब ठाकरेंचे थोरपण मान्य करायलाच हवे. महाराष्ट्रातील एखाद्या मोठ्या, महत्वकांक्षी प्रकल्पाला त्यांचे नाव देणे ही शिवसेनेप्रमाणे प्रत्येक सामान्य माणसाचीही इच्छा आहे यात शंका नाही,

मात्र यापुर्वीच महाराष्ट्र शासनाने बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाची सुरुवात केली आहे. या महत्वकांक्षी प्रकल्पाला बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव देण्यात आले आहे. त्यासह बाळासाहेब ठाकरे स्मार्ट शेतकरी योजनेचीही घोषणा शासनाने केली असून त्याअंतर्गतही विकासाची अनेक कामे सुरु आहेत.

 

balasaheb thakaray inmarathi

मुंबई महापौर बंगल्याच्या जागी ७०० कोटींच्या निधीतून बाळासाहेब ठाकरे स्मारकही उभारण्याची तयारी शासनाने दाखवली असून लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. काहीवमहिन्यांपुर्वी या प्रकल्पाचा भुमीपुजन सोहळाही पार पडला होता.

 

balasaheb smarak inmarathi

हे ही वाचा – ‘त्या’ एका भयानक केसमुळे बाळासाहेब म्हणाले होते “मी शिवसेना सोडतो”!

नागपूर शहराशेजारी असलेल्या गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्यात आलंय. विदर्भातील अत्यंत महत्वाचा प्रकल्प म्हणून याची गणना केली जाते.

 

balasaheb thakare inmarathi

 

नाशिक महापालिकेनेही बाळासाहेब ठाकरे वस्तुसंग्रहालयाची उभारणी करत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.

याव्यतिरिक्त राज्यातील इतर अनेक ठिकाणं, स्मारकं यांना बाळासाहेबांच्या नावाने गौरवण्यात आलं आहे.

मात्र या दोघांच्या तुलनेत लोकनेते दि बा पाटील यांचे कार्य आजही अनेकांना ठाऊक नाही. पनवेल पालिकेचे नगराध्यक्ष, महाराष्ट्राचे पनवेल-उरण विधानसभा मतदारसंघाचे ४ वेळा आमदार, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि रायगडचे दोन वेळा खासदार अशी राजकीय कारकीर्द असूनही लोकांचा नेता ही खरी ओळख त्यांनी कायम जपली.

नवी मुंबई सिडको आणि जेएनपीटी (न्हावा शेवा बंदर) प्रकल्पग्रस्त जनतेचे खंबीर नेतृत्व केले. वेळप्रसंगी पोलिसांचा लाठीमार झेलला तर स्वतः राजकारणात असूनही नागरिकांसाठी प्रशासनाशी वैर पत्करले.

शेतकरी कामकरी पक्षाला दि. बा. पाटील यांनी मोठे केले होते. जोपर्यंत पाटील शेतकरी कामकरी पक्षात होते, तोपर्यंत शेतकरी कामकरी पक्ष हा संपूर्ण महाराष्ट्रात प्रमुख राजकीय विरोधी पक्ष होता. पण त्यांच्यानंतर रायगड जिल्हा सोडता या पक्षाचे अस्तित्व महाराष्ट्रात इतरत्र कुठेही जाणवत नाही.

शेतकरी, भुमीधारक, सामान्य माणूस यांचा नेता अशी ओळख असलेल्या दि बा पाटलांनी कायमच भुमीपुत्रांची कड घेतली, त्यांना वाली नाही म्हणून होणारी परवड रोखण्यासाठी दिबा पोलिसांसमोरही ठाम उभे रहायचे.

 

di ba patil inmarathi

 

नेता हा कार्यालयात कमी आणि लोकांत अधिक असावा ही शिकवण त्यांनी खरी ठरवली. दिबांनी मांडलेली योजना पुढे केवळ रायगडकरांच्या नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्रातील प्रकल्पग्रस्तांसाठी वरदान ठरली. ती योजना म्हणजे, साडेबारा टक्क्यांचा विकसित भूखंडाचा मोबदला!

जेव्हा ‘सिडको’ची स्थापना झाली आणि नवी मुंबई शहरासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेणं सुरु झालं, तेव्हा त्या अपेक्षेपेक्षा कमी दरानं घेतल्या जात होत्या. दि. बा. पाटील यांच्या नेतृत्वात ७० च्या दशकात लढा उभारला गेला आणि त्यानंतर शेतकऱ्यांना वाढीव मोबदला आणि काही प्रमाणात जमिनीही मिळाल्या. त्यानंतर न्हावा-शेवा बंदरासाठी घेतल्या गेलेल्या जमिनींसाठीही त्यांनी लढा उभारला. कष्टकऱ्यांसाठी लढणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती.

सध्याच्या विमानतळासाठी त्यांनी दिलेला लढा, शेकापची उभारलेली फळी या सर्वांची जाण ठेवून शासनाने या प्रकल्पाला दि बा पाटील यांचेच नाव देण्याची मागणी रास्त आहे, यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण, एकांगी विचार किंवा इतर नावांचा अनादर न करता दि बां च्या लढ्याचा विचार व्हावा आणि ज्या जागेवर हे विमानतळ उभारले जात आहे त्या जागेचा, तेथिल संघर्षाचा इतिहास भविष्यातही आठवला जावा, केवळ भारतीयांनाच नव्हे तर परदेशी प्रवाशांनाही हा इतिहास कळावा यासाठी विमानतळाला दि बा पाटलांचेच नाव देणे हा योग्य आणि रास्त पर्याय आहे.

 

navi mumbai airport

 

यांमुळे दिबांचेच नव्हे तर तेथिल भुमिपुत्रांचेही कार्य सातासमुद्रापार पोहोचेल, भारताच्या इतिहासातील आणखी एक पैलू जगासमोर उलगडेल.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?