' स्वप्नात येऊन दिलेल्या दृष्ट्यान्तामुळे मुंबईकरांना रस्ताही मिळाला आणि त्यांचे आराध्य दैवतही...

स्वप्नात येऊन दिलेल्या दृष्ट्यान्तामुळे मुंबईकरांना रस्ताही मिळाला आणि त्यांचे आराध्य दैवतही…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मुंबई, मुंबापुरी, मायानगरी, झगमगती चंदेरी दुनिया… प्रत्येकजण आपल्या लाडक्या नावाने या शहराला हाक मारतो. पण एक प्रश्न कायम राहतो की ही मुंबई नक्की कुणाची? राजकीय पक्षांची, त्यांच्या कार्यकर्त्यांची, बॉलिवूडकरांची, त्यांना आर्थिक बळ देणा-या उद्योजकांची, व्यापारीवर्गाची, त्यांच्या ग्राहकांची, नोकरदारांची, या शहरात येण्याचं आणि इथे आल्यावर स्थिरावण्याचं स्वप्न बघणा-यांची, अर्थात प्रत्येकाची…

 

mumbai city inmarathi

 

जगभरातल्या कोणत्याही शहरातून मुंबईची वाट काढत आलेल्या प्रत्येकाला या शहरानं आपलंसं केलं. मग कधी लोकलच्या गर्दीत सामावून घेतलं, तर कधी बॅन्डस्टॅन्ड, वरळी सी फेसवर त्याचं प्रेमही फुलवलं, १० बाय १० चा आसरा दिला आणि रोजची लाखो स्वप्न दिली.

अर्थात या मायानगरीतील अनेक जागा, अनेक रस्ते आजही सर्वसामान्यांना भुरळ घालतात. मुंबईकर असूनही पेडर रोड, वरळी सी फेस यांसारख्या ठिकाणांवर फिरताना नजर थेट उंचच उंच इमारतींवर खिळते. मग ते ‘प्रभुकुंज’त असलेले मंगेशकर कुटुंबियांचं वास्तव्य असो वा तेथून हाकेच्या अंतरावर ‘अंटालिया’मध्ये मिरवणारे अंबानी कुटुंब!

 

celebrity inmarathi

 

उद्योजक, कलाकार, गायक, खेळाडू अशा अनेक मान्यवरांना जन्म देणाऱ्या या शहरावर महालक्ष्मीचा वरदहस्त आहे ही बाब मान्य करायलाच हवी. किंबहूना त्याच मुंबादेवाच्या नावाचा जागर आजही शहरात होत असतो.

वरळीचे महालक्ष्मी मंदिर पाहिल्याशिवाय ना मुंबईदर्शन पुर्ण होते ना कोणत्याही शुभकार्याची सुरुवात. या शहरावरचं नवे तर प्रत्येक मुंबईकरावर तिचा शुभाशिर्वाद असतो म्हणूनच मुंबईत आलेल्या प्रत्येकाचं स्वप्न पुर्ण होतं असेही अनेकदा म्हटलं जातं.

विश्वास बसणार नाही मात्र याच महालक्ष्मीला आपल्या शहरात आपलं अस्तित्व सिद्ध करावं लागलं होतं. असं काय घडलं? देवीचा हा साक्षात्कार नेमका कसा झाला? त्यानंतर या शहराशी तिचं नातं कसं जुळलं? जाणून घेऊया.

काय सांगते आख्यायिका

ही गोष्ट सुमारे १७८४ सालची… मुंबईवर मिळवलेली सत्ता अनुभवण्यात ब्रिटीश व्यस्त होते. इस्ट इंडिया कंपनीने व्यापारी जाळे विणले. या शहरात व्यापाराला वाव असला तरी आव्हानही मोठी होती. सर्वात मुख्य म्हणजे बेटांच्या या शहराला वारंवार समुद्रभरतीचा धोका.

 

old mumbai inmarathi

 

मुंबई अर्थात सध्याचा पेडर रोड परिसर आणि वरळी गाव या दोन बेटांमध्ये या शहराची विभागणी होती. समुद्राचा उधाण आलं की या दोन्ही बेटांत पाणी शिरायचं. जनजीवन विस्कळीत व्हायचं. वारंवार येणा-या या संकटातून मार्ग काढण्यासाठी मुंबईचा तत्कालीन गव्हर्नर जॉर्ज हॉर्नबीने या दोन्ही भागांना जोडणारा रस्ता तयार करण्याची शक्कल लढवली.

ब्रिटीशांच्या इस्ट इंडिया कंपनीने या कल्पनेला विरोध केला. इतकंच नव्हे तर इंग्लंडमध्ये बसलेल्या राज्यकर्त्यांनाही हा विचार पटला नाही. मात्र मुंबईची जबाबदारी आपल्या खांद्यावर असल्याने आपणच हा प्रकल्प पूर्ण करायचा या विचाराने जॉर्जने हुशार तरुण इंजिनिअर्सची मदत घेत परवानगीशिवाय कामाला सुरुवात केली.

इंजिनिअर्सच्या या गटाचं नेतृत्व करत होता रामजी शिवजी हा तरुण! रामजीने तंत्रज्ञांसह आपलं काम सुरु केलं. दगड, खडक, सिमेंट यांच्या राशी मागवल्या गेल्या. उत्साहाने कामाला सुरुवात झाली. आपल्या कल्पनेमुळे या शहरात मोठा बदल होणार म्हणून जॉर्जही खूश होता.

दोन्ही बेटांवर भरणीचं काम सुरु झालं मात्र समुद्राला उधाण आलं आणि प्रयत्नांवर पाणी पडलं. समुद्रावर खापर फोडून पुन्हा नव्याने कामाला सुरुवात झाली. काम अर्ध्यावर आलं आणि पुन्हा एकदा समुद्राच्या भरतीनं सारंकाही विस्कळीत झालं.

 

mumbai sea inmarathi

 

एक दोन नव्हे तर तब्बल १० हून अधिक वेळा प्रयत्न केले गेले. काम अर्ध्यावर आलं की खंड पडत होता. जणूकाही मुंबईच्या समुद्राला हे काम होणं मान्यच नव्हतं.

एकेरात्री थकूनभाकून झोपलेला रामजीच्या स्वप्नात महालक्ष्मीदेवीने दृष्टान्त दिला. “समुद्रात ज्या ठिकाणी भरणीचं काम सुरु आहे तिथे तळाशी मी माझ्या दोन बहिणींसह वास्तव्य करते. आधी माझ्या मुर्ती बाहेर काढ, त्यांची प्रतिष्ठापना कर आणि मगच तुझे काम पुर्ण होईल”. देवीचे हे वाक्य ऐकून रामजी जागा होत विचारात पडला.

दुसऱ्याच दिवशी त्याने स्वप्नातील या दृष्टान्ताबाबत गव्हर्नर जॉर्ज यांना सांगितलं. मात्र मुळातच आधुनिक विचारसरणी असलेल्या ब्रिटीश जॉर्जचा स्वप्न, दृष्टान्त या विषयांवर विश्वास बसणं शक्यच नव्हतं. त्यामुळे त्याने मुर्तींच्या शोधकामाला आधी नकार दिला, मात्र त्याचवेळी हे काम लवकरात लवकर पुर्ण होणंही गरजेचं होतं.

एकीकडे त्याच्यावर इंग्लंडहून येणारा दबाव, अपुर्ण कामाची धास्ती अशा सर्वांमुळेच अखेर नाईलाजाने त्यांनी रामजींना खोदकामाला परवानगी दिली.

समुद्राच्या तळाशी केले जाणारे खोदकाम ही अवघड बाब होती. मात्र यावेळी इंजिनिअर्सच्या मदतीला मुंबईतील स्थानिक मच्छिमार धावून आले. त्यांच्या अनुभवाचा फायदा होत काम पूर्ण झालं आणि समुद्राच्या तळाशी हाती लागलेल्या तीन मुर्तींसह इंजिनिअर्स जॉर्जकडे धावत आले.

 

mahalaxmi temple inmarathi

 

रामजीचा दृष्टान्त खरा ठरला होता. समुद्राच्या तळाशी महालक्ष्मी, सरस्वती आणि महाकाली या तीन देवींची मुर्ती सापडली होती. जॉर्ज यांनी आदेश दिल्याने अहोरात्र काम सुरु झालं आणि पहिल्याच प्रयत्नात कोणंतही विघ्न न येता मुंबई आणि वरळी या दोन बेटांना जोडणारा रस्ता उभा राहिला.

जॉर्जचं काम पुर्ण झालं मात्र रामजी आपलं वचन विसरला नाही. मुर्तांची शोध लागल्यानंतर ज्याठिकाणी त्यांची तात्पुरती प्रतिष्ठापना करण्यात आली होती तिच जागा निश्चित करून त्या ठिकाणी महालक्ष्मी देवीचं भव्य मंदिर उभारण्यात आलं.

 

mahalaxmi temple mumbai inmarathi

 

आज पेडर रोडवरून फिरताना त्यामागे असा एखादा इतिहास असेल याची अनेकांना कल्पनाही नाही. आजही केवळ मुंबईकर नव्हे तर परदेशी पर्यटकही महालक्ष्मीपुढे नतमस्तक होतात.

महालक्ष्मीच्या या मुर्ती समुद्राच्या तळाशी गवसल्या किंबहूना त्यांनी आपलं अस्तित्व स्वतःचं सिद्ध केलं, मात्र त्या क्षणापासून या शहराशी देवीचं जे नातं निर्माण झालं ते दिवसेंदिवस दृढ होतंय. मग मुंबईतील महापूर असो वा बॉम्बहल्ले. कितीही संकट झाली तरी मुंबईकरांचे हात महालक्ष्मीपुढे भक्तीने जोडले जातात आणि प्रत्येक संकटरूप राक्षसाचा देवी विनाश करत मुंबईकरांना अभय देते हे ही मान्य करायला हवं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?