' ब्रिटिश जुलूम; भारतात नजरकैदेत प्राण सोडलेल्या पतीला, ती मायदेशी नेऊ शकली नाही – InMarathi

ब्रिटिश जुलूम; भारतात नजरकैदेत प्राण सोडलेल्या पतीला, ती मायदेशी नेऊ शकली नाही

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतात इंग्रजांनी जवळजवळ १५० वर्षांच्यावर राज्य केले. आज जे आपल्या आसपासचे देश आहेत ते देश सुद्धा ब्रिटिशांच्या अधिपत्याखालील होते.

आज जसे एखाद्या अट्टल गुन्हेगारला तिहार जेल, येरवडा जेल मध्ये ठेवतात तसे त्याकाळी ब्रिटिश आपल्या लोकांना शिक्षेसाठी मंडाले( आताचे म्यानमार) मध्ये ठेवले जात असे. त्याकाळी ब्रह्मदेश म्हणून ओळखला जाई. याच ब्रह्मदेशाचा राजा एकेकाळी ब्रिटिशांनी आपल्या रत्नागिरी मध्ये कैद करून ठेवले होते.

 

mandale inmarathi 1

 

रत्नागिरीत जाणारा प्रत्येक पर्यटक थिबा पॅलेसला भेट दिल्याखेरीज परतत. नाही. एकेकाळच्या ब्रह्मदेशाच्या थिबा राजाचा हा राजवाडा इतकीच संकुचित माहिती आता या राजवाड्याच्या रुपानं उरली आहे. खरंतर ब्रिटिशांच्या क्रूरपणाचा पुरावा म्हणजे हा राजवाडा आहे.

ब्रिटिशांनी आपलं साम्राज्य पसरवताना साम, दाम, दंड, भेद या सर्वाचा अवलंब केला आणि तो करत असतानाच मानवताही खुंटीला टांगली. ब्रिटीशांच्या क्रुरपणाचा एक पुरावा म्हणजे रत्नागिरीचा थिबा पॅलेस.

निसर्गरम्य परिसरात असणारा हा पॅलेस ब्रह्मदेशाच्या म्हणजेच आताच्या म्यानमारच्या, राजाचा आहे मात्र सध्या याठिकाणी राजाचे वंशज रहात नाहीत. थिबा राजाचे वंशज अक्षरश: दारिद्र्याचं आयुष्य कंठत आहेत. या राजघराण्याची वाताहत खरंतर ब्रिटिशांनी थिबाला स्थानबध्दतेची शिक्षा दिली तेंव्हाच झाली होती.

 

thiba palace inmarathi

हे ही वाचा – पुण्यातील प्रत्येक पेठेमागे आहे स्वतंत्र इतिहास! अस्सल पुणेकरांना तर हे माहित हवंच…

थिबा राजानं अवा (अप्पर बर्मा) वर सात वर्षं राज्य केलं. त्याचा सगळा कारभार मंडाले येथून चालत असे. त्याचं राज्य नामशेष होण्याबाबत नेहमीच त्याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, त्याला ब्रिटिशांचं लांगूलचलन करणं कधीच जमलं नाही. याकारणामुळेच तो सतत गोर्‍यांच्या डोळ्यात खुपत होता. त्याचप्रमाणे तो कालखंड वसाहतवादाचं वर्चस्व वाढत चालल्याचा होता.

जर ब्रिटीशांनी अप्पर बर्मावर कब्जा केला नसता तर त्या काळात भारत चीनमधे प्रभावी बनत चाललेली फ़्रेंच सत्ता ब्रिटिशांना भारी पडली असती. यावेळेपर्यंत बर्मानं ब्रिटिशांशी १८२० आणि १८५० सालची दोन युध्द करून झालेली होती. या युध्दात हार पत्करावी लागल्यानं समुद्र किनारपट्टीसहित अनेक भूप्रदेश बर्मानं गमावला होता.

ब्रिटिशांसाठी अप्पर बर्मा केवळ निर्यात बाजारपेठ नव्हती तर, नैसर्गिक साधन संपत्तीनं समृध्द असा हा देश ब्रिटिशांसाठी महत्वाचा होता. ब्रह्मदेशाची जनता त्यांच्या राजाला देवतेसमान मानत असे. म्हणूनच या देवतेलाच देशापासून, मातीपासून आणि राजावर जिवापाड प्रेम करणार्‍या, पाठींबा देणार्‍या जनतेपासून दूर करण्याचा कुटील डाव ब्रिटिशांनी खेळला.

 

 

thiba palace 33 inmarathi

 

थिबा राजाला त्याच्या कुटुंबियांसहित शेजारच्या देशात हद्दपार करण्याचा निर्णय ब्रिटिशांनी घेतला. त्यावेळेस भारताचे व्हॉईसराय आणि गव्हर्नर जनरल होते, लॉर्ड डफ़रिन. लॉर्ड डफ़रिननी या राजाला देशातल्या एका कोपर्‍यात बंदीस्त करण्याचं ठरविलं आणि त्यानुसार मुंबईपासून दूर ३३० किमी अंतरावरचा दक्षिणेकडिल रत्नागिरीची निवड केली.

त्या काळात रत्नागिरीला पोहोचण्याचा एकमेव सोपा मार्ग होता, सागरी प्रवास. कारण रेल्वे अद्याप रत्नागिरीत पोहोचली नव्हती. त्यामुळे स्टिमरनं प्रवास करणं हाच एकमेव सोपा मार्ग होता. अर्थात पावसाळ्यात हा मार्गही बंद होत असे.

१८८५ साली ब्रिटीशांनी थिबा राजाला स्थानबध्द करुन त्याला हिंदुस्थानात आणलं, मात्र यावेळेस थिबा राजाची पत्नी, राणी सुपयालट गर्भवती असल्या कारणानं मद्रास येथे थांबून, विश्रांती घेऊन मग पुढचा प्रवास करण्याचं ठरलं. राजा थिबा, राणी सुपयालट आणि या दोघांची चार अपत्यं, राजाची धाकटी राणी सुपयागले ही सगळीच रत्नागिरीत हलविण्या आली.

 

thiba palace 2 inmarathi

 

एकेकाळी समुध्द असणार्‍या ब्रह्मदेशाशी लढाई करून ब्रिटीशांनी थिबा राजाला युध्दात हरवलं. त्यावेळेस थिबा राजा २७ वर्षांचा होता. युध्दात हरल्यानंतर त्याच्याकडून सत्ता, संपत्ती सर्वकाही काढून घेण्यात आलं आणि त्याला हिंदुस्थानातील रत्नागिरीत आणलं गेलं.

रत्नागिरीत निर्वासित म्हणून आलेल्या या राजानं थिबा पॅलेसची बांधणी केली. ज्यावेळेस थिबा राजा रत्नागिरीत आला त्याकाळात रत्नागिरी हे अवघं ११ हजार लोकवस्ती असणारं शहर होतं. शेती आणि मासेमारी हे दोन मुख्य व्यवसाय असणारं रत्नागिरी थिबा राजासाठी सर्वार्थानं परकं होतं.

 

ratnagiri inmarathi

 

इथल्या चालीरिती, संस्कृती, खान पान. हवामान, धर्म, भाषा सर्वकाही राजासाठी नवीन होतं. रत्नागिरीत पाय ठेवल्यापासून थिबा राजाला नैराश्यानं घेरलं होतं. त्यानं ताबडतोब व्हॉईसरॉयला पत्र लिहून आपल्याला पुन्हा मायदेशी पाठविण्याची कळकळीनं विनंति केली. मात्र ही विनंती ब्रिटीशांनी फ़ेटाळली.

इतकंच नाही तर राजाकडून त्याचे सर्व मान, मरातब, संपत्ती आणि अधिकारही काढून घेण्यात आले. काही प्रमाणात दागदागिने बाळगण्यास मात्र परवानगी दिली गेली. पुढील कालखंडात उदर्निवाहासाठी यातला एक एक करत सगळे दागिने राजाला विकावे लागले.

ब्रिटिशांकडून राजाला सुरवातीच्या कालखंडात जवळपास एक लाख रुपयांची पेन्शन मिळत असे. कालांतरानं या पेन्शनमधे घट करण्यात आली. १९१६ साली जेंव्हा राजाचा मृत्यू झाला तेंव्हा त्याची पेन्शन २५ हजार रुपये इतकीही नव्हती.

 

thiba 4 inmarathi

 

राजाला आणि त्याच्या कुटुंबियांना स्थानिक जनतेशी मोकळेपणानं संवाद साधण्याची परवानगी नव्हती. तसेच त्यांना शाळेत जाण्याची किंवा स्थानिक मुलांसोबत खेळण्याचीही परवानगी नव्हती. वयाच्या तब्बल तिशीपर्यंत या मुलांनी हे विचित्र आयुष्य जगलं.

परिणामस्वरुप थिबा राजाच्या चारही मुली अयोग्य व्यक्तींच्या प्रेमात पडल्या आणि राजघरण्याची घरसण आणखीनच वेगानं झाली. दुसरीकडे ब्रह्मदेशात थिबा राजाविरोधात अंसतोष पसरविण्यातही ब्रिटिश यशस्वी झाले. थिबा राजाला कधीच हिंदुस्थानात रहायचं नव्हतं.

मायभूमीची ओढ असणारा हा राजा अखेरच्या श्वासापर्यंत ब्रिटिशांकडे मायभूमीला परत पाठविण्याविषयी विनंत्या करत राहिला. मात्र त्याची विनंती कधीच मान्य करण्यात आली नाही. अगदी त्याचं पार्थिवही त्याच्या मातीत अंत्यसंस्कारासाठी नेण्यास ब्रिटिशांनी परवानगी नाकारली.

 

thiba palace 1 inmarathi

हे ही वाचा – नेपोलियन सारखा शूर योद्धा इतका हळवा, रोमँटिक असेल यावर विश्वास बसेल का?

आपल्या मायभूमीतल्या मातीशी एकरुप व्हावं ही थिबा राजाची एकमेव आणि अंतिम  इच्छा होती. त्याच्या पश्चात्त राणी सुपयालट हिनं तब्बल दोन वर्षं थिबा राजाचं पार्थिव जतन केलं होतं आणि ब्रिटिशांना हात जोडून विनवण्या करत होती की ‘आता तरी राजाचं पार्थिव का होईना, पण ते ब्रह्मदेशात परतू दे’. मात्र त्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या केवळ कुटुंबियांना परतण्याची परवानगी देण्यात आली आणि राजाचे अंत्यसंस्कार रत्नागिरीतच करण्यात आले.

१९४८ मधे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राजाच्या वंशजांनी थिबा राजाचे अवशेष ब्रह्मदेशात परत नेण्याचे खूप प्रयत्न केले मात्र नवीन सरकारपुढे इतर अनेक समस्या असल्यानं या मागणीचा विचारही करण्यात आला नाही.अशा रितिनं ब्रिटिशराजमधे एका राजघराण्याचा दुर्दैवी अंत झाला.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?