' सगळ्यांना आवडणाऱ्या “हाजमोला”ची जबरदस्त मार्केटिंग स्ट्रॅटेजी समजून घ्याच! – InMarathi

सगळ्यांना आवडणाऱ्या “हाजमोला”ची जबरदस्त मार्केटिंग स्ट्रॅटेजी समजून घ्याच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

एखादं चॉकलेट किंवा कॅण्डीचं मार्केट मधील आयुष्य हे साधारणपणे ५ ते १० वर्ष इतकंच असतं. या काळात लोकांच्या आवडी निवडी बदलतात. मग प्रत्येक कंपनी ही मार्केटच्या ट्रेंड नुसार चॉकलेट, कॅण्डीमध्ये आकार, चव, पॅकिंग यापैकी अपेक्षित असे बदल करत असते.

आपल्या स्पर्धकांपेक्षा एक पाऊल पुढे राहण्याच्या प्रयत्नात प्रत्येक फूड कंपनी नेहमीच नवीन संशोधनावर भर देत असते. एकाच प्रकारामध्ये चॉकलेट बनवून लोकांना आपल्याकडे आकर्षित करून ठेवण्याची कला ही मोजक्या कंपन्यांकडे असते.

भारतीय कंपनी ‘डाबर इंडिया लिमिटेड’ला ही कला चांगलीच अवगत आहे असं म्हणता येईल. डाबरची हाजमोला ही गोळी मागच्या ४३ वर्षांपासून आपलं स्थान टिकवून आहे यावरून डाबर इंडिया लिमिटेडची मार्केटवरची पकड नक्कीच मान्य करण्यासारखी आहे.

 

hajmola inmarathi

 

“ये बात कुछ हजम नही हुई… हाजमोला सर” ही टॅगलाईन वापरून हाजमोला ही चवदार आणि पाचक गोळी लोकांची आवडती आहे यात शंकाच नाही. हाजमोलाची चिंचं असलेली गोळी ही आपल्यापैकी कित्येक लोकांची ९० च्या दशकात सुद्धा आवडती होती आणि आज ही आहे.

‘हाजमोला’ने खास असं काय केलं?

चवदार, पाचक द्रव्य असलेली गोळी आणि त्याला साजेशी जाहिरात ही हाजमोला मार्केटमध्ये टिकून राहण्याची प्रमुख कारणं म्हणता येतील. डाबर कंपनीने ‘कपिल देव’ ला एका जाहिरातीत घेतलं तेव्हा हाजमोला ही घराघरात पोहोचली.

कपिल देवच्या बॉलिंगवर ‘सिक्सर’ मारण्याच्या एका लहान मुलाच्या वाक्याला कपिल देव “ये बात कुछ हजम नही हुई” असं म्हणतात आणि मग तो लहान मुलगा त्यांना स्माईल देतो अशी ती फक्त २० सेकंदाची जाहिरात होती. पण, त्या एका जाहिरातीने पुढील २० वर्ष पुरेल अशी मार्केटमध्ये ओळख निर्माण करून दिली.

 

 

डाबर इंडिया लिमिटेडचा भर हा सुरुवातीपासून आयुर्वेदिक उत्पादनांवरच होता. हाजमोला ही सुद्धा एक आयुर्वेदिक गोळीच आहे. या श्रेणीमध्ये हाजमोलाचा आजचा मार्केट शेअर हा ८०% इतका आहे. १५० करोड इतका टर्नओवर असलेला हाजमोला सुरुवातीच्या काळात गमतीदार जाहिरातींद्वारे प्रेक्षकांसमोर आणला गेला.

“चटपटा स्वाद और झटपट आराम” ही टॅगलाईन सुद्धा हाजमोलाकडे लोकांना आकर्षित करण्यात यशस्वी ठरली. ‘पचनास उपयुक्त’ या सदरात मोडत असल्याने हाजमोला अबालवृद्धांच्या पसंतीस उतरली.

आज जगात विकल्या जाणाऱ्या १० पाचक गोळ्यांपैकी ८ हाजमोला असतात इतकी हाजमोलाला मागणी आहे. प्रत्येक ठिकाणी हाजमोला पाहिजे त्या वेळेत उपलब्ध करून देणे हे सुद्धा हाजमोलाच्या यशाचं कारण म्हणता येईल.

 

hajmola flavors inmarathi

 

हाजमोला गोळ्या या सुरुवातीला काचेच्या बाटलीमध्ये मिळायच्या. काही वर्षांनी यामध्ये बदल करून छोट्या पॅकेट्समध्ये त्या उपलब्ध करून देण्याचा निर्णय कंपनीने घेतला. कोणत्याही प्रवासात हाजमोला कँडी सोबत ठेवण्याच्या पद्धतीला तेव्हापासून सुरुवात झाली. घराघरात डबीमध्ये जपून ठेवली जाणारी हाजमोला गोळी ही नंतर शाळेच्या मुलांच्या खिशात सुद्धा दिसायला सुरुवात झाली.

क्रिकेटपटू कपिल देव नंतर त्यावेळी बॉलीवूडमध्ये पाय रोवू पाहणाऱ्या अभिनेत्री मल्लिका शेरावतने हाजमोलाची जाहिरात केली.

 

mallika sheravat inmarathi

 

लग्न झालेली मुलगी सासरी जाण्याच्या आधी हाजमोला खाऊन मगच कारमध्ये बसते. कौटुंबिक जाहिरात करणाऱ्या आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला लागणाऱ्या हाजमोलाची ही जाहिरात सुद्धा लोकांना खूप आवडली.

२१ व्या शतकाच्या सुरुवातीला हाजमोलाने अमिताभ बच्चन यांना आपल्या जाहिरातीत घेतलं. २००४ मध्ये तरुणांना डोळ्यासमोर ठेवून एका लहान मुलासोबत अमिताभ यांनी केलेली जाहिरात सर्वांना खूप आवडली. हाजमोलाच्या चवदार गोळीला मार्केटिंगची मिळालेली साथ, हाजमोलाला नेहमी चर्चेत ठेवण्यास मदत करत होती.

२०१२ मध्ये डाबर इंडिया लिमिटेडने अजय देवगणला ‘ब्रँड अँबेसेडर’ म्हणून साईन केलं. ‘चटकोला’ हाजमोला या नावाने सुरू केलेल्या गोळ्यांची जाहिरात अजय देवगणने केली आणि त्यातून हाजमोलाच्या जाहिरातींचं नवीन स्वरूप लोकांसमोर आलं.

 

hajmola chatkola inmarathi

 

“ये बात कुछ हजम नही हुई…” ही टॅगलाईन आता कंपनीने वापरणं बंद केलं आहे. लोकांना आता हाजमोलाची सवय झाली आहे आणि त्यामुळे डाबर इंडिया जाहिरातीपेक्षा वेगवेगळ्या पॅकिंगच्या पद्धतीवर संशोधन करत आहे.

हाजमोलाने टीव्ही जाहिरातींसोबतच हायवेवरील ढाब्यांना लक्ष केलं. आपली चटकदार गोळी प्रत्येकापर्यंत पोहोचवणं हे लक्ष्य डाबर इंडियाने या कॅम्पेनमधून साध्य केलं.

त्यानंतर भारतीय रेल्वे सोबत केलेला जाहिरातींचा करार आणि एफएम रेडिओला दिलेलं जाहिरात मूल्य हे हाजमोलाला सतत लोकांच्या लक्षात राहण्यासाठी मोलाचं योगदान देत होते.

===

===

हाजमोलाने पुढे जाऊन ‘यौडले’ नावाचं एक ड्रिंक बाजारात आणलं. त्यासोबतच २०१९ मध्ये सुरू केलेलं ‘अनारदाना’ आणि ‘फन 2 कँडी’ असे सतत नवीन काहीतरी प्रकार लोकांसमोर येत होते.

आज हाजमोलाचे ‘इमली’, ‘चटकोला’, ‘रेग्युलर’, ‘हिंग’, ‘अनारदाना’, ‘पुदिना’ हे सहा फ्लेवर उपलब्ध आहेत. “हजम सब, चाहे जब” या टॅगलाईनने सध्या डाबर इंडिया लिमिटेड हाजमोलाची जाहिरात करत आहे.

 

hajmola inmarathi

 

घरात तयार केलेल्या एका पाचक गोळीला इतक्या मोठ्या व्यवसायाचं स्वरूप दिलं जाऊ शकतं हे सिद्ध करणाऱ्या डाबर इंडियाचं सर्वांना कौतुक आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?