'"मुलगी ते स्त्री" या प्रवासात तुमच्या मुलीच्या ह्या गोष्टींकडे लक्ष द्या - भाग २

“मुलगी ते स्त्री” या प्रवासात तुमच्या मुलीच्या ह्या गोष्टींकडे लक्ष द्या – भाग २

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मागील भागाची लिंक : “मुलगी ते स्त्री” या प्रवासात तुमच्या मुलीच्या ह्या ७ गोष्टींकडे लक्ष द्या – भाग १

===

लेखिका : शीतल पाटील श्रीगिरी

===

मागील भागात आपण पौगंडावस्थेत होणारे शारीरिक बदल आणि त्या वयात लावायच्या सवयींबद्दल माहिती घेतली. या भागात आपण मुलींमध्ये होणारे भावनिक/ मानसिक बदल आणि त्याला कसे सामोरे जायचे याबद्दल माहिती घेऊ या.

वयाच्या या टप्प्यांवर मुलींमध्ये खूप शारीरिक आणि मानसिक स्थित्यांतर होत असतात आणि या काळात बऱ्याच वर्तणूक समस्या उद्भवतात.

१. गोंधळलेपणा, आत्मविश्वास कमी होणे :

 

indian-girl-marathipizza
hot1041stl.com

 

पौगंडावस्थेत मुलींमध्ये अनेक शारीरिक व हॉर्मोनल बदल वेगाने होत असतात. त्यामुळे त्या गोंधळतात selfconcious होतात. त्याचवेळी अनेक प्रकारचे विचार डोक्यात घोळत असतात.

त्यामुळे एकाग्रता कमी होते; परिणामी शालेय प्रगती वर ही परिणाम होऊ शकतो. या सगळ्यामुळे मुली संभ्रमित होऊ शकतात, काही जणांमध्ये आत्मविश्वास ही खालावतो.

तसेच स्वतः मधल्या शारीरिक बदलांची तुलना (उंची, वजन, इ.) इतर मुलींसोबत केल्याने अथवा कुणी चिडवल्यामुळे काही मुलींमध्ये न्यूनगंड ही निर्माण होतो.

अशावेळी मुलींमधले बदल त्यांना समजावून सांगणे, हे बदल नैसर्गिक आहेत याबद्दल त्यांना आश्वस्त करणे आणि धीर देणेे खूप गरजेचे आहे.

शाळेतील कामगिरी खालावली तरी त्यांना धारेवर धरू नका, किंवा सर्वांसमोर टीका अथवा इतरांशी तुलना अजिबात करू नका; त्याने त्यांचा स्वतःवरचा विश्वास अजून खालावेल .

 

२. हळवेपणा/ अती भावनाशीलता :

 

indian-girl-marathipizza01
sheknows.com

 

छोट्या छोट्या गोष्टींवरून मुली रडवेल्या होतात, अतिभावनिक होऊन काहीतरी बोलतात. पालकांना समजत नाही की क्षुल्लक गोष्टींवर आपली मुलगी अत्यंतिक प्रतिक्रिया का देत आहे .

मुलीच्या शरीरात दरमहा हॉर्मोन्स ची तीव्र आंदोलनं सुरू असतात.

शरीर, मन, पूर्णपणे सरावलेले नसते, त्यामुळे असे होते. तिची थट्टा करू नका, त्याचवेळी तिने थोडं खंबीर राहायला पाहिजे हे न दुखावता प्रेमाने, पण ठामपणे सुचवा.

 

३. चिडचिडेपणा / रागावर ताबा न राहणे / आक्रमकता :

 

indian-girl-marathipizza02
nelive.in

 

असे कुठलेच आई वडील नसतील, ज्यांना teenage tantrums ची झळ बसली नसेल. वस्तू, दार आपटणं, चिडचिड करणं, सांगितलेलं न ऐकणं, उलट उत्तरं देणं, असे बरेच प्रकार या वयातली मुलं, मुली करतात.

आपण चिडलो की ते अजून आक्रमकपणे react होतात. प्रत्यक्षात होतं काय, की या काळात मुलांना स्वतःच्या स्वतंत्र व्यक्तिमत्वाची जाणीव होत असते आणि त्यांना स्वतःची ओळख हवी असते.

ती ते नेहमीच्या चाकोरी विरुद्ध वागून ठसवायचा प्रयत्न करत असतात. त्याचवेळी त्यांच्या सामाजिक जाणिवा देखील मूळ धरत असतात.

पुस्तकात, शाळेत, शिकवलेले आदर्श आणि प्रत्यक्ष जगातला मोठ्यांच्या वागण्यातला व्यावहारिक दृष्टिकोन, यातील विसंगती त्यांच्या लक्षात यायला लागते आणि त्यांचा भाबडा विश्वास कमी होतो व बंडखोरी वाढते.

या परिस्थितीत पालकांनी संयम ढळू न देणे हे सगळ्यात जास्त आवश्यक असते. शांत आणि ठाम रहा. प्रत्येक बाबतीत त्यांना dictate करू नका; त्यांना स्वतःचे निर्णय घेऊ द्या.

त्याने त्यांचा आत्मविश्वास ही वाढेल आणि विद्रोह ही कमी होईल.

काही बाबींना मात्र ठामपणे नकार द्या; जसे की लायसन्स नसताना वाहन चालवणे, न विचारता घरातून पैसे घेणे, न कळवता कुठल्याही पार्टी ला जाणे, कायदा मोडणे, इ. घरात एखादी मिटिंग घेऊन मर्यादा स्पष्ट कराव्यात आणि त्या ठामपणे पाळाव्यात.

 

४. नैराश्य:

 

sad girl inmarathi
istockphoto.com

 

शरीर-मनातील बदल आणि त्याबद्दल अर्धवट किंवा चुकीची माहिती, लैंगिक शिक्षणाचा अभाव, मनात येणारे लैंगिक विचार आणि त्यामुळे येणारा अपराधबोध, तसेच शैक्षणिक आघाडीवर असलेली आव्हाने, अपेक्षांचा होणारा भडिमार, या सगळ्यामुळे मुलांमध्ये नैराश्य येऊ शकते.

नेहमीचे भावनिक चढउतार आणि हे नैराश्य यातील फरक समजणे फार गरजेचे आहे. नैराश्याची लक्षणे ओळखणे आणि वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.

खूप जास्त किंवा कमी झोपणे, खाणे कमी होणे, सतत एकटं राहणे, कायम निरुत्साही असणे, सातत्याने शाळेतली कामगिरी ढासळणे, मरणाविषयी बोलणे किंवा तसे कार्यक्रम बघणे, पुस्तके वाचणे.

ही लक्षणे दुर्लक्षित करू नका.

मुलांमध्ये नैराश्य टाळण्यासाठी त्यांच्यावर अवास्तव अपेक्षांचे ओझे लादू नका, त्यांना सांघिक खेळांसाठी प्रोत्साहित करा, त्यांना एखादा छंद जोपासू द्या, त्यांच्याशी संवाद कायम ठेवा.

आपण चुकलो, हरलो, तरी आपल्या आई वडीलांचे आपल्यावर नेहमी प्रेम असेल हा विश्वास त्यांना वाटू द्या आणि तरीही परिस्थिती गंभीर वाटली तर मानसोपचार तज्ञ किंवा समुपदेशकाचा सल्ला घ्यायला अजिबात संकोच करू नका!

 

५. सोशल मीडिया:

 

indian-girl-marathipizza04
dazeinfo.com

 

इंटरनेट चा अतिवापर हे अवघड दुखणे होऊन बसले आहे.

बरेच पालक स्वतःच आहारी गेलेले असल्यामुळे मुलांना काही बोलण्याची सोय नसते आणि प्रोजेक्ट्स, इतर महत्वपूर्ण माहिती, यासाठी आंतरजालाची मदत तर घ्यावीच लागते.

पण व्हाट्सअप्प, फेसबुक, इंस्टाग्राम, मोबाईल गेम्स सारख्या गोष्टींमुळे वेळ ही खूप वाया जातो. सोशल मीडिया addiction , त्यातून येणारी अस्वस्थता, नैराश्य, याचा धोका ही आहेच.

हे सगळे वापरताना तारतम्य बाळगावे, आहारी जाऊ नये यासाठी प्रयत्न करा. काही आक्षेपार्ह साईट्स ब्लॉक करून टाका. मुळात स्वतःही या गोष्टी पाळा.

दिवसभरात ठराविक No media time ठरवा आणि तो पाळा. निसर्ग ट्रेक, मैदानी खेळ, यासारख्या गोष्टींना प्रोत्साहन द्या.

 

६. व्यसनाधीनता :

 

addicted girls inmarathi
pinterest.com

 

मोठे झाल्याची भावना, काहीतरी थरारक करण्याची इच्छा, सवंगड्यांचा दबाव (peer pressure), कुटुंबातील व्यक्तींना व्यसन करताना पाहणे, अशा अनेक गोष्टींमुळे किशोरावस्थेतील मुले-मुली व्यसनाकडे वळतात.

यात मुलांचे प्रमाण जास्त असले तरी मुलींमध्ये ही हे लक्षणीयरित्या वाढत आहे. घरात सहज उपलब्ध असेल तर उत्सुकतेपोटी ही व्यसनांना सुरुवात होते.

फक्त एक झुरका, फक्त एक घोट, फक्त एक शॉट, असा “एकदाच करून बघू” म्हणून झालेली सुरुवात कधी कधी सवय आणि नंतर व्यसन बनून जाते .

ही अतिशय नाजूक आणि क्लिष्ट समस्या आहे. मुलांना त्यांच्यावर पाळत ठेवलेली अजिबात आवडत नाही; तेव्हा त्यांच्या नकळत त्यांच्यावर थोडं लक्ष ठेवले पाहिजे.

आपल्या मुलीचे मित्र मैत्रिणी घरी येतील तेव्हा त्यांच्याशी संवाद साधा, त्यावरून ती कोणत्या गटात वावरत आहे हे लक्षात येईल.

एक इमर्जन्सी डायरी करा आणि त्यात जवळचे पाहुणे, मित्र, मुलीच्या ही मित्र, मैत्रिणी यांचे नाव, पत्ते, फोन नंबर लिहून ठेवा.

आपल्या मुलीच्या मित्र मैत्रिणींच्या पालकांशी ही संपर्क ठेवा; जमल्यास एखादा ग्रुप बनवा, म्हणजे काही वेगळे, संशयास्पद वाटल्यास सगळे मिळून लक्ष घालता येईल.

सगळ्यात महत्वाचे म्हणजे प्रसंगी थोडी मवाळ, नमती भूमिका घेऊन संवाद कायम ठेवा, म्हणजे काही विपरीत घडल्यास ती तुम्हाला ते न बिचकता सांगू शकेल.

आपण जी चौकशी करतो, ती काळजी आणि भीतीपोटी करतो आणि ती आजच्या काळात रास्त आहे, हे तिच्या पर्यंत पोहोचलं पाहिजे.

एकूण पाल्याचे teenage हाताळणे ही खरच पालकांसाठी तारेवरची कसरत आहे.

हे थोडेसे दुचाकी चालवायला शिकवण्यासारखे आहे; हँडल त्यांच्या ताब्यात दिलेच पाहिजे, त्याशिवाय ते शिकू शकणार नाहीत, पण त्याच वेळी तोल गेला, धडपडले, तर सावरायला आई वडील सदैव सोबत, पाठीशी आहेत हा विश्वास त्यांना वाटला पाहिजे.

कुंभार होऊन घडवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा माळी होऊन जोपासना करा.

 

indian-girl-marathipizza07
mysahana.org

 

ही माहिती सर्वसाधारण किशोरावस्थेतील सामान्य स्थित्यंतराबद्दल आहे . काही विशिष्ट समस्या असतील ( तीव्र नैराश्य, हिंसक वर्तणूक, व्यसनाधीनता, लैंगिक अत्याचार, इ) तर तज्ज्ञांची मदत घ्या.

सगळ्यात महत्वाचे… क्वालिटी टाइम ही संकल्पना किती ही गोंडस असली तरी मुलं ही व्हाट्सअप्प फेसबुक सारखी नसतात, की आपल्याला मोकळा वेळ मिळाला म्हणून ते लगेच ऍक्टिव्हेट होतील आणि संवाद साधतील.

भरपूर वेळ एकत्र घालवल्यावर थोडा संवाद साधला जातो. मुलांसोबतचा प्रत्येक क्षण इव्हेंटफुल आणि दिवसातला सगळं वेळ happening नसतो. त्यांना काहीही न करता शांत बसण्यासाठी वेळ मिळू द्या….. त्यातून त्यांचा संवाद वाढेल, तुमच्याशी आणि स्वतःशी ही…!

Sitting quietly, doing nothing, Spring comes, and the grass grows, by itself.
                                                                                                  – Basho Matsuo

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?