' छोट्याशा भूमिकेवरही नेटिझन्स फिदा: चेल्लम सर साकारणारा अभिनेता आहे तरी कोण? – InMarathi

छोट्याशा भूमिकेवरही नेटिझन्स फिदा: चेल्लम सर साकारणारा अभिनेता आहे तरी कोण?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – ईशान पांडुरंग घमंडे 

===

अॅमेझॉन प्राईमवरील फॅमिली मॅन सिरीजचा दुसरा भाग प्रदर्शित झाला, आणि त्यादिवसापासून आजपर्यंत या सिरीजची तुफान चर्चा कायम आहे. अनेक मिम्स दर्जेदार अभिनय, कथानक या सगळ्याचीच प्रचंड चर्चा सुरु असताना या सिरीजमधील काही व्यक्तींची विशेष चर्चा असलेली दिसून येतेय.

मुख्य भूमिकेतील मनोज वाजपेयी, राजीच्या भूमिकेतील दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा अक्किनेनी हे दोघे चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत, हे जरी खरं असलं तिर खऱ्या अर्थाने चर्चा सुरु आहे ती ‘चेल्लम सर’ या भूमिकेची… ‘चेल्लम सरांना सगळं माहित असतं’ इथपासून सुरु होणारे मिम्स अगदी त्यांचा आणि रजनीकांत यांचा एक फोटो व्हायरल करण्यापर्यंत येऊन पोचले आहेत.

 

rajnikant and uday mahesh inmarathi

 

‘चेल्लम सर हे चालते फिरते गुगल आहेत’ अशा आशयाचं मिम सुद्धा तुम्ही नक्कीच पाहिलं असेल. रजनीकांत आणि गुगलशी या पात्राची झालेली तुलना या पात्राची प्रसिद्धी अधोरेखित करणारी आहे.

श्रीकांत तिवारीच्या एका फोनवर हा निवृत्त अधिकारी त्याचं भन्नाट काम सुरु करतो आणि श्रीकांतला सर्वतोपरी मदत करतो, हे सिरीजमध्ये पाहायला मिळतं. चेल्लम सर या पात्राला अवघ्या काही मिनिटांचा स्क्रीन टाइम मिळाला असेल, पण या काही मिनिटांनी त्या पात्राला आणि अभिनेत्याला रातोरात चर्चेत आणलं हे मात्र निश्चित!

फॅमिली मॅन प्रदर्शित झाल्यावर लगेच बघता आलं नाही, पण मनोज वाजपेयीच्या बरोबरीने हातात फोन घेतलेला आणखी एक जण सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत होता. या सगळ्यात सिरीजचे स्पॉयलर्स मिळणार का, अशी भीती तर मनात होतीच. सिरीज बघून झाल्यावर, चेल्लम सरांची भूमिकाही आवडली आणि या कलाकाराविषयी उत्सुकता वाटली ती निराळीच…!!

 

chellam sir inmarathi

===

हे ही वाचा – इंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या फॅमिलीमॅन २ चे हे मीम्स नाही पाहिले तर मग काय पाहिलं?

===

दीपनच्या भूमिकेसाठी ऑडिशन

होय अगदी बरोबर वाचलंत, दीपन म्हणजेच फॅमिली मॅनच्या तामिळ रेबेलमधील एक मुख्य पात्र असणाऱ्या पात्रासाठी उदय महेश म्हणजेच चेल्लम सर यांनी ऑडिशन दिली होती. मात्र या भूमिकेसाठी त्यांची निवड झाली नाही. त्यांना नाकारण्यात आलं. फॅमिली मॅनसारख्या उत्तम सिरीजमध्ये काम करण्याची संधी मिळणार नाही, याचं एखाद्या कलाकाराला वाईट वाटलं नसतं तरच नवल!

ऑडिशनला दोन महिने उलटून गेलेले असताना, अचानक फॅमिली मॅनच्या टीमने उदय महेश यांच्याशी संपर्क साधला. त्यांना चेल्लम सर ही भूमिका देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या उत्तम सिरीजचा भाग होता येणार असल्याने, त्यांनी ही लहानशी भूमिका सुद्धा आनंदाने स्वीकारली.

अवघ्या १५ मिनिटांचा स्क्रीन टाइम असलेली ही भूमिका चाहत्यांच्या मनात घर करेल, आणि रातोरात सोशल मीडियावरील चर्चेचा विषय बनेल, असा विचार त्यावेळी उदय महेशच काय, तर मालिकेशी संबंधित इतरही कुणी केला नसेल.

 

chellam sir family man inmarathi

 

बॉलिवूडच्या चित्रपटांमध्येही साकारली आहे भूमिका

उदय महेश या अभिनेत्याने जॉन अब्राहामची मुख्य भूमिका असलेला ‘मद्रास कॅफे’ आणि रजनीकांत, राधिका आपटे यांचा कबाली या सिनेमांमध्ये सुद्धा छोट्या भूमिका स्वीकरल्या आहेत. बॉलिवूडमधून पडद्यावर झळकून सुद्धा महेश यांना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही, असंच आता म्हणावं लागेल.

मद्रास कॅफे आणि कबाली या दोन्ही नावांसह उदय महेश असं नाव लिहून सर्वज्ञात गुगलवर काही शोधण्याचा प्रयत्न केला, तरीही चेल्लम सर्च तुमच्या स्क्रीनवर अवतरलेले तुम्हाला पाहायला मिळतील.

 

rajnikant kabali inmarathi

 

या भूमिकेमुळे महेश यांना मिळालेल्या प्रसिद्धीचा यावरून नक्कीच अंदाज बांधता येऊ शकतो.

===

हे ही वाचा – द स्पाय आणि द फॅमिली मॅन : सध्या गाजत असलेल्या या वेबसिरीजबद्दल जाणून घ्या

===

अपघाताने ठेवलं अभिनयात पाऊल

चेल्लम सर बनून आज चाहत्यांच्या मनामनात पोचलेल्या उदय महेश यांना कधीही अभिनय करायचा नव्हता. लेखन आणि दिग्दर्शन हे त्यांचे अधिक आवडते विषय होते. कॉलेजमध्ये असताना सिनेमाची आवड तर त्यांना लागली, मात्र या क्षेत्राकडे कसं वळता येईल हे त्यावेळी त्यांना ठाऊक नव्हतं.

दाक्षिणात्य सिनेमॅटोग्राफर नटराजन सुब्रमण्यम यांच्यामुळे त्यांना सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्यांचा सिनेसृष्टीत प्रवेश झाला. या संधीचं सोनं करून त्यांनी एक चांगला दिग्दर्शक होण्यासाठी प्रयत्न सुरु केले. त्याचबरोबरीने त्यांना लेखनाची सुद्धा आवड निर्माण झाली.

लेखक आणि दिग्दर्शक असलेले महेश हे एका दिग्दर्शकाच्या मदतीसाठी कोचीमध्ये होते. त्याचवेळी सुजित सरकार या त्यांच्या मित्राने ‘मद्रास कॅफे’मध्ये एक छोटीशी भूमिका साकारण्याचा आग्रह धरला. जॉन अब्राहामसारख्या अभिनेत्यासह काम करायला मिळणार, म्हणून त्यांनी ही भूमिका स्वीकारली आणि कॅमेऱ्यामागे लाईट्स, कॅमेरा, अॅक्शन म्हणता म्हणता ते कॅमेऱ्यासमोरील लाईट्समध्ये आले.

 

jon abraham inmarathi

 

हा अपघात घडला नसता, तर आज उदय महेश यांना चेल्लम सर म्हणून बघण्याची संधी आपल्याला मिळाली नसती. चेहरा निर्विकार ठेऊन, दर्जेदार अभिनय करत त्यांनी अनेकांच्या चेहऱ्यावर उत्तम कलाकृती बघितल्याच्या समाधानाचे भाव निर्माण केले.

मनोज वाजपेयीसारख्या उत्तम कलाकारासह काम करण्याची संधी मिळाली हे माझं भाग्य असल्याचं मत उदय महेश व्यक्त करतात. फॅमिली मॅनच्या तिसऱ्या भागात चेल्लम सर ही भूमिका अधिक महत्त्वाची आणि मोठी असणार असल्याची चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे.

तुफान चर्चेत असलेले चेल्लम सर तिसऱ्या भागातही असावेत आणि त्यांना आणखी जास्त काळ पडद्यावर पाहायची संधी मिळावी अशी इच्छा तर माझ्यासारख्या सगळ्याच चाहत्यांची आहे.

मुळात लेखन आणि दिग्दर्शनात अधिक रुची असणारे उदय महेश, यांनी चांगली भूमिका असेल तर अभिनयाचा सुद्धा नक्कीच विचार करेन असं म्हटल्याचं चर्चिलं जातंय. त्यामुळे तिसऱ्या सिझनच्या निमित्ताने, उदय महेश चेल्लम सर म्हणून आणखी जास्त वेळ पडद्यावर पाहायला मिळाले तर आश्चर्य वाटायला नको.

===

हे ही वाचा – नेहमीप्रमाणे भरकटलेल्या मालिकेतील एकमेव ‘चांगली’ गोष्ट – “खलनायक” अतुल परचुरे!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?