' लाखोंचे प्राण वाचवणाऱ्या वैज्ञानिकाला केवळ तो ‘भारतीय’ आहे म्हणून इंग्रजांनी डावललं! – InMarathi

लाखोंचे प्राण वाचवणाऱ्या वैज्ञानिकाला केवळ तो ‘भारतीय’ आहे म्हणून इंग्रजांनी डावललं!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज बेंगलोर किंवा हैद्राबादला भारताचं सायन्स हब म्हणून ओळखलं जातं. मात्र फाळणीपूर्व भारतात पंजाबra प्रांताला सायन्स हबचा मान होता.

याचं बरचसं श्रेय हरगोविंद खुराना आणि अब्दुस सलीम या शास्त्रज्ञांना जात असलं तरिही या दोघांत आणखीन एक नाव होतं, जे काळाच्या ओघात विस्मृतीत गेलं आहे आणि ते म्हणजे रुची राम सहनी.

शास्त्रज्ञ, मेट्रोलॉजिस्ट, भैतिकशास्त्रज्ञ आणि सर्वात महत्वाचं म्हणजे paleobotanist चे पितामह म्हणून त्यांची ओळख आहे.

रूची राम सहनी यांचा जन्म फाळणीपूर्व भारतातल्या डेरा इथला. आज हे ठिकाण पाकिस्तानातल्या खैबर पख्तूनख्व प्रांतात आहे. १८६३ साली रूची राम सहनी यांनी करमचंद सामी आणि गुलाब देवी या दांपत्याच्या कुटुंबात जन्म घेतला.

 

ruchi ram sahni inmarathi

 

करमचंद यांचा व्यवसाय होता आणि आर्थिक परिस्थितिही उत्तम होती मात्र नंतर व्यवसायातल्या तोट्यानं हे कुटुंब आर्थिक हालाखीत सापडलं. जिथे दोन वेळेच्या जेवणाचे वांदे झाले होते तिथे शिक्षणाची चैन परवडणार नव्हती.

मात्र कुमारवस्थेतील रुची रामना शिक्षणात केवळ गोडी नव्हती तर अक्षरश: वेड होतं. शिक्षणाशिवाय रहाणं त्यांना शक्यच नव्हतं. पडेल ते कष्ट उपसत रुची राम यांचं शिक्षण त्यांनी चालू ठेवलं.

हे ही वाचा एक अभिमानास्पद गोष्ट- अमेरिकेतील एका पर्वताला दिलंय भारतीय शास्त्रज्ञाचं नाव!

त्यावेळेस रुची राम अवघे सोळा वर्षांचे होते आणि शाळेसाठी त्यांना गावापासून पन्नास मैलांचा प्रवास करत जावं लागत असे. त्यांना जी शाळा हवी होती ती त्यांच्या गावापासून दूर असल्यानं इतका प्रवास करण्यावाचून दुसरा पर्यायच नव्हता.

मात्र त्या वयातही रूची रामनी कसलिही तडजोड न करता, कुरकुर न करता मिळेल त्या वहानानं प्रसंगी पायी चालत शाळा आणि शिक्षण दोन्हीत खंड पडू दिला नाही.

लाहोरमधून शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर पंजाब युनिव्हर्सिटीतून त्यांनी बीए ऑनर्स पदवी प्राप्त केली. पदवीनंतर त्यांनी भारतीय मेट्रॉलॉजीकल विभागाच्या शिमल्यातल्या ऑफिसमधे नोकरी धरली. त्यावेळेस त्यांचं वय होतं अवघं २२ वर्षे!

त्या काळात ते IMD (Indiana Metrological Department) मधले पहिले आणि एकमेव भारतीय शास्त्रज्ञ होते. हेन्री फ्रान्सिस ब्लॅण्डफोर्ड या ब्रिटिश मेट्रोलॉजिस्ट आणि पेलिओलॉजिस्ट यांचे सहय्यक म्हणून ते रुजू झाले.

 

henry francis blandford inmarathi

 

रोजच्या हवामानाच्या नोंदी ठेवण्याचं काम रुची राम सामी यांच्याकडे सोपविण्यात आलं होतं. भारत आणि तेव्हाचं बरमा येथील हवामानाच्या नोंदी ते ठेवत असत.

त्यांचं काम इतकं अचूक असे की वृत्तपत्रांत छापण्यासाठी देत असताना ब्लॅण्डफोर्ड कधी कधी न वाचताही पुढे पाठवत असत. याचं कारण त्यांची खात्री पटली होती की रुची राम सामी यांचं काम चोख आहे. त्यात त्रुटी निघण्याची शक्यताच नसणार.

नेमकी हीच बाब अनेकांना खटलू लागली होती. एका “नेटिव्ह” ला मिळणारं हे महत्व अनेकांच्या आसुयेचा विषय बनलं होतं. रुची राम सामी यांच्यासाठी हे काम म्हणजे दुधारी तलवारीसारखं बनलं होतं.

एका बाजूला या कामातील अचुकतेमुळे त्यांना विभागात महत्व प्राप्त झालं होतं आणि ही जबाबदारी पार पाडताना एक छोटी चुकही भोवणार होती.

त्या चुकीचं भांडवल करून रुची राम सहनीचं करियर धोक्यात येण्याची शक्यताच जास्त होती तर दुसरीकडे त्यांच्या कष्टांचं चीज होत असल्याचं समाधानही होतं.

रुची राम यांना तोंडावर बोलून दाखविलं जात असे की कसे या पदावर काम करण्यासाठी ते फारसे योग्यतेचे नाहीत आणि त्यांच्याऐवजी एखादा युरोपियन उमेदवार कसा योग्य ठरेल. मात्र रुची राम या टिकेकडे दूर्लक्ष करत आपलं काम निष्ठेनं करत राहिले.

त्या काळातील नामांकीत अशा द पायोनियर या मासिकात रुची राम सामी यांच्या चुकलेल्या हवामान अंदाजावर सणकून टीका करण्यात आली होती आणि रुची राम यांच्यासारखा “नेटिव्ह” या पदासाठी कसा अयोग्य आहे हे अधोरेखित करण्यात आलं होतं.

 

ruchi ram sahni 2 inmarathi

 

रुची राम यांना वर्णभेदाचा कडवा सामना करावा लागत होता. जितकं त्यांचं काम अचूक होत होतं तितकाच हा संघर्ष तीव्र होत चालला होता. दुर्दैवानं या वर्णभेदानं त्यांची पाठ स्वातंत्र्योत्तर काळातही सोडली नाही. म्हणूनच इतिहासात त्यांच्या कार्याची नोंद अगदीच त्रोटकपणे घेतलेली आहे.

अशातच १८८५ साली एक घटना अशी घडली की आपल्या करियरच्या सुरवातीच्या काळात असणार्‍या रुची राम सामींना त्यांची या क्षेत्रातली हुशारी सिध्द करण्याची वेळ आली. या परिक्षेत ते अव्वल रीतीने उत्तीर्ण झाले.

अर्थातच त्यावेळच्या सरकारनं ही घटना फारशी उजेडातही येऊ दिली नाही आणि रुची रामना त्याचं श्रेयही दिलं नाही. त्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यातली ही घटना आहे.

रुची राम सामी रोजच्यासारखेच आपल्या ऑफिसमधे आले आणि रोजच्यासारखेच आलेल्या हवामान नोंदींवरून नजर टाकू लागले. सर्व रिपोर्टमधे एका रिपोर्टनं त्यांचं लक्ष वेधून घेतलं. डायमंड हार्बरचा तो रिपोर्ट अचानक घडलेले हवामान बदल दाखवत होता आणि हे बदल काही चांगले संकेत देत नव्हते.

हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेलं रुची राम सामी यांच्या निदर्शनास आलं. शिवाय इतर रिपोर्टमधे या अचानक घडलेल्या बदलाचा पुसटसा उल्लेखही नव्हता. हे सगळं प्रकरण विचार करायला लावणारं होतं त्यामुळे त्यांनी तातडीनं बंदरावर तार केली.

हे ही वाचा मायदेशात दुर्लक्षिलेल्या ‘भारतीय एडिसनची’ खऱ्या ‘एडिसननेसुद्धा’ दखल घेतली होती!

लक्षात घ्या, त्याकाळात संपर्कमाध्यमं आजच्यासारखी प्रगत नव्हती. एखादं संकट येऊ घातलेलं असलं आणि ते लक्षातही आलं तरिही ते कळविण्यासाठी तातडीची संपर्कयंत्रणा वापरण्यात त्या काळात मर्यादा होत्या.

तार हा एकमेव तातडीनं संपर्क साधण्याचा मार्ग होता आणि रुची राम सामी यांनी त्याचाच वापर करत बंदराशी संपर्क साधला. बंदरावरील ऑब्जर्व्हरला ताज्या हवामान नोंदी तात्काळ पाठविण्याचे आदेश त्यांनी दिले.

 

telegram inmarathii

 

या नोंदी हातात पड्ल्यानंतर रुची राम सामींची खात्रीच पटली की एक भयंकर वादळ येऊ घातलं आहे. आता सामींनी डायमंड आणि इतर बंदरांना हवामानातल्या बारीक सारीक बदलांवरही डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवण्याचे आदेश देत दर अर्ध्या तासानं हवामान नोंदी पाठविण्यास सांगितलं.

हे सगळं घडत असताना दुसरीकडे यापूर्वी आलेल्या महाकाय वादळानी कसा प्रवास केला आणि बंदरांची कशी, कितपत हानी केली याचा अभ्यास चालू केला. आदेश देण्यासाठी, यावेळेस कार्यालयातील सर्व कलकत्त्याला गेले असल्यानं आत्पकालीन स्थिती हातालण्यासाठी सामींचे कोणीही वरिष्ठ उपस्थित नव्हते.

आता सामीनी वेळ वाया न घालवता सर्व सुत्रं आपल्या हातात घेतली. त्यांना संकटाची चाहूल लागली होती आणि तातडीनं पावलं उचलली नाहीत तर मनुष्यहानीला तोंड द्यावं लागणार आहे.

हजारोंचे जीव घेत हे वादळ जमिनीवरून पुढे सरकणार होतं हे जाणलं होतं. त्यांनी येऊ घातलेल्या वादळाचा अंदाज प्रसिध्द केला ज्यामुळे अनेक मोठ्या जहाजांना बंदरांवर न येण्याचा निर्णय घेणं सोपं होऊन पुढे घडणारी हानी टळली.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं हेच ते २२ सप्टेंबर १८८५ चं वादळ. ज्यानं निसर्गाचं तांडव दाखविलं. आजवरच्या इतिहासातलं हे एक महाभयानक वादळ ठरलं ज्याच्या वेग होता ताशी २५० किमीचा आणि सात मिटर उंच लाटा उसळवत ते जमिनीकडे आलं होतं.

 

cyclone inmarathi

 

सहनीच्या समयसूचकतेमुळे या वादळामुळे होऊ शकणार होती ती हानी टळली. सामींनी हा सर्व घटनाक्रम कामाचा भाग असल्यानं त्यांचे वरिष्ठ असणार्‍या ब्लॅन्ड्र्फोर्ड यांना कळविला.

ब्लॅण्डफोर्ड यांना हे वाचून धक्काच बसला कारण बंगालमधे हवामान खात्यात काम करणार्‍या वरिष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर पेडलर यांना रिपोर्टस बघूनही या हवामान बदलाची कुणकुणही लागली नव्हती.

त्यांनी सर्व स्टेशन्सला सहनींना पाठविलेल्या तारांच्या कॉपी आपल्याला पाठविण्यास सांगितलं. या सर्व रिपोर्टचा अभ्यास केल्यावर पेडलर आणि बॅण्डफोर्ड यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही की सहनींनी वादळाचं अचूक निदान केलं होतं आणि योग्य ती पावलं उचलली होती.

 

ruchi ram memoir inmarathi

 

कालांतरानं पेडलर यांनी या वादळावर सविस्तर रिपोर्टही लिहिला मात्र ज्यात रुची राम सामी यांना श्रेय देणं तर दूरच त्यांचा उल्लेखही टाळला. सहनींनी त्यांचं आत्मचरित्र लिहिल्यावर या गोष्टी उजेडात आल्या.

वर्णभेद आणि इतर पॉलिटिक्स यामुळे इतिहासाच्या पानांत हरवलेल्या या शास्त्रज्ञाला मानाचा मुजरा!

===

हे ही वाचा नोबेल पासून वंचित ठेवली गेलेली पहिली भारतीय शास्त्रज्ञ आजही मायदेशात दुर्लक्षितच आहे…

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?