' या गोड पदार्थाचा सुद्धा ‘सीमावाद’! “रशोगुल्ला” नक्की बंगालचा की ओडिशाचा?! – InMarathi

या गोड पदार्थाचा सुद्धा ‘सीमावाद’! “रशोगुल्ला” नक्की बंगालचा की ओडिशाचा?!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मऊ, लुसलुशीत, तोंडात पटकन विरघळणारा आपल्या सगळ्यांच्याच आवडीच्या अशा रसगुल्ल्याचा शोध कसा लागला असेल हे तुम्हाला ठाऊक आहे का? तुम्ही जर सच्चे खवय्ये असाल, तर कोणत्याही पदार्थाचा शोध कोणी, कसा लावला असेल याविषयी तुम्हाला जिज्ञासा नक्कीच असेल. आज आपण आपल्या सगळ्यांच्या आवडत्या रसगुल्ल्याच्या शोधाची गोष्ट जाणून घेणार आहोत.

ओडिशा आणि बंगाल या दोन्ही संस्कृती भिन्न असल्या तरी भाषा आणि खाद्य पादार्थांच्या बाबतीत मात्र त्यांतील भिन्नतेची दरी मिटलेली दिसते. दोन्ही राज्यातील लोक गोड पदार्थांचे विशेष चाहते! जशी त्यांना गोड पदार्थांची आवड आहे तसाच दोन्ही राज्यांमध्ये एक गोड वाद सुद्धा आहे. रसगुल्ला बंगालचा का ओडिशाचा हा वाद.

 

rasgulla inmarathi

 

रसगुल्ला ही पश्चिम बंगालची पेटंट डिश असल्याचंच आपल्या सगळ्यांना लहानपणापासून शिकवलं जातं. पण बंगालच्या या दाव्याला चॅलेंज करणारंसुद्धा एक राज्य आहे बरं का? ओडिशा त्या राज्याचं नाव.

ओडिया आणि बंगाली माणसाला तुम्ही जर का हा प्रश्न विचारला की रसगुल्ल्याचा शोध कुठे लागला, तर हा शोध आमच्याच राज्यात लागलाय हे ठामपणे दोघेही सांगतील आणि पुढे यावरून त्यांच्यात वादही होईल. कारण बंगाली आणि ओडिया लोक रसगुल्ल्याच्या या वादाला फार गंभीरपणे घेतात.

===

हे ही वाचा – जगाला वेड लावलेल्या एका चटपटीत पदार्थाचा शोध ‘अशा’ घटनेमुळे लागलाय

===

ओडिशाचा दावा काय?

ओडिया लोकांचं म्हणणं असं आहे, की रसगुल्ला त्यांच्या राज्यात पहिल्यांदा बनवण्यात आला होता. एका दंतकथेनुसार, जेव्हा भगवान जगन्नाथ, सुभद्रा आणि आपले ज्येष्ठ बंधू बलराम यांच्या बरोबर केलेल्या ९ दिवसीय रथ यात्रेवरून घरी, म्हणजे वैकुंठात परतले तेव्हा देवी लक्ष्मीने त्यांना बाहेरच अडवलं आणि आपल्याला रथयात्रेला बरोबर नेलं नाही म्हणून रुसलेल्या लक्ष्मीदेवीने त्यांना घरात प्रवेश करण्यापासून मनाई केली.

लक्ष्मीदेवीचा रुसवा दूर करण्यासाठी भगवान जगन्नाथाने त्यांना ‘खीर मोहन’ म्हणजेच रसगुल्ला भरवला. ज्यामुळे देवीचा राग गेला. तेव्हापासून खीर मोहनाचा देवी लक्ष्मीला नैवेद्य दाखवण्याची प्रथा अविरतपणे सुरू आहे.

 

laxmi devi inmarathi

 

एका कथेनुसार असंही म्हटलं जातं, की ओडिशाच्या एका मंदिरातील पुजाऱ्याने रसगुल्ल्याचा शोध लावला.

एका लहानश्या पाहाल नावाच्या गावात दुधाचं अतिप्रमाणात उत्पादन होत असे. तेथील लोक जास्त असलेलं दूध अक्षरशः फेकून देत असत. अन्नाचा असा अपव्यय पाहून त्या पुजाऱ्याने दुधाला विरजण लावून त्यापासून एक गोड पदार्थ बनवला.

तो पदार्थ रंगाने अंजिरी रंगाचा असून, कापसासारखा मऊ व साखरेच्या पाकात घालून ठेवल्याने चवीला गोड होता. त्यालाच आजच्या काळात रसगुल्ला म्हणतात. आज “पाहाल रसगुल्ला” अत्यंत प्रसिद्ध असलेल्या रसगुल्ल्याच्या प्रकारातील एक आहे.

 

pahal rasgulla inmarathi

===

हे ही वाचा – अनेकांचा जीव की प्राण असणाऱ्या ‘मॅगी’च्या नावाची मजेशीर गोष्ट तुम्ही ऐकलीय का?

===

बंगाल काय म्हणतं?

एका बंगाली कथेनुसार रसगुल्ला हा ७०० वर्ष जुना पदार्थ नसून केवळ १५० वर्ष जुना आहे. कारण बंगालचा लाडका रोशोगुल्ला नोबिन चंद्र दासांनी १८६८ साली रसगुल्ल्याचा यशस्वी प्रयोग पार पाडला.

नोबिन हे व्यवसायाने हलवाई होते. त्यांच्या वंशजांच्या म्हणण्यानुसार नोबिन यांनी १८६४ साली जोराशंको येथे आपले पहिले मिठाईचे दुकान सुरु केले होते. इतर मिठाई विक्रेत्यांप्रमाणे ते सुद्धा बंगालमध्ये मिळणारे सगळे मिष्टान्न विकत. त्यात सोंदेशचा सुद्धा समावेश होता.

 

sondesh inmarathi

 

मोठ्या प्रमाणावर स्पर्धा असल्याने, त्यांना या व्यवसायात सतत तोटा होत होता. हवा तसा नफा कधीच झाला नाही. तेव्हा त्यांनी ‘आपली काही तरी स्पेशल डिश असावी’ हा संकल्प सोडला. आणि त्या डिशच्या शोधाचा प्रवास सुरु झाला.

त्यांनी दुधापासून तयार होणाऱ्या पनीरचे छोटे छोटे गोळे साखरेच्या पाकात बुडवून ठेवणे सुरु केले. पण गोळे पाकात टाकले की लगेच फुटत होते. अनेक अयशस्वी प्रयोगांनंतर त्यांना रसगुल्ला बनवण्याचं गुपित उमगलं आणि रसगुल्ल्याचा शोध लागला.

नोबिन चंद्रांना या डिशचं पेटंट घेऊन ठेवण्याचा सल्लाही अनेक लोकांनी दिला. परंतु त्यांना हे नको होते. त्यांचा हा रसगुल्ला त्यांना भारतभर, जगभर प्रसिद्ध व्हायला हवा होता. त्यामुळे त्यांनी इतर हालवायांना सुद्धा ही कला शिकवली आणि रसगुल्ला हळू हळू संपूर्ण भारतात पसरला.

रबिंद्रानाथ टॅगोर हे सुद्धा नोबिन चंद्राच्या रसगुल्ल्याचे चाहते होते. नोबिन चंद्राच्या गावाहून त्यांना कोणी भेटायला आले तर ते त्यांना नोबिन बाबूंच्या दुकानातील तो प्रसिद्ध रसगुल्ला आवर्जून आणायला सांगत.

 

rabindranath tagore inmarathi

 

आणखी एक आख्यायिकेनुसार कलकत्त्यात आलेल्या एका परदेशी व्यावसायिकाने या रसगुल्ल्याला हरियाणा, राजस्थान, अशा भारताच्या विविध भागापर्यंत पोहचवलं. त्यामुळे नोबिन चंद्र दासांचा प्रयोग तुफान यशस्वी झाला. त्यालाच आज राजस्थानमध्ये रसबरी, उत्तरप्रदेशात राजभोग आणि बनारसमध्ये रसमलाई या नावांनी सुद्धा ओळखलं जातं.

===

हे ही वाचा – हे १० पदार्थ जे आपण इथे ‘चायनीज’ म्हणून खातो ते खुद्द चीनमध्ये सुद्धा मिळत नाहीत!

===

अनादिकालापासून चालत आलेला हा रसगुल्ल्याच्या मालकीचा वाद तर कधीच संपणार नाही, पण ४ नोव्हेंबर २०१७ रोजी सरकार ने GI टॅग देऊन रसगुल्ल्याचा मालकी हक्क पश्चिम बंगालला दिला. कागद पत्रांवरचा वाद जरी संपुष्टात आला असला तरी अजूनही रसगुल्ला ओडिशाचा की बंगालचा हा वाद तेथील स्थानिकांच्या मनातून मिटलेला नाही.

एखादा पादार्थ आपण फक्त आवड म्हणून खातो. पण त्याच्या मागे अशा अनेक चित्रविचित्र, खऱ्या-खोट्या कथा किंवा दंत कथा सुद्धा असू शकतात आणि त्यांवरून वाद विवादही होऊ शकतात हे आज आपण सगळ्यांनीच प्रथमच पाहिले असेल.

अर्थात या वादाशी आपला काही संबंध नाहीच… आपण आपलं रसगुल्ल्यावर ताव मारुयात आणि ही गोड पदार्थाची गोड माहिती आपल्या आवडत्या व्यक्तींपर्यंत पोचवुयात… काय…!!

 

rasgulla inmarathi

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?