' गुलाब नाही, जामुनचाही पत्ता नाही, मग ‘गुलाबजाम’ आला कुठून? वाचा गोड इतिहास! – InMarathi

गुलाब नाही, जामुनचाही पत्ता नाही, मग ‘गुलाबजाम’ आला कुठून? वाचा गोड इतिहास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लालसर, मऊसुत, खमंग तळलेला आणि त्यानंतर पाकात घोळलेला गरमागरम गुलाबजाम समोर आले की हात आखडता घेणं म्हणजे महापाप असं विनोदाने म्हटलं जातं.

“लग्नसराई असो वा घरातील अन्य शुभकार्य, खमंग पदार्थांची रेलचेल असलेल्या ताटात गुलाबजाम पडले नाहीत तर जेवण पूर्ण झाल्यासारखं वाटत नाही”, “अन्न हे पुर्णब्रह्म असलं तरी ‘गुलाबजाम’ हे सर्वोत्तम वरदान आहे” ही वाक्य अनेकदा कानांवर पडली असतील.

 

gulabjam inmarathi

हे ही वाचा – या गोड पदार्थाचा सुद्धा ‘सीमावाद’! “रशोगुल्ला” नक्की बंगालचा की ओडिशाचा?!

नरमगरम गुलाबजाम तोंडात विरघळल्यानंतर मिळणारा आनंद हा स्वर्गसुखापेक्षा काही वेगळा नाही. देश असो वा परदेश गुलाबजामप्रेमी आढळणार नाही हे शक्यच नाही.

काहींना रबडीसह गुलाबजामची जव चाखायला आवडते तर हल्ली आयस्क्रीमसह गुलाबजामची जोडी जमवून त्याचा आनंद लुटला जातो.

तर सर्वाच्या आवडीचा, प्रत्येक घरातील खव्वैयांकडून ज्याची आतुरतेने वाट पाहिली जाते तो आवडीचा पाहूणा नेमका येतो कुठून? त्याचं मुळ नाव, गाव काय? तो भारतीय की परदेशी? यांची उत्तरं फारशी कुणाला ठाऊक नसतात.

मात्र या गुलाबामची चव जितकी भारी, त्याहूनही त्याच्या जन्माची कथा चविष्ट आहे.

गुलाबही नाही ना जामूनचाही पत्ता नाही तरिही या पदार्थाला गुलाबजाम का म्हणतात? हा विचार कधीतरी तुमच्याही मनात आलाच असणार, मात्र केवळ गंमत म्हणून पडलेल्या प्रश्नाचं उत्तर या पदार्थाच्या इतिहासात दडलंय हे तुम्हाला ठाऊक आहे का?

प्रयोगातून जन्म

भारतात मिटक्या मारून खाल्ल्या जाणा-या गुलाबजाम या पक्वान्नाची संकल्पना मूळ भारतीय नाहीच. मात्र परदेशातील या प्रकाराचा प्रयोग भारतात झाला तो सतराव्या शतकात.

दिल्लाच्या तक्तावर बसलेल्या शहाजानना खूष करण्यासाठी तेथिल खानसामा प्रयत्नशील होते. रोजच्या पठडीतील मिष्टान्नाव्यतिरिक्त काहीतरी निराळे बनवावे यासाठी झटणा-या खानसामाने वेगवेगळे प्रयोग सुरु केले.

 

shahajahan inmarathi

 

त्यावेळी त्याला पूर्वी कधीतरी परदेशात पाहिलेला एक पदार्थ आठवला. त्याने तो पदार्थ चाखला नव्हता, मात्र त्याची कृती त्याला लक्षात होती. आपल्याला हा पदार्थ नक्की बनवता येईल की नाही याबाबत त्याला शंका होती, मात्र त्याने आपले प्रयत्न सुरुच ठेवले.

त्याने हातातील साहित्य पाहिले, खव्याचा वापर करून काहीतरी पदार्थ तयार करावा या विचाराने खव्याचे लाडुसारखे गोल आकार करत तुपात तळले मात्र एवढं करून त्याला गोडवा येत नव्हता. त्यासाठी त्याने साखरेच्याा माकात हे गोळे भिजवले. आता चवीच गोडवा आला मात्र त्याला हवा तसा खमंग दरवळत नव्हता. खूप प्रयत्न करूनही सुवास काही येईना, अखेरिस त्याने या तळलेल्या गोळ्यांवर गुलाबपाणी शिंपडले आणि त्या मंद सुवासाने संपूर्ण हवेली दरवळली.

 

gulab jamun inmarathi

 

जांभळासारखा (जामून) आकार आणि गुलाबाचा सुवास यांवरून या पदार्थाला गुलाबजाम हे नाव मिळालं अशी अख्यायिका आहे.

 

shaha jahan inmarathi

 

ज्या बादशहासाठी ही मिठाई बनवली होती त्याला कितपत आवडली हे ठाऊक नाही, मात्र त्यानंतर अनेक शतके, आजही घराघरात जगभरातील खव्वैयांना या पदार्थाने वेड लावले आहे.

बामियेचा भाऊ

गुलाबजामच्या जन्माची आणखी एक आख्यायिका आहे. अनेक अभ्यासकांच्या मते गुलाबजाम हा पदार्थ बामियेवरून स्फुरला असणार.आता तुम्हाला प्रश्न पडले असतील की हा बामिये कोण? हा पदार्थ मुळ भारतीय की परदेशी? आजही तो खाल्ला जातो का?

मध्यपुर्वेतील संस्कृतीनुसार माणसाने स्वकष्टाने सर्वप्रथम बनवलेला पदार्थ म्हणजे बामिये. त्यावेळी माणसाकडे ना पाककौशल्य होतं ना कोणतीही साधनं. त्यामुळे हाती असलेल्या पीठाचे गोळे करून ते भट्टीत ते तळले गेले आणि त्याला स्वाद यावा यासाठी भरपूर मधात घोळवले गेले.

 

bamiye inmarathi

 

त्यानंतर युरोपसह मध्य आशियात हा प्रकार अत्यंत चवीने खाल्ला गेला. काळानुसार त्यात बदल झाला, म्हणूनच गुलाबजाम हा पदार्थ बामियेचेच आधुनिक रुप आहे असेही मानले जाते.

हे ही वाचा – जगाला वेड लावलेल्या एका चटपटीत पदार्थाचा शोध ‘अशा’ घटनेमुळे लागलाय

भारतात रुप बदललं

हा पदार्थ बामियेवरून प्रेरित झालेला असो वा शहाजनासाठी बनवलेला एक प्रयोग, हा पदार्थ भारतात आला आणि अस्सल भारतीय झाला. भारतीयांना प्रत्येक गोड पदार्थ हा दुधाशी निगडित आवडतो. त्यामुळे गुलाबजामचीही दुधाशी सांगड घालण्यात आली.

खव्याचा गुलाबजाम बनवताना मिश्रण एकजीव होण्यासाठी केला जाणारा दुधाचा वापर हा त्याची चव खुलवतो.

भारतात केवळ राज्यच नव्हे तर प्रत्येक गावांनुसारही गुलाबजामचं रुप बदलतं. कुणी त्याला गुलगुले म्हणतंं तर कुणी तुलुम्बा.

 

gulab jam inmarathi

 

अर्थात भारतीयांनी आपलं कौशल्य पणाला लावून त्याला त्यामध्ये बदल केले आहेत. लंबगोल, कवडी, शंख, जाळीदार, सुबक नक्षी अशा अनेकविध आकारांमध्ये गुलाबजाम समोर आला की हात आखडता घेणं शक्यच नाही. एवढंच नव्हे तर बडिशोप. व्हॅनिला, केसर, वेलची अशा विविध फ्लेवर्सचा खमंग सुवास येताच खव्वैयांच्या तोंडाला पाणी सुटतं. हेच खरं भारतीय खाद्यसंस्कृतीचं यश म्हणावं लागेल.

इंदौर, दिल्ली या खाऊगल्ल्यांमध्ये गरमागरम गुलाबजामसोबत खाल्ली जाणारी रबडी चाखण्यासाठी परदेशी खव्वैयेही हजेरी लावतात.

 

gulabjamun inmarathi

 

शहाजहानसाठी बनवलेला प्रयोग असो वा बामियेसारख्या जुन्या पदार्थावरून घेतली गेलेली प्रेरणा. गुलाबजामचा उगम हा वर्षानुवर्षापुर्वी झाला हे नक्की! एवढचं नव्हे तर अनेक खाद्यसंस्कृती एकत्र येत त्यांच्या सुंदर मिलापातून गुलाबजाम जन्मल्याने त्याची चव अधिकच खुलते.

खाद्यसंस्कृतीत सातत्याने प्रयोग होणं गरजेचं आहे. एखाद्या जुन्या पदार्थाला आधुनिक टच दिला तर त्यातून नवाकोरा पदार्थ तयार होतो, गुलाबजामचेही तसेच काहीसे झाले आहे. आजही त्यात सातत्याने होणारे बदल कौतुकास्पद आहेत.

 

gulabjam sweet inmarathi

 

तर पुर्वआशियाई संस्कृती, त्यानंतर शहाजहानचा महाल असा लांबचा प्रवास करून आपल्यापर्यंत पोहोचणा-या गुलाबजामने खीर, पुरणपोळी, बासुंदी या पदार्थांना केंव्हाच मागे टाकलंय. म्हणूनच कोणत्याही सोहळ्यात खमंग गुलाबजाम मुखात पडल्याशिवाय सोहळ्याचा आनंद पुर्ण होणं शक्यच नाही.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?