'कीर्तनाचा बाजार मांडू नका आणि तिची गाण्याची सभाही करू नका : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १७

कीर्तनाचा बाजार मांडू नका आणि तिची गाण्याची सभाही करू नका : जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १७

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

मागील भागाची लिंक: जाऊ तुकोबांच्या गावा : भाग १६

===

काशीबाईच्या घरापाशी पोहोचताच तुकोबांनी आवाज दिला,

आम्ही आलो बरं का…

हे ऐकून काशीबाई बाहेर आली आणि आधीच गरम करून ठेवलेले ऊन पाणी तिने तुकोबांच्या चरणांवर घातले. फुलपात्रांतून आणलेले थोडेसे दूध घालून पुन्हा ऊन पाण्याने धुतले व तुकोबांस घरात घेतले. आबा, नारायणानेही पाय धुवून आंत प्रवेश केला. आवलीबाई आधीच येऊन थांबल्या होत्या.

jave-tukobanchya-gaava-marathipizza01

काशीबाईने माजघरांत केळीची पाने मांडली होती. रांगोळ्या काढलेली. तुकोबांचे आणि आवलीबाईचे शेजारी शेजारी, त्या बाजूला एक तेवती मोठी समई. समोर आबा, नारायण आणि एक समई त्यांच्यासाठीही. मंडळी पानावर बसली आणि काशीबाईने वाढायला घेतले. सोबत एक परकरी मुलगी होती. काशीबाई म्हणाली,

ही माझी नात हो, थोरल्या पुतणीची मुलगी. हिची आई आल्ये मदतीला.

मीठ, लिंबू, चटणी, कोशिंबीर, भजी, पापड, कुरड्या डावीकडे वाढून झालं. लाल भोपळ्याची न् शेंगांची भाजी उजवीकडे वाढली. मुख्य बेत पुरणपोळीचा बेत असल्याने कटाची आमटी होती, ती एका द्रोणात वाढली. दुसऱ्या द्रोणात शेवयांची खीर वाढली. घारगे, लाडू आणि करंजी वाढल्यावर पान पंचपक्वान्नांने सजले आणि भात, वरण, तूप वाढून म्हातारी म्हणाली,

बसा आता. सावकाश होऊ द्या बरं..

तुकोबा म्हणाले,

म्हातारे, किती करायचं ते? वय काय आपलं? आणि इतके लाड करू नयेत माणसाचे.

काशीबाई म्हणाली,

लाड माणसाचे नाहीत, पांडुरंगाचे आहेत….

असे म्हणत म्हातारीने सूर लावला –

जेव माझ्या पांडुरंगा । गोड मानूनी श्रीरंगा ।।
तुजसाठी केला पाक । माया मजवरी राख ।।
जगले मी तुजपायी । राहो चित्त तुझे ठायी ।।
लाविलीस मज गोडी । नामरूपाची आवडी ।।
आज येथे माझे घरी । तुका पांडुरंगा परी ।।
ह्मणे काशी तुझे तुज । रांधियले ऐसे भोज ।।

काशीबाईने आग्रह करकरून जेवण वाढले. मंडळी जेवून आणि काशीबाई वाढून तृप्त झाली. जेवणानंतर काशीबाईने ओसरीवर दोन पाट पूर्वेकडे तोंड करून मांडले आणि तुकोबांना सपत्नीक त्यावर बसविले. पुतणीला बाहेर बोलावले आणि तिच्याकरवी आवलीबाईची खणानारळाने ओटी भरली. स्वहस्ते तुकोबांना धोतर दिले आणि दोघांच्या पायी पडली. म्हणाली,

लोकांना पंढरपूरला जावं लागतं आणि विठोबारखुमाई माझ्याकडे जेवायला येतात अशी मी भाग्याची आहे.

तुकोबा आणि आवलीबाई उठले आणि म्हातारीच्या पाया पडले व म्हणाले,

म्हातारे, फार केलंस हो..

हा सारा सोहळा पाहात आबा, नारायण बाजूला उभे होते. म्हातारीने आबाला आणि नारायणालाही उपरणे दिले. आबा पाया पडला, त्याला म्हातारी म्हणाली,

धरला विषय सोडू नको, तुला हवे ते मिळो!

मागोमाग नारायण पाया पडला, त्याला आशीर्वाद मिळाला,

तुला गाणे येते तसे कीर्तनही येवो!

तुकोबांच्या चेहेऱ्यावर स्मित उमटले आणि आबा चटकन बोलून गेला,

आज कीर्तनच तर हुतं बुवांचं. मानसं कसली खूष झाली त्येंच्यावर. भली गर्दी नंतर. जो तो म्हनतुया, आमच्या बी गावी या कीर्तनाला.

म्हातारी म्हणाली,

असं होय? मला वाटलं गाणंच झालं. काय सांगू आबा, ह्या तुक्याचं कीर्तन झालं की माझ्याच घरावरून लोक जातात. म्हणत असतात, आज तुकोबांनी हे सांगितलं, आज तुकोबांनी ते सांगितलं. आज पण सगळे इथूनच गेले. म्हणत होते, हे बुवा चांगले गातात! आज हे गायले, ते गायले. गातही होते कुणी कुणी.

नारायण गोरामोरा झाला, तुकोबा म्हणाले ,

म्हातारे, तुझा स्वयंपाक सौम्य होता, हे बोलणं जरा तिखट झालं..

म्हातारी म्हणाली,

तूच सांग आता त्याला समजावून. मोठा कीर्तनकार हो म्हणावं.

तुकोबा म्हणाले,

सांगतो हो. आता निघतो आम्ही. फार छान जेवलो आम्ही.

असे म्हणून मंडळी बाहेर पडली. थोड्या अंतरावर एक वडाचा पार लागला तो पाहून तुकोबा आबाला म्हणाले,

आबा, मंडळींना घरी सोडा आणि या परत.

आवलीबाई म्हणाल्या,

फार नका हो बोलू नारायणाला आणि लवकर या घरी. फार वाट पाहायला लावू नका. आज चंद्र बराच आहे पण शेवटी अंधारचीच वेळ.”

तुकोबांनी मान डोलावली. तुकोबा पारावर बसले आणि नारायणाला म्हणाले,

बसा!

नारायण काही बसला नाही, उगी उभाच राहिला. तुकोबा म्हणाले,

म्हातारीचं बोलणं लागलं ना? वाईट वाटलं असेल….

नारायण खालच्या आवाजात म्हणाला,

वाईट थोडं वाटलं पण नवल अधिक वाटलं. आजवर कुणी बोललं नव्हतं हे मला. सगळे म्हणतात मी छान कीर्तन करतो…

तुकोबांचा आवाज किंचित कठोर झाला,

लोक म्हणतात तुम्ही छान कीर्तन करता आणि तुम्हाला ते खरे वाटते! म्हणायचे तर लोक तसे म्हणतात हे तुम्हाला आवडते! जे लोकांना आवडते ते तुम्ही लोकांना देता आणि तुम्हाला आवडते ते लोक तुम्हाला देतात! अशी ही परस्परसंमतीने चाललेली देवाणघेवाण आहे! नारोबा, कौतुकाच्या आशेने तुम्ही कीर्तनाचा बाजारच मांडलात!

 

आशाबद्ध वक्ता । धाक श्रोतयाच्या चित्ता ।।
वायां गेलें तें भजन । उभयतां लोभी मन ॥
बहिर्मुख एके ठायीं । तैसें जालें तया दोहीं ॥
माप तैसी गोणी । तुका ह्मणे रितीं दोन्ही ॥

 

नारोबा, कीर्तन करणे ही काही सामान्य गोष्ट नव्हे. व्रत आहे ते. समाजसुधारणेचे व्रत….

क्षणभर थांबून तुकोबांनी आवाज अजून तीक्ष्ण केला आणि ते पुढे म्हणू लागले,

नारोबा, कीर्तनाचा बाजार मांडू नका आणि तिची गाण्याची सभाही करू नका. कीर्तन कीर्तनासारखेच झाले पाहिजे. त्यातून लोकांना काही बोध झाला पाहिजे. तो लोकांनी ऐकावा म्हणून गायनाचा वापर साधन म्हणून करा. आपले गाणे लोकांना आवडते, मग लोक गर्दी करतात म्हणून गाण्यावर गाणी म्हणू लागला तर तो कीर्तनकार कसला? आज तुम्ही किती गायलात! तुम्हाला सांगायचे काहीच नव्हते! गायचे मात्र होते! दोन गाणी जोडायला म्हणून लागेल तेवढे बोललात! बरे बोललात त्याचा तरी काय मेळ होता? नाम घ्या म्हणत होतात, सांगत होतात, नामाचा अनुभव घ्या! म्हणजे काय हो? आणि नारोबा सांगा, आजच्या तुमच्या कीर्तनाचा विषय काय होता तो?

नारायण म्हणाला,

नाम घ्या ही संताची शिकवण आहे असा विषय होता…

तुकोबा उत्तरले,

असे का? मग ‘देवाचिये द्वारी उभा क्षणभरी’ हा अभंग पूर्वरंगाला का घेतलात?

नारायणाने उत्तर दिले,

हरि मुखे ह्मणा हरि मुखे ह्मणा असा त्यात नामाचा उपदेश आहे…

तुकोबा समजावणीच्या सुरात म्हणाले,

नारोबा, अभंग लावणे ही इतकी काही सोपी गोष्ट नव्हे. एकेका अभंगावर तुम्ही कष्ट केले पाहिजेत.

 

अर्थाविण पाठांतर कासया करावें । व्यर्थ चि मरावें घोकूनियां ॥
घोकूनियां काय वेगीं अर्थ पाहे । अर्थरूप राहे होऊनियां ॥
तुका ह्मणे ज्याला अर्थी आहे भेटी । नाहीं तरी गोष्टी बोलों नका ॥

 

जो अभंग तुम्ही पूर्वरंगाला घेतलात तो तुम्ही जनांस समजावून सांगितला पाहिजे. दाखले द्यायचे ते त्या अभंगातील विषय लोकांपर्यंत पोहोचावा म्हणून. मार्ग सांगायचे ते लोकांना तो विषय साधावा म्हणून. नारोबा, ज्ञानदेव महाराजांनी त्या एकाच अभंगात ही सारी किमया कशी केली आहे ते पाहा. अभंगात असा सिद्धांत मांडला आहे की जो देवाच्या दारी क्षणभराकरिताही उभा राहील तो बंधमुक्त होईल. हा काही साधा सोपा विषय नव्हे. तुम्ही तो टाळलातच! अभंगाचा पुढचा चरण म्हणतो, हरिनाम घेणे हा देवाच्या दारी जाण्याचा मार्ग आहे. तो संसारात राहूनही साधता येईल. असा मार्ग सांगून ज्ञानदेवांनी शेवटी दाखला दिला आहे की कृष्णाची आठवण सतत ठेवल्यामुळे तो द्वारकेचा राणा नेहमी पांडवांघरी गरजेला उभा राहिला. असा अर्थ लावून, तो अखंड मनात धरून तुम्ही तुमचे कीर्तन रंगविले पाहिजे नारोबा. लोक कंटाळू नयेत म्हणून काही चुटके सांगावे, अधूनमधून गावे पण सूत्र सोडून वाहावत जाऊ नये. तुमचे आजचे कीर्तन रंगतदार पण अर्थहीन झाले. जिथे गीतांचे अभंग व्हायचे तिथे तुम्ही अभंगांची गाणी केलीत. बोध लांब राहिला आणि तुमचा आवाज मनात ठेवून लोक घरी गेले! म्हातारीने ते पाहिले आणि तुम्हाला बोल बसला!

इतके बोलून झाल्यावर मागे वळून पाहतात तो चोरपावलांनी आबा येऊन उभा.

आलात का आबा तुम्ही? चला आता जाऊ या घरी.

असे म्हणत तुकोबा पारावरून उठून उभे राहिले.

===

(साताऱ्यातील दैनिक ऐक्यच्या सौजन्याने त्यांच्या रविवार पुरवणी ‘झुंबर’ ह्यात प्रकाशित होणारी ‘जाऊ तुकोबांच्या गावा’ ही लेखमाला पुन:प्रकाशित करत आहोत.)

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?