' आज चाहत्यांचं लाडकं ठरलेलं हे गाणं त्याकाळी 'हिटलरच्या साम्राज्याला हादरे' देत होतं...

आज चाहत्यांचं लाडकं ठरलेलं हे गाणं त्याकाळी ‘हिटलरच्या साम्राज्याला हादरे’ देत होतं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

===

कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे भारतीय प्रेक्षकांच्या विचारांच्या कक्षा रुंदावल्या. बराच वेळ हातात असल्याकारणाने वाचन, चिंतन वाढले आणि याबरोबरच इतर देशातल्या कलाकृतींचा आस्वाद घेणेसुद्धा वाढले.

या कठीण काळात नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मने भारतीय लोकांचा नेटफ्लिक्स कडचा वाढता ओघ पाहून कमीत कमी किंमतीत नेटफ्लिक्सचा पर्याय उपलब्ध करून दिला आणि एक चाकोरीबद्ध मनोरंजन अनुभवणारा प्रेक्षक इतर देशातल्या वेगवेगळ्या कलाकृतींचा आनंद घेऊ लागला.

नेटफ्लिक्सवर जगभरातून वेगवेगळ्या देशांच्या वेब सिरिज, सिनेमे रिलीज होत असतात. त्यापैकीच फार कमी कालावधीत भारतात सर्वात जास्त लोकप्रिय झालेली सिरिज म्हणजे स्पॅनिश भाषेतली ‘मनी हाईस्ट’!

याच सिरीजचा शेवटचा भाग आता प्रदर्शित होत आहे. आता शेवटचा भाग येतोय, तर मग पुन्हा एकदा चर्चा तर होणारच!!!

 

money heist inmarathi

 

सर्वप्रथम ही सिरिज स्पॅनिश आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेत उपलब्ध होती, पण नंतर जसजसं अधिकाधिक भारतीय लोक या सिरिजला पसंती देऊ लागले तसं त्यांनी ही सिरिज हिंदीमध्येसुद्धा उपलब्ध करून दिली.

===

===

जेव्हा ही सिरिज हिंदीत उपलब्ध झाली तेव्हापासून आजपर्यंत ही सिरिज भारतातली सर्वात पाहणाऱ्या वेबसिरिजच्या लिस्टमध्ये आहे. एकंदरच यातली पात्र, त्यांचे मनसुबे, सिस्टिमविरुद्ध त्यांचा राग, त्यांच्या चोरी करण्याच्या अतरंगी पद्धती, दाली मास्कची क्रेझ हे सगळंच लोकांना प्रचंड आवडलं!

त्याहीपेक्षा सर्वात जास्त लोकप्रिय झालं ते यातलं एक लोकगीत, हे ऐकूनच आपल्यापैकी कित्येकांच्या ओठांवर त्या गाण्याचे ते शब्द आले असतील हे नक्की, होय होय तेच “बेला चाओ” गाणं!

 

bella ciao inmarathi

 

या गाण्याचे शब्द कोणालाही समजले नसतील पण या गाण्याची चाल आणि एकंदर ठेका बघता हे २ शब्द प्रत्येकाच्या तोंडात बसले आणि कित्येक लोक सहज ते गाणं गुणगुणू लागले! काहीसं मागे पडलेलं हे गाणं, आता शेवटच्या भागाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सगळ्यांच्या ओठावर रेंगाळू लागलं आहे.

हे लोकगीत कोणी म्हंटले? यामागचा इतिहास काय? या गाण्याने संपूर्ण जगात क्रांति कशी घडवून आणली? या सगळ्या गोष्टी आपण या आजच्या लेखातून जाणून घेणार आहोत!

शेती करणाऱ्या महिला मजुरांनी या गाण्याची सुरुवात केली होती :

१९ व्या शतकात इटलीच्या उत्तर भागातील भाताची शेती करण्याऱ्या शेतातल्या महिला मजूर हे गाणं गात असत. इटलीच्या या भागात तांदूळ आणि इतर धान्याची शेती होत असे, आणि शेतात काम करण्यासाठी गरीब महिलांना आणलं जायचं.

अतिशय हालाखीच्या परिस्थितित त्यांना इथे ठेवलं जायचं, शेतात काम करताना त्यांच्या पायात चपला नसायच्या शिवाय काम करताना त्यांच्या पाठीवर बरंचसं सामान लादलं जायचं आणि एवढं राबवून घेऊनसुद्धा त्यांना म्हणावा तसा मोबदला मिळत नसे.

 

bella ciao farmers inmarathi

 

यामुळेच आपल्या मालकांच्या विरोधात या महिला “बेला चाओ” हे गाणं म्हणत असत. खरंतर या लोकगीताचे शब्द बरेचसे वेगळे होते. या गाण्यातून त्या महिला त्यांच्या वेदना व्यक्त करत असत.

“आम्ही सकाळी उठतो, शेतात कामाला जातो, आमचा मालक लाठी घेऊन उभा असतो, इथे तासंतास काम करून आमच्या आयुष्यातले मोलाचे क्षण विसरलो आहोत, पण एक दिवस आम्हीसुद्धा स्वतंत्र होऊन काम करू” असा एकंदर त्या गाण्याचा अर्थ होता.

दुसरे महायुद्ध, विद्रोह आणि बेला चाओ :

जेव्हा १९३९ मध्ये जर्मनीच्या हुकूमशहा एडोल्फ हिटलरने दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात केली त्यावेळेस इटलीचा शासक मूसलोनी यानेसुद्धा हिटलरला पाठिंबा दिला होता आणि तो या महायुद्धात हिटलरच्या बरोबरीने उभा ठाकला.

 

hitler mussolini inmarathi

 

मुसोलिनीच्या या निर्णयामुळे इटलीचे बरेच नागरीक नाखुश होते, त्यांना हे अजिबात पटलेलं नव्हतं.

१९४३ सालापर्यंत महायुद्धामुळे इटलीबरोबरच जर्मनीचाही पाडाव जवळ येत होता, एकंदरच युद्धजन्य परिस्थितिमुळे दोन्ही देशांमध्ये बराच असंतोष पसरला होता. 

इटलीची परिस्थिति बघता तिथल्या राजा विक्टर एमॅन्युएल तिसऱ्याने मुसोलिनीला अटक केली आणि इतरांना शस्त्र टाकण्यास सूचित केले. जेव्हा हिटलरला हे समजलं तेव्हा इटलीवर हल्ला करून बऱ्याच भागांवर त्याने वर्चस्व प्रस्थापित केलं.

===

===

हिटलरच्या या कृत्यामुळे Italian Resistance movement ची सुरुवात झाली, या आंदोलनात सहभागी झालेल्या लोकांना पार्टीसन्स म्हंटलं जायचं. हिटलरच्या फासिस्ट सरकारच्या विरोधात प्रोटेस्ट अंथम म्हणून “बेला चाओ” या गाण्याचा वापर केला जाऊ लागला.

 

italian resistance movemen inmarathi

 

यानंतर इटलीच नव्हे तर साऱ्या जगभरात फासिस्ट सरकारच्या विरोधात हे गाणं म्हंटलं जाऊ लागलं.

“बेला चाओ” चा नेमका अर्थ आहे तरी काय?

“एक दिवस मी उठलो, गुडबाय ब्युटीफुल,

आणि एक दिवस मला माझ्या देशात आक्रमणकारी दिसले, मी त्यांच्याशी युद्ध करायला जातोय

मला वाटतं लवकरच मला मृत्यू कवटाळणार आहे”

अशाप्रकारे या एका गाण्याने अत्याचारी सिस्टिम विरोधात एक चळवळ उभी केली आणि हळू हळू साऱ्या जगात या गाण्याकडे क्रांति घडवणारे गाणे म्हणून बघितले जाऊ लागले!

मनी हाईस्ट या वेबसिरिजमध्ये बऱ्याच ठिकाणी हे गाणं आणि यातली कडवी तुम्हाला ऐकायला मिळतील, लवकरच या सिरिजचा शेवटचा सीझन रिलीज होणार आहे!

 

money heist 2 inmarathi

 

तो बघताना जेव्हा हे गाणं कानावर पडेल तेव्हा नक्कीच हा सगळा इतिहास तुमच्या डोळ्यांसमोर उभा राहील!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?