' पुरुषी अहंकार अधोरेखित करून, स्त्रियांचं समाजातील (खरं) स्थान दाखवणारा अनुभव!

पुरुषी अहंकार अधोरेखित करून, स्त्रियांचं समाजातील (खरं) स्थान दाखवणारा अनुभव!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

लेखक – शरदमणी मराठे

===

काही आठवड्यांपूर्वी मित्रमंडळींनी “ग्रेट इंडियन किचन” या मल्याळम भाषेतील सिनेमाबद्दल सांगितले. त्याच सुमारास लोकमाध्यमांत ह्याविषयीचे लेखनही वाचण्यात आले. सिनेमा आवडल्या – नावडल्याची चर्चाही वाचली. नुकताच मी हा सिनेमा बघितला. मला तो ठीक वाटला. सिनेमाची प्रशस्ती ‘स्टार’ च्या आकड्यात सांगायची प्रथा आहे. साधारण पाच पैकी किती स्टार ह्या सिनेमाला देता येतील? मी एक प्रेक्षक म्हणून ह्या सिनेमाला अडीच किंवा तीन स्टार देईन.

एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की हा सिनेमा केरळमधल्या एका विशिष्ट घराची कहाणी दाखवतो. मी तरी सिनेमा बघताना तो त्या-त्या नायकाचा/ नायिकेचा सिनेमा म्हणूनच बघतो. मध्यवर्ती भूमिकेच्या भोवती घडणारे कथानक आणि ते आपल्या पर्यंत आणणारे माध्यम म्हणजे सिनेमा.

 

film poster inmarathi

 

त्या दृष्टीने पाहिले तर एका पारंपारिक विचार असलेल्या घराची आणि त्या घरात नवीनच लग्न होऊन आलेल्या सुनेची ही कहाणी आहे. सगळे बसल्याजागी मिळावे ही अपेक्षा असलेला सासरा, त्या अपेक्षा पूर्ण करणारी त्याची पत्नी म्हणजे सासू आणि शिक्षक असलेला पण ह्याच घराच्या पठडीत वाढलेला तिचा नवरा असा हा परिवार आहे.

“आपण नोकरी करतो, पैसे मिळवतो, म्हणजे आपण आपली जबाबदारी पूर्ण करतो” अशी नवऱ्याची समजूत आहे असे दिसते. म्हणजे अश्या अर्थाचे संवाद नाहीत, पण त्याच्या देहबोलीतून आणि बायको कडून असणाऱ्या अपेक्षांवरून ते दिसून येते. त्यामुळे, नोकरी करणारा नवरा आणि त्याचा निवृत्त बाप यांनी, ‘बाहेरची कामं’ ती आपली आणि त्या व्यतिरिक्त ‘घरातली कामं’ नावाचं एक भलंमोठं गाठोडं हे सासु-सुनेचे अशी काहीशी वाटणी मनात केलेली दिसते.

लग्न झाल्यानंतरच्या नवलाईचे काही मोजके दिवस नायिकेला ‘तिच्या कामातून’ काहीशी सुट्टी मिळते. सासुबाई त्यांच्या लेकीकडे जाण्याचे कारण घडते आणि रांधा, वाढा, उष्टी काढा, घराची सफाई करा, भांडी घासा, कपडे धुवा, ही सगळी कामाची यादी या नव्या नवरीच्या वाट्याला येते. त्या दिवसभराच्या न संपणाऱ्या घाण्यामध्ये नायिकेची होत असणारी घुसमट हा सिनेमाभर व्यापून राहिलेला भाग आहे.

 

bedroom inmarathi

हे ही वाचा – जगातील अशी काही ठिकाणं जिथे स्त्रियांना नाही तर पुरुषांना आहे ‘नो एण्ट्री’

मला काही वेळ घरकामाच्या यादीतील तोच तोच पणा बघून कंटाळवाणे झाले. विचार आला आपण हे सलग अर्धा तास सुद्धा बघू शकत नाही ते ही नायिका दिवसभर कसे करत असेल? कदाचित तेच ठसवण्याचा दिग्दर्शकाचा हेतू असावा. त्यातून केरळमधील उतरत्या छप्पराचे पारंपारिक घर, आधुनिकतेचा लवलेश नसणारे स्वयंपाकघर, त्या भोवती घुटमळत राहणारे त्या घरातील स्त्रीविश्व, खास केरळी प्रकारचे खाद्यपदार्थ असे सातत्याने आणि दीर्घकाळ एक अनुभव म्हणून समोर येत राहते. एक वेगळ्या धाटणीचा प्रयोग म्हणून तसे त्यांनी केले असावे. त्यामुळे ती सगळी घुसमट झुगारून देऊन नायिका स्वत:ची ओळख निर्माण करते तो भाग अगदी वेगवान व काही मोजक्या मिनिटात संपणारा झाला आहे.

 

kitchen inmarathi

 

घुसमट झुगारून देण्याचा ‘ट्रिगर’ म्हणून नवऱ्याने-सासऱ्याने धरलेले अय्यपा देवाचे व्रत, त्या कर्मकांडात सुनेकडून असणाऱ्या अपेक्षा, त्याचवेळी शबरीमला मंदिर प्रवेशासाठी केरळ परिसरात सुरु असणारे आंदोलन वगैरे गोष्टी दाखवल्या आहेत. सिनेमा घडत असणाऱ्या केरळची पार्श्वभूमी लक्षात घेता नायिकेच्या बंडखोरीचा ‘ट्रिगर’ म्हणून ह्या साऱ्या गोष्टी समजू शकण्यासारख्या आहेत. हे धार्मिक व वादग्रस्त विषय वगळूनही हा सिनेमा पुरेसा प्रभावी करता आला असता असे मला वाटले ही गोष्ट वेगळी.

भारतीय सिनेमांत हिंदूंच्या धार्मिक/ सामाजिक परंपरा यांच्या बद्दल विशेष टीकात्म दृष्टीने चित्रण केले जाते असे माझे मत आहे. तो टीकात्म दृष्टीकोन अन्य धर्मीय परंपरा/ प्रथा यांच्याबाबत देखील तसाच दिसला असता तर न्यायपूर्ण झाले असते पण तसे घडताना दिसत नाही. पण ह्या बद्दल अधिक सविस्तर आणि स्वतंत्र पणे लिहायला हवे.

त्यामुळे जरी एका घराची किंवा एका मध्यवर्ती भूमिका असणाऱ्या नायिकेची गोष्ट सांगितली गेली असली आणि जरी भारताच्या केरळ सारख्या दक्षिणेकडील राज्यात ती घडत असली तरी काही सामाजिक मुद्दे समोर आणण्यात हा सिनेमा यशस्वी ठरला आहे असे नक्कीच म्हणता येईल. जसे, मराठी मध्ये १९८२ मध्ये आलेला उंबरठा सिनेमा ही म्हटले तर ‘सुलभा महाजन’ ह्या व्यक्तिरेखेची कहाणी होती, पण तरीही ‘महिलेची समाजात होणारी घुसमट’ समाजासमोर धीटपणे आणणारा तो प्रातिनिधिक सिनेमा ठरला.

ग्रेट इंडियन किचन’ सिनेमाच्या बाबतीत देखील असे निश्चितपणे म्हणता येईल. भारतीय महिलांचा स्वयंपाक घर आणि घरकामात जात असलेला मोठा काळ हे वास्तव नाकारता येणारे नाही. आजवर समोर आलेली अनेक सर्वेक्षणे ह्याकडेच लक्ष्य वेधत आहेत.

 

umbartha inmarathi

 

सुमारे सहा वर्षांपूर्वी जर्मनीतील एका बाजार संशोधन करणाऱ्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात असे दिसून आले की भारतीय लोकांचे आठवड्यातील सुमारे १३ तास स्वयंपाकघरातील कामात जातात तर जागतिक सरासरी ६ तास अशी आहे. सर्वेक्षणात उल्लेख ‘भारतीय लोक’ असा असला तरी ह्यातील बहुतांशी वाटा हा महिलांचा असतो हे आपल्याला मान्य करावेच लागेल.

सिनेमात दाखवल्याप्रमाणे स्वयंपाकाव्यतिरिक्त घरातील सफाई, धुणी-भांडी घरातील महिलांनाच करावी लागतात असे प्रमाणही भरपूर असावे. शेतीप्रधान समाज व्यवस्थेत कधीतरी ‘बाहेरची कामे’ आणि ‘घरातली कामे’ अशी वर्गवारी झाली असेल. पण शेतीप्रधान अवस्थेतून समाज उद्योगप्रधान अवस्थेत गेला. शहरात आला. यंत्र-तंत्र यांच्यामुळे ‘बाहेरची’ कामे सुकर होत गेली. युनियन-बाजी, कर्मचारी फ्रेंडली धोरणे, ऑटोमेशन, यामुळे ‘बाहेरच्या’ कामांमधले श्रम कमी-कमी होत गेले, कामाचे तास ठरले. पण घरातले श्रम तसेच राहिले आणि महिला ते श्रम करीतच राहिल्या. गॅस स्टोव्ह, मिक्सर, प्रेशर-कुकर सारख्या ‘सोयी’ गृहीत धरल्या तरी महिलांच्या श्रमाचे प्रमाण कमी झालेले नाही.

५० किंवा ६० च्या दशकांत, गिरगावातून फोर्टमधील कार्यालयात कामासाठी नऊच्या सुमारास गेलेला नवरा दिवसभराच्या कामाने ‘दमून’ सहा-साडे सहा वाजता घरी यायचा तेव्हा ‘दमून’ आलेल्या नवऱ्याच्या कलाकलाने घेत, त्याचा सगळा तऱ्हेवाईकपणा त्याची पत्नी कर्तव्यभावनेने सहन करायची. पुढे ७० च्या दशकानंतर मोठ्या संख्येने महिला ऑफिसांमध्ये काम करू लागल्या आणि काम करून किती ‘दमायला’ होते त्याचे पुरुषांचे पितळ उघडे पडले. तरीही त्यानंतरच्या महिलांच्या काही पिढ्या मुलांच्या जबाबदाऱ्या, घरचे काम, कुळाचार आणि ऑफिस अशा सर्व गोष्टी मोठ्या तडफीने करत राहिल्या आणि पुरुष मात्र अडीअडचणीला ‘बाहेरच्या’ पोळ्या खाव्या लागतात म्हणून कुरकुरत राहिला.

जसा “ग्रेट इंडियन किचन” सिनेमातील सासरा मिक्सरमध्ये केलेल्या चटणी बद्दल, प्रेशर कुकर मध्ये शिजवलेल्या भाताबद्दल आणि वॉशिंग मशीन मध्ये धुतलेल्या कपड्यांच्या बद्दल कुरकुरत राहतो. त्यामुळे महिला आणि पुरुष यांच्यात श्रमाच्या कामांची विषम विभागणी ही समस्या खरी आहे. ती सामाजिक समस्या आहे. केवळ महिलांची समस्या नाही.

 

family inmarathi

 

महाराष्ट्रातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान’ ह्या संस्थेने गावागावांत मोठ्या प्रमाणावर बायोगॅस संयंत्र उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले, मार्गदर्शन केले प्रत्यक्ष उभारणी आणि देखभाल ह्यामध्ये मदत केली. त्यातून घराघरात निळ्या ज्योतीच्या शेगड्या आल्या, प्रेशर कुकर आले. महिलांचा रोज तास-दोन तास वेळ वाचू लागला. त्यातून महिलांनी शिवण, अन्नप्रक्रिया, शिकवण्या, कोंबडी पालन, परसबागेत भाज्यांची लागवड असे कितीतरी उपक्रम हाती घेतले आणि घराच्या मिळकतीत हातभार लावला. त्यातून आत्मविश्वास मिळालेल्या महिला बचत गट, सामाजिक उपक्रम यात सहभागी होताना दिसत आहेत. सदर संस्थेचे काम असलेल्या काही गावांत तरी हा बदल घडताना दिसत आहे.

आज मोठ्या शहरातील काही घरात तरी, स्वयंपाक आणि घरातील कामे ह्या आघाडीवर पुरुष सहभागी होत असल्याचे स्वागतार्ह चित्र दिसत आहे. हे चित्र बदलाची नांदी आहे असे आपण नक्की म्हणू शकतो. तरीही हे चित्र प्रातिनिधिक आहे असे म्हणता येणार नाही. आजही घराघरांत स्वयंपाक आणि घरातील कामे ह्यात स्त्री-आणि पुरुष यांत होणारे कामांचे वाटप, श्रम-विभागणी विषम स्वरूपाची आहे. आणि ह्या विषम विभागणी मागे पुरुषसत्ताक समाज व्यवस्था आणि पुरुषी अहंकार हे कारण आहे. हा सिनेमा ह्या सामाजिक समस्येला यशस्वीपणे अधोरेखित करतो आहे.

हे ही वाचा – असं समजून घ्या तुमच्या बायकोला! वाद टळतील, प्रेमही वाढेल

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?