' आज प्रसिद्ध ब्रँड बनलेल्या या साड्या, फक्त खास पाहुण्यांना भेट म्हणून दिल्या जायच्या!! – InMarathi

आज प्रसिद्ध ब्रँड बनलेल्या या साड्या, फक्त खास पाहुण्यांना भेट म्हणून दिल्या जायच्या!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

साड्या म्हणजे बायकांचा जीव की प्राण, पुलंनी म्हंटलच आहे की, बनारसी, कांजीवरम हे निव्वळ पुरुषांना छळण्यासाठी जन्माला आले आहेत. आज या साड्यांची क्रेझ फक्त बायकांमध्ये नसून अगदी आजकालच्या तरुणींनादेखील आहे. सणवार असो किंवा लग्नसराई मुली  साड्यांमध्येच जास्त दिसतात.

नवरे मंडळी सुद्धा कामानिमित्त कोलकाता, बंगलोरला गेली की हमखास येताना बायकोसाठी तिकडची साडी आठवणीने आणतात, साडी आणायचा जर विसर पडला तर पुढच्या ट्रीपमध्ये जास्त साड्यांचा भर नवरेमंडळींना पडतो.

मध्यप्रदेशचा ‘माहेश्वरी साडी’ हा आज एक जगप्रसिद्ध ब्रँड झाला असून, तो पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. या साड्या सुबक, टिकाऊ आणि उत्कृष्ट रंगसंगती असल्यामुळे फार लोकप्रिय आहेत.

भारतातील दिल्ली, मुंबई शिवाय अनेक छोटे मोठे रिटेल आउटलेट्स याव्यतिरिक्त या साड्यांना फ्रांस, जर्मनी आणि युनायटेड किंगडम (UK) या देशांत विशेष मागणी आहे.

एका महेश्वरी साडीची किंमत १५०० रुपयांपासून सुरु होऊन ५ ते ६ हजारांपर्यंत वाढत जाते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर माहेश्वरी साड्यांची मागणी भारतात आणि जगभरात प्रचंड घसरली होती.

 

maheshwari sarees inmarathi

 

या साड्यांमधून महेश्वरचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपला जातो आणि तो पुढेही जपला जावा, या जाणिवेपोटी एक जगप्रसिद्ध ब्रँड उदयास आला आहे.

===

हे ही वाचा – कुणाचं काय तर कुणाचं काय! ब्रँडचं उलटं नाव आकर्षित करतं कोट्यवधींचा रेव्हेन्यू!

===

या एका साडीशी कोणता इतिहास जोडलेला आहे, तिला इतकं महत्व का दिलं जातं, ते आज आपण पाहणार आहोत.

माहेश्वरी साडीचा इतिहास

अठराव्या शतकात, अहिल्याबाई होळकर जेव्हा मध्यप्रदेशावर शासन करीत होत्या, तेव्हा त्यांनी रोजगार निर्मितीसाठी आणि आपल्या भेटीसाठी येणाऱ्या राजघराण्यातील पाहुण्यांना एखादी छानशी भेटवस्तू द्यावी या उद्देशाने माहेश्वरी साड्यांची निर्मिती सुरु केली होती.

 

ahilyabai holkar inmarathi

 

होळकरांची राजधानी “महेश्वर” गावी या साड्यांच्या निर्मितीचे काम सुरु झाल्याने, या साडीला “महेश्वरी साडी” असे नाव देण्यात आले.

अहिल्याबाईंच्या आग्रहावरून सुरत, मंडू, आणि मालव्यातून अनेक कुशल कारागीर बोलावण्यात आले. या कारागिरांच्या कौशल्याची छटा आपल्याला साड्यांच्या डिझाइन्समध्ये दिसते.

ही माहेश्वरी हातमागावरची साडी मूळात रेशीम वापरून बनवली जात असे. काळानुसार त्यात सुत आणि लोकरीचा वापर केला जाऊ लागला. साडीचे डिझाईन अहिल्यादेवींच्या शांत, सय्यमी आणि शोभिवंत व्यक्तिमत्वाला लक्षात घेऊन करण्यात आले होते. साडीचा पदर तेवढा सोडला तर, संपूर्ण साडी साधी म्हणजेच प्लेन ठेवली गेली. फक्त पदरावर कलाकुसर आणि नक्षीकाम केले जायी.

महेश्वरगडाच्या भिंतींवरील कोरीव कलाकृतींवरून प्रेरित होऊन या कारागिरांनी साड्यांवरील डिझाईन तयार केले होते. त्यात चटई, विटा, चमेलीची फुलं आणि हिऱ्यांच्या डिझाइन्सचा समावेश होता. अत्यंत सुंदर आणि आकर्षक पद्धतीने ही सगळी चित्रे साडीवर रेखाटली गेली होती.

 

maheshwari saree design inmarathi

 

याशिवाय काही साड्यांच्या पदरावर फक्त चौकड्यांचे नक्षीकाम करण्यात आले. वेगवेगळ्या प्रकारचे पट्टे, चौकड्या, रेषा असलेल्या साड्या सुद्धा तयार केल्या जाऊ लागल्या.

साड्यांच्या डिझाईनवरून साड्यांचे प्रकार ठरवले गेले. चंद्रकला, बईंगनी चंद्रकला हे अत्यंत सध्या, प्लेन माहेश्वरी साड्यांचे दोन प्रकार आहेत. तर चंद्रतारा, बेली आणि परबी हे पदरावर चौकडी आणि वर नमूद केलेल्या डिझाइन्सच्या साड्यांचे प्रकार आहेत.

या साड्यांची एक विशेष रंगसंगती ठरवण्यात आली होती, ज्यात गडद रंगांचा मोठ्याप्रमाणात वापर केला जात असे. डाळिंबी, गुलबक्षी, जांभळा, तपकिरी, राणी, आम्रक, काशी, धानी, हे रंग प्रामुख्याने वापरले जात. आणि साड्यांना रंगवण्यासाठी वनस्पतींपासून तयार केल्या जाणाऱ्या रंगाचा वापर केला जात होता.

===

===

माहेश्वरी साडी नऊवारी असून वजनात फारच हलकी आणि रेशमी असल्याने फार मऊ असायची. सोनेरी आणि चांदीच्या रंगांच्या दोऱ्यांचा सुद्धा विशेष वापर या साडीत केला जात असे. या सुंदर साडीचं सौंदर्याव्यतिरिक्त आणखी एक वैशिष्ट्य होतं. आपल्या साध्या साडीला एकीकडूनच पदर असतो, डिझाईन एकीकडूनच असतं, पण माहेश्वरी साडीला जाणूनच दोन्ही बाजूंनी पदर ठेवण्यात आले होते.

यामागचं कारण असं, की एका बाजूने खराब झाल्यास, त्यावरील काम अस्पष्ट किंवा दोरे निघाल्यास साडीची टोकं बदलून, दुसऱ्या बाजूने सुद्धा साडी वापरता येत असे. त्यामुळे या साड्या इतर साड्यांच्या तुलनेत अधिक काळ टिकून राहायच्या. आजदेखील ही पद्धत बदललेली नाही.

आजही नऊवारी महेश्वरी साडीच्या दोन्ही बाजूस पदर ठेवले जातात. इतक्या सगळ्या गुणांमुळे खरेदी करताना आपण खर्च केलेल्या पैशाचं समाधान ग्राहकाला मिळतं.

 

maheshwari saree design 1 inmarathi

 

अहिल्यादेवींनी सुरु केलेल्या साड्यांच्या या उद्योगाने हातमागावरच्या अनेक कामगारांना रोजगार प्राप्ती झाली आणि गावात सुख समृद्धी नांदू लागली.

असे म्हणतात पहिल्या महेश्वरी साडीचे संकल्पचित्र स्वतः अहिल्याबाई होळकरांनी काढले होते. नंतर त्यांची आवड लक्षात घेऊन, एका सुंदर पुष्पाचं पुढे साड्यांच्या अनेकविध डिझाईन करून कारागिरांनी एका सुंदर पुष्पगुच्छात रूपांतर केलं.

असा बनत गेला ब्रँड

इतका सुंदर वारसा काळाच्या पडद्याआड जातोय या काळजीने दोन तरुणांना पार ग्रासून टाकलं आणि यातूनच “रेहवा” नावाच्या नॉन – प्रॉफिट ऑर्गनायझेशनची सुरुवात झाली.

रेहवा संस्था सुरु करणारे दोघे म्हणजेच रिचर्ड शिवाजीराव होळकर आणि सॅली होळकर. यांनी लुप्त होत असलेल्या या सुंदर कलाकृतीत नव्याने प्राण फुंकले आणि महेश्वरगडावरच आपल्या हातमागावरच्या महेश्वरी साड्यांची पुन्हा एकदा नव्या जोमाने निर्मिती सुरु केली.

 

richard and sally holkar inmarathi

 

१६० विणकर आणि इतर ३०० कामगार असलेला हा प्लॅन्ट पूर्ण जोमाने साड्यांची मागणी पूर्ण करण्याचं काम अविरतपणे करतो आहे. रेहवाचं वार्षिक उत्पन्न ४० ते ६० कोटी एवढं आहे आणि दरवर्षी ते वाढत्या प्रतिप्रदेच्या चंद्राप्रमाणे वाढतच चाललंय.

साड्यांशिवाय महेश्वरी स्टाईलच्या शालींना आणि दुपट्ट्यांना सुद्धा ग्राहकांचा भरभरून प्रतिसाद लाभलाय ज्यामुळे आता साड्यांबरोबर शाली आणि दुपट्टे सुद्धा निर्यात केले जातात.

===

===

राजघराण्यातील पाहुण्यांसाठी सुरु करण्यात आलेल्या एका साडीचा आज एवढा मोठा ब्रँड झालाय हे फार कौतुकास्पद आहेच. पण स्त्रियांच्या अगदी जिव्हाळ्याच्या साड्यांमुळे रोजगार निर्मिती सुद्धा होऊ शकते, या अहिल्याबाई होळकरांच्या संकल्पनेला मोठी दाद द्यायला हवी.

एका उत्पादनाची बाजारपेठेत मागणी निर्माण करून, तिचा खप वाढवणाऱ्या अहिल्याबाईंमधल्या अत्यंत हुशार व्यावसायिकेला आणि प्रजेवर आईसारखी माया करणाऱ्या प्रजेच्या आवडत्या राणीला मनाचा मुजरा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?