' शर्टच्या २ उघड्या बटणांपासून 'मामा' टोपण नावाच्या उगमापर्यंत: अशोक सराफांचे भन्नाट किस्से!

शर्टच्या २ उघड्या बटणांपासून ‘मामा’ टोपण नावाच्या उगमापर्यंत: अशोक सराफांचे भन्नाट किस्से!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

ज्या काळात मराठी सिनेमांनी कात टाकली होती त्या काळात या संपूर्ण मराठी सिनेसृष्टीला स्वतःच्या खांद्यावर उचलून इथवर घेऊन येणारे एक असामान्य कलाकार म्हणजे अशोक सराफ.

आज अशोक सराफ हे नाव घेतलं की आपल्यासमोर उभे राहतात ते धनंजय माने किंवा उद्योगपती यदूनाथ जवळकर ज्यांची खास खोकण्याची शैली आजही आपल्याला पोत धरून हसायला भाग पाडते!

 

ashok saraf inmarathi

 

अशोक सराफ हे मराठी इंडस्ट्रीतलं असं नाणं आहे जे आजही खणखणीत वाजतं, अगदी अजय देवगणचा सिंघमसुद्धा त्यांनी साकारलेल्या कॉन्स्टेबलशिवाय अपूर्णच वाटतो.

त्यांचे अशी ही बनवा बनवी, गंमत-जंमत, धूमधडाका, चौकट राजा, वजीर पासून एक डाव धोबी पछाड, नवरा माझा नावसाचा, मी शिवाजी पार्क पर्यंत कित्येक सिनेमे लोकं आजही आवडीने बघतात!

हे ही वाचा मराठीतला मास्टरपीस “अशी ही बनवाबनवी” एका फ्लॉप हिंदी चित्रपटाचा रिमेक होता!

बनवा बनवी आणि धूमधडाकासारखे सिनेमे तर मराठीतले कल्ट क्लासिक म्हणून गणले जातात. फक्त विनोदी भूमिकाच नाही तर गंभीर भूमिकांमध्येसुद्धा अशोक सराफ अक्षरशः घुसतात!

 

ashok saraf movies inmarathi

 

ज्या काळात अशोक सराफ यांचा उदय झाला त्या काळात बहुतेक अभिनेते हे टाइपकास्ट होत असत, म्हणजे एकाच साच्यातल्या भूमिका त्यांना ऑफर होत, पण त्याही काळात अशोक मामांनी स्वतःमधला अभिनेता कायम जीवंत ठेवला आणि विविधांगी भूमिका करून प्रेक्षकांच्या मनावर गारुड केलं!

आज अशोक सराफ यांचा वाढदिवस, तब्बल ४० वर्षाहून अधिक काळ सिनेक्षेत्रावर अधिराज्य गाजवणाऱ्या आपल्या लाडक्या अशोक सराफ यांना मामा हे नाव टोपणनाव कसे पडले? तसेच इतकं प्रतिभावान असूनही त्यांना हिंदी सिनेमाने हवा तसा सन्मान का दिला नाही? अशा काही भन्नाट गोष्टींबद्दल आपण जाणून घेणार आहोत!

बँकर ते अॅक्टर व्हाया नाटककार :

१९४७ मध्ये दक्षिण मुंबईतील चिखलवाडी इथे सर्वसामान्य कुटुंबात अशोक सराफ यांचा जन्म झाला, इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय करणाऱ्या अशोक यांच्या वडिलांची अशोकने शिकून मोठा बिजनेसमन व्हावं अशी अपेक्षा होती.

 

ashok saraf inmarathi 2

 

अर्थात अशोक यांचा ओढा हा सगळा अभिनयाकडे असल्याने आणि आपल्या वडिलांना दुखवायचं नाही म्हणून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि स्टेट बँकेत कामाला सुरुवात केली, पण अभिनयाचं वेड कायम होतंच!

अखेर रंगभूमीवर काम सुरू केल्यावर वि.स. खांडेकर यांच्या ययाती या कादंबरीवर आधारित एका नाटकात अशोक यांना एका विदूषकाची भूमिका मिळाली आणि तिथून त्यांचा अभिनेता म्हणून प्रवास सुरू झाला खरा.

पण बरीच नाटकं आणि सिनेमे करूनही त्यांना म्हणावी तशी लोकप्रियता काही मिळत नव्हती, आणि अखेरीस तो सिनेमा आला ज्याने ३ तासात अशोक सराफ यांना सुपरस्टार बनवलं, तो सिनेमा म्हणजे दादा कोंडके यांचा पांडू हवालदार!

 

pandu hawaldar inmarathi

 

तो सिनेमा आजही मराठी सिनेविश्वातला आयकोनिक सिनेमा मानला जातो, त्यानंतर अशोक मामांनी मागे वळून पाहिलंच नाही. मग लक्ष्या, महेश कोठारे, सचिन पिळगावकर अशा दिग्गज लोकांसोबत धमाल हीट सिनेमे देऊन अशोक सराफ या नावाला एक वलय प्राप्त झालं!

मामा हे नाव कसं पडलं?

एका सिनेमाच्या सेटवरचा तो किस्सा अशोक सराफ यांना ‘मामा’ बनवण्यासाठी कारणीभूत ठरला. सिनेमाच्या सेटवरचे कॅमेरामॅन प्रकाश शिंदे हे बऱ्याचदा त्यांच्या लहान मुलीला सेटवर घेऊन यायचे.

हे ही वाचा एका ‘अतरंगी’ कुटुंबाची गोष्ट सांगणाऱ्या ‘हम पांच’ कुटुंबातील सदस्य सध्या काय करतात?

त्यावेळेस ती मुलगी दरवेळेस अशोक सराफ यांच्याकडे बोट दाखवून ते कोण? असे विचारायची त्यावर कॅमेरामॅन प्रकाश यांनी त्यांच्या मुलीला सांगितलं की त्यांना अशोक मामा म्हणायचं!

 

ashok saraf 2 inmarathi

 

बास त्यानंतर त्या लहान मुलीने अशोक सराफ यांना अशोक मामा म्हणायला सुरुवात केली आणि तिच्यापाठोपाठ सेटवरच्या प्रत्येकालाच ती सवय लागली, त्यांचं हे नाव इतकं प्रसिद्ध झालं की आजही अशोक सराफ यांना इंडस्ट्रीचे ‘मामा’ म्हणून ओळखलं जातं!

त्यांच्या शर्टची २ बटणं कायम उघडी का असायची?

त्या काळात प्रत्येक अभिनेत्याला लोकं खूप फॉलो करायचे, एका हिरोची केसांची फॅशन, कपडे यांची लोकं बाहेर नक्कल करायचे, आणि याच काळातले एक ट्रेंड सेटर म्हणूनही अशोक सराफ यांच्याकडे बघितलं जातं!

अशोक सराफ यांचे सुरुवातीचे काही सिनेमे पाहिलेत तर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच लक्षात येईल की अशोक मामा त्यांच्या शर्टची पहिली २ बटणं कायम उघडी ठेवायचे.

 

ashok saraf shirt inmarathi

 

यामागे २ कारणं होती एकतर तेव्हा ही फॅशन नुकतीच आली होती आणि दुसरं कारण म्हणजे कॉलरपर्यंत बटणं लावल्यावर अशोक सराफ यांना गुदमरल्यासारखं व्हायचं त्यामुळे शर्टची २ बटणं उघडी ठेवल्याने त्यांना बरंच मोकळं वाटायचं आणि त्यांना काम करणंही सोप्पं जायचं.

हिंदी सिनेमाने मामांना म्हणावा तसा सन्मान दिला नाही :

इतका ग्रेट अभिनेता असूनही हिंदी सिनेमात दरवेळेस अशोक सराफ यांना दुय्यम सहाय्यक भूमिकाच मिळाल्या.

आजही सेट मॅक्सवर कित्येकदा शाहरुख सलमानचा करण-अर्जुन लागलेला असताना आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत असतो ठाकूरच्या मुंशीची आणि त्याच्या त्या खास “ठाकूर तो गियो” या डायलॉगची!

 

thakur to giyo inmarathi

 

हिंदी सिनेमात कायम अशोक सराफ यांच्या भूमिकांचा कॉमिक रिलीफ म्हणूनच वापर करण्यात आला. मग ते येस बॉस मधल्या शाहरुखच्या मित्राचा रोल असो किंवा सिंघममधल्या कॉन्स्टेबलचा!

बघायला गेलं तर या दोन्ही भूमिका तशा महत्वाच्याच आहेत पण तरीही अशोक मामांच्या अभिनयाचा हिंदीच्या लोकांना म्हणावा तसा उपयोग करून घेता आला नाही.

अर्थात ही गोष्ट प्रत्येक मराठी कलाकाराच्या बाबतीत बोलली जाते, पण अशोक सराफ यांनी त्यांचं कधीच वाईट वाटून घेतलं नाही, ते भूमिका करत राहिले आणि लोकांनी त्यांच्या छोट्या भूमिका का होईना लक्षात ठेवल्या इथेच अशोक सराफ एक कलाकार म्हणून जिंकले!

हे ही वाचा हिंदी सिनेमांत मराठी कलाकारांची खिल्ली – राधेमध्येही तोच प्रकार : हे थांबणार कधी?

वयाची ७० ओलांडूनही अशोक सराफ आज त्याच ताकदीने, त्याच निष्ठेने काम करतात याची प्रचिती चिन्मय मांडेलकर दिग्दर्शित “व्हॅक्युम क्लीनर” या नाटकाच्या तालमी दरम्यान त्यांच्या सहकलाकारांना  आली होती!

या नाटकाच्या तालमी दरम्यान मानेला झालेल्या दुखापतीमुळे फिरताना संवाद म्हणताना अशोक मामांच्या मानेल हिसका बसला आणि त्यांना प्रचंड वेदना सुरू झाल्या, तरीही तालमी दरम्यान आपल्याकडे असलेला बाम त्यांनी मानेला लावला नाही.

 

ashok saraf majha katta inmarathi

 

यावर त्यांना विचारणा झाल्यावर त्यांनी उत्तर दिलं की – “त्या बामचा वास फार उग्र आहे, त्याचा इतरांनाही त्रास झाला असता आणि आपल्या तालमीवर त्याचा परिणाम झाला असता!”

अशा या वयाची ७० ओलांडूनही काम करताना सहकलाकारांचा विचार करणाऱ्या, म्हणावं तसं recognition न मिळूनही केवळ प्रेक्षकांच्या प्रेमाखातर अव्याहत काम करणाऱ्या इंडस्ट्रीच्या अशोक मामांना ७४ व्या वाढदिसाच्या इनमराठी टीम तर्फे खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या या अफाट कारकिर्दीला मानाचा मुजरा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?