' कम्प्युटर व्हायरसशी थेट दोन हात करणारा अस्सल मराठमोळा “दहावी पास” उद्योजक – InMarathi

कम्प्युटर व्हायरसशी थेट दोन हात करणारा अस्सल मराठमोळा “दहावी पास” उद्योजक

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

दहावीनंतर त्याने शिक्षण सोडलं ते नाईलाज म्हणून. घरच्या परिस्थितीसमोर शरणागती पत्करून. पण ही बाब कधीही त्याच्या प्रगतीच्या आड आली नाही. शिक्षणाशिवाय त्याच्या प्रगतीची गाडी कधीही थांबली नाही, किंबहुना काळाच्या ओघात त्याच्या मेहनीतमुळे या गाडीने सुसाट वेग घेतला आणि कुणी स्वप्नातही विचार न करू शकणारे ध्येय त्याने गाठले, “उच्चशिक्षणाशिवाय प्रगती नाही” अशी टिका करणाऱ्या  अनेकांची तोंडं त्याने बंद केली ती केवळ अफाट जिद्दीच्या बळावर… कैलाश काटकर या मराठमोळ्या तरुणाची यशोगाथा प्रत्येकाला जगण्याची नवी उमेद देते.

 

kailas katkar inmarathi

 

ऐंशीच्या दशकातील पुणे, शिवाजीनगरमधील नरवीर तानाजीवाडीमध्ये एका लहानशा खोलीत दहावीतील कैलाश अस्वस्थपणे येरझाऱ्या घालत होता. बुद्धीमत्ता, परिश्रम करण्याची तयारी असं सारं काही असूनही केवळ घऱच्या आर्थिक परिस्थितीमुळे पुढील शिक्षण थांबबावे लागत होते. खाजगी कंपनीत वडिल आणइ घरकाम करणारी आई यांच्या मिळकतीवर पाच जणांचं कुटुंब पोसणं शक्य नसल्याने थोरल्या कैलाशने अखेर माघार घेतली.

नोकरी करण्याखेरीज पर्याय नव्हता, मात्र काय करावं हे ही समजत नव्हतं. समवयीन मुलं शिक्षणात रमलेली असताना कैलाश मात्र कामाच्या शोधात पुणे पालथं घालत होता. यावेळी बालपणीचा छंद त्याच्या कामी आला. घरातील वस्तु बिघडली की ती दुरुस्त करण्याची त्याची आवड पुढे इतकी फायदेशीर ठरेल याचा कुणी विचारही केला नव्हता.  सुरुवातीला त्याला फारसे यश येत नव्हते मात्र कालांतराने कोणतीही वस्तु प्रयत्नांनी तो दुरुस्त करायचा.

कॅलक्युलेटर दुरुस्त करण्याबाबत एका नोकरीची जाहिरात त्याने वाचली आणि कॅल्क्युलेटर म्हणजे नेमकं काय? हे देखील ठाऊक नसताना त्यांनी मुलाखत दिली. पहिल्यांदाच नशिबाने साथ दिल्याने नोकरी मिळाली आणि खऱ्याखुऱ्या संघर्षाची सुरुवात झाली.

 

calculater inmarathi

 

यंत्रांची दुरुस्ती या आवडत्या विषयाचेच काम असल्याने कैलास यांनी झटपट हे ज्ञान आत्मसात केले. कॅल्क्युलेटर व्यतिरिक्त इतरही अनेक यंत्रांची दुरुस्ती त्यांनी शिकून घेतली.

मात्र आठ तासांची नोकरी ही चौकट त्यांना मान्य नव्हती. मराठी माणूस उद्योगधंदा करू शकत नाही असा सुर पुण्यात चारही बाजुंनी ऐकू येत असतानाही कैलास यांनी मंगळवार पेठेतील छोट्या जागेत आपलं दुकान थाटलं. वेगवेगळ्या वस्तु दुरुस्त करणारे कैलास हे ग्राहकांचे लाडके बनत चालले होते.

हे ही वाचा – शेतकऱ्यांना ‘रडवणाऱ्या’ कांदा समस्येवर तरुणीने शोधला उपाय, मंत्र्यांनीही केलं कौतुक!

आणि आयुष्याला कलाटणी मिळाली…

एके दिवशी खात्यात रक्कम भरण्यासाठी बॅंकेत गेलेल्या कैलाश यांना एक यंत्र दिसलं, यंत्रांच्याच दुनियेत राहूनही अपिरिचित असलेलं यंत्र पाहून उत्सुकतेने त्याची माहिती काढली.

त्या यंत्राचं नाव होतं संगणक अर्थात कम्प्युटर. हे अवजड यंत्रं नेमकं काय काम करतं? त्याचा वापर किती? याची माहिती मिळवताना कैलास यांच्या एका निकटवर्तीयांनी संगणक युग येईल अशी आशा वर्तवली.

 

computer inmarathi

 

एकीकडे लोक उत्सुकतेने संगणक पाहण्यात रमले असताना त्याचवेळी कैलास यांच्या डोक्यातील चक्र मात्र वेगाने फिरत होते. जसे घरातील कोणतेही यंत्र हमखास बिघडते, मग त्याची दुरुस्ती करावी लागले त्यानुसार शक्तीशाली, प्रगत तंत्रज्ञानाचा अविष्कार असलेल्या यंत्राची दुरुस्ती आणि त्याची सुरक्षितता यांचा प्रश्न सोडवण्यासाठी कैलाशचे प्रयत्न सुरु केले.

मात्र यासाठी हाती कम्प्युटर येण्याची गरज होती. एककीडे कम्प्युटरच्या भितीने नोकरी जाईल या भितीने हजारो तरुण रस्त्यावर उतरले होते, तर अनेकांना हे यंत्र न परवडणारे होते, त्यामुळे कैलास यांना संगणक हाताळण्यास अद्याप मिळाला नव्हता. मात्र याच क्षेत्रात त्यांची मुसाफिरी नक्की असल्याने अखेर तो क्षण आलाच.

पुण्यात टाइम्स ऑफ इंडियाच्या कार्यालयातील प्रिंटर बिघडल्याने कैलास यांना निमंत्रण आले. नेहमीप्रमाणे प्रिंटर दुरुस्ती करताना त्यांचे लक्ष आसपासच्या काही संगणकांवर गेले. या कामादरम्यान त्यांना माहिती मिळाली की हे सगळे संगणक बंद असल्याने विकून टाकण्यात येत आहेत. यापुर्वीही अनेकांचा संगणक दुरुस्तीचा प्रयत्न फसल्याने ते भंगारात काढण्याचा निर्णय संस्थेतर्फे घेण्यात आला होता.

ही संधी कैलाश यांनी हेरली आणि हे संगणक दुरुस्त करण्याचे शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलले. त्यानंतर मात्र केवळ टाइम्स ऑफ इंडियाच नव्हे तर इतर अनेक बड्या संस्थांनी कैलाश यांच्याशी संगणक दुरुस्तीचा करार केल्याने संपुर्ण पुणे शहरात कैलाश काटकर हे नाव गाजण्यास सुरुवात झाली.

 

kailas katkar

 

विविध संस्थांचे संगणक दुरुस्त करताना कैलाश यांची विचारचक्र पुन्हा एकदा फिरू लागली. एवढे प्रगत यंत्र नेमके बिघडते कसे? याच विचारांतून त्यांना संगणकात शिरकाव करणाऱ्या व्हायरसची माहिती मिळाली. हा व्हायरस मुळापासून दूर करण्यासाठी किंबहूना तो व्हायरस रोखण्यासाठी काय करता येईल अशी भन्नाट कल्पना कैलास यांना स्वस्थ बसू देत नव्हती.

त्यापुर्वी अॅण्टिव्हायरस ही संकल्पना भारतीयांना फारशी ठाऊकही नव्हती. जिद्द असली तरी कैलाश यांच्याकडे सॉफ्टवेअरचे शिक्षण नव्हते. त्यामुळे संगणकाच्या आत डोकावण्यासाठी त्यांना एखाद्या तज्ञाची गरज होती. यावेळ त्यांचा धाकटा भाऊ संजय यांचे सॉफ्टवेअरमधील शिक्षण उपयोगास आले.

एखाद्या व्हायरसची साथ आल्यानंतर जसे एक दोन नव्हे तर हजारो रुग्णांना उपचारांची गरज असते त्याचप्रमाणे यंत्रांमध्ये शिरणारा व्हायरसही अनेक संगणकांचे नुकसान करून शकतो, त्यामुळे आपल्या प्रयोगामुळे असंख्य संगणक दुरुस्त करता येतील हा साधा हिशोब मांडणाऱ्या कैलाश यांना ते कोणती क्रांती करत आहेत याची कल्पनाही नव्हती.

सुरवातीला एका प्रयोगिक तत्वावर तयार करण्यात आलेले टूल परिचित ग्राहकाच्या संगणकात वापरण्यात आले, या ग्राहकाने पसंती दर्शवताच या भावांच्या जोडीचा उत्साह वाढला. स्वतःजवळील रक्कम खर्च करत कैलास यांनी पुण्यात जागा घेतली आणि या लहानशा जागेत या दोघांचे भलेमोठे, उज्वल भविष्य आकार घेऊ लागले.

कैलाश यांची क्लपकता आणि संजय यांचे कौशल्य पणाला लागले. मराठी भावांनी तयार केलेला पहिलावहिला अॅण्टिव्हायरस बनला. अवघ्या काही मिनिटांत तुमच्या संगणकाचा आजार बरा करणा-या या औषधाचं नाव ठेवण्यात आलं,’ क्विक हिल’.

 

quick heal inmarathi

 

मात्र खरी कसोटी होती ती नव्याने तयार केलेले हे उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवण्याची. संगणकात व्हायरस शिरतो, ही बाबच जिथे अनेकांना ठाऊक नाही तिथे त्यावरच्या उपचारांविषयी माहिती असण्याचा प्रश्नच नव्हता.

कैलाश यांनी स्वतः ही जबाबदारी स्विकारली. मोठमोठ्या संस्था, परिचित व्यवसायिक यांच्याकडे प्रत्यक्ष जात त्यांनी व्हायरस , क्विक हिलचा वापर, उपयुक्तता यांची माहिती दिली. सुरुवातीचा काळ खडतर होता, आव्हानात्मक होता, मात्र जिद्दीला पर्याय नाही हेच सुत्र पाळणारे कैलास कधीही थकले नाहीत.

 

katkar brothers inmarathi

हे ही वाचा – दुबई गाजवलेला मराठी उद्योजक! याचा गरीबीतून लक्षाधीश होण्यापर्यंत प्रवास खूप काही शिकवून जातो!

हळूहळू अॅण्टिव्हायरसची निकड सगळ्यांनाच भासू लागली. अनेक कंपन्यांनी क्विक हिलशी करार केला. काटकर यांचा पसारा इतका वाढला की पुणे, मुंबई अशा अनेक शहरांमध्ये ऑफिसेस स्थापन झाली.

आज हजारो कर्मचारी या संस्थेत सक्रीय आहेत. देशातच नव्हे तर परदेशात या संस्थेचा व्याप पाढला आहे. आज संगणक आणि अॅण्टिव्हायरस ही नावं उच्चारली तरी क्विक हिल हे नाव आठवल्याशिवाय रहात नाही. अर्थात यामागे मराठी उद्योजकांचा सिंहाचा वाटा आहे ही बाब प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानाची आहे हे नक्की.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?