ट्रिपल तलाकचा पैगंबर कालीन इतिहास, शरिया मधील ४ नियम आणि मुस्लीम महिला

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

सध्या ट्रिपल तलाक हा विषय पेटलेला आहे. मिडिया २-४ तथाकथित विद्वानांना पकडून आणून दिवसभर डोके उठवतो आहे. परंतु गेली काही दिवस चालू असणारी चर्चा ऐकून एक गोष्ट लक्षात आली की मुळातून ही समस्या, तिचे स्वरूप, व्याप्ती आणि संभाव्य तोडगा व त्या तोडग्याचे (पुन्हा संभाव्यच) परिणाम याचा कुणालाही गंध नाही. सगळेच आंधळ्याच्या ताब्यात हत्ती यावा तसे चाचपडत आहेत. या संदर्भात माझी माहिती इथे देतो आहे. विषय गंभीर आहे गहन आहे त्यामुळे परिपक्व प्रतिक्रिया अपेक्षित आहेत.

ट्रिपल तलाक – कुराण – पैगम्बर : इतिहास

मोहमद पैगंबर यांच्या जन्माच्या पूर्वी मध्य पूर्व आखातात राहणारे अरब हे टोळ्या करून राहत असत. छोट्या टोळ्या आणि त्यांची गावे यांची एक स्वतंत्र व्यवस्था असे. निसर्ग अत्यंत प्रतिकूल. जगण्याचा संघर्ष अत्यंत टोकाचा. पाणी अन्न सगळ्याचीच मारामार. आणि त्यामुळे अत्यंत कट्टर प्रवृत्ती विकसित झालेली. या टोळ्या एकमेकांवर सतत आक्रमणे करत असत. आणि जी टोळी विजयी होईल ती दुसऱ्या टोळीतील पुरुषांची कत्तल घडवणार बायका वाटून घेणार आणि इतर सर्व लुट वाटून घेणार. जे वाटणे शक्य नसेल किंवा कामाचे नसेल ते इतर टोळ्यांना विकून मोकळे होणार. मग टोळीच्या स्वरूपात अस्तित्व टिकवायचे असेल तर शक्ती भरपूर हवी. शक्ती हवी म्हणून मनुष्यबळ भरपूर हवे. मूर्तीपूजेचा सुद्धा प्राथमिक स्वरूपात विकसित झालेल्या या टोळ्यांना विधिनिषेध नव्हता. सक्ख्या बहिण भावांच्यातील विवाह सुद्धा त्यांच्यात वैध होते. स्त्री म्हणजे मुल उत्पादन करणारे आणि अन्न शिजवून खायला घालणारे यंत्र या पलीकडे तिला मूल्य नव्हते. उंट, गुलाम, खजूर यांच्या प्रमाणे स्त्री हे सुद्धा एक चलन म्हणून वापरात होते. मानवी इतिहासाचा आणि विकासाचा धांडोळा घेतला तर इतक्या अमानुष पातळीवरील जीवन कोणताही मानवसमूह कोणत्याही काळात जगत नव्हता. जगभरातील आदिवासी जमाती ज्यांना ख्रिश्चन लोकांनी हिथन आणि पेगन म्हणून बदनाम केले त्यांच्यात किंबहुना स्त्रीला अत्यंत योग्य दर्जा दिला गेला होता. त्या दृष्टीने विचार केला तर अरबी लोक हे पशूच्या पातळीवरील जीवन जगत होते.

अश्या मानव समुहात जन्माला आलेल्या मोहमद पैगंबर यांनी कुराण च्या रूपाने त्यांना मानवता धर्म शिकवणारे तत्वज्ञान दिले. अर्थात पशुतुल्य जीवन जगणाऱ्या अरब लोकांना पचेल रुचेल आणि अंमलात आणता येईल असे साधे सोपे सुटसुटीत आणि प्राथमिक मानवी मुल्ये रुजवू शकतील असे तत्वज्ञान त्यांना दिले गेले.

पहिला नियम सांगितला गेला तो म्हणजे “मां के दुध को बख्शो”. म्हणजेच – सक्ख्या भावाबहिणींचे लग्न करण्याची प्रथा बंद करायला सांगितले.

परंतु चुलत आणि इतर बहिणींशी लग्न चालत होते. ( मानवी वंशशास्त्रज्ञ मंडळीनी हे सिद्ध केले आहे कि कुटुंबाच्या, कुलाच्या अंतर्गत केले जाणारे विवाह आणि त्यातून निर्माण होणारी अपत्ये हि कालांतराने मनोरुग्ण, मानसिक दृष्ट्या कमकुवत, हिंस्त्र स्वरुपाची आणि नपुंसक होतात आणि भारतात आपण हे पारशी समुदायाच्या बाबतीत पाहिलेले सत्य आहे ).

दुसरा नियम बनवला गेला तो होता “हक ए मेहर”. अर्थात मुलीशी लग्न करण्यासाठी नवरयामुलाने मुलीच्या वडिलांना मेहर म्हणून नजराणा देणे आवश्यक केले गेले.

ही रक्कम “भरपूर असावी” जेणेकरून भविष्यात काही समस्या उद्भवली तर मुलगी वडिलांवर आर्थिक दृष्ट्या अवलंबून राहणार नाही, मेहर च्या पैश्यात ती स्वतःचा उदर निर्वाह करू शकेल. आणि एका अर्थाने हे मुलीचा विक्रय करणे सुद्धा होत होते. मग आपल्याच नात्यातील मुलीशी निकाह करताना त्या मुलीच्या पालकांना भरपुर रक्कम मोजावी लागत असे.

तिसरा नियम कुराणात या संदर्भात एका आयतेच्या रूपात आहे – तो म्हणजे मुस्लीम पुरुष जर पहिली पत्नी हयात असेल तर तिच्या संमतीने एखादी विधवा, परितक्त्या, युद्धात मेलेल्या सैनिकाची पत्नी आणि युद्धात जिंकलेली गुलाम स्त्री हिच्याशी निकाह करू शकतो.

हा विवाह त्या स्त्रीला सामाजिक स्थान मिळावे म्हणून असेल आणि त्यात तिच्या चरितार्थाची जबाबदारी घेणे अभिप्रेत असेल. असे ४ पर्यंत विवाह करण्याची परवानगी होती. आणि प्रत्येकवेळी पहिल्या पत्नीची संमती आवश्यक होती.

triple-talaq-01-marathipizza

 

ही आयत मी कुराण अल मजीद च्या हिंदी तजुर्मा मध्ये वाचली. एकदा नाही १० वेळा वाचली आणि मी लिहिले आहे अगदी तसेच त्यात लिहिले आहे. या पैकी एक ही अक्षर माझ्या मनातील नाही. या एकमेव आयातीचा आधार घेऊन आपल्याकडे आजतागायत बहुपत्नीत्वाचा लाभ मुस्लीम लोकांनी घेतला आहे. इस्लाम कबूल करण्याच्या साठी जी आकर्षणे दाखवली जातात त्या पैकी एक मुख्य आकर्षण हे बहुपत्नीत्व आहे.

आता ही आयत त्या काळाशी नक्कीच सुसंगत होती. त्यावेळी या चारीही अवस्थांच्या मधील स्त्रीला टोळी संस्कृतीमध्ये सन्मानपूर्वक जगण्यासाठी असा निकाह नक्कीच आवश्यक होता. परंतु आज आपण लोक “कल्याणकारी राज्य” ही संकल्पना स्वीकारली आहे. विधवा अथवा परितक्त्या स्त्रियांच्या पुनर्वसनासाठी आपल्याकडे कायदे आणि सामाजिक कल्याण मंत्रालयाच्या योजना आहेत, ज्यात त्यांच्या चरितार्थाची सोय होते. त्यांच्या मुलांना सुद्धा शिक्षण आदी बाबींच्या साठी मदत केली जाते. युद्धात मृत सैनिकाच्या पत्नीला सरकार रोख रक्कम, पेट्रोल पंप किंवा अश्या सुविधा आणि पेन्शन देते जेणे करून तिच्या आर्थिक गरजा सन्मानपूर्वक भागू शकतात.शिवाय गुलामगिरी आता कायद्याने बंद आहे त्यामुळे युद्धात जिंकून स्त्रीला गुलाम करणे आता कुणालाच शक्य नाही. अर्थात पैगंबर यांच्या कालखंडाशी तुलना करता आजच्या स्त्रीला या पद्धतीच्या लग्नाची गरजच उरत नाही अर्थात या आयातीचा आधार घेऊन बहुपत्नीत्व स्वीकारणे अथवा लादणे हे बेकायदेशीर आहे आणि यात काहीही संशय उरत नाही.

चौथा नियम होता तलाक चा.

पती अथवा पत्नी यांच्यात भांडणे कुरबुर झाली आणि त्यांना आपण एकत्र राहू शकत नाहीं असे वाटले तर नवरा अथवा बायको दोघांच्या पैकी कोणीही एकमेकांना तीन वेळा तलाक तलाक तलाक उच्चारले तर त्यांचा तलाक अथवा संबंध विच्छेद झाला असे मानले जाई. त्या परिस्थितीत नवरा त्याच्या बायकोला हक ए मेहर चे पैसे अदा करून नात्यातून मुक्त होऊ शकत होता. मुलांच्या पालनपोषणाची जबाबदारी सुद्धा त्याच्यावर येत नव्हती आणि तो दुसरा विवाह करण्यास मोकळा होत होता. स्त्री सुद्धा दुसरा विवाह करू शकत असे, अर्थात मुलांच्या मुळे तिच्यासाठी ते तितकेसे सोपे नव्हते. म्हणजेच – हि ट्रिपल तलाक ची पद्धत मुस्लीम पुरुषांच्या साठी अत्यंत सोयीची होती आणि आजही आहे. यात हक ए मेहर नावाची रक्कम दिली कि सगळ्याच जबाबदारीतून मुक्त होता येते. मुलांचे झंझट नाही आणि आपल्या मालमत्तेतील वाटा देण्याची सुद्धा आवश्यकता नाही. पुन्हा दुसऱ्या सुंदर आणि गरीब मुलीशी लग्न करायला तो पुरुष मोकळा. सगळ्यात महत्वाचेहे की या सगळ्या कृत्याला धर्माचे शर्करा अवगुंठण आहे. म्हणजे सामाजिक स्थानाला सुद्धा धक्का पोचत नाही. एका मुलीचे आयुष्य आपण हक ए मेहर नावाची भिक देऊन नरकासमान करतो आहोत. तिच्याशी सहवास करून जन्माला घातलेल्या मुलांच्या पालन पोषणाची जबाबदारी सुद्धा आपण नाकारत आहोत आणि हद्द म्हणजे एका दुसर्या अश्याच एका मुलीला आपण या चक्रात ओढत आहोत याची काहीही परवा न करणारी पुरुषी मानसिकता हाच आणि हाच इस्लाम चा आत्मा आहे. यात कुठेही स्त्रीला मानव सुद्धा समजले गेलेले नाही आणि आपल्या देशातील तथाकथित विचारवंत मंडळीना हा धर्म शांततेचा धर्म वाटतो.

बहुपत्नीत्व बाळगताना पत्नींची आणि मुलांची सुद्धा जबाबदारी येते. त्यांचे योग्य पालन पोषण व्हावे या साठी तितके धनवान असणे आवश्यक आहे अन्यथा मग मुलांना मदरशात पाठवावे लागते. या पेक्षा ट्रिपल तलाक ही अधिक चांगली पळवाट आहे आणि तिचा आत्तापर्येंत मुक्त वापर केला गेलेला आहे.

एका मुस्लीम मुलीच्या दृष्टीकोनातून हा सगळा प्रकार पहा.

लग्न नात्यातीलच पुरुषाशी होणार…चुलत भाऊ किंवा असाच कोणी. लग्न ठरवताना मुलाकडचे लोक म्हणजे घरातीलच मंडळी – त्यामुळे मग “मुलगा चांगला आहे, उगीच मेहर इतकाच पाहिजे म्हणून अडून बसू नका…आपल्याला मुलीचा संसार झालेला पाहायचा आहे…मेहर चा पैसा जन्मभर पुरतो का?” – वगेरे बोलून मध्यस्थ मंडळी नाममात्र मेहर वर लग्न लावणार. आणि – त्या दिवसापासून ती मुलगी नवऱ्याची मानसिक आणि शारीरिक गुलाम म्हणून जीवन जगण्यास बाध्य होणार.

मी या पुरुषाच्या चांगल्या आणि विकृत अश्या सगळ्या वासना आणि इच्छा पुरवल्या नाहीत तर हा एक तर मला तलाक देणार…माझे शिक्षण कमी मग मी कसे जगणार मला तर नोकरी मिळणार नाही…मग आई बाप आणि भावाच्या कृपेवर मला आणि माझ्या मुलांना जगावे लागेल.. आणि तलाक नाही दिला तर एखादी सवत आणून डोक्यावर बसवेल…

– एक १८ ते १९ वर्षाची निम्न मध्यमवर्गीय अथवा मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगी अशी टांगती तलवार डोक्यावर घेऊन तिचे उरलेले संपूर्ण आयुष्य जगते.

triple-talaq-02-marathipizza

तिची मुले सुद्धा जन्मल्यापासून हेच पाहतात कि त्यांच्या आईला पोतेऱ्यापेक्षा घरात जास्त किंमत नाही आणि ती सतत दहशतीखाली जगते आहे. मुलांवर संस्कार हे आई करत असते ती जर स्वतंत्र, आनंदी नसेल तर ती मुलांना काय शिकवेल काय संस्कार देईल ? अर्थात मुलांच्यावर सुद्धा चांगले संस्कार होऊ शकत नाहीत. मुलीना तर लहानपणापासून गुलाम म्हणून कसे जगावे याचा धडाच आईच्या रूपाने पाहायला मिळत असतो. कल्पना करा १९४७ पर्यंत हे सगळे ठीक होते पण स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली तरी सामान्य मुस्लीम कुटुंबातील वातावरण आपण समानतेचे निर्माण करू शकलो नाही हा आपला किती मोठा पराभव आहे.

आता या संदर्भात हिंदू धर्मात काय सांगितले आहे ते सुद्धा पाहूया. स्वातंत्र्यापूर्वी जे मनुस्मृती वर आधारित कायदे हिंदू धर्मीय पाळत असत. त्या नुसार लग्नाचे ८ प्रकार आहेत (त्यात राक्षस विवाह – मुलगी पळवून नेऊन लग्न करणे सुद्धा येतो). आणि या सर्व प्रकारे लग्न केलेल्या बायका आणि त्यांची मुले यांना संपत्ती मध्ये समान हक्क दिलेला आहे. राज्यघटना लिहिताना यातील बहुपत्नीत्व ही मुभा कायद्याने बंद केली गेली आणि एकपत्नित्व हे हिंदू पुरुषांना बाध्य केले गेले. आणि पहिल्या पत्नीला कायदेशीर सोडचिट्ठी देऊन तिला पुरेशी पोटगी एक रकमी अथवा न्यायालय सांगेल तशी देणे मान्य केल्या शिवाय दुसरे लग्न करता येत नाही. अर्थात बेकायदेशीर दुसरा विवाह असेल तर पहिली पत्नी आणि तिच्या मुलांचे हक्क अबाधित राहतात दुसरी पत्नी आणि तिची मुले यांना कायद्याने काहीही मिळत नाही. याच्या बरोबर उलट इस्लामिक पद्धतीत होते…ट्रिपल तलाक दिला कि पहिली बायको आणि तिची मुले रस्त्यावर येतात आणि दुसऱ्या बायकों ला नवऱ्याचे सगळे काही मिळते.

त्यामुळे ही “ट्रिपल तलाक आणि बहुपत्नीत्व” या दोन्ही गोष्टीची मुस्लिमांना दिलेली सवलत घटनाबाह्य आहे आणि याचा कुराण शी संबंध नसून शरीया या मुस्लीम कायद्याशी संबंध आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टी आता कचऱ्याच्या पेटीत टाकणे आवश्यक आहे. जे मूलतत्ववादी मुस्लीम “इस्लाम खतरे में है” ची बांग देत आहेत त्यांना सज्जड दम देऊन सांगणे आवश्यक आहे की यात फक्त शरिया कायदा बदलून त्याला मानवी , आधुनिक आणि कालसुसंगत स्वरूप दिले जाते आहे आणि त्याचे त्यांनी स्वागत करणे आवश्यक आहे. आणि त्यांनी विरोध केला तरी तो चिरडून या दोन्ही गोष्टींच्या संदर्भात कायदा आवश्यक आहे.

ट्रिपल तलाक चा उल्लेख येईल आणि सय्यद शहाबानो हिचे नाव निघणार नाही हे अशक्य आहे. शहाबानो ला सुद्धा तिच्या नवऱ्याने ट्रिपल तलाक दिला होता आणि हक ए मेहर दिला होता जो खूप तुटपुंजा होता. त्यामुळे तिने कोर्टात धाव घेतली. कोर्टाने तिच्या बाजूने निर्णय दिला आणि हिंदू स्त्री ला मिळते तशी पोटगी मिळणे हा तिचा मुलभूत अधिकार आहे याला मान्यता दिली आणि तिच्या नवऱ्याला पोटगी दे हा आदेश दिला. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आणि न्यायालयाने याच निर्णयावर शिक्कामोर्तब केला. मुस्लीम मूलतत्ववादी संघटना चिडल्या आणि त्यांनी राजीव गांधी सरकार ला धमकी दिली. राजीव सरकार ने हार मानली आणि एक खास अधिवेशन बोलावून कायदा करून सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय फिरवला गेला. त्यावेळी तमाम पुरोगामी, कम्युनिस्ट, हिंदुत्ववादी हे खांद्याला खांदा लावून शहाबानो साठी लढले होते. पण त्यांची झुंज व्यर्थ गेली. आज भाजपा सत्तेत आहे. कालचक्राचे १८० अंशात भ्रमण पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता जर या दोन्ही प्रकारांना पायबंद घालण्यासाठी घटना साठी दुरुस्ती करण्याची वेळ आली तर कम्युनिस्ट लोकांनी आणि पुरोगामी मंडळीनी चांगल्या भावनेने मदत करावी.

हे दोन कायदे केले गेले तर मुस्लिमांचे कुटुंब नियोजन सुद्धा सुरु होईल. इस्लाम हा धर्म कालबाह्य नियमांच्या तावडीतून मुक्त होणे आवश्यक आहे. मध्यंतरी मी एका अमेरिकन टीव्हीवरील चर्चा ऐकली होती त्यात एक आफ्रिकन अमेरिकन स्त्री जी धर्माने मुस्लीम आहे तिचे मत मांडत होती. तिने सांगितले –

मी मुस्लीम आहे. इस्लाम माझा धर्म आहे पण मी अमेरिकन नागरिक आहे आणि मला अमेरिकेचा कायदा मानणे, त्याचे पालन करणे आणि माझ्या काही समस्या असतील तर त्या सुद्धा या कायद्यांच्या कक्षेतच सोडवणे हे आणि हेच योग्य आहे. मी शरीय कायदा मनात नाही आणि शरिया कायद्याचे पालन हा माझ्यासाठी मुद्दाच असू शकत नाही.

ही परिपक्वता आपल्या चर्चांच्या मध्ये दिसेल आपल्याकडील मुल्ला मौलवी हि भाषा बोलू लागतील तो खरा सुदिन.

===

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?