' छत्रपतींच्या स्वराज्याचं वैभव राखून असलेले ५ किल्ले - जे अनेकांना माहिती नाहीत

छत्रपतींच्या स्वराज्याचं वैभव राखून असलेले ५ किल्ले – जे अनेकांना माहिती नाहीत

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

छत्रपती शिवाजी महाराज… रयतेचा राजा… महाराष्ट्रातील तमाम जनतेचे दैवत! शिवाजी महाराजांचे नुसते नाव जरी काढले की आपल्या मनात त्यांच्याविषयी अपार आदर दाटून येतो, छाती अभिमानाने फुलून येते. हे महाराष्ट्राच्या जनतेचे आणि मराठी मातीचे भाग्य की शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात जन्म घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.

स्वराज्याची स्थापना करताना शिवाजी महाराजांनी अनेक गड कोट बांधले. अनेक गड जिंकले आणि दुरवस्था झालेल्या अनेक किल्ल्यांची डागडुजी करून ते सुस्थितीत आणले. ह्याशिवाय काळाच्या फार पुढचा विचार महाराजांनी केला आणि सागराकडून परकीय शक्तींचे आक्रमण रोखण्यासाठी सिंधुदुर्ग व विजयदुर्ग हे जलदुर्ग सागरी सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी बांधले.

थोडक्यात महाराजांनी दूरदृष्टीने अशा ठिकाणी किल्ले बांधले किंवा जिंकले ज्यांच्या माध्यमातून त्यांना राज्यकारभार करता येईल व राज्यातील सर्व भागांकडे लक्ष ठेवता येईल.

 

chhatrapati shivaji maharaj inmarathi

 

सह्याद्रीच्या अंगाखांद्यावर जे किल्ले महाराजांनी बांधले किंवा जिंकले ते आजही दिमाखात उभे आहेत. पण काही किल्ल्यांची शासनाच्या व नागरिकांच्या उदासीनतेमुळे दुरवस्था झाली आहे. हे ४०० किल्ले जे महाराजांनी बांधले व जिंकले त्यांच्याकडे आपल्याला महाराजांची आठवण म्हणून बघता येईल. हे किल्ले महाराष्ट्रासाठी एक अनमोल ठेव आहे.

महाराष्ट्राची दौलत आहे जिच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे हे सगळेच मान्य करतील. रायगड, सिंधुदुर्ग, लोहगड, प्रतापगड, शिवनेरी, पुरंदर, सिंहगड ,पन्हाळा हे गड सर्वांना माहित आहेत. दर वर्षी हजारो पर्यटक ह्या ठिकाणांना भेट देतात व इतिहासातील गतस्मृतींना उजाळा देतात.

पण ह्या किल्यांखेरीज महाराष्ट्रात आणखीही असे भव्य किल्ले आहेत जे बघायला फारसे लोक जात नाहीत. हे किल्ले फक्त ट्रेकिंग करणाऱ्यांना सहसा माहित असतात.

हे किल्ले म्हणजे मंगळगड, प्रचीतगड, कैलासगड, वासोटा आणि हरिश्चंद्र गड!

शासनाने शिवनेरी व रायगड ह्या किल्यांची डागडुजी करून ते पर्यटकांसाठी खुले केलेले असले तरीही ह्या आणि इतर किल्यांसाठी भरपूर काम होणे व त्यांची देखभाल करणे अत्यावश्यक आहे.

 

vasota-fort-marathipizza

हे ही वाचा – सह्याद्रीचं रौद्ररूप अनुभवायचं असेल तर हे ८ किल्ले यंदाच्या पावसाळ्यात फिरायलाच हवेत!

महाराष्ट्रात एकूण किती किल्ले आहेत हे जाणून घेण्यासाठी २०१५ मध्ये एक सर्व्हे घेण्यात आला. ह्यात आजवर मिळालेल्या माहितीनुसार असे लक्षात आले आहे की,

मोजकेच किल्ले शासनाच्या अखत्यारीत येतात, इतर किल्ले एकतर पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येतात किंवा महसूल विभागाच्या किंवा काही किल्ले हे खाजगी मालकीचे आहेत.

तर काही किल्ल्यांची देखभाल करण्याची जबाबदारी ही NGO ने घेतलेली आहे. पण छोट्या NGOs साठी हे प्रचंड मोठे कार्य आहे आणि त्यासाठी पैसा जमा करणे अतिशय कठीण आहे.

सर्वांना वंदनीय अशा महाराजांचा पुतळा अरबी समुद्रात बसवणे निश्चितच चांगले काम आहे. पण त्या सोबतच त्यांनी अतिशय कष्ट करून स्वराज्याची उभारणी केली त्यात ह्या किल्ल्यांचा मोठा वाटा आहे.

त्यांच्या ह्याच आठवणी ज्या किल्ल्यांच्या स्वरुपात आजही उभ्या आहेत त्या आपण व्यवस्थित जतन करून ठेवल्या तर ती महाराजांना वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल. मराठी माणूस आजही स्वराज्याचे व त्यासाठी घेतलेल्या महाराजांच्या व त्यांच्या मावळ्यांच्या कष्टाचे मोल जाणतो हे बघून महाराजांना पण समाधान वाटेल.

आज आपण महाराजांनी जिंकलेले किंवा बांधलेले असे काही किल्ले बघणार आहोत जे फारसे कोणाला माहित नाहीत.

१. मंगळगड किंवा कांगोरी

 

mangalgad-marathipizza

 

मंगळगड हा गड कांगोरी म्हणून सुद्धा ओळखला जातो. हा गड दुधाणेवाडी ह्या गावाजवळ आहे. हा किल्ला महाड गावापासून ११ मैलांवर आहे. हा गड सह्याद्रीच्या एका ओसाड शिखरावर बांधलेला आहे. हा गड समुद्रसपाटी पासून २४५७ फुट उंचावर आहे. ह्या किल्ल्यावर जायचा मार्ग एक अरुंद आणि खडकाळ आहे. दोन मैल ह्या रस्त्यावर चालल्यानंतर आपण ह्या गडापर्यंत पोहोचू शकतो.

हा किल्ला जावळीच्या चंद्रराव मोरे ह्यांनी बांधला आहे. शिवाजी महाराजांनी हा किल्ला १६४८ साली जिंकला.

हा गड जावळीच्या खोऱ्याजवळ असल्याने राजकीय दृष्ट्या अतिशय महत्वाचा होता. जावळीच्या खोऱ्याजवळ असल्याने तो काबीज करण्यास व हल्ला करण्यास अतिशय कठीण होता. ह्या किल्ल्यासारखेच जावळीच्या खोऱ्यामध्ये मकरंदगड, चंद्रगड आणि प्रतापगड असे किल्ले आहेत. प्रत्येक किल्ल्याला आपापले वेगळे नैसर्गिक सौंदर्य आहे जे बघण्यासारखे आहे.

२. हरिश्चंद्र गड

 

harischandragad-marathipizza

 

हा गड अहमदनगर जिल्ह्यात आहे. समुद्रसपाटीपासून ह्या गडाची उंची ४,६६५ फुट इतकी आहे. हा गड रात्रीच्या वेळी ट्रेक करण्यासाठी प्रसिद्ध आहे व पश्चिम घाटातील सर्वात अवघड स्थळ आहे. कल्याणहून ९० किमी इतके अंतर असलेला हा गड माळशेज घाटाच्या जवळ आहे.

ह्या गडावर जाण्यासाठी अनेक मार्ग आहेत पण सर्वात कठीण मार्ग आहे ‘नळीची वाट’. ही वाट खूप अरुंद आहे व ८० अंश इतका कठीण चढ आहे. ट्रेकिंग करणारी माणसे ह्या अवघड मार्गाचे आव्हान स्वीकारून ह्याच मार्गाने चढ करून किल्ल्यापर्यंत पोचतात. ह्या किल्ल्यावर रात्रीच्या वेळी तंबू टाकून वस्ती करणे हा एक अविस्मरणीय अनुभव असतो असे ट्रेकर्स सांगतात.

हा गड अतिशय पुरातनकाळापासून अस्तित्वात आहे. कारण मत्स्यपुराण, अग्निपुराण व स्कंदपुराणात हरिश्चंद्र गडाचा उल्लेख केलेला आढळून येतो.

मराठ्यांनी हा किल्ला १७४७ साली काबीज केला. त्याआधी हा किल्ला मुघलांच्या ताब्यात होता. ह्या किल्ल्यावर ११व्या शतकात कोरीवकाम केलेल्या गुफा आहेत ज्यामध्ये भगवान विष्णूंच्या मूर्ती आहेत. तसेच मध्ययुगीन काळातले हरिश्चंद्रेश्वर मंदिर व केदारेश्वराची गुफा सुद्धा आहे.

३. अलंग, मदन आणि कुलंग

 

amk-marathipizza

 

हे तीनही किल्ले वेगवेगळे असले तरीही ट्रेकर्स ह्या तिन्हीवर एकसाथ चढाई करतात. ट्रेकिंग करणाऱ्यांसाठी हा ट्रेक अतिशय कठीण समजला जातो.

हे किल्ले नाशिक जिल्ह्यात कळसुबाई पर्वतरांगेमध्ये वसलेले आहेत. ह्याच ठिकाणी सह्याद्री पर्वताची सर्वात उंच शिखरे म्हणजेच रतनगड व कळसुबाई वसलेली आहेत.

ह्या ठिकाणी घनदाट जंगल, मोठ्या दऱ्या व गोंधळात टाकणाऱ्या वाटा असल्याने हा ट्रेक अतिशय कठीण समजला जातो. हा ट्रेक करताना दऱ्या तसेच खिंडी चढाव्या तसेच उतराव्या लागतात.

लांबच लांब रस्ता तुडवावा लागतो तसेच अतिशय खडतर उतारावर चालावे लागते. अलंग किल्ल्यावर पोचल्यानंतर तुम्हाला कुलंग व मदन किल्ला तसेच कळसुबाई शिखराचा सुंदर देखावा बघण्यास मिळतो. असे म्हणतात की ह्या ट्रेक मध्ये मदन गडापर्यंत पोचण्याचा रस्ता सर्वात अवघड आहे.

१७६० साली मुघलांनी हे तीनही गड पेशव्यांच्या स्वाधीन केले. त्यानंतर १८१८ साली ह्या भागातील सर्व गड ब्रिटीशांच्या ताब्यात गेले.

४. प्रचीतगड

 

prachitgad-marathipizza

 

प्रचीतगड हा किल्ला उचीतगड म्हणून सुद्धा ओळखला जातो. हा गड सांगली जिल्ह्यात आहे.

असे म्हणतात की महाराजांनी सह्याद्रीच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकाकडे जाता यावे म्हणून प्रचीतगड आणि महिमानगड बांधला. हा गड कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रावर लक्ष ठेवण्यासाठी एक मोक्याचे ठिकाण होते. हा गड चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये आहे. ह्या किल्ल्याची तटबंदी अजूनही मजबूत आहे. ह्या गडावर एक विहीर, एक देऊळ व ५ तोफा आहेत.

ह्या ठिकाणी ट्रेकला जाताना लोक पाथरपुंजहून सुरुवात करतात आणि कंधार डोहाला हमखास भेट देतात. ह्या ठिकाणी ट्रेकला जायचे असल्यास गाईड बरोबर असणे आवश्यक आहे. कारण नवीन माणूस ह्या ठिकाणी रस्ता चुकू शकतो.

हा गड शिवाजी महाराजांनी रावराणा शूरवीर सूर्यराव सुर्वे ह्यांच्याकडून १६६० साली जिंकून घेतला. ह्या लढाईचे तानाजी मालुसरे ह्यांनी नेतृत्व केले होते.

५. कैलासगड

 

kailasgad-marathipizza

 

कैलासगड हे ठिकाण अनुभवी ट्रेकर्स साठी आहे जे ट्रेकिंग साठी वेगळ्या जागांच्या व वेगळ्या अनुभवांच्या शोधात असतात.

ह्या गडाच्या सानिध्यात अप्रतिम निसर्गसौंदर्य अनुभवायला मिळते. तसेच ह्या गडाभोवती मुळशी धरणातून आलेले बॅकवॉटर आहे जे ह्या गडाची शोभा वाढवते. हा गड वडूस्ते गावाजवळ आहे. असे म्हणतात की हा गड अतिशय जुना म्हणजे सातवाहन काळातील आहे.

शिवाजी महाराजांनी एकदा ह्या गडाला भेट दिली आहे. हा गड अतिशय निर्जन आहे व देखभाल नसल्याने अतिशय दुरावस्थेत आहे.

ह्या किल्ल्यांबद्दल जाणून घेतल्यानंतर जर हे किल्ले बघायची इच्छा झाली असेल तर नक्कीच ह्या किल्ल्यांना भेट द्या आणि महाराष्ट्राचे हे वैभव जतन करण्यास हातभार लावा!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on “छत्रपतींच्या स्वराज्याचं वैभव राखून असलेले ५ किल्ले – जे अनेकांना माहिती नाहीत

 • August 27, 2018 at 7:23 pm
  Permalink

  thanks for the article

  Reply
 • December 1, 2018 at 3:31 pm
  Permalink

  khup chan mi nakki janar

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?