' जेव्हा लक्ष्मणच्या ‘बाथरूम सिंगिंग’मुळे अख्ख्या भारतीय संघाला घाम फुटला होता… – InMarathi

जेव्हा लक्ष्मणच्या ‘बाथरूम सिंगिंग’मुळे अख्ख्या भारतीय संघाला घाम फुटला होता…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

लेखक – ईशान पांडुरंग घमंडे 

===

कुठलाही खेळ म्हटलं, की तो जसा मैदानावर रंगतो, तसाच मैदानबाहेरही रंगतो. अगदी सरावाच्या वेळात घडणाऱ्या गंमतीजंमतींपासून ते सामना सुरु असताना घडणारे किस्से; एक ना अनेक भानगडी घडत असतात. हे सगळं फक्त छोट्या स्तरावर किंवा मनोरंजन म्हणून खेळल्या जाणाऱ्या स्पर्धांमध्ये घडतं का?, तर मुळीच नाही. अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मैदानाबाहेर भन्नाट किस्से घडत असतात.

भारतात सर्वाधिक खेळला जाणारा खेळ कुठला असेल, तर तो क्रिकेट! त्यामुळे क्रिकेटच्या मैदानावर आणि मैदानाबाहेर घडलेले असे किस्से आपण नेहमीच ऐकत, वाचत किंवा बघत असतो. मग माईकच्या मागे धोनी किंवा रिषभसारख्या मिश्किल यष्टिरक्षकांनी केलेली गंमत असो, किंवा ऑस्ट्रेलियन खेळाडू ज्यात माहीर होते, ते स्लेजिंग… 

आज असाच एक मजेशीर किस्सा शेअर करतोय, जो एकाचवेळी मैदानावर आणि मैदानाबाहेर सुद्धा अनेकांसाठी चिंतेचा आणि ताणाचा विषय होऊन गेला होता. या टेन्शनच्या वातावरणासाठी कारणीभूत असलेला लक्ष्मण मात्र बाथरूममध्ये आरामात अंघोळ करण्यात मग्न होता.

 

vvs laxman inmarathi

===

हे ही वाचा – या किडकिडीत भारतीय खेळाडूने ओढली होती ऑस्ट्रेलियन गोलंदाजाची मिशी!! 

===

लक्ष्मणची नेहमीची सवय

व्हीव्हीएस अर्थात व्हेरी व्हेरी स्पेशल लक्ष्मणला एक सवय होती, ती म्हणजे फलंदाजीला जाण्याआधी अंघोळ करण्याची. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणारा लक्ष्मण, सहसा भारताचा डाव सुरु झाल्यावर किंवा पहिला गडी बाद झाल्यावर एक शॉवर घेऊन फ्रेश व्हायचा आणि मग तिसरा गडी बाद झाला की मैदानावर उतरायचा.

खरंतर त्याच्या या नेहमीच्या वागण्यात चुकीचं किंवा कुणासाठी तापदायक ठरू शकेल, असं काहीच नव्हतं. तरीही त्याची हीच सवय २००७ सालच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर असताना त्याच्या अंगाशी आली होती. केवळ लक्ष्मणच नाही, तर संघातील इतरही काही खेळाडूंना त्याच्या या सवयीचा फटका बसला होता.

 

laxman and dravid inmarathi

 

सचिनला मैदानावर मज्जाव

या सामन्यात वीरेंद्र सेहवाग आणि वासिम जाफर भारताचे सलामीवीर होते. हे दोघे मैदानावर उतरले आणि लक्ष्मणने सवयीप्रमाणे बाथरूम गाठलं. पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या लक्ष्मणच्या दृष्टीने सारं काही सुरळीत सुरु होतं. वीरू आणि जागफर यांनी मात्र, ‘पळा पळा, कोण पुढे पळे तो…’ अशा मूडमध्ये फलंदाजी केली.

वीरू बाद झाल्यावर कप्तान राहुल द्रविड मैदानावर स्थिरस्थावर होण्याआधीच जाफरने सुद्धा तंबूची वाट धरली. अवघ्या ६ धावांमध्ये भारताने २ गडी गमावले आणि सचिन मैदानाकडे निघाला. इथेच खरी मेख होती.

सचिन फलंदाजीसाठी निघाला खरा, मात्र त्याला फलंदाजी करण्याची परवानगी नाकारण्यात आली. चौथ्या अंपायरने त्याला मैदानावर जाण्यापासून रोखलं.

 

sachin-sad-inmarathi

 

याचं कारणही अगदी योग्यच होतं. आदल्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा डाव संपण्याच्या काही काळ आधीच सचिनने मैदान सोडलं होतं.

क्रिकेटच्या नियमानुसार खेळाडू जितका काळ क्षेत्ररक्षणासाठी मैदानावर नसेल, तेवढा वेळ तो फलंदाजीला येऊ शकत नाही. सचिनला फलंदाजी करण्याची परवानगी मिळण्यासाठी काही मिनिटांचा अवधी बाकी होता. त्यामुळे त्याला फलंदाजी करता येणार नव्हती.

यात खरं तर चौथ्या पंचांची सुद्धा चूक होती. काही काळ सचिनला फलंदाजी करता येणार नाही, याची कोणतीही पूर्वकल्पना संघाला किंवा सचिनला त्यांनी दिली नव्हती. अर्थात, आता वेळ निघून गेली होती आणि लक्ष्मणला मैदानावर येणं भाग होतं.

===

हे ही वाचा – खांद्याला चेंडू लागला, अंपायरने सचिनला आऊट दिलं. तो क्षणभर स्तब्ध झाला आणि…

===

लांडगा आला रे आला

ऑफस्पिनर हरभजन याने लगेचंच बाथरूमचा रस्ता धरला. ‘तुला फलंदाजीला जावं लागणार आहे, बाहेर ये.’ असा निरोप त्याने लक्ष्मणला दिला. मात्र, हरभजन हा एक गमत्या माणूस म्हणून ड्रेसिंग रूममध्ये प्रसिद्ध होता. हा फिरकीपटू, नेहमीप्रमाणे मैदानाबाहेर आपली फिरकी घेतोय, असं वाटून लक्ष्मणने त्याच्या सूचनेकडे साफ दुर्लक्ष केलं.

उलट त्याने छान गाणी गुणगुणायला सुरुवात केली आणि हरभजनच्या बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं.

 

vvs laxman and harbhajan singh inmarathi

 

नेहमीच खेळाडूंची मस्करी करण्याची सवय हरभजनला आणि पर्यायाने अख्ख्या संघाला महागात पडली. भज्जी खरं बोलतोय हे सांगण्यासाठी खुद्द सचिनला तिथे पोचावं लागलं. त्यामुळे ड्रेसिंगरूममधील ताण आणि धावपळ आणखीच वाढली, हे वेगळे सांगणे न लगे.

दादाची धावपळ

सचिन आणि लक्ष्मण दोघेही नाहीत म्हटल्यावर सौरव गांगुलीला फलंदाजीला जावं लागणार होतं. आता जिथे फलंदाजीसाठी लक्ष्मणच तयार नव्हता, तिथे दादाकडून तरी कशी अपेक्षा करावी. त्यामुळे त्याची धावपळ होणं साहजिक होतं.

अर्थात, इथे केवळ त्याचीच नाही, तर अनेकांची धावाधाव सुरु झाली. कुणी बॅट घेऊन येतोय, कुणी दादाचा शर्ट घेऊन येतोय, दोन जण दादाला दोन पायांचे पॅड बांधून द्यायला मदत करतायत, अशी त्याची खातीरदारी सुरु झाली. राजघराण्यातील असलेल्या दादाला नुसतंच महाराजा म्हणत नाहीत, तर महाराजासारखी त्याची सेवाही होते याचं दर्शन त्यावेळी भारताच्या ड्रेसिंग रूममध्ये झालं…

शेवटी कसाबसा तयार होऊन गांगुली मैदानावर उतरला. मात्र यासगळ्या गडबडीत ३ मिनिटांचा अवधी कधीच उलटून गेला होता. फलंदाजीला जाण्यासाठी इतके कष्ट घ्यावे लागले त्यामुळे दादासुद्धा वैतागला होता. पण खरं टेन्शन होतं, त्याला टाइम आउट ठरवलं जाण्याचं.

 

saurav ganguly inmarathi

===

हे ही वाचा – या बस ड्रायव्हरमुळे गांगुलीने लॉर्ड्सच्या मैदानावर टि-शर्ट काढला होता

===

मैदानावरची लढाई

ड्रेसिंग रूममध्ये ड्रामा सुरु असताना संघाचा कप्तान राहुल द्रविड मैदानावर वेगळीच लढाई लढत होता. काहीतरी गोंधळ सुरु आहे, आणि त्यामुळेच पुढचा फलंदाज मैदानावर आलेला नाही हे एव्हाना सगळ्यांच्या लक्षात आलं होतं. नेहमीच संघाच्या भल्यासाठी पडेल ती जबाबदारी खांद्यावर उचलणारा द्रविड, यावेळी तर संघाचा कर्णधारच होता.

त्याने प्रसंगावधान राखलं, आणि दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार ग्रॅमी स्मिथशी चर्चा करून ठेवली. सचिनला खेळण्याची परवानगी न मिळाल्याने पुढचा खेळाडू मैदानावर यायला उशीर होत असल्याने, टाइम आउटसाठी अपील करू नये अशी विनंती द्रविडने केली होती.

दक्षिण आफ्रिका संघानेही खिलाडूवृत्ती दाखवली आणि खेळाडूला बाद ठरवण्यासाठी कुठलंही अपील पंचांकडे केलं नाही.

नेहमीच संघाचं भलं करण्यासाठी पुढे असणाऱ्या द्रविडने इथेही त्याची जबाबदारी चोख पार पाडली. उगाच नाही, तो माझ्यासारखा क्रिकेट चाहत्यांचा आवडता खेळाडू आणि व्यक्ती ठरत…!!

 

rahul dravid gentleman inmarathi

 

गुरु ग्रेग चॅपल यांचा नवीन नियम

असं म्हटलं जातं, की या प्रसंगाचा धसका घेऊन, मैदानावर आल्यानंतर कुणीही अंघोळीला जायचं नाही, असा नवा नियम त्यावेळी प्रशिक्षक असणारे ग्रेग चॅपल यांनी ठरवून दिला होता.

भारतीय संघावर अनेक प्रयोग करणारे ग्रेग चॅपल यांनी असा नियम खरंच अस्तित्वात आणला असेल, असं मानायला मला तरी कुठलीही हरकत नाही. अर्थात, ही अशी गडबड पुन्हा होऊ नये, यासाठीच त्यांनी हा नियम केला असणार त्यामुळे या बाबतीत तरी त्यांचा राग येण्याचं काहीच कारण नाही.

 

greg chappel inmarathi

===

हे ही वाचा – चॅपेलने आपल्या भावाला सरपटी बॉल टाकायला सांगितला, तेव्हापासून बंदी आहे सरपटी बॉलिंगवर!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

InMarathi.com वर विविध लेखकांनी व्यक्त केलेले विचार ही त्यांची वैयक्तिक मतं असतात. InMarathi.com त्या मतांशी सहमत असेलच असं नाही. | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटरइंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?