' जेव्हा 'रॉ'ने स्वतःच इंडियन एअरलाईन्सचं विमान 'हायजॅक' केलं होतं...

जेव्हा ‘रॉ’ने स्वतःच इंडियन एअरलाईन्सचं विमान ‘हायजॅक’ केलं होतं…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांचा वॉर हा चित्रपट तुम्ही बघितलाच असाल. त्यामध्ये टायगर श्रॉफचा डमी, मिशनवर असलेल्या हृतिक रोशनला विष देऊन मारून टाकतो.

शत्रू पक्षाला वाटतं की त्यांच्या मार्गतला मोठा अडथळा दूर झाला. पण, ऐन क्लायमॅक्सच्या सिनमध्ये तोच मेलेला हृतिक रोशन परत येऊन त्यांच्या प्लॅनवर पाणी फेरतो आणि देशाला वाचवतो.

सांगायचं तात्पर्य काय, तर शत्रूला त्याच्या मनासारखं झालंय असं वाटू द्यायचं, त्यांना त्यांच्या मतानुसार काम करू द्यायचं आणि योग्य वेळ आली की कंट्रोल आपल्या हातात घेऊन खेळ हवा तसा फिरवायचा.

 

war movie inmarathi

 

जेम्स बॉण्ड पटाचे चाहते असाल तर या गोष्टी तुम्हाला नवीन नसतील. अर्थात, या झाल्या चित्रपटातल्या गोष्टी. खऱ्या आयुष्यात असं काही शक्य आहे का.?

शक्य जरी असलं, तरी त्याची विश्वासार्हता किती ते सांगणं कठीण आहे. पण भारताची गुप्तचर संघटना रिसर्च अँड अॅनालिसिस विंग अर्थात ‘रॉ’चे कारनामे हे शंका घेण्यासारखे नाहीत.

जेव्हा जेव्हा त्यांनी बातम्या पुरावल्या आहेत, त्या खऱ्या निघाल्या आहेत. त्यात त्यांनी हातात घेतलेली मिशन्स तर अंगावर शहारे आणतील एवढी भयानक आहेत.

आज ‘रॉ’च्या अशाच एका मिशनबद्दल आपण जाणून  घेणार आहोत, ज्यात त्यांनी पाकिस्तानला त्यांच्या प्लॅननुसार काम करू देऊन आपलं कार्य साधलं होतं.

 

raw indian intelligence inmarathi

===

हे ही वाचा – RAW उभी करणाऱ्या गुप्तहेराची, अप्रसिद्ध, थरारक ‘गुप्त जीवनगाथा’…

===

तो काळ होता सत्तरच्या दशकातला. बांगलादेश अस्तित्वात त्यावेळी आलेला नव्हता. पूर्व पाकिस्तान हा बंगाली भाषिक मुस्लिमांचा प्रदेश तर पश्चिम पाकिस्तान हा उर्दू भाषिक. पाकिस्तानात निवडणुकीचे पडघम वाजायला सुरवात झाली, होती आणि पूर्व पाकिस्तानमधील बंगाली नेते मुजीब उर रहमान हे त्या निवडणुकीत फेव्हरेट होते.

निवडणूक शेजारील देशात आहे त्यात आपल्याला काय,असं म्हणून विषय सोडता येऊ शकत होता. पण रहमान यांचं निवडणूक जिंकणं भारतासाठी फायदेशीर ठरणार होतं.

जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अल फतेह नावाच्या एका नवख्या दहशतवादी संघटनेने जम्मू काश्मीर बँकेवर दरोडा घातला. नवीन असल्याने सगळे दरोडेखोर पकडले गेले. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच त्यांनी सगळं सत्यकथन करायला सुरवात केली.

पोलिसांना अशी काही माहिती मिळाली, की त्यांना त्यामध्ये ‘रॉ’ला सामील करून घ्यावं लागलं. ही माहिती होती, पूर्व पाकिस्तानात निवडणूकीदरम्यान लष्करी उलटफेर करण्याची.

तात्काळ ‘रॉ’ने एक मिशन हाती घेतलं, ते म्हणजे काहीही करून पाकिस्तानमध्ये होणारी निवडणूक सुरळीत व्हावी. अधिक माहिती घेण्यासाठी ‘रॉ’ने आपला एजंट पाकिस्तानमध्ये अॅक्टिव्ह केला. त्याचं नाव ‘हाशिम कुरेशी’!

असं म्हटलं जातं, की ‘रॉ’ला डबल क्रॉस करून हा पाकिस्तानच्या आयएसआयमध्ये सामील झाला होता. तर काही जण असंही म्हणतात, की ‘रॉ’च्या संगण्यावरूनच तो आयएसआयमध्ये भरती झाला होता.

 

isi pakistan intelligence agency inmarathi

 

काय घटना घडली…

१७ वर्षाचा हाशिम कुरेशी पाकिस्तानमध्ये भेटतो ते मकबूल भटला. याने त्याचा ब्रेन वॉश करून त्याला आयएसआयमध्ये सामील करून घेतलं, असं म्हटलं जातं. या हाशिम कुरेशीवर एक मोठी जबाबदारी टाकली गेली.

जम्मूमध्ये पकडले गेलेले दहशतवादी सोडवण्याची जबाबदारी. आणि हे दहशतवादी सोडवण्यासाठी त्यांना योग्य मार्ग वाटला तो विमान हायजॅकिंगचा.

हे कुठलं साधंसुधं विमान नाही, तर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे चिरंजीव राजीव गांधी चालवत असलेले एयर इंडियाचे विमान असणार होतं.

सगळं प्लॅनिंग आणि जागा निश्चित झाल्यावर आयएसआयने हाशिम कुरेशीला आपल्या मिशनवर सोडून दिले. अटारी बॉर्डर क्रॉस करताना बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेसच्या जवानांना हाशि वर संशय आला आणि तडक त्याला अटक करून ‘रॉ’च्या ताब्यात देण्यात आलं.

‘रॉ’ला फार मेहनत करावी लागली नाही. हाशिमने आयएसआयचा सगळा प्लॅन ‘रॉ’च्या अधिकाऱ्यांसमोर सांगून टाकला. ‘रॉ’ अशाच एका संधीची वाट बघत होती. ती संधी त्यांना आयतीच मिळाली.

===

हे ही वाचा – ब्लॅक टायगर: पाकिस्तानी सैन्यात राहून गुप्तहेरी करणारा धाडसी RAW एजंट!

===

त्यावेळी पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान यांना सर्वाधिक कमी अंतरात जोडणारा मार्ग होता, तो हवाई मार्ग. पण त्यासाठी त्यांना भारतीय हवाई हद्दीतून उड्डाण आवश्यक असायचं.

भारताने जर आपली हवाई सीमा बंद केली, तर पाकिस्तानी विमानांना पार श्रीलंकेला वळसा घालून पूर्व पाकिस्तानात दाखल व्हावं लागायचं.

यामध्ये तिप्पट इंधन, तिप्पट वेळ आणि बराच अधिक पैसा हा खर्च होत असे. त्यामुळे भारतीय हद्दीचा वापर करणे, हा पाकिस्तानी विमानांचा नाईलाज होता.

…आणि ऑपरेशन सुरु झालं

पूर्व पाकिस्तानात येऊ घातलेली राजकीय उलटफेर रोखण्यासाठी ‘रॉ’ला आणि पर्यायाने भारताला आयती संधी मिळाली. आयएसआयच्या प्लॅननुसार ‘रॉ’ने हाशिमला काम करायला सांगितलं आणि त्याला हत्यारे सुद्धा पुरवण्यात आली. अर्थात ही हत्यारं बनावट होती. हा योजनेचाच एक भाग होता.

फक्त प्लॅनमध्ये थोडा बदल केला गेला. राजीव गांधी उडवत असलेल्या एयर इंडियाच्या विमानाऐवजी, जुने असल्याने कार्यरत नसलेले एयर इंडियाचेच ‘गंगा’ हे जम्मूवरून श्रीनगरला जाणारे विमान आणले गेले.

 

ganga hijack inmarathi

 

या प्लॅनमध्ये हाशिम कुरेशीचा चुलत भाऊ अश्रफ कुरेशी देखील सामील झाला होता.

ठरल्याप्रमाणे ३० जानेवारी १९७१ ला जम्मूवरून उड्डाण भरलेल्या गंगा विमानाच्या पायलट केबिनमध्ये घुसून हाशिमने विमानाच्या पायलटच्या डोक्यावर बंदूक ठेवून ते विमान लाहोरच्या दिशेला वळवलं.

अश्रफ हातात ग्रेनेड घेऊन कॉकपिटमध्ये आला तसं विमानात असलेल्या प्रवाशांना कळून चुकलं की विमान हायजॅक झालं आहे. लाहोरला विमान लँड झाल्यावर राजीव गांधी पकडले गेले याचा आयएसआयला भलताच आनंद झाला. कुरेशी बंधूंच्या कामगिरीवर ते खूप खुश झाले. इथे भारताने आपला डाव खेळला.

 

rajiv gandhi inmarathi

 

आपलं विमान पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हायजॅक केलं असून, ते लाहोरला असल्याची पुष्टी करून भारताने पाकिस्तानी विमानांसाठी आपली हवाई हद्द बंद केली.

आता पाकिस्तानी लष्कराला पार कोलंबो मार्गे ढाका गाठावं लागणार होतं. तिथे पूर्व पाकिस्तानमध्ये उलटफेर करायला टपून बसलेल्या पाकिस्तानी लष्कराचे आता सगळं लक्ष या हायजॅकिंगच्या प्रकरणाकडे वळलं. कारण राजीव गांधी हाती लागले नाहीतच, शिवाय भारताने हद्द बंद केली आणि जगात नाक कापलं गेलं होतं ते वेगळं…!!

त्यामुळे जे काही  घडलं आहे ते सावरण्यासाठी आयएसआयने भारताचं विमान प्रवाशांसकट मुक्त केलं आणि हाशिम कुरेशीला सुद्धा भारतात पाठवलं. हाशिमला आपल्याकडे ठेवून पाकिस्तान आपली आणखी नाचक्की करून घ्यायच्या तयारीत नव्हता.

हे प्रकरण थंड होई पर्यंत तिथे मुजीब उर रहमान यांचा प्रचंड मोठा विजय झाला होता. आणि झुल्फिकार भुट्टो यांचा पराभव झाला होता.

===

हे ही वाचा – देशाच्या सुरक्षेसाठी गुप्तपणे काम करणाऱ्या रॉ (RAW) बद्दल काही अभिमानास्पद गोष्टी!

===

कालांतराने पाकिस्तानात या प्रकरणाच्या चौकशीसाठी एक समिती नेमली गेली. त्या समितीने आपल्या रिपोर्टमध्ये उल्लेख केला की ‘हे सगळं भारतीय गुप्तचर संघटना ‘रॉ’ने रचलेलं कुंभाड आहे.’

गाफील राहिलेल्या आयएसआयच्या मुर्खतेचा पुरेपूर फायदा उचलत भारताने रहमान यांच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. पुढे पूर्व पाकिस्तानात काय झाले ते सर्वश्रुत आहे. ज्याने तिसऱ्या भारत पाक युद्धाला तोंड फुटून बंगाली भाषिक बांगलादेशची निर्मिती झाली आणि या सगळ्याचा पाया घातला तो ‘रॉ’च्या या गंगा हायजॅकिंग मिशनने!

 

raw india inmarathi

 

गंगा हायजॅकिंगसारखं काही घडलंच नव्हतं, असं रॉ अजूनही सांगते. पण दुनियेच्या पाठीमागून सुरू असलेली अशी प्रकरणं काही ना काही मार्गाने प्रकाशात येतच असतात. मग ते मोसाद असो, सीआयए असो, एमआय सिक्स असो वा खुद्द रॉ असो.!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?