' अकबराला अद्दल घडवणारा, असाही एक अज्ञात श्रीकृष्ण भक्त…!! – InMarathi

अकबराला अद्दल घडवणारा, असाही एक अज्ञात श्रीकृष्ण भक्त…!!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एका सर्वसाधारण कुटुंबात जन्मलेला जन्मांध  मुलगा बालपणीच कृष्णभक्तीमार्गावर वाटचाल करतो, हजारो काव्यरचना रचतो आणि इतका प्रसिद्ध होतो की खुद्द अकबर त्याच्या भेटीला दाखल होतो, मुघल शासकाकडून दिलेले हजारो नजराणे नाकारत केवळ कृष्णभक्तीत लीन होतो… एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी अशी ही कहाणी काही वर्षापुर्वी आपल्या देशात प्रत्यक्षात अनेकांनी अनुभवली होती.

कोण होता हा मुलगा? जन्मांध असूनही काव्यरचना करण्याची, त्या लिहीण्याची प्रेरणा त्याला नक्की कशी मिळाली? हा दैवी चमत्कार, त्याच्यावरील कृष्णाचा वरदहस्त की निव्वळ एक दंतकथा? अशा असंख्य प्रश्नांचा शोध ज्यांच्याबाबत घेतला जातो, ते म्हणजे ‘कवी सुरदास’. हिंदी साहित्यातील एक अग्रगण्य असलेलं हे नाव ख-याअर्थी ओळखंलं जातं ते त्यांच्या अफाट कृष्णभक्तीसाठी.

 

surdas inmarathi

 

कृष्णभक्तांची यादी त्याच्या लिलांइतकीच मोठी, अगाध…मग त्याचा सवंगडी असलेला पेंद्या असो वा त्याच्या ध्यासात रमणारी संत मीराबाई…या सर्वांमध्ये सुरदास हे नाव मात्र अग्रक्रमाने घेतलं जातं. मात्र त्यांच्या रचना आणि कृष्णभक्ती यापलिकडे त्यांचा जीवनपट फारसा कुणाला ठाऊक नाही. ज्यांनी तो जाणून घेतला त्यांमध्ये अनेक मतमतांतरे आहेत. या वादांच्या पलिकडे जात सुरदासांचा जीवनपट जाणून घेणं ही अत्यंत महत्वाची बाब आहे.

आत्ताच्या दिल्लीहून काही किलोमीटर अंतरावरील सीही खेडेगावातील सारस्वत ब्राह्मण कुटुंबात सुरदासांचा जन्म झाला. जन्मे नेमक्या कोणत्या साली झाला याबाबत ठोस माहिती उपलब्ध नसली तरी इतिहासकारांच्या मते १४७८-१५८५ या त्यांचा कालखंड मानला जातो.

सुशिक्षित मात्र सर्वसामान्य परिस्थिती असणा-या पालकांच्या पदरी जन्मांध पुत्र आला, त्यामुळे वडिलांचे त्यांच्याकडे काहीसे दुर्लक्ष झाले. याबाबतही अनेक मतमतांतरे आढळतात. बहुतांश जाणकारांनी सुरदास हे जन्मांध असल्याचे सिद्ध केले असले तरी काही इतिहासकाराच्या मते ते जन्मांध नसून काही काळानंतर त्यांची दृष्टी गेली. मात्र सुरदासांचे गुरु वल्लभाचार्य यांच्या कुळातील काही जाणकारांनी सुरदास जन्मांध असल्याचा उल्लेख लेखनात केला आहे.

अंधत्व असलं तरी शुद्ध वाणी आणि कल्पनाशक्ती यांच्या बळावर बाल सुरदासांनी काव्यरचना म्हणण्यास सुरुवात केली. अनेकांसाठी हे आश्चर्य होते. काव्यरचेनेत रमणारे सुरदास ज्योतिषविद्याही शिकून उदरनिर्वाह करू लागले मात्र या सा-यात त्यांचं मन रमेनासं होताच त्यांनी घराकडे पाठ फिरवली.

यमुनातिरी गौघाट येथे आपल्या कुटीत त्यांची साधना सुरु झाली. ही साधना म्हणजे केवळ कृष्णभक्तीची आस, श्रीकृष्णापर्यंत भक्ती पोहोचवण्यासाठी केली जाणारी काव्य. अशातच मथुरेतील एका यात्रेत त्यांची भेट वल्लभाचार्याशी झाली आणि सुरदासांनी त्यांना गुरु मानले. यामुळे साहित्यासह अध्यात्मिक वाटचालही सुरु झाली.

 

surdas guru inmarathi

 

सुरदास आणि त्यांच्या रचना हे कोडं आजही अनेकांना उकललेलं नाही. जन्मांध असलेल्या, औपचारिक शिक्षण न घेतलेल्या व्यक्तीने ब्रीज भाषेत एवढ्या रचना लिहाव्यात हा काहींसाठी वादाचा मुद्दा असला तरी त्यांनी शब्दबद्ध केलेले ‘सुरसागर’, ‘सुरसरावली’ हे ग्रंथ त्या सगळ्या वादाचे उत्तर आहेत.

हे ही वाचा – श्रीकृष्णाची प्राणप्रिय द्वारका नगरी पाण्यात का बुडाली? वाचा ही रंजक कथा

जाणकारांच्या मते सुरदासांनी कृष्णलिलांचं वर्णन करणा-या तब्बल १ लाखांहून अधिक रचना केल्या, मात्र दुर्दैवाने त्यातील ८-१० हजार रचना आज संग्रही आहेत. कृष्णजन्म, बाललिला आणि यौवनातील रासलिला यांचं वर्णन प्रामुख्याने त्यांच्या रचनांमध्ये दिसून येतं.

“मैया मे नही माखन खायो” हे सुरदासांचे शब्द अनेक शतकांनंतर आजही घराघरात ऐकले जातात हेच त्यांच्या लेखनकौशल्याचं वैशिष्ठ्य! साध्या सोप्या तरिही रसाळ भाषेत केलेलं वर्णन श्रीकृष्णाचं खरंखुरं रुप नजरेसमोर उभं करतं. त्यांच्या याच कौशल्यामुळे अनेकांनी ते जन्मांध नसल्याबाबत टिका केली आहे. ज्याने श्रीकृष्णाचे रुप कधीही पाहिले नाही त्यांना इतके हुबेहुब वर्णन करणे निव्वळ अशक्य आहे असा प्रतिवाद केला जातो, मात्र काही अख्यायिकांमध्ये या वादाचे उत्तर सापडते. सुरदासांना प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने दर्शन दिल्याने दृष्टी नसूनही त्यांनी कन्हैैयाचे रुप पाहिले आणि आपल्या रचनांमध्ये रेखाटले.

 

surdas 1 inmarathi

 

अकबराला रोखठोक उत्तर

त्याकाळी मुस्लिम शासक अकबर याचा प्रचंड बोलबाला आणि दहशत होती. मात्र कलेवर प्रेम असणा-या अकबराने सुरदासांची काही काव्य ऐकली आणि न राहून त्यांनी सुरदासांना महालात येण्याचे निमंत्रण दिले. या निमंत्रणासह अनेक नजराणेही पाठवण्यात आले मात्र सुरदासांनी नम्रपणे ते नजराणे परत पाठवले. त्यासह त्या निमंत्रणालाही नकार देत, “मला महालात येणे शक्य नाही, मात्र तुमची इच्छा असल्यास तुम्ही माझ्या कुटीत या” असा संदेशही दिला.

अकबराला असा संदेश म्हणजे धारिष्ट्य होते, पण सुरदासांना याची तमा नव्हती. सुरदासांकडून असे अनपेक्षित उत्तर येऊनही अकबर त्यांच्या भेटीस गेला. सुरदासांचे काव्य ऐकून भारावलेल्या अकबराने त्यांना स्वतःवर अर्थात अकबरावर काव्य रचण्यास सांगितले, मात्र सुरदासांनी त्यालाही नकार देत “कृष्णभक्ती हेच केवळ माझे ध्येय असल्याने मला इतर काहीही सुचणार नाही” असे स्पष्ट केले.

 

 

surdas akbar 1 inmarathi

 

या संवादानंतरही अकबराचा पारा चढला नाही हे नवलच! अकबरानेच पुढे काही कवींच्या मदतीने सुरदासांच्या काव्याचे फारसीमध्ये भाषांतर करून घेतले असाही उल्लेख इतिहासकारांनी केला आहे.

जातीभेदाला विरोध

सुरदासांनी कृष्णलिलांसह ज्या काही इतर रचना रचल्या त्यात त्यांनी कर्मकांड, जातीभेद यांना विरोध केला. साहित्याच्या माध्यमातून त्यांनी तत्कालीन समाजप्रश्नावर भाष्य केलं. जातीभेद, स्त्रियांवरील अन्याय, कर्मकांड, जातीभेद, कौटुंबिक कलह अशा अनेक प्रश्नांबाबत त्यांनी प्रबोधन केलं.

सुरदासांचे गुरु यांनी त्यांची कृष्णभक्ती पाहून त्यांना ‘सागर’ अशी उपाधी दिली. काव्यरचनांसह आपल्या मधुर वाणीने ते रचनांचे गायनही करायचे.

उत्तर भारतात त्यांचे प्रामुख्याने वास्तव्य असल्याने तेथे त्यांनी अनेक चमत्कार घडवल्याच्याही कथा प्रसिद्ध आहेत. मात्र चमत्कारांच्या पलिकडे जात त्यांनी केलेले कार्य, रचना आजही अभ्यासल्या जातात.

कृष्णाच्या नामस्मरणातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

 

surdas krishna inmarathi

 

सुरदासांच्या रचनांइतके कृष्णसाहित्य इतर कुणीही केले नाही असा दावा केला जातो, त्यांच्या अनेक रचना दुर्दैवाने उपलब्ध नसल्याने त्या वादाच्या भोव-यातही अडकल्या जातात, मात्र सुरदासांचे अस्तित्व, त्यांचे कार्य यांवर कोणताही संदेह नाही.

सुरदासांचा जीवनपट हा त्यांच्या रचनांइतकाच मधूर, वैविध्यपुर्ण आणि मोहून टाकणारा आहे.

हे ही वाचा – कथा शबरीची: फारशी माहित नसलेली, पण तिच्या बोरांइतकीच गोड आणि ह्रदयस्पर्शी!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?